पाठीवरचं ‘ओझं’ उतरायचं तर...

पाठीवरचं ‘ओझं’ उतरायचं तर...

- डॉ. अ. ल. देशमुख , ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

दप्तर हा शिक्षण क्षेत्रातील जुना आजार आहे. कालोघात वाढत गेलेल्या दप्तराच्या ओझ्याचे दुष्परिणाम पाहिले तर विद्यार्थ्यांचे आरोग्य खरोखर संकटात येत आहे.

याबाबत अनेकदा चर्चा झाली, परिपत्रके निघाली, न्यायालयीन निकाल लागले.परंतु परिस्थिती आहे तशीच राहिली. आता केंद्र सरकारने हे ओझे कमी करण्याबाबत काही मुलभूत बदल सुचवले आहेत. हे बदल स्वागतार्ह असले तरी त्यांची अमलबजावणी होणार का, हा खरा प्रश्न आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतेच दिले आहेत. त्यानुसार पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे त्यांच्या शारीरिक वजनाच्या 10 टक्क्यांहून जास्त नको, असे स्पष्ट केले आहे. सर्व राज्यांना नवीन शैक्षणिक सत्रापासून या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र शासनाने दप्तराबद्दल पुन्हा एकदा नव्याने विचार करुन घेतलेला हा निर्णय आनंददायी आहे. दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात सुचवलेले मुलभूत उपाय स्वागतार्ह आहेत. ये रे माझ्या मागल्या...याप्रमाणे याही वेळी घेतलेल्या निर्णयाची कार्यवाही जर झाली नाही तर पुन्हा दप्तरासंबंधी कुणी विचार करु नये. त्याऐवजी कार्यवाही न करणार्‍यांना शिक्षा व्हावी, तरच विद्यार्थ्यांना न्याय दिल्यासारखे होईल.

दप्तर हा शिक्षण क्षेत्रातील जुना आजार आहे. अनेक वेळेला याविषयी चर्चा, परिपत्रके, न्यायालयीन निकाल लागले आहेत; परंतु परिस्थिती आहे तशीच आहे. याबाबतीत अनेक समित्याही स्थापन झाल्या. समित्यांचे अहवाल आले. त्यांचे ओझे वाढले पण दप्तराचे ओझे काही कमी झाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. शालेय शिक्षणात अनेकवेळा अनेक प्रयोग होतात.परंतु पाठीवरच्या दप्तराच्या ओझ्याबाबत फारसे प्रयोग झाले नाहीत.

पहिलीसाठी 1.75 किलोग्रॅमपासून सातवीच्या विद्यार्थ्यापर्यंत 3.65 किलोग्रॅमपर्यंत दप्तराचे ओझे असावे असे अनेकवेळा सांगूनही त्याचे पालन होताना दिसत नाही. उलट दिवसेंदिवस दप्तराचा आकार, दप्तराची विविधता यामध्ये नाविन्यता आणून दप्तरे तयार करणार्‍या लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यवसाय थाटला हेही सत्य आहे. अर्थात याबाबत व्यावसायिकांना नावे ठेवून चालणार नाही. कारण पैसा मिळवणे हा त्यांचा उद्देश असणे स्वाभाविक आहे. पण मोकळ्या दप्तराचे वजन किती आहे याची चाचपणी अद्याप कुणीही केलेली नाही. तेच जर निकषांपेक्षा जास्त असेल तर त्याबाबतीत कोण आणि काय कारवाई करणार याचा विचार होण्याची गरज आहे.

दप्तराचे ओझे हा आजार कायमस्वरूपी ठेवण्यामध्ये शासन, संस्थाचालक मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि प्रकाशक सर्वच जण जबाबदार आहेत. शिक्षणात पालकांच्या इच्छा आणि अपेक्षा, शिक्षकांचा साचेबंद स्वभाव, संस्थाचालकांच्या मनमानी कल्पना आणि सरकारच्या नुसत्याच प्रसिद्ध होणार्‍या नियमावल्या या सर्वांचं ओझं विद्यार्थ्यांच्या मनावर लादले जात आहे, याचा शिक्षण व्यवस्थेमध्ये कुठेही विचार होताना दिसत नाही.

