पशुवैद्यकाचे प्राण्यांशी नातेच वेगळे!

जागतिक पशुवैद्यकीय दिनविशेष
पशुवैद्यकाचे प्राण्यांशी नातेच वेगळे!

आज जागतिक पशुवैद्यकीय दिवस (World Veterinary Day). दर वर्षी एप्रिल महिन्याचा शेवटचा शनिवार हा जगभरात पशुवैद्यक दिन म्हणून साजरा केला जातो. ‘पशुवैद्यकीय लवचिकता मजबूत करणे’ हे यंदाचे घोषवाक्य आहे. त्यानिमित्त पशुधन विकास अधिकारी डॉ. सचिन शामराव वेन्दे (Dr. Sachin Vende) यांच्याशी साधलेला संवाद.

या पेशातील आठवणीतील एखादा प्रसंग

एकदा वसुबारस (Vasubaras) साजरी केली जात होती. एका शेतकरी (Farmer) कुटुंबातील महिला गायीला ओवाळत असताना तिची सोन्याची ती पोत त्या गायीने खाल्ली. मालकाचा फोन आला. कुठलीही अखाद्य वस्तू एका reticulam नावाच्या कप्यात जाऊन बसते. तशीच ही वस्तू गायीच्या (Cow) त्या कप्यात जाऊन बसली. दुसर्‍या दिवशी गायीचे ऑपरेशन (Operation) करण्यात आले आणि ती सोन्याची पोत त्या शेतकर्‍याला सुपूर्द करण्यात आली. त्यासोबत गायीची इतरही तपासणी करून पोटातील काही प्रमाणातले प्लास्टिकही काढण्यात आले. अश्याप्रकरे त्या गायीचा भविष्यातील संभाव्य धोके ही टाळण्यात आले.

प्राण्यांची भाषा तुम्हाला कशी समजते?

प्राण्यांची भाषा (Animals language) समजण्यासाठी अनुभवाची गरज असते. पशुवैद्यक शास्त्राच्या अभ्यासक्रमात आम्हाला वेगवेगळे आजार त्याची लक्षणे आणि त्यावरील उपचार शिकवली जातात. जो प्राणी नॉर्मल आहे, आजारी नाही असा प्राणी व्यवस्थितपणे खातो, पाणी पितो. त्याच्या चेहर्‍यावर एक प्रकारचे तेज असते. आजारी प्राण्यात त्याचा चेहरा थोडा नाराज असतो, खाणे-पिणेे कमी झालेले असते. पशुपालक सगळ्यात पहिले आम्हाला एवढेच सांगतो की हा खात नाही, पाणी पीत नाही. याच्यावर आम्हाला प्राण्याची देहबोली, त्याची लक्षणे याचा अभ्यास करून मगच या प्राण्याला काय झालं हे जाणून घ्यावे लागते. आमचा पेशंट आमच्याशी बोलत नाही आम्हाला त्याच्याकडून जाणून घ्यावे लागते.

प्राण्यांवर उपचार करताना शिक्षण, स्किल बरोबरच भावनाही तितक्याच महत्वाच्या वाटतात का?

अगदी महत्वाचा प्रश्न, कितीही ज्ञान असले, कौशल्य असले तरी त्या प्राण्यांविषयी जर तुमच्या मनात भावना नसतील तर काय अर्थ उरेल. आम्ही जेव्हाही कुठल्याही प्राण्यावर (Animal) उपचार करतो तेव्हा आमचेही त्या प्राण्यांविषयी वेगळेच नाते तयार होते. आमच्या उपचाराने किंवा शस्त्रक्रियेने जेव्हा एखादा पशू बरा होतो तेव्हा मालकासोबत आमच्याही आनंदाला पारावार उरत नाही. कारण आमच्याबाबतीत ‘पशुसेवा हेच ईश्वर सेवा’

कोणत्या प्राण्याची शस्त्रक्रिया जास्त आव्हानात्मक वाटते आणि का?

तसे तर प्रत्येक प्राणी हा वेगळा आहे. त्याची भूल, त्याची शस्त्रक्रिया करण्याची पद्धत वेगवेगळी असते. प्रत्येक प्राण्यांची शस्त्रक्रिया ही आव्हानात्मकच असते. एखाद्या वेळेस आम्हाला वन्य प्राण्यावर शस्त्रक्रिया करावी लागते ती मात्र खूप जास्त आव्हानात्मक असते.

प्राण्यांचे एक्सरे काढताना, भूल देताना कोणकोणती आव्हाने पेलावी लागतात?

पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय नाशिक येथे अनेक प्रकारचे प्राणी एक्स-रे काढण्यासाठी येतात. तो प्राणी शांत असेल तर एक्स-रे काढणे सोपे जाते. पण एखादा कुत्रा किंवा मांजर बर्‍याच वेळा खूप आक्रमक असतात. त्यावेळेला एक्स-रे काढणे अवघड जाते. गाय किंवा बैल यांचे उभ्या अवस्थेत एक्सरे घ्यावे लागतात.

एक्सरे काढेपर्यंत त्यांना स्थिर उभे ठेवणे हे देखील आव्हानच आहे. अनेकवेळा जे प्राणी आक्रमक असतात त्यांना भूल देऊन एक्सरे काढावा लागतो. कुत्रा किंवा मांजर शक्यतो यांनाच भूल देण्याची गरज पडते. भूल देणे हेही खूप आव्हानात्मक काम आहे. पशुवैद्यकीय क्षेत्रात विविध प्रकारच्या प्राण्यांना भूल द्यावी लागते. गाय किंवा बैल यांना आम्ही लोकल नर्व ब्लॉक मध्येच बर्‍याच वेळा ऑपरेशन करतो. कारण त्यांना पूर्ण भूल देण्याची गरज पडत नाही.

खूप मोठे ऑपरेशन असले तरच पूर्ण भूल देण्याची गरज पडते. मात्र कुत्रा, घोडा मांजर यांना पूर्ण भूल देऊन मगच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येते. भूल देण्याचे ठरवत असताना आम्हाला त्या प्राण्याचे वजन, वय आणि त्याची शारीरिक अवस्था बघून आम्हाला त्याला भूल कशी आणि किती प्रकारची द्यायची हे ठरवावे लागते. त्याच्या डोस रेट प्रमाणे आणि अनुभवाच्या आधारे आम्ही त्या गोष्टी व्यवस्थित पार पडतो. बर्‍याच वेळेला एखादा प्राणी खूप आजारी असेल आणि त्याला पूर्ण भूल द्यायची असेल तर त्यावेळेला मात्र रिस्क वाढते.

Related Stories

No stories found.