'नाशिक' इंडस्ट्रीचे उज्वल भवितव्य

'नाशिक' इंडस्ट्रीचे उज्वल भवितव्य

पुढील 25 वर्षांत तंत्रज्ञानात बरेच बदल होणार आहेत. बहुतेक कारखाने मोठ्या प्रमाणात ऑटोमेशनसाठी जातील. कारण त्यात अनेक फायदे असतात. रोजगार निर्मितीवर याचा कसा परिणाम होतो हे मात्र पाहावे लागेल. लोकसंख्येचा विचार करता भारत ही स्वतःच एक मोठी बाजारपेठ आहे. तथापि लोकसंख्या कमवणारी असल्यास बाजारपेठ चांगली असते. जेव्हा जीवनशैलीवर खर्च होतो तेव्हाच अर्थव्यवस्था वाढीस लागते. त्यादृष्टीने नाशिक इंडस्ट्रीचे भवितव्य उज्ज्वल आहे.

कोणत्याही व्यक्ती आणि संस्थेचा विकास होण्यासाठी दूरदृष्टी असणे खूप महत्त्वाचे आहे. आपण हे जितक्या चांगल्या प्रकारे विकसित आणि परिभाषित करू शकू तितक्या चांगल्या प्रकारे ती प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल करता येईल.

अर्थात, नाशिक इंडस्ट्रीलाही हेच तत्त्व लागू आहे. 25 वर्षांनंतर म्हणजे 2045 साली आपण कसे असू, याची कल्पना आपण करू शकल्यास ते मिळवण्याच्या दिशेने एक आराखडा तयार करता येईल.

नाशिकची इंडस्ट्री पुढील 25 वर्षांत काहीशी अशी असू शकेल, असे वाटते. नाशिक उद्योग फक्त शहरापुरता मर्यादित राहणार नाही तर तो संपूर्ण जिल्हा व्यापेल. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणे महत्त्वाचे आहे. आपण पाहत आहोत की, फक्त शहरापुरता विकास झाला तर शहरांना आणि तेथील नागरिकांना बर्‍याच आव्हानांना सामोरे जावे लागते.

कारण त्यांच्या संसाधनांवर ताण पडतो. रहदारी खूप वाढते. प्रदूषण वाढते. त्यामुळे जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. औद्योगिक वाढीमुळे जीवनाची गुणवत्ता वाढली पाहिजे. म्हणूनच उद्योगाचा भौगोलिक प्रसार होणे महत्त्वाचे आहे - म्हणजे ‘व्हर्टिकल’पेक्षा ‘हॉरिझॉन्टल’ वाढ झाली पाहिजे. उद्योगाची व्याप्ती फक्त असेंब्ली किंवा मॅन्युफॅक्चरिंगपुरतीच मर्यादित नसावी.

जिल्ह्यात वाईन उद्योग आणि अन्नप्रक्रिया उद्योगाची प्रचंड क्षमता असल्याचे आपण पाहत आहोत. येथूनच काही प्रमुख ब्रँडस् उदयास आले आहेत. आपण या क्षेत्रातदेखील कार्य करू शकतो. स्किल्ड वर्कफोर्स हा प्रत्येक उद्योगातील महत्त्वाचा भाग असतो.

गेल्या दशकात नाशिकमध्ये बर्‍याच शैक्षणिक संस्था उदयास आल्या आहेत. पाश्चात्य देशांत शैक्षणिक संस्थांशी उद्योगांचे अतिशय मजबूत नाते असते. हेच मॉडेल येथेही अमलात आणू शकलो तर दर्जेदार मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही. अर्थात, कोणताही लहान किंवा मोठा उद्योग स्थानिक, राज्य आणि केंद्र सरकारांच्या पाठबळाशिवाय वाढू शकत नाही. म्हणूनच उद्योग-सरकारी संबंध परस्पर फायद्यासाठी असले पाहिजेत.

उद्योग सरकारी तिजोरीत महसूलवाढीसाठी हातभार लावतो आणि रोजगार निर्माण करतो. त्याचप्रमाणे सरकारकडूनही त्यास योग्य प्रतिसाद मिळाला पाहिजे. म्हणूनच चांगल्या जमिनीची उपलब्धता आणि सुविधा, कामगार नियमांत सुधारणा, जलद आणि कमी परवानग्या, सुलभ कर कायद्यांसारख्या उद्योगाच्या उचित मागण्यांकडे सरकारचा अधिक सकारात्मक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे.

भारत सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’चे लक्ष्य ठेवले आहे. ज्याप्रमाणे पाश्चात्य जगातील छोट्या शहरांत मल्टिनॅशनल कंपन्यांचे मूळ असते त्याचप्रमाणे नाशिक कंपन्यादेखील मल्टिनॅशनल होऊ शकतात. त्याचबरोबर मल्टिनॅशनल कंपन्यांसाठी नाशिक हे एक आकर्षक ठिकाण ठरू शकते.

नाशिकच्या कंपन्या दर्जेदार उत्पादने आणि कस्टमर फोकससाठी नावाजलेल्या आहेतच. बर्‍याच बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी नाशिक हा पसंतीचा व्हेंडर बेस आहे. याला राजकीय इच्छाशक्ती आणि नेतृत्व याची योग्य जोड मिळाली पाहिजे. लोकप्रतिनिधी आणि उद्योग नेते यांनी एकत्रितपणे यावर काम केल्यास हे सहज शक्य आहे.

विकसित देशांकडून आपण शिकतो तसेच आपण लहान दक्षिण-पूर्व आशियाई देशांकडूनही बरेच काही शिकू शकतो. ते ऑटोमेशन आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनात गुंतवणूक करतात. त्यामुळे ते जागतिक स्तरावर अत्यंत वाजवी किमतीत उत्पादने वितरीत करू शकतात.

पुढील 25 वर्षांत तंत्रज्ञानात बरेच बदल होणार आहेत. बहुतेक कारखाने मोठ्या प्रमाणात ऑटोमेशनसाठी जातील. कारण त्यात अनेक फायदे असतात. रोजगार निर्मितीवर याचा कसा परिणाम होतो हे मात्र बघायला लागेल. लोकसंख्येचा विचार करता भारत ही स्वतःच एक मोठी बाजारपेठ आहे.

तथापि लोकसंख्या कमवणारी असल्यास बाजारपेठ चांगली असते. जेव्हा जीवनशैलीवर खर्च होतो तेव्हाच अर्थव्यवस्था वाढीस लागते. जीवनशैलीवर खर्च तेव्हाच होऊ शकतो जेव्हा लोकांकडे पैसे असतात. म्हणूनच ऑटोमेशन आणि जॉब निर्मितीदरम्यान संतुलन असणे आवश्यक आहे. त्यामुळे पाश्चिमात्य देशांसारखे न करता आणि भारताच्या लोकसंख्येचा विचार करून केवळ आवश्यकतेनुसारच आपण ऑटोमेशनसाठी जावे.

इ-वाहनांसाठी जग तयार होत आहे आणि यामुळे ऑटो मार्केट पूर्णपणे बदलत आहे. प्रस्थापित व्यवसायांव्यतिरिक्त या मार्केटमध्ये बरेच नवीन व्यवसायही दाखल होत आहेत आणि नाशिकच्या कंपन्या या बदलाला जुळवून घेण्यास सज्ज आहेत. ‘कोविड’ साथीने आपल्याला शिकवले आहे की, ऑनलाईन कम्युनिकेशन प्लॅटफॉर्ममुळे प्रवास, व्यापार मेळावे इत्यादींवर परिणाम झाला आहे.

जग जवळ आले आहे आणि अगदी छोट्या उद्योजकांनाही आता त्यांच्या कार्यालयात बसून जगाच्या बाजारपेठेत थेट प्रवेश मिळाला आहे. व्यापार मेळावा ऑनलाईन भरवला जात आहे. परिणामी प्रवासी खर्च आणि वेळेत मोठ्या प्रमाणात बचत आहे. भविष्यात नक्कीच हाच मार्ग असेल. आयटी हे भविष्य असेल.

कारण ते अभियांत्रिकी, व्यवसाय आणि मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असेल. आयटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये योग्य गुंतवणूक हे यशाचे मुख्य सूत्र असेल. इ-लर्निंग, वर्क-फ्रॉम-होम याचा सध्या आपण घेत असलेला अनुभव हा काहींच्या आयुष्यात अविभाज्य घटक असेल. यामुळे महिला सबलीकरणास मदत होऊ शकते. त्याचबरोबर मानवजाती अधिक पर्यावरण जागरुक बनत आहे.

पर्यावरणाशी संबंधित कायदे अधिक कठोर बनू शकतील. याचा फायदा आपल्याला व भविष्यातील पिढ्यांना नक्कीच होईल. त्याकरता नवीन कायद्यांची अंबलबजावणी होणे गरजेचे आहे. सौरऊर्जा, पवन ऊर्जा इत्यादी अक्षय ऊर्जा स्त्रोत सध्या लोकप्रिय होत आहेत. कालांतराने ही ऊर्जा निर्मितीची अविभाज्य घटक असेल. प्रत्येक इमारत ही वीजनिर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण असेल.

त्यादृष्टीने वीजनिर्मितीचे नवीन पर्याय उपलब्ध होतील. जग खूप बदलत आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल. हे बदल अतिशय वेगाने होत आहेत. होत असलेल्या बदलांशी जुळवून घेण्यास आपण इच्छुक आणि सक्षम आहोत का? हे आपल्याला सुनिश्चित करावे लागेल.

एकंदरीत नाशिक इंडस्ट्रीचे भविष्य उज्ज्वल दिसते. उद्योगपती, निवडलेले प्रतिनिधी, मनुष्यबळ, शैक्षणिक संस्था आणि संपूर्ण समाज अशा सर्व भागधारकांनी नाशिक जिल्ह्यातील उद्योगांसाठी सामायिक दृष्टिकोन बाळगला आणि आपण तांत्रिक बदलांचा अंदाज घेऊ शकलो व सक्षम राहू शकलो तर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यास नक्कीच तयार होऊ. आपल्याकडे योग्य दृष्टिकोन असेल आणि आपण त्याबद्दल वचनबद्ध असू तर आपण नक्कीच आपले व्हिजन गाठू शकू!

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com