अस्वच्छतेचा ‘मोसम’ला विळखा

अस्वच्छतेचा ‘मोसम’ला विळखा

मालेगाव । वाल्मिक पगारे | Malegaon

मनपा हद्दीतून मार्गस्थ होणार्‍या मोसम नदीस पात्रातील वाढते अतिक्रमण (encroachment) व कचर्‍याच्या साम्राज्यामुळे बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. जलधारांव्दारे मोसमखोर्‍यास तृप्त करत असल्याने मोक्षगंगा अशी ओळख निर्माण करणार्‍या मोसमनदीची शहरातील दिवसेगणिक वाढत जाणारी दुर्दशा निश्चित चिंता निर्माण करणारी ठरावी.

दरम्यान, कोट्यवधी रूपये नदी सुधार योजनेंतर्गत मोसमवर खर्च केले जात असले तरी तिची दुरावस्था कमी झालेली दिसून येत नाही. नदीपात्रात माती-दगडाचा भराव टाकून झोपडी-घरांबरोबर आता व्यावसायिकांची दुकाने-गोदामे थाटू लागली आहेत. त्यामुळे मोसमपूल ते झांजेश्वर मंदिरापर्यंतचा मोसमनदीपात्र दिवसेंदिवस अरूंद होत चालला आहे.

डॉ. आंबेडकर पुल ते काटे हनुमान मंदिरापर्यंत तर मोठ्या प्रमाणात नदीपात्रात अतिक्रमणे थाटण्यात आली आहे. तरी नदीपात्रातील घरे असो अथवा दुकाने ही कायद्यानुसार बेकायदेशीर ठरतात. तरी वीज, पाणी आदी मुलभूत सुविधा त्यांना संबंधित यंत्रणांतर्फे पुरविल्या जातात. त्यामुळे अतिक्रमणांचा विळखा सातत्याने वाढत आहे. संपुर्ण शहरातील कचरा (Garbage) व घाण पाणी (Dirty water) पात्रातच टाकले जात असल्याने नदीऐवजी घाणपाण्याचे तळे अशी उपमा शहरवासियांतर्फे मोसम नदीस दिली जात आहे.

साल्हेर-मुल्हेर डोंगराच्या (Salher-Mulher mountain) कुशीतून उगम पावणार्‍या मोक्षगंगा अर्थात् मोसम नदीचे अस्तित्व शहरात जवळ असलेल्या पुरातन झांजेश्वर मंदिरालगत गिरणा नदीत संगम होवून समाप्त होते. मात्र आपल्या जलधारांनी मालेगावसह (malegaon) बागलाण (baglan) तालुक्यास तृप्त करण्यासह सुजलाम्-सुफलाम् करण्याचे काम मोसमने केले असल्याने तिला मोक्षगंगा असे देखील संबोधले जाते.

गत दोन-तीन वर्षापासून मुसळधार (heavy rain) पर्जन्यवृष्टीमुळे मोसमला मोठे पुर येत असल्याने ती पावसाळ्यात दहा ते पंधरा दिवस प्रवाहीत राहते. शहरातील सांडवा पुल डुबेपर्यंत हा पुर राहत असल्याने नदीपात्रात साठलेला कचरा, घाण सर्व या पुरात वाहून जात असल्याने नदीकाठावर राहणार्‍या रहिवाशांना दरवर्षी दुर्गंधीपासून मुक्ततेसाठी मोसमच्या पुराची प्रतिक्षा असते. फक्त पावसाळ्यातच काही दिवस मोसम प्रवाहीत राहते. उर्वरित दहा ते अकरा महिने नदीपात्र कोरडेच राहते.

मोसम प्रवाहीत राहत नसल्याने मनपा-अथवा शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण करणे हा जन्मसिध्द अधिकार मानणार्‍यांनी मनपा हद्दीतील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण थाटल्याने नदीपात्र अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येते. झोपडी-घरेच नव्हे तर किरकोळ वस्तूंच्या दुकानी इतकेच नव्हे म्हशीचे गोठे, चारा बाजाराचे अतिक्रमण देखील नदीपात्रात करण्यात आले आहे.

काहींनी तर पक्के बांधकाम नदीपात्रात केले आहे. डॉ. आंबेडकर पुलापासून ते काटे हनुमान मंदिरासमोरील पात्रात शेकडो अतिक्रमणे थाटण्यात आली आहेत. रामसेतू पुलालगत (Ramsetu Bridge) तर आता दगड-मुरूमचा भराव टाकून दुकाने-गोदामे नदीपात्रात उभी केली जात आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजुंनी ही अतिक्रमणे चंद्रकलेपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे.

