कौशल्य आणि गुणवत्ता विकास गरजेचा
फिचर्स

कौशल्य आणि गुणवत्ता विकास गरजेचा

दैनिक देशदूत वर्धापन दिन विशेष

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

हॉस्पिटॅलिटी उद्योगाचा विचार केल्यास येणार्‍या 25 वर्षांत या क्षेत्रामध्ये कमालीचे बदल झालेले दिसून येतील. शासनाचे नियम आणखी कठोर होतील. प्रत्येक खाद्यपदार्थाबाबत हायजेनिकचे प्रश्न काटेकोरपणे तपासले जातील. सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजना कसोशीने पाळाव्या लागतील. स्पर्धेत टिकण्यासाठी छोट्या उद्योगांना कौशल्य विकसित करण्यासोबतच गुणवत्ता वाढवणेही गरजेचे आहे...

सागर गाढवे | नाशिक

कोविडने माणसाची जीवनशैली बदलून टाकली आहे. केवळ माणसाचे खानपान बदलले नाही तर सण-वार व विविध सोहळ्यांचे नियमच बदलून टाकले आहेत. त्यामुळे येणारे वर्ष तरी यातून बाहेर निघणे कठीण असणार आहे.

या महामारीमुळे जनसामान्यांच्या आनंदोत्सवावर विरजण पडले आहे. सण-उत्सव तर घरगुती सोहळेच झाले आहेत. सार्वजनिक ठिकाणी उत्सवांवर मर्यादा आली आहे. त्यापाठोपाठ अर्थातच विवाह सोहळ्यांना मर्यादा घालण्यात आल्या आहेत. 50 लोकांचा सोहळा करण्याला परवानगी आहे. येणार्‍या काळात त्यात वाढ होईल, मात्र सद्यस्थितीत हा उद्योग टिकवणे हे मोठे आव्हान आहे. सेवा उद्योग म्हटले की त्यात मनुष्यबळ हे महत्त्वाचे आहे.

या क्षेत्रातील बहुतांश मनुष्यबळ हे अनस्किल गटातून येते. कोविडच्या लॉकडाऊन काळात उद्योग व्यवसाय बंद असताना या लोकांना सांभाळणे हे दिव्य होते.

आगामी काळाचा विचार केल्यास येत्या काही वर्षांमध्ये सेवा उद्योगात खूप मोठे बदल करणे शक्य आहे. किंबहुना ते करावे लागतील. अन्यथा टिकाव धरणे कठीण होईल. शासनाद्वारे वेगवेगळ्या अटी-शर्ती लावण्यात आलेल्या आहेत. त्यातून उद्योग सुरू ठेवणे कठीण होत जाणार आहे. पूर्वी हॉलमध्ये बंधन नसलेली फायर सेफ्टीची नोंद आता लॉन्सलाही लागू होणार आहेत. फेडरेशनच्या माध्यमातून शासनाला जीएसटी पाच टक्के करण्यास आग्रह धरलेला आहे. त्यावर पाठपुराव्याचे कामही चालू आहे.

नियमांमुळे आधीच समारंभांची संख्या कमी होत आहे. त्याचा परिणाम व्यावसायिकांना स्पर्धात्मक दर देणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे जीएसटी कमी करून भार कमी करावा, अशी मागणी फेडरेशनने शासनाकडे केली आहे.

येणार्‍या काळात आचारी, महाराज ही संकल्पना काही अंशाने मागे पडेल आणि मोठ्या उद्योग समूहांचा यात शिरकाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या प्रणालीला तोंड देताना छोट्या व्यावसायिकांची अडचण होणार आहे.

येणार्‍या काळात बँक्वेट हॉल ही संकल्पना उदयास येणार आहे. यासोबतच आगामी काळात सेंट्रल किचन आवश्यक केले जाणार आहे. यादृष्टीने शासनस्तरावरूनही प्रयत्न केले जात आहेत. सर्वसामान्यतः नागरिकांना आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अन टच, हायजेनिक फूड ही संकल्पना वाढणार आहे.

त्या माध्यमातून सेंट्रल किचनद्वारे अन्नपुरवठा केला जाणार आहे. शासनाद्वारे मोठमोठे वेअर हाऊस तयार करून त्या माध्यमातून सेंट्रल किचनप्रणाली उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे मोठ्या उद्योग समूहांना या प्रणालीचा वापर करणे सोपे होणार आहे. मात्र छोट्या प्रमाणात काम करणार्‍या केटरिंग व्यावसायिकांना टिकाव धरणे कठीण होईल.

शासनस्तरावरून पर्यटनाला प्रोत्साहन देणे गरजेचे होणार आहे. भारतात महाराष्ट्रात किंबहुना नाशिकमध्ये खूप पर्यटन स्थळे आहेत. त्यांना योग्य पद्धतीने जोपासणे गरजेचे आहे. शासनस्तरावरून त्यादृष्टीने प्रयत्न केले जात असून येणार्‍या काळात पर्यटन हा मोठा भाग आपल्याला समोर येईल. त्या माध्यमातून संधीही उपलब्ध होतील.

नाशिकमधील वातावरण, निसर्ग संपदा अतिशय सुरेख असल्याने साप्ताहिक सुटीचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वर इतक्या तोलामोलाचे पर्यटन स्थळ म्हणून नाशिक विकसित होऊ लागेल.

हॉस्पिटॅलिटी अथवा कॅटर्स या व्यवसायाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला जाईल. येणार्‍या काळात या क्षेत्राकडे लोकांची ओढ वाढणार आहे. आज केटरिंग अथवा हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई-पुण्याकडे जावे लागते. आगामी काळात नाशकातही प्रशिक्षण केंद्र वेगाने विकसित होतील आणि आचारी व्यवसायाला सन्मानचे स्थान मिळेल. येणारा काळ उच्च तंत्रज्ञान तसेच ऑटोमेशनचा आहे.

त्यामुळे अनेक ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करून, कामाची गती, अचूकता व शुद्धता पाळली जाईल. अर्थात, त्यामुळे काही प्रमाणात मनुष्यबळावर त्याचा परिणाम होईल. यामुळे साधारण 50 टक्के मनुष्यबळ कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणार्‍या काळात अनस्किल्ड कामगारांपेक्षा कुशल मनुष्यबळालाच मागणी राहील. हॉस्पिटॅलिटी उद्योगाचा विचार केल्यास येणार्‍या 25 वर्षांत या क्षेत्रामध्ये कमालीचे बदल झालेले दिसून येतील. शासनाचे नियम आणखी कठोर होतील.

प्रत्येक खाद्यपदार्थाबाबत हायजेनिकचे प्रश्न काटेकोरपणे तपासले जातील. लग्न सोहळ्यांना मर्यादा आली असली तरी ते बंद होऊ शकत नाहीत. त्यामुळे या उद्योगांनाही खूप मोठी संधी भविष्यात वाढणार आहे. सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजना कसोशीने पाळाव्या लागतील. मात्र मोठ्या उद्योग समूहाच्या शिरकावामुळे स्पर्धा वाढणार आहे.

या स्पर्धेत छोट्या उद्योगांना टिकाऊ धरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यासोबतच गुणवत्ता वाढवणेही गरजेचे ठरणार आहे. समाजाची मानसिकताही ‘बदला’ची आहे. तोच तोपणा लोकांना आवडत नाही. त्यामुळे सेवासुविधा, पदार्थांच्या पुरवठ्यामध्ये सातत्याने नावीन्यपूर्ण बदल करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com