शासनाने न्यायालयाला मान द्यायचा म्हणून अनेक परिपत्रके काढली; पण कार्यवाहीच्या पातळीवर शून्य प्रगती केली. संस्थाचालक इमारतींचे जाळे वाढवून आपल्या स्वतःचे खिसे कसे भरतील याबाबतीत प्रयत्नशील असल्याने शिक्षणामधून गुणवत्ता प्राप्त करायची आहे किंवा विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण द्यायचे आहे हा विचारच निसटला आहे. त्याकडे कुणाचेच लक्षच नाही. मुख्याध्यापक शासकीय कामे, शाळेतील वाढती कामे यामुळे त्रस्त झाले आहेत. शिक्षणातील नेमक्या समस्या कोणत्या आहेत आणि त्या समस्यांवर उपाय काढायचे आहेत त्यासाठी प्रक्रियेत काही संशोधन करावे लागते याविषयी ते अनभिज्ञ आहेत. विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापनाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे अशा शिक्षणक्षेत्रातील कणा म्हणजे शिक्षक.

पण हा घटक शाळेबाहेरील कामे करणे, संस्थाचालकांची मर्जी सांभाळणे, पालकांना खूष ठेवणे आणि अभ्यासक्रम संपवणे यातच दंग राहिला आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यास्याव्यतिरिक्त नेमक्या समस्या काय आहेत याचा विचार शिक्षकांनी करायचा आहे ही संकल्पनाच अनेकांच्या डोक्यात नाही. त्यामुळे विद्यार्थी शाळेत येतो आहे ना़? वर्गात बसतो आहे ना? शांतपणे मी शिकवलेले ऐकतोय ना? परीक्षा देऊन पास होतो आहे ना? एवढ्याच बाबतील शिक्षणात प्रगती झाली. पण हे होत असताना विद्यार्थ्यांच्या वर्तनातील शारिरीक स्थिती, मानसिक अवस्था त्याच्या नैतिक प्रक्रियेमध्ये त्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये तो दिवसेंदिवस मागे पडत चालला आहे. दिवसेंदिवस बेशिस्त होत चालला आहे. दिवसेंदिवस अस्थिर होत चालला आहे. हे असे विदारक चित्र शाळांमध्ये अनेक वर्षे दिसत आले आहे ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. दप्तराचे ओझे हा त्याचाच एक प्रकार आहे. बोटावर मोजता येईल एवढ्याच शिक्षकांनी याबाबतीत काही चांगले प्रयोगही केलेले आहेत आणि ते कौतुकास्पदच आहेत. पण त्याची व्यापकता वाढलेली नाही.

दप्तराच्या ओझ्याचे दुष्परिणाम पाहिले तर विद्यार्थ्यांचे आरोग्य खरोखर संकटात येत आहे असे म्हटल्यास ते खोटे ठरणार नाही. कारण जड दप्तर घेऊन जाणार्‍या विद्यार्थ्यांना पाठदुखी, मानदुखी, पाठीच्या कण्याचा आकार बदलणे, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे. सांधे आखडणे, कंबरदुखी किंवा पाठदुखी, पाठीचे स्नायू आखडणे, मांड्यावर ताण येणे अशा शारिरीक व्याधी विद्यार्थ्यांना जडत आहेत. काही विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यामुळे एका बाजूला झुकणे आणि खांदे पाडून उभे राहणे, अशा अयोग्य सवयी जडलेल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना गुडघेदुखीचा त्रास होतो आहे.

दप्तराच्या ओझ्यामुळे उद्भवणार्‍या या सर्व शारिरीक व्याधींसाठी पहिला कारणीभूत ठरणारा घटक म्हणजे पालक आहे. पालकांची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे असेच सुरू राहाणार. आपल्या मुलाचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी शाळेत जात असताना त्याच्या दप्तराची स्थिती, वजन, दप्तरातील साहित्य पालक पाहणार नसतील तर ते असेच सुरू राहणार आहे. त्याच्या दप्तराचे वजन कमी करण्यापेक्षा पाण्याची बाटली, जेवणाचा डबा, गृहपाठाच्या वह्या, खासगी प्रकाशकांची

मार्गदर्शके, नसलेल्या तासांची वह्या पुस्तके असतात. ते पाहण्याची जबाबदारी कोणाची आहे? ही सर्व जबाबदारी पालकांची आहे. किती पालकांनी हा प्रश्न शिक्षक पालक संघात चर्चेला आणला आहे? अशिक्षित पालकांनाही यामध्ये सहकार्य करता येईल. पण ते आम्ही अशिक्षित या नावाखाली दडून बसतात हे चूक आहे. पालकांनीच याबाबतीत काही प्रयत्न केले तर ही समस्या नक्कीच सुटणार आहे.

