अर्थव्यवस्था गतिमान होण्याची आशा

अर्थव्यवस्था गतिमान होण्याची आशा

- टी.व्ही.मोहनदास पै

सरकारी खर्च वाढल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था यावर्षी साडेआठ ते दहा टक्के दराने वृद्धी नोंदवू शकते, अशी आशा गुंतवणूकदार आणि उद्यम जगताला आहे. हे लक्ष्य पूर्ण केल्यास देशाला 50 दशअब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे तसेच पुढील दशकात ती शंभर दशअब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होऊ शकेल.

भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल तेजीकडे सुरू असल्याचे आकडेवारी दर्शविते. गुंतवणूकदार आणि उद्यम जगतातील आशावादाबरोबरच वाढत्या सरकारी खर्चामुळे 2021-22 या आर्थिक वर्षात भारत साडेआठ ते दहा टक्के दराने वृद्धी नोंदवू शकतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आएमएफ) आणि जागतिक बँकेने भारताच्या विकासाची उद्दिष्टे याच दरम्यान अंदाजित केली आहेत.

ही उद्दिष्टे पूर्ण केल्यास भारतीय अर्थव्यवस्था 50 दशअब्ज डॉलरपर्यंत तर पुढील दशकात ती शंभर दशअब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करