Monday, April 29, 2024
HomeUncategorizedहृदयरोगाचा वाढता धोका

हृदयरोगाचा वाढता धोका

डॉ. सुदेश गुप्ते

कोविड-19 च्या रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत असताना जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालातून हृदयरोगाची दाहकता समोर आणली आहे.

- Advertisement -

डब्ल्यूएचओने सर्वाधिक मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍या दहा आजारांची यादी जाहीर केली आहे. हृदयरोगामुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू होत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे हृदयाला जपणे आवश्यक असल्याचे आता अधोरेखित झाले आहे.

कोरोना विषाणूने गेल्या काही महिन्यांपासून जगभरात थैमान घातले. कोविड-19 च्या रुग्णांची आणि या आजारामुळे होणार्‍या मृत्यूंच्या वाढत्या संख्येमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र काळजीत पडले असताना असंसर्गजन्य आजारही जगभरातल्या सर्वाधिक मृत्यूंना कारणीभूत ठरत असल्याची बाब समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार गेल्या दोन दशकांमध्ये हृदयरोगामुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू झाल्यामुळे हा आजार खूप घातक असल्याचे अधोरेखित झाले आहे.

डब्ल्यूएचओने जारी केलेल्या अहवालात 2000 ते 2019 या 20 वर्षांच्या कालावधीत विविध आजारांमुळे झालेल्या मृत्यूंची नोंद घेण्यात आली आहे. जगभरात मृत्यूला कारणीभूत ठरणार्‍या दहा आजारांपैकी सात असंसर्गजन्य आजार आहेत. या यादीवर नजर टाकल्यास हृदयरोग किंवा हृदयविकार पहिल्या स्थानी असल्याचे दिसून येते. हृदयरोगानंतर पक्षाघातामुळे जगात सर्वाधिक मृत्यू होत आहेत. क्रोनिक ऑब्जस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज तिसर्‍या क्रमांकावर असून चौथ्या स्थानी लोवर रेस्पिरेट्री विकार म्हणजे श्वसनाशी संबंधित आजार आहेत. हृदयविकारानंतर सर्वाधिक मृत्यू श्वसनाशी संबंधित आजरांमुळे होत असल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे.

निओनेटल आजारांमुळेही बरेच मृत्यू होत असून ही व्याधी पाचव्या स्थानी आहे. ट्रेकिया, ब्राँकस आणि फुफ्फुसाचा कर्करोग हे आजार संयुक्तपणे सहाव्या स्थानी आहेत. अल्झायमर-डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंशसुद्धा मृत्यूला कारणीभूत ठरू लागला आहे.

या व्याधीनेही सर्वाधिक मृत्यूंना कारणीभूत ठरणार्‍या आजारांच्या यादीत सातवे स्थान पटकावले असून ही धोक्याची घंटा आहे. डायरिया म्हणजे जुलाब-उलट्या ही वरवर साधी वाटणारी बाबही मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. जगभरात मधुमेहाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. म्हणूनच मृत्यूला कारणीभूत ठरणार्‍या आजारांच्या यादीत मधुमेहाने नववे स्थान पटकावले आहे. मूत्रपिंडाशी संबंधित व्याधी मृत्यूला कारणीभूत ठरणार्‍या आजारांच्या यादीत दहाव्या स्थानी आहे.

जगभरात विविध आजारांमुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये 16 टक्के वाटा हृदयरोगाचा आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये हृदयविकारामुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये तब्बल 20 लाखांनी वाढ झाली असून 2019 पर्यंत सुमारे 90 लाख लोकांना हृदयरोगामुळे जीव गमवावा लागला आहे. 2019 मधल्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल एक तृतीयांश मृत्यू हृदयरोगांमुळे झाले आहेत.

गेल्या वर्षी चीनमध्ये हृदयरोगामुळे सर्वाधिक मृत्यू झाले. त्यानंतर भारत, रशिया, अमेरिका आणि इंडोनेशिया या देशांचा क्रमांक लागतो. फ्रान्स, पेरु आणि जपानमध्ये हृदयरोगाचे प्रमाण बरेच कमी असल्याचे आढळून आले. भारताबद्दल बोलायचे तर 2018 मध्ये ङ्गद लँसेटफमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात हृदयविकारांमुळे अधिक मृत्यू होत आहेत. 1970 नंतर जन्मलेल्या प्रौढांमध्ये हृदयरोगाचा धोका अधिक असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले होते.

2000 पर्यंत धमन्यांशी संबंधित हृदयरोग आणि पक्षाघातामुळे शहरी भागांमधल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत होते. मात्र त्यानंतरच्या काळात हृदयरोगाने ग्रामीण भागालाही आपल्या कवेत घ्यायला सुरुवात केली. 2000 ते 2015 या काळात हृदयरोगामुळे मृत्युमुखी पडणार्‍या ग्रामीण भागातील पुरुषांचे प्रमाण शहरी भागातल्या पुरुषांपेक्षा अधिक होते. पुरुषांप्रमाणेच ग्रामीण भागातल्या महिलांमध्येही हृदयरोगाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. दरम्यान, तमिळनाडू, कर्नाटक, पंजाब आणि हरयाणासारख्या तुलनेने प्रगत राज्यांमध्ये हृदयविकारामुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण वाढल्याचे हा अहवाल सांगतो. तसेच ईशान्य भारतातली राज्ये, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये पक्षाघातामुळे अधिक मृत्यू झाले.

