Friday, April 26, 2024
HomeUncategorizedजलसंपत्ती वाचवायची तर...

जलसंपत्ती वाचवायची तर…

– मोहन एस. मते, सामाजिक कार्यकर्ते

एकविसावे शतक पाण्याचे म्हणून ओळखले जाते. कारण विकास घडला तर तो पाण्यामुळेच घडेल आणि या प्रक्रियेत कोणता प्रमुख अडथळा आला तरी तो पाण्याशी संबधीत समस्यांचाच असेल.

- Advertisement -

आजच्या काळात एका बाजूला हवामान बदलांमुळे, पर्यावरणाच्या र्‍हासामुळे पाण्याची उपलब्धता कमी होत आहे; तर दुसर्‍या बाजूला जीवनशैली उंचावत जाईल तसतशी पाण्याची गरज वाढत चालली आहे. मागणी आणि उपलब्धता यांचे हे गुणोत्तर लक्षात घेता केवळ जलसंपत्तीचे संवर्धन करा हा मंत्र पुरेसा ठरणार नसून पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर आवश्यक ठरणार आहे. सिंगापूर, इस्राईलसारख्या देशांनी याबाबत आदर्श घालून दिला आहे.

संपत्ती म्हटले की ती केवळ पैशांचीच असते असा एक समज असतो. मात्र पाणी, नद्या, शुद्ध हवा, हिरवीगार वनराई, वृक्षवेली, डोंगर, पशुपक्षी हीदेखील नैसर्गिक संपत्ती आहे; मात्र माणसानं आर्थिक संपत्तीचा विकास करण्याच्या नादात नैसर्गिक संपत्तीकडे दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम आज भोगावे लागत आहेत.

आज अनेक ठिकाणी अशी वेळ आली आहे की आर्थिक संपत्ती विपुल आहे; मात्र पाण्यासारखी नैसर्गिक संपत्ती नसल्यामुळे बिकट संकट उभे राहिले आहे. जलसंपत्तीकडे झालेल्या दुर्लक्षाचे परिणाम जगभरात कमी अधिक फरकाने जाणवू लागले आहेत. केवळ पाण्याची अनुपलब्धता हेच संकट नसून दूषित आणि अशुद्ध पाणी हीदेखील आक्राळविक्राळ समस्या बनली आहे. जीवन म्हणवल्या जाणार्‍या पाण्याविषयीची जागृती करण्यासाठीच जागतिक जलदिन साजरा होतो. संयुक्त राष्ट्रसंघाने 22 मार्च 1993 रोजी पहिला जागतिक जलदिन साजरा केला.

एकविसावे शतक पाण्याचे म्हणून ओळखले जाते. कारण विकास घडला तर तो पाण्यामुळेच घडेल आणि या प्रक्रियेत कोणता प्रमुख अडथळा आला तरी तो पाण्याशी संबधीत समस्यांचाच असेल. त्याचबरोबर भविष्यात तिसरे महायुद्ध झालेच तर ते पाण्यामुळे होईल, अशी भीती सातत्याने वर्तवण्यात आली आहे.

आरोग्यदायी जगासाठी स्वच्छ पाणी हे महत्त्वाचे आहे, पण या बाबतच्या वास्तवाचा विचार केला तरी आपल्या समोरील आजच्या आव्हानांचा अंदाज येईल. आज जग कितीही सुधारले असले आणि कितीही प्रगती झाली तरी पाण्याशिवाय जगरहाटी चालूच शकणार नाही. केवळ पिण्यासाठी नव्हे तर शेती, उद्योधंदे वीजनिर्मिती अशा अनेक कारणांसाठी माणसाला पाण्यावर अवलंबून राहावे लागते. माणसाची प्रगती जसजशी होत चालली आहे तसतशी पाण्याची गरज वाढतच चालली आहे.

आज भारताचा विचार करता, देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे उलटूनही देशातील अनेक खेड्यांमध्ये आपल्याला शुद्ध पाणी देता आलेले नाही. शेती, उद्योगधंद्यांसाठी आवश्यक असणार्‍या पाण्याची सोयही पूर्णतः करता आलेली नाही. पाण्याची वाढती मागणी आणि बदलत्या हवामानामुळे लहरी बनलेल्या मान्सूनमुळे कमी होत चाललेली उपलब्धता यामुळे पाण्यावरुन संघर्षाचे प्रसंग उद्भवत आहेत. हे संघर्ष देशा-देशांमध्ये तर आहेतच; पण त्याचबरोबरीने ते देशांतर्गतही आहेत.

भारतात महाराष्ट्र-कर्नाटक- तामिळनाडू, महाराष्ट्र-गुजरात, पंजाब-हरियाणा या राज्यांमधील जलतंटे वर्षानुवर्षांपासून चालत आले आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी लवादांची नेमणूक झालेली आहे. समन्यायी पाणीवाटपाच्या मुद्दयावरुन सुरू असलेल्या या संघर्षात कोट्यवधी रुपये खर्ची झाले आहेत. दुसरीकडे भारत-पाकिस्तान, भारत-चीन यांच्यातही नद्यांच्या पाण्यांवरुन वादविवाद सुरू आहेत.

पाणी हे जीवन तर आहेच, पण आजच्या काळात प्रमुख जागतिक घटक कोणता असेल तर तो सुद्धा पाणीच! कारण आज विविध भागातील विकसित राष्ट्रे, विकसनशील राष्ट्रे किंवा अगदी दारिद्य्र भोगत असलेल्या राष्ट्रांच्या समस्या जगभर एक सारख्या आहेत. त्यामुळेच पाण्यावरुन काहीही घडले तरी त्यांचे परिणाम अतिशय व्यापक स्वरुपाचे असतील. मग त्यावरुन सामंजस्य घडून आले तरी आणि युद्धे भडकली तरी सुद्धा!

अशुद्ध पाण्याची समस्या

शुद्ध पाण्याच्या अभावामुळे आज आरोग्याचे प्रश्न सर्वत्रच वाढलेले आहेत. संयुक्त राष्ट्राचा अहवाल सांगतो की जगातील एक अब्जाहून अधिक लोक स्वच्छ पाण्यापासून वंचित आहेत आणि त्यादुप्पटीहून अधिक लोकांना शौचालयांच्या सुविधा नाहीत. एकूण 6.5 ते 7 अब्ज लोक संख्येपैकी एक तृतीयांश लोक या समस्येला तोड देत आहेत. यावरून या समस्येची व्याप्ती लक्षात येईल.

परिणामी दररोज 7 ते 7.5 हजार लोक पाण्यामुळे उद्भवणार्‍या आजारांचे बळी ठरताहेत. सर्वच विकसनशील देशांमधील सर्व प्रकारचे सुमारे 80ते 90 टक्के सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नद्या, तलाव, समुद्र आणि भूजलात सोडले जाते. अतिश्रीमंत देशामध्येही असेच व्यापक प्रश्न आहेत. गरीब देशांमध्ये एक माणूस दिवसभरात पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी, स्वच्छतेसाठी आणि इतर वापरासाठी जितके पाणी उपयोगात आणतो, तेवढे पाणी श्रीमंत देशातला माणूस एका फ्लशमध्ये वाया घालवतो. यावरुन पाण्याचा गैरवाजवी वापर आणि पाणीवापरातील विषमता दिसून येते. बदलत्या काळात पाण्याचा वापर केवळ लोकसंख्येच्या प्रमाणात वाढत गेलेला नाही, तर गेल्या शतकात लोकसंख्यावाढीच्या तुलनेत जगातील पाणीवापर दुपटीने-तिपटीने वाढलेला आहे. याच काळात जवळपास सर्वच जलस्त्रोत झपाट्याने दुषित होत आहेत. त्यामुळे पाणी टंचाईची टांगती तलवार पाचवीलाच पूजलेली आहे.

‘पाणी वाचवा’सोबत ‘पाण्याचा पुनर्वापर’ आवश्यक

निसर्गाचे दोहन करत विकासाची भूक भागवली जात असल्यामुळे पर्यावरणाचे चक्र कोलमडत चालले आहे. आज हवामान बदलाचा परिणाम म्हणून जगातील भल्याभल्या देशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच आता केवळ ‘पाणी वाचवा’ या पारंपरिक उपयांनी प्रश्न सुटणार नाहीत; पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर करा हा नारा द्यावा लागणार आहे. याचे कारण बर्‍याच भागात पाणीच कमी असल्याने आहे ते पाणी प्रक्रिया करून काटेकोरपणे वापरावे लागणार आहे. एरवी गटारात सोडले जाणारे सांडपाणी शुद्ध करून ते पिण्यासाठी वापरावे लागेल.

आज सिंगापूरमध्ये वापरण्यात येणारे पिण्याचे पाणी पाहिले तर त्यातील 70 ते 75 टक्के पाणी हे सांडपाण्याच्या शुद्धीकरणाच्या रुपातून आलेले आहे. इस्त्रायलमध्ये हे प्रमाण 85 टक्क्यापर्यंत आहे. काल भरलेले पाणी शिळे झाले म्हणून ते टाकून देणार्‍यांसाठी हे उदाहरण पुरेसे समर्पक आहे. पाणी प्रश्नावर हेच भविष्यातील उपाय राहणार आहेत. पाण्याचे वेगवेगळ्या प्रकारे शुद्धीकरण करून ते पिण्यासाठी, शेतीसाठी किंवा शौचालयात वापरण्याच्या दर्जाचे बनविणे आणि वेगवेगळ्या प्रकारे पुरविणे यासाठी संशोधनही होणे गरजेचे आहे. आज सर्वाधिक पाणी लागणार्‍या शेतीक्षेत्रामध्ये ठिबकसारख्या शोधामुळे पाणीवापर अत्यंत कमी होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच संशोधन पाणीपुनर्वापर, पाणीशुद्धीकरणाबाबत व्हायला हवे आणि ते किफायतशीर दरात लोकांना उपलब्ध व्हायला हवे. तसे झाल्यास जागरूक नागरिक त्याचा निश्चित वापर करतील.

पाण्यावरुन जागतिक संघर्ष

याहून महत्त्वाचा मुद्दा आहे तो पाण्यावरुन भडकणार्‍या संघर्षाचा! भारत-पाकिस्तान यांच्यातील सिंधू नदीच्या वाटपावरुन असलेला वाद सर्वश्रुत आहे. पाकिस्तानातून वाहणार्‍या सिंधू नदीच्या पाचही उपनद्यांचा उगम भारतीय हद्दीत असल्याने त्या आपल्यासाठी लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. भारत बांगलादेश दरम्यान गंगेच्या पाण्यावरुन असलेला मतभेद, तिस्ता नदी वाद, यांच्यासह जगाच्या सर्वच भागांतील नद्यांचा त्यात समावेश आहे. आफ्रिका खंडात नाईल, वोल्टा झांबेझी, नायगर, सेनेगल या नद्यांवरुन असेच पाणी वाटपाचे वाद आहेत. मध्य आशियात अम दरिया-सिर दरिया या नद्यांवरुन उझबेकिस्तान, किर्गिजिस्तान, ताजिकिस्तान हे देश आजही झगडत आहेत.

कमी पावसाच्या मध्यपूर्वेत जॉर्डन, युफ्रेटिस, तायग्रिस या नद्या अशाच संघर्षाचे कारण ठरल्या आहेत. मध्य-पूर्वेतील संघर्षात पाणी हा प्रमुख मुद्दा आहेच. इस्त्रायलने 1967 मध्ये आक्रमण करून बळकावलेल्या आसपासच्या प्रदेशातच त्यांचे पाण्याचे दोन-तृतियांश स्त्रोत आहेत. तिथल्या वाळवंटी भागात पाणी हाच सर्वाधिक किंमती स्त्रोत आहे. पाण्यावरुन वाढणार्‍या संघर्षांंना कोणत्याही प्रदेशाची मर्यादा नाही. संयुक्त राष्ट्र संघाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार विविध देशांमधून वाहणार्‍या जगातील 263 सामाईक नद्यांपैकी 153 नद्यांबाबत अद्याप पाणी वाटपाचे म्हणावे तसे करार झालेले नाहीत.

या नद्यांमधून वाहणार्‍या पाण्याचे प्रमाण हे जगातील वाहत्या पाण्यापैकी 55 ते 60 टक्के इतके जास्त आहे. ही स्थिती पाणी हक्कावरुन आंतरराष्ट्रीय संघर्ष भडकण्यास आमंत्रण देणारी आहे. दोन किंवा अधिक देशांमधून वाहणार्‍या नद्यांच्या पाण्याबाबत नियमित आणि तातडीने राजनैतिक तोडगा काढणे हाच उपाय आहे. वाद चिघळत न ठेवता जलस्त्रोतांचे वाटप करून ़घेणे आवश्यक आहे. भारत पाकिस्तान यांच्यात सिंधुुनदीच्या पाण्यावरुन वाद असले तरी 1960 च्या सिंधुकरारामळे बरेच संघर्ष टळलेे. हा करार झाल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात 1965 आणि 1971 मध्ये दोन मोठी युद्ध झाली. पण युद्ध काळातही सिंधु कराराचे पालन दोन्ही देशांकडून झाले. हेच नाईल बाबत इजिप्त, सुदान, युगांडा, यांच्यातील कराराने साध्य केले आहे. पाण्याबाबतची आव्हाने पेलताना सामंजस्य आणि सहकार्य हीच उत्तरे आहेत. पाण्यावरून कधीही युद्धे, पेटू शकतात. त्याप्रमाणे पाणी हे शांतता प्रस्थापित करण्याचे प्रमुख साधनही ठरु शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या