257 भूखंड मिळाले तर हजारो कोटींचे धनी होऊ

द्दवाढीतील गावठाण जागा अन् त्यांची मोजणी मनपाच्या हद्दवाढीत लगतच्या 11 गावांचा समावेश आहे. मनपात येण्याआधी ग्रामपंचायतींच्या ताब्यात असणार्‍या गावठाण म्हणून संबोधल्या जाणार्‍या जागा, भूखंड यांची नव्याने मोजणी होणे आवश्यक आहे. मनपात जाण्याची कुणकूण लागताच काहींनी आपापल्या भागातील काही जागा बळकावल्याचेही बोलले जाते. त्यामुळे त्यांच्याकडे असणारे जागांचे उतारे, त्यात समाविष्ठ असलेली जागा आणि अतिरिक्त व्यापलेली जागा याचे नव्याने सर्वेक्षण झाल्यास बर्‍याचशा जागा मनपाला मिळू शकतात. नवीन समाविष्ठ भागात सुविधा पुरविणे मनपाचीच जबाबदारी असल्याने उत्पन्न वाढीचे प्रयत्न गांभीर्याने करावेच लागतील, ते व्हायलाच हवेत.
धुळे महापालिका
धुळे महापालिका

धुळ्याची महापालिका होवून दीड तपापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते आहे तसा शहराचा चहू बाजूने विस्तारही होतो आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेली मनपाची निवडणूक ही नवीन हद्द वाढीसह झाली. अर्थात शहरालगतच्या 11 गावांचा महानगरात समावेश झाला.

एकाअर्थाने या महानगराचे भौगोलिक स्वरुप विकसीत झाले. मात्र पाहिजे तशा सुविधा निर्माण झाल्या नाहीत. नगरपालिकेची महानगरपालिका झाली पण अजूनही या शहराला महानगराचे स्वरुप आलेले नाही. रोजगार, उद्योगधंदे, आयटी पार्क, मोठे मॉल्स किंवा वेगवेगळ्या क्षेत्राला वाहिलेले हब याठिकाणी निर्माण होवू शकलेले नाही. अजूनही या शहराच्या समस्या, पिण्याचे नियमीत पाणी, रस्ते, गटारी, वीज आणि आरोग्याच्याच भोवती फिरत आहेत.

मनपाच्या मालकीचे अनेक शॉपींग सेंटर वर्षानुवर्ष बंदच आहेत. त्यामुळे विकासावरच चर्चा करायची म्हटली तर ती एका लेखात संपणारी नाही. आपला मुद्दा महापालिकेच्या उत्पन्न वाढीशी निगडीत असला तरी यात येणारे अडथळे, काहींची मानसिकता आणि सत्तेचा दुरुपयोग या विषयांशी सल्लग्न आहे. मनपाने ठरविले तर आजही उत्पन्न वाढीचे अनेक स्त्रोत शहरात उपलब्ध आहेत. गरज आहे ती प्रामाणिकतेची.

यांचे अभिनंदनच आहे!

15 दिवसांपूर्वी खा.डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रयत्नाने, उपमहापौर कल्याणी अंपळकर, गजेंद्र अपंळकर यांच्या पाठपुराव्याने आणि महापौर चंद्रकांत सोनार, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या सहकार्याने एक मोठा भूखंड मनपाच्या ताब्यात आला. शहरातील दसेरा मैदान परिसरातील सुमारे शंभर कोटी रुपयांचे बाजार मूल्य असलेल्या भखंडावर मनपाचे नाव लागले. ही बाब निश्चितच मोठी आहे. यासाठी प्रयत्न करणारे नेते, पदाधिकारी यांचे अभिनंदनच केले पाहिजे.

यांचाही विचार व्हावा

शहरातील महापालिकेच्या मालकीचे भूखंड, मालमत्ता हे विषय नेहमीच चर्चेचे ठरतात. सभांमध्ये यावर गाजावाजाही होतो. त्यामुळे मध्यंतरी मनपाने केलेल्या सर्वेक्षणानुसार तब्बल 257 भूखंड मनपाच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट झाले.

यापैकी काही भूखंडावर काहीजणांनी अनधिकृतपणे कब्जा मिळविला आहे. कुठे यावर समाज मंदीर तर कुठे मंगल कार्यालये, काहीठिकाणी बगीचे तर काही ठिकाणी शेड उभारुन जागा अडकविण्यात आल्या आहेत. पडून असलेल्या भूखंडाची अवस्था देखील काहीशी अशीच आहे. झालेले बांधकाम तोडावे असे आपले म्हणणे नाही. परंतु मनपा मालकीच्या भूखंडावर बांधकाम किंवा एखादी सार्वजनिक हिताची वास्तू उभारली गेली असेल तर त्याचे अधिकार मनपाकडे यायला हवेत.

यातूनच उत्पन्नाचा झरा सुरू होवू शकतो. काहीठिकाणी परस्पर प्लॉट पाडून विकल्याच्याही तक्रारी अधुन मधून पुढे येतात. मात्र याच्या खोलात कोणी जात नाही. मनपाचा वाढता खर्च आणि उत्पन्नचे मर्यादीत स्त्रोत विचारात घेता महापालिकेला स्वतःचे उत्पन्न वाढविणे अत्यंत आवश्यक बनले आहे.

यासाठीच गार्डन असो की, नाट्यगृह, मंगल कार्यालय असो की, समाज मंदीर किंवा अगदीच मोकळी जागा असेल तर त्याचा व्यावसायीक दृष्ट्या काही उपयोग करता येईल काय? याचा विचार मनपा प्रशासनाने करणे गरजेचे आहे. एकच भूखंड शंभर कोटींच्या किमतीचा असेल तर सर्वेक्षणात आढळून आलेले सर्व 257 भूखंडांवर मनपाचे नाव लागले, ते ताब्यात घेतले तर महापालिका निश्चितच हजारो कोटींची धनी होवू शकेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com