महत्त्वाची बाब म्हणजे या राज्यांमध्ये पक्षाघातामुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या तिपटीने अधिक असल्याचे आढळून आले. लक्षात घेण्याजोगी आणखी एक बाब म्हणजे पक्षाघातामुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण अधिक असणार्‍या राज्यांमध्ये हृदयविकारांमुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण कमी होते तर हृदयविकाराचे मृत्यू अधिक असणार्‍या राज्यांमध्ये पक्षाघाताचे प्रमाण कमी होते. ग्रामीण तसेच ईशान्य भारतातील मागास राज्यांमध्ये हृदयविकार तसेच पक्षाघातामुळे होणार्‍या मृत्यूंमागे आरोग्यविषयक सुविधांचा अभाव हे महत्त्वाचे कारण असल्याची बाब या अहवालात नमूद करण्यात आली होती.

देशातल्या ग्रामीण तसेच मागास भागांमध्ये असणारी डॉक्टरांची तसेच दर्जेदार रुग्णालयांची कमतरता लोकांच्या जीवावर उठत असल्याचेही समोर आले आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनच्या अहवालानुसार मार्च 2017 पर्यंत ग्रामीण भागातल्या जवळपास आठ टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकही डॉक्टर नव्हता तर 61 टक्के केंद्रांमध्ये फक्त एक डॉक्टर कार्यरत होता. लँसेटच्या अहवालानुसार 2005-06 आणि 2015-16 या कालावधीत धूम्रपान करणार्‍यांच्या संख्येत घट नोंदवण्यात आली असली तरी शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात धूम्रपान करणार्‍यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले.

धूम्रपानावर नियंत्रण मिळवल्यास किंवा सिगारेट सोडल्यास अकाली मृत्यूचा धोका अनेकपटींनी कमी होत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. स्थूलपणा, मधुमेह, कोलेस्टरॉलचे अधिक प्रमाण, उच्च रक्तदाब, बैठी जीवनशैली, धूम्रपान, चुकीचा आहार, नैराश्य आणि अनुवंशिकता ही हृदयविकारामागील महत्त्वाची कारणे आहेत. हृदयविकार हा जीवनशैलीशी संबंधित आजार असल्यामुळे आपल्याला राहणीमानात बदल करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम आणि संतुलित आहारामुळे आपण हृदयरोगावर नियंत्रण मिळवू शकतो.

जगभरात हृदयरोगामुळे सर्वाधिक मृत्यू होत असले तरी पक्षाघात आणि क्रॉनिक ऑब्जस्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसिज या व्याधींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या आजारांमुळे अनुक्रमे अकरा आणि सहा टक्के मृत्यू झाले आहेत. श्वसनमार्गाचा संसर्ग हा सर्वाधिक मृत्यूंना कारणीभूत ठरणारा संसर्गजन्य आजार असला तरी 2000 च्या तुलनेत 2019 मध्ये या आजारामुळे कमी मृत्यू झाले आहेत.

ट्रेकिया, ब्राँकस आणि फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होणार्‍या मृत्यूंचा आकडा 1.2 दशलक्षांवरून 1.8 दशलक्षांवर पोहोचला आहे. स्मृतीभ्रंशाचे प्रमाण महिलांमध्ये अधिक आहे. अल्झायमर तसेच डिमेन्शियाच्या इतर प्रकारांमुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये 65 टक्के महिला असल्याचेही समोर आले आहे. डायरियाचा समावेश आघाडीच्या दहा आजारांमध्ये असला तरी यामुळे होणार्‍या मृत्यूंच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. मधुमेहही मृत्यूंना कारणीभूत ठरत आहे.

2000 नंतर मधुमेहामुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये तब्बल 70 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून यामुळे पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. 2000 नंतर मधुमेहामुळे होणार्‍या पुरुषांच्या मृत्यूंमध्ये 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असताना गेल्या 20 वर्षांमध्ये एचआयव्हीमुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये 51 टक्क्यांनी घट झाली आहे. क्षयरोगाचे प्रमाणही कमी होताना दिसत आहे. 2019 मध्ये क्षयरोग सर्वाधिक मृत्यूंना कारणीभूत ठरणार्‍या आजारांच्या यादीत तेराव्या स्थानी आहे.

या सकारात्मक बाबी असताना मूत्रपिंडाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. आकडेवारी बघता प्रत्येकानेच सर्वांगीण आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करून हृदयविकार, मूत्रपिंडाशी संबंधित विकार तसेच इतर असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. तसेच या आजारांवरील उपचारांच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ करावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या