शाळेमध्ये खरं म्हणजे विद्यार्थ्यांनी वह्या पुस्तके आणण्याची गरजच नाही. शिक्षकांनी प्रभावी पद्धतीने शिकवावे आणि विद्यार्थ्यांनी ते समजून घ्यावे ही खरी अध्ययन, अध्यापनाची प्रक्रिया. पुस्तक वाचून दाखवणे, विद्यार्थ्यांना लिहून देणे, लिहून घेणे या अध्यापन पद्धतीने कोणत्याही शिक्षणतज्ज्ञाने सांगितल्या नाहीत, कोणत्याही शिक्षणाच्या पुस्तकातही नाहीत. तरी त्या शाळेमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. यामुळे दप्तराचे ओझे वाढतच गेले. खरे तर शिक्षकांना असेही करता येईल की, विद्यार्थ्यांनी घरून येताना आज ज्या विषयाचा तास आहे तेवढेच फुलस्केप कागद बरोबर आणावेत.

शाळेमध्ये शिक्षकांनी शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या विषयासंबंधी जे काही टिपण काढायचे आहे किंवा शिक्षकांच्या अध्यापनातील महत्त्वाचे मुद्दे असतील ते या कागदावर लिहून घ्यावे. विद्यार्थ्यांनी घरी गेल्यानंतर प्रत्येक विषयाची एक स्वतंत्र फाईल करावी आणि शाळेतील फुलस्केप त्या फाईलमध्ये लावून टाकावा. असे करण्यामुळे विद्यार्थ्यांंची घरी प्रत्येक विषयाची स्वतंत्र फाईल तयार होईल. तसेच शाळेत जाताना फक्त चार ते पाच विषयासाठी तेवढेच पाच फुलस्केप विद्यार्थ्यांकडे राहातील. यामुळे दप्तराचे ओझे एकदम कमी होणार आहे. एका छोट्याश्या आकर्षक कापडी पिशवीतूनही विद्यार्थ्यांना हे शाळेत नेता येईल. त्याचे वजन जास्तीत जास्त 100 किंवा 200 ग्रॅम होईल. यामधून विद्यार्थ्यांना विचार करण्याची सवय सुद्धा लागेल. शिक्षकांनी शिकवलेले नेमके काय आहे ते शोधण्याची सवय लागेल आणि स्वतः अभ्यास करण्याची क्षमता दृढ होईल. मुख्य म्हणजे, दप्तराचे ओझे कमी होईलच पण अध्ययन, अध्यापन प्रक्रिया देखील आनंददायी होईल. थोडक्यात, पाठ्यपुस्तके ही घरी अभ्यास करण्यासाठी आहेत, शाळेत नेण्यासाठी नाहीत हा विचार दृढ झाला तर आपोआप दप्तराचे ओझे कमी होईल.

दुसरी गोष्ट म्हणजे, शासनाने सुद्धा अभ्यास

क्रमाची व्याप्ती वाढवून पाठ्यपुस्तकांचे आकार वाढवले आहेत. पूर्वी डेमी साईजची लहान पुस्तके होती आणि पुस्तके ए-4 साईजची झाली आहे. पानांची संख्याही दुप्पट झाली आहे. पाठ्यपुस्तकांचा दर्जा वाढवण्याच्या नादात दप्तरांचे ओझे वाढत आहे याचा विचार झालेलाच नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रश्नाकडे कुणीच गांभीर्याने पहायला तयार नाही. चलता है चलने दो या प्रवृत्तीमुळे हे असेच सुरू राहाणार आहे. म्हणूनच, दप्तराचे ओझे वाढवण्यापेक्षा अध्ययन, अध्यापनाचे ओझे वाढवण्यासाठी सर्वांनी आपली मानसिकता सकारात्मक करणे हेच याला खरे उत्तर आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com