मात्र मनपा असो की पाटबंधारे विभाग या दोन्ही विभागांचे या अतिक्रमणांकडे झालेले दुर्लक्ष निश्चितच चिंताजनक ठरावे. नदीपात्राचा परिसर पाटबंधारे विभागाशी (Irrigation Department) तर नदीबाहेरील परिसर मनपाशी संबंधित त्यामुळे कारवाई करणार तरी कोण? हा प्रश्न उपस्थित राहत आहे. दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवत वेळ मारून नेत असल्यानेच अतिक्रमण धारकांचे फावले असल्याची संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे व्यक्त केली जात आहे.

अतिक्रमणांबरोबर घाणीच्या साम्राज्याने मोसम नदीस बकाल स्वरूप आले आहे. वडगाव बंधार्‍यापर्यंत मोसमचे स्वच्छ पाणी पाणीपुरवठा (Clean water supply) योजनांव्दारे अनेक गावांची तहान भागवत आहे. मात्र श्रीरामनगरपासून या पाण्यात गटारींव्दारे सांडपाणी आणून सोडले जाते. इतकेच नव्हे शहरातील बहुतांश हॉटेलमधील शिळे अन्न, कचरा रात्रीतून मोसमपात्रात फेकला जातो.

अनेक व्यावसायिक देखील आपला कचरा नदीतच टाकण्याची धन्यता मानतात. मृत जनावरे देखील नदीपात्रात आणून फेकली जातात. या सर्व कचर्‍यांमुळे नदीपात्रात पाणी प्रवाहीत राहत नसल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. यामुळे नदीकाठावर राहणारे रहिवाशी तब्बल अकरा महिने ही दुर्गंधी सहन करतात. पावसाळ्यात मोसमला पुर आल्यावर हा सर्व कचरा, घाण वाहून गिरणा धरणात पोहचत तेथील पाणी अशुध्द करते.

पाणी, वीज आदी मुलभूत सुविधा मिळत असल्यानेच नदीपात्रातील अतिक्रमणे वाढत असल्याची तक्रार शहरवासियांतर्फे केली जात आहे. राजकीय वरदहस्त लाभले असल्यानेच नदीपात्रात घरांचे अतिक्रमणे थाटली जात आहे. महापूर आल्यावर यंत्रणेतर्फे जिवीतहानी होवू नये यास्तव नागरीकांना बाहेर काढले जाते. पुर ओसरताच हे नागरीक पुन्हा अतिक्रमीत घरात येवून वास्तव्य करतात. यंत्रणेने कारवाईचा बडगा उचलल्यास ‘वोट बँक’ जपणारे राजकीय नेते या कारवाईस विरोध दर्शवित हाणून पाडतात. त्यामुळे अतिक्रमणांचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे.

नदीपात्रातील अतिक्रमण व प्रदुषणासंदर्भात जिल्हाधिकारी, मनपा व पाटबंधारे विभाग आदींकडे अर्ज, निवेदने मोठ्या प्रमाणात देण्यात आली आहेत. अनेकदा आंदोलन देखील छेडले गेले. मात्र मोसम नदीच्या या दुर्दशेबाबत कुणीच लक्ष देण्यास तयार नसल्याची खंत सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या पदाधिकारी बोलून दाखवली. नदीपात्रातील वाढते अतिक्रमणाबाबत पाटबंधारे विभागाने आत्ताच लक्ष न दिल्यास भविष्यात मुंबईच्या मिठी नदीसारखी घटना येथे घडू शकते, अशी भिती नागरीकांतर्फे व्यक्त केली जात आहे.

‘अतिक्रमणांना’ राजकीय पाठबळ

मोसम नदीपात्रात अनेक वर्षापासून राजकीय वरदहस्त लाभत असल्याने अतिक्रमणे थाटली जात आहे. वाढत्या अतिक्रमणांमुळे नदीपात्राची रूंदी दिवसेंदिवस कमी होत आहे.

मनपा असो कि पाटबंधारे विभाग यांचे हेतुपुरस्सर अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्यावरील हातगाडीवाले, छोटे व्यावसायिक यांच्या अतिक्रमणांना कारवाईचा बडगा दाखवला जातो. परंतू नदीपात्रातील अतिक्रमधारकांना मुलभूत सुविधा पुरविल्या जातात. हा प्रकार निश्चितच गंभीर आहे. मोठ्या प्रमाणात घरांचे अतिक्रमण असल्याने महापुरात जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे या अतिक्रमण धारकांना घरकुल योजनेत घर देत नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्याची आवश्यकता आहे. राजकीय आशीर्वादाने ही अतिक्रमणे थाटत असली तरी भविष्यातील धोका लक्षात घेत मनपा, पाटबंधारे विभागाने ती काढली पाहिजे, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते देवा पाटील यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com