शेतकरी ‘वाचवायचा’ तर...

शेतकरी ‘वाचवायचा’ तर...
Farmer

- डॉ. दत्ता देशकर, ज्येष्ठ जलतज्ज्ञ

महाराष्ट्रातील एका शेतकर्‍याने आत्महत्या करतांना मी पुढील जन्मी शेतकरी म्हणून जन्म घेणार नाही अशी घोषणा करीत प्राणत्याग केला. अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून विचार करताना या प्रश्नाच्या मुळाशी जाणे गरजेचे वाटते. तसे सखोल चिंतन केले असताना शेताचा आकार, माल संग्रहणाची सोय, बाजाराचा वेध, उत्पादन खर्चावर नियंत्रण, शेतीतील उत्पादकता, पाण्याची उपलब्धता, दररोज पैसा मिळवून देणारे पीक या सर्व गोष्टींचा विचार एकत्रपणे केला तरच शेती किफायतशीर होवू शकते आणि तसे झाले तरच शेतकर्‍याला आपण आत्महत्येपासून परावृत्त करु शकतो.

महाराष्ट्रातील एका शेतकर्‍याने आत्महत्या करतांना मी पुढील जन्मी शेतकरी म्हणून जन्म घेणार नाही अशी घोषणा करीत प्राणत्याग केला. या घोषणेला भावनात्मक दृष्टीने बघितले तर कथा आणि कादंबर्‍या सुद्धा लिहिल्या जावू शकतील. पण अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून मला तसे बघता येणार नाही. वर्षानुवर्षे शेतकर्‍याला सांगण्यात येत आहे की बाबा, शेतीकडे व्यवसाय म्हणून बघ जरा. शेतामध्ये एक वर्ष नुकसान आले तर मी समजू शकतो; पण वर्षानुवर्षे नुकसान येत असेल तर आपले कुठे तरी चुकते आहे हे तो विचारात का घेत नाही हा खरा प्रश्न आहे.

आज शेतीत सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शेतीपासून दररोज पैसा मिळणे. व्यक्तीगत जीवनात शेतकर्‍याला दररोज खर्च करण्यासाठी पैसा लागतो. त्याला शेतीबरोबर घरही चालवायचे असते. पण शेतीतून चार महिन्यांनंतर पैसा मिळणार असेल तर घरखर्च चालवायचा कसा ? आणि चार महिन्यांनंतर तरी पैसा मिळेल याची हमी काय? याच कारणामुळे कुटूंबातील एखादी व्यक्ती अशा कामासाठी बाजूला केली जावी की जिच्याकडून नियमित पैसा मिळू शकेल.

या शिवाय शेतीतील असा एखादा भाग असेल की जिथून दररोज पैसा मिळू शकेल. गायी आणि म्हशी पालन, कोंबडी पालन, शेळी पालन, मधुमक्खी पालन, वराह पालन, भाजीपाला निर्मिती यांसारखे व्यवसाय जर जोडधंदा म्हणून केले तर त्यापासून दररोज पैसा मिळू शकतो आणि दररोज पैसा मिळत असेल तर माझा दावा आहे की असा शेतकरी कधीही आत्महत्त्या करण्याचे पातक करणार नाही. दुर्दैव हे आहे की हे व्यवसाय करणे अनेकांना कमीपणाचे वाटते.

मला उत्पादन खर्चाचाही विचार करणे अगत्याचे वाटते. शेती कसण्यासाठी बिया, खते, औषधे यासारख्या निविष्ठा लागत असतात. या सगळ्या वस्तू पुरविणारे मोटारगाड्यांतून हिंडतात. पण त्या खरेदी करणारा शेतकरी मात्र वणवण हिंडताना दिसतो. आज शेतकर्‍यांचा सर्व जोर रासायनिक खतांवर दिसतो. पोत्याची दोरी सोडली की खत हजर. पण त्यामुळे शेताचे पोत खराब होणे आणि वारेमाप पैसा मोजावा लागणे याला उत्तर काय? शेतातील ओला कचरा व शेण (अर्थात त्यासाठी शेतात जनावरे असणे आवश्यक असते) जमा करुन त्यापासून विनामूल्य खत तयार करता येते ही बाबच शेतकरी विसरुन गेला आहे की काय, असा प्रश्न पडतो. गायीच्या मूत्रापासून अमूल्य असे कीटकनाशक तयार केले जावू शकते. पण ते न करता बाजारातून औषधाची बाटली आणणे हा मार्ग वापरला जातो. शिवाय त्याच औषधाचा वापर आत्महत्या करण्यासाठीही केला जावू शकतो ती बाब वेगळी. ‘पिकते तिथे विकत नाही’ ही म्हण आपण दररोज वापरतो. शेतकरी या म्हणीची अंमलबजावणी कधी करणार हा खरा प्रश्न आहे. प्रत्येक उत्पादक आपली विक्री व्यवस्था निश्चित केल्याशिवाय उत्पादनच करीत नाही.

तो जेव्हा बँकेत कर्ज मागण्यासाठी जातो तेव्हा बँक मॅनेजर त्याला तुझी विक्री व्यवस्था काय हा प्रश्न विचारतो आणि ती समाधानकारक वाटली तरच बँक कर्ज देते. मी उत्पादन करणार, पुढे जे काही व्हायचे ते होवो असे म्हणून चालत नाही. याच कारणाने जो शेतकरी ग्राहक नक्की करुन शेती करतो तोच यशस्वी झालेला दिसतो. पुण्याच्या आजूबाजूला असे कित्येक शेतकरी आहेत की ज्यांनी आपली विक्रीसाखळी मजबूत केली आहे आणि त्यामुळे ते एकरी सात ते आठ लाख रुपये कमवतांना दिसतात. व्यवसायात टिकून राहायचे असेल तर शेतीत गुंतवणूक करावी लागते.

नवीन तंत्रांचा अवलंब करावा लागतो. पण शेतकर्‍याकडे शेतमाल विकून घरखर्च चालविण्यासाठी पैसा बाजूला ठेवून काही शिल्लकच उरत नाही. मग तो शेतीचा विकास कसा करणाऱ? त्यासाठी कर्ज घेतले तर त्याची परतफेड कशी करायची हा प्रश्न निर्माण होतो. थोडक्यात काय तर तो शेतीला अडचणींमधून बाहेर काढूच शकत नाही आणि वर्षानुवर्षे तशीच शेती रडतखडत करत राहतो. आर्थिक स्थैर्य असलेला शेतकरी विरळाच. शेतमाल योग्य भावात विकायचा असेल तर तुमच्याजवळ भरपूर शेतमाल असावा लागतो. तरच तुम्ही बाजारावर दबाव आणू शकता. दीड-दोन एकर शेती कसणारा माणूस हा दबाव कसा आणणार? असे असेल तर बाजारावर त्याचे काहीच नियंत्रण राहात नाही. मिळेल ती किंमत घेवून त्याला समाधानी राहावे लागते. बरेच शेतकरी एकत्र आले तर मात्र पुरवठ्यावर ताबा मिळवता येतो; पण एकत्र येण्यासाठी शेतकरी प्रयत्न करतांना दिसत नाही. सहकार आपल्या राज्यकत्यार्ंंनी इतका बदनाम करुन ठेवला आहे की शेतकर्‍याला एकत्र यायची भितीच वाटायला लागली आहे. शेताचा आकार, माल संग्रहणाची सोय, बाजाराचा वेध, उत्पादन खर्चावर नियंत्रण, शेतीतील उत्पादकता, पाण्याची उपलब्धता, दररोज पैसा मिळवून देणारे पीक या सर्व गोष्टींचा विचार एकत्रपणे केला तरच शेती किफायतशीर होवू शकते आणि तसे झाले तरच शेतकर्‍याला आपण आत्महत्येपासून परावृत्त करु शकतो.

Related Stories

No stories found.