Monday, April 29, 2024
HomeUncategorizedसुधारणांची ‘उच्च’ गरज

सुधारणांची ‘उच्च’ गरज

– विनिता शाह

ग्लोबल एम्प्लॉएबिलिटी रँकिंग या क्रमवारीत भारतातील पाच विद्यापीठांचा समावेश टॉप विद्यापीठांच्या यादीत झाला आहे. याचाच अर्थ असा की, या विद्यापीठांमधून बाहेर पडलेल्या युवकांना थेट काम देण्यासाठी पात्र समजले जाते.

- Advertisement -

तथापि अशी मोजकी विद्यापीठे आणि संस्था वगळता आपल्याकडे उच्च शिक्षणाची जी अवस्था आहे, ती या पाच विद्यापीठांच्या यशामुळे लपून राहू शकत नाही. ती सुधारायलाच हवी.

इमर्जिंग हा फ्रान्समधील मनुष्यबळ कन्सल्टन्सी ग्रुप आणि टाइम हायर एज्युकेशन या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने ग्लोबल एम्प्लॉएबिलिटी रँकिंग 2020 ही क्रमवारी तयार केली असून, भारतासाठी त्यात खूशखबर आहे. आपल्या परिस्थितीत सुधारणा करून भारताने या क्रमवारीत पंधरावे स्थान पटकावले आहे. एवढेच नव्हे तर रोजगारासाठी पूर्णपणे तयार (कुशल) युवकांची जडणघडण करण्याच्या बाबतीत आयआयटी दिल्ली या भारतातील अव्वल शिक्षणसंस्थेने 54 व्या स्थानावरून 27 व्या स्थानावर उडी घेतली आहे.

विविध देशांतील विद्यापीठांच्या कामगिरीवर आधारित या विस्तृत अहवालात भारताला 15 वे स्थान मिळणे हे मोठे यश आहे. 2010 मध्ये या क्रमवारीत भारताचे स्थान 23 वे होते. त्यामुळे स्वाभाविकच केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. अर्थात आयआयएससी बेंगळुरू या संस्थेची गेल्यावर्षीच्या 43 व्या क्रमांकावरून यावर्षी 71 व्या स्थानावर घसरण झाली आहे. परंतु टॉप विद्यापीठांच्या यादीत भारतातील पाच विद्यापीठांचा समावेश आहे आणि त्यात वर उल्लेख केलेल्या दोन संस्थांव्यतिरिक्त आयआयटी मुंबई, अ‍ॅमिटी विद्यापीठ आणि आयआयटी खडगपूर या संस्थांचा समावेश आहे.

ही क्रमवारी 22 देशांमधील 8000 नियुक्तीकर्त्या व्यवस्थापकांशी केलेल्या संवादाच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. याचा अर्थ असा झाला की, आपल्याकडील टॉप विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलेल्या युवकांना जागतिक स्तरावर थेट काम देण्यास पात्र मानले जाते आणि या आघाडीवर भारताची स्थिती भक्कम होत आहे. परंतु सर्वोत्कृष्ट पाच विद्यापीठांची चमक देशातील अन्य विद्यापीठे आणि शिक्षणसंस्थांची स्थिती लपवू शकत नाही. त्याचप्रमाणे उच्च शिक्षणाची परिस्थिती सुधारण्याची गरज यामुळे यत्किंचित कमीही होत नाही. अभियांत्रिकी शाखेचेच उदाहरण घेतल्यास दिल्ली आणि मुंबईतील अभियंते त्या-त्या शहरांत आहेत.

परंतु संपूर्ण देशभरात सहा हजारांपेक्षा अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये आणि संस्था आहेत आणि त्यामधून सरासरी 15 लाख अभियंते दरवर्षी बाहेर पडतात. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, केवळ पदवी संपादन करण्यापलीकडे या अभियंत्यांचे आपापल्या क्षेत्रातील कौशल्य इतके कमी असते की, यापैकी केवळ 20 टक्के विद्यार्थ्यांनाच पदवीस अनुरूप काम मिळू शकते. याच कारणामुळे देशातील अभियांत्रिकी शिक्षणाचा स्तर उंचावण्याची आणि या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके उद्योगांच्या नवीन गरजांनुसार समायोजित करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.

बिगरतांत्रिकी उच्चशिक्षण क्षेत्रात तर परिस्थिती याहीपेक्षा वाईट आहे. शिक्षकांच्या कमतरतेपासून सत्राचा अभ्यासक्रम वेळेवर पूर्ण न होण्यापर्यंत असंख्य समस्या आणि तक्रारींची लांबलचक यादीच असून, त्यावर लक्ष केंद्रित करण्याची फुरसत आजवर कोणत्याही सरकारला मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर, ग्लोबल एम्प्लॉएबिलिटी रँकिंगमध्ये सुधारणा झाल्याचा आनंद साजरा करण्याजोगी स्थिती नाही. उलट उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्याकडे इतर संस्था आणि विद्यापीठे यांची परिस्थिती किती नाजूक आहे, हे लक्षात घेऊन ती सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक आणि प्रामाणिक प्रयत्न सुरू करायला हवेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या