बिहार निकालाचा अन्वयार्थ

jalgaon-digital
6 Min Read

– प्रा. पोपट नाईकनवरे

बिहारमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु जिंकणारे किती जिंकले आणि हरणारे किती हरले? असा प्रश्न विचारला जात आहे. काही राजकीय निरीक्षक हा निकाल अंतिम मानत नाहीत; तथापि एनडीएचा पुन्हा विजय झाला हे वास्तव आहे.

तेजस्वी यादव यांनी त्यांची राजकीय उंची सिद्ध केली आहे. चिराग पासवान, असदुद्दीन ओवैसी, यांनी जसे आपले अस्तित्व दाखवून दिले त्याचप्रमाणे डाव्या पक्षांनीही 16 जागा मिळवून चांगले ‘कमबॅक’ केले आहे.

बिहारच्या जनतेने जनार्दनाची भूमिका बजावून पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) पारड्यात बहुमत टाकले आहे. या यशामुळे एनडीएच्या घटकदलांना आनंद जरूर झाला असेल; परंतु या जनादेशाने काही स्पष्ट संदेशही सत्ताधार्‍यांना दिले आहेत. जिंकणारे किती जिंकले आणि हरणारे किती हरले? असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी या निकालाचे विश्लेषण करावे लागेल. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) गेल्या वेळेपेक्षा यावेळी 29 जागा कमी मिळाल्या असून, 42 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. याचाच अर्थ ही जेडीयूचा नव्हे तर एनडीएचा विजय आहे. 74 जागा जिंकणारा भाजप आता ‘बडे भाई’च्या भूमिकेत असेल, हे सांगण्याची गरज नाही. राजकारणाचा बुद्धिबळ लहान भावाला मोठा आणि मोठ्या भावाला लहान कधी करेल, हे सांगता येत नाही. अशा स्थितीत नितीशकुमार मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार असतील का, हा पहिला प्रश्न. निर्णय तर नितीशकुमारांनाच घ्यायचा आहे; कारण जेडीयूच्या जागा कमी निवडून आल्या असतील तरी नितीशकुमार यांनाच मुख्यमंत्री करण्याची आपली इच्छा आहे, असे भाजपने स्पष्ट केले आहे.

एक प्रश्न असाही निर्माण होतो आहे की, एवढे मोठे यश संपादन करणारा भारतीय जनता पक्ष 2024 ची लोकसभा निवडणूकसुद्धा नितीशकुमारांना पुढे करून लढवू इच्छित असेल का? या प्रश्नाचे उत्तर अजूनही भविष्याच्या अनिश्चिततेत असले, तरी अनेकदा भूतकाळाच्या गर्भात भविष्यकाळातील दिशेचे संकेत दडलेले असतात.

मतदानाची आकडेवारी असे सांगते की, स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘हनुमान’ म्हणवून घेणार्‍या चिराग पासवान यांनी जेडीयूचे प्रचंड नुकसान केले आणि कमीत कमी 30 जागांवर त्यांच्या उमेदवारांना मोठा तोटा सहन करावा लागला. जर चिराग यांनी एनडीएमधून निवडणुका लढविल्या असत्या तर चित्र काही औरच पाहायला मिळाले असते. एनडीएचे एवढे नुकसान केल्यानंतरसुद्धा भाजप केंद्रात चिराग यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविणार का, हेही पाहावे लागेल. जर त्यांनी त्यांचे पिता रामविलास पासवान यांची जागा भरून काढण्याचे ठरविले, तर लोकसभा निवडणुकीसंबंधी निर्माण होत असलेल्या शंकांना बळ मिळेल.

तेजस्वी यादव यांच्याविषयी भाष्य केलेच पाहिजे. 2015 ची निवडणूक जेडीयू आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांनी एकत्रितपणे लढविली होती, हे उघड सत्य आहे. तेव्हा लालूप्रसाद यादव यांनी स्वतः आघाडीचे निमंत्रकपद स्वीकारले होते. यावेळी ते तुरुंगात होते आणि अर्थातच सर्व मदार एकट्या तेजस्वी यादव यांच्यावर होती. यावेळी त्यांच्याकडे नितीशकुमार यांच्यासारखा भागीदार नव्हता. ही पोकळी त्यांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या माध्यमातून भरून काढण्याचा प्रयत्न केला. ऐन निवडणुकांच्या वेळी व्हीआयपी, हम आणि राष्ट्रीय लोक समता पार्टी या पक्षांनी महाआघाडीपासून फारकत घेतली होती. महाआघाडीची बाजू निश्चितच यामुळे कमकुवत झाली होती. परंतु असे असूनही तजस्वी यादव यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करून रान पेटविले. मोठ्या संख्येने गर्दी जमविण्यात ते यशस्वी झाले; परंतु मतदारांना त्यांच्याविषयी विश्वास देऊ शकले नाहीत, हे मतदानातून स्पष्ट झाले. महाआघाडीला युवकांची मोठी साथ लाभली; परंतु महिलांनी एनडीएलाच बळ दिले. त्याचा परिणाम स्पष्ट दिसत आहे. ‘जंगलराज’ची संकल्पना अद्यापही ताजी असावी का? महाआघाडीचे कुटुंब अशा प्रकारे विखुरले नसते तर निकाल काय लागले असते? हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. म्हणूनच, निवडणुकीत पराभव होऊनसुद्धा तेजस्वी यादव यांची राजकीय उंची खूपच वाढली आहे, असे बिनदिक्कत म्हणता येते.

डाव्या आघाडीची चर्चाही या ठिकाणी करणे गरजेचे आहे. या निवडणुकीत तब्बल 16 जागा जिंकून डाव्यांनी दमदार ‘कमबॅक’ केले आहे. आरजेडीने डाव्यांना आणि डाव्यांनी आरजेडीला मोठे बळ दिले.

भाजपची जोरदार मुसंडी आणि डाव्यांचा चढता आलेख एकाच वेळी, एकाच राज्यात दिसणे ही आश्चर्याचीच बाब! राजकारणात वैचारिक संघर्षाचे दिवस संपले, असे कोण म्हणेल? पाच जागा जिंकून असदुद्दीन ओवैसी यांनीही ताकद दाखवून दिली आहे. चिराग पासवान यांनी जेडीयूचा खेळ बिघडवला तसेच ओवैसींनी महाआघाडीचे नुकसान केले; परंतु चतुराईने स्वतःचे अस्तित्व दाखवून दिले. महाराष्ट्रानंतर बिहार हे त्यांच्या भावी राजकारणाचा मार्ग प्रशस्त करणारे राज्य असेल. डाव्या पक्षांनीही राष्ट्रीय पातळीवर अशी काही रणनीती आखली असेल का?

कोरोना, स्थलांतरित मजूर, चीन आणि आर्थिक समस्या असे मुद्दे असतानासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली लोकप्रियता कायम ठेवली याचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. त्यांच्याविना एवढी मोठी मुसंडी मारण्याची कल्पनाही भारतीय जनता पक्ष करू शकला नसता. केवळ बिहारमध्येच नव्हे, तर देशातील ज्या राज्यांमध्ये पोटनिवडणुका झाल्या, त्या सर्व राज्यांत भाजपला मोठे यश मिळाले आहे. प्रत्येक निवडणुकीगणिक आपली लोकप्रियता अधिकाधिक वर्धिष्णु राखणारा मोदींसारखा दुसरा नेता आजमितीस भारतात नाही.

या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढणे अपेक्षितच आहे. काही राजकीय समीक्षक 10 तारखेला लागलेले निकाल अंतिम मानत नाहीत. सत्तेच्या प्रांगणात आणखी काही मोहरे आपली वेळ येण्याची प्रतीक्षा करीत असणे शक्यही आहे. तूर्तास मात्र एनडीएसाठी सत्तेचा मार्ग बिहारमध्ये पुन्हा एकदा प्रशस्त झाला आहे. नव्याने स्थापन होणारे सरकार बिहारी जनतेच्या आकांक्षांचा विचार करेल आणि त्यानुसार कारभार करेल, अशी अपेक्षा बाळगूया.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *