कसे थांबणार मॅरिटेल रेप?

कसे थांबणार मॅरिटेल रेप?

- विधिषा देशपांडे Vidhisha Deshpande

पत्नीशी बळजबरीने संबंध ठेवणे किंवा संबंध ठेवण्यास भाग पाडणे हा एकप्रकारचा विवाहांतर्गत बलात्कार असून तो घटस्फोट देण्यासाठी सबळ कारण ठरू शकतो, असा महत्त्वाचा निकाल अलिकडेच केरळ उच्च न्यायालयाने Kerala High Court दिला आहे. या आधारावर उच्च न्यायालयाने घटस्फोट नामंजूर करण्याची पतीची याचिका फेटाळून लावली. तत्पूर्वी कनिष्ट न्यायालयाने पत्नीने मागितलेला घटस्फोट मंजूर केला होता आणि या निकालाला पतीने आव्हान दिले होते.

उच्च न्यायालयाने निर्णयात स्पष्टपणे म्हटले की, देशातील कायदा हा विवाहांतर्गत संबंधात होणार्‍या बलात्काराला गुन्हा मानत नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की, पतीचे गैरवर्तन घटस्फोट घेण्यास कारण ठरू शकत नाही. भारतीय समाजातील मोठा वर्ग आजही पत्नीच्या शरिरावर हक्क गाजवतो. या कथित हक्काच्या जोरावर बहुतांश लोक पत्नीच्या इच्छेविरोधात लैंगिक संबंध ठेवण्याचा अधिकार गाजवतात.

उच्च न्यायालयाने म्हटले की, आधुनिक सामाजिक न्यायशास्त्रात पती आणि पत्नीला समान दर्जा देण्यात आला आहे आणि पतीला कोणत्याही रुपात पत्नीवर आपली मर्जी थोपवण्याचा अधिकार नाही.

यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित राहतात की, देशातील कायद्यांना मॅरिटेल रेपकडे दुर्लक्ष करण्याची सवलत कधीपर्यंत मिळणार आहे? एका आकडेवारीनुसार देशात वैवाहिक जीवन जगणार्‍या 15 ते 49 वयोगटातील प्रत्येकी तीनपैकी एक महिलेवर पतीकडून अत्याचार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जगातील 36 देशात मॅरिटेल रेप Marital Rape हा कायदेशीर गुन्हा नाही. भारतातील कायदे इंग्रजांनी केल्याचे सांगितले जाते. परंतु ब्रिटनमध्ये 30 वर्षापूर्वीच पतीने जबरदस्तीने ठेवलेले संबंध हा गुन्हा असल्याची तरतूद करण्यात आली.

अर्थात आपल्याकडे एखादा कायदा तयार झाला की त्याचा मोठ्या प्रमाणात दुरपयोग होवू शकतो, या शंकेला देखील वाव आहे. परंतु संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी कायद्यात काही तरतूद केल्यास शंकेचे निरसन होवू शकते. अशा प्रकरणात अटकेची कारवाई करताना आणखी काही निकष बसवता येणे शक्य होऊ शकतेे. परंतु लग्न केले म्हणजे पत्नीबरोबर मनमानीप्रमाणे संबंध ठेवता येतात, ही मान्यता खोडून काढणे गरजेचे आहे. कायद्यानुसार वैवाहिक संबंधाच्या काळात पीडितांना संरक्षण देणे ही कायद्याची जबाबदारी आहे. भारतात विवाहाला सात जन्माचे संबंध म्हणून मानले जाते आणि त्या आधारावर दोषीला निर्दोष ठरवता येणार नाही.

मॅरिटल रेप म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास पत्नीच्या इच्छेविरोधात संबंध ठेवणे हा वैवाहिक बलात्कार आहे. परंतु या कृत्यास गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवलेले नाही. परंतु संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी वैवाहिक बलात्काराचे तब्बल 75 टक्के प्रकरणे होतात. केरळ न्यायालयाने म्हटले की, या कृतीला दंड ठोठावता येणार नाही, परंतु यास शारीरिक आणि मानसिक क्रुरतेच्या नजरेतून पाहिले जाईल.

कायदा काय म्हणतो?

बलात्कार हा गंभीर गुन्हा आहेच. परंतु वैवाहिक बलात्काराचा यात समावेश नाही. कलमात बलात्काराची व्याख्या स्पष्ट केली आहे. परंतु मॅरिटल रेपचा उल्लेख नाही. पत्नीचे वय 12 पेक्षा कमी असेल तर पतीला शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात आहे. म्हणजेच अल्पवयीन पत्नीवर पती बलात्कार करत असेल तर त्याला दंड किंवा दोन वर्षाचा तुरुंगावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्याचवेळी 12 पेक्षा अधिक वयाच्या पत्नीवर परवानगीने किंवा परवानगी नसताना केलेल्या बलात्काराचा उल्लेख नाही. शेवटी पत्नीची इच्छा असो किंवा नसो, पत्नीशी शारिरीक संबंध ठेवणे हा पतीराजांना अधिकार वाटतो. परंतु पुरुषांना महिलांचा ङ्गनकारफ समजत नाही का?. बलात्कार हा शेवटी बलात्कारच आहे. पतीला परमेश्वर समजून पत्नी किती दिवस वैवाहिक बलात्काराचा अन्याय सहन करत राहणार, हा देखील प्रश्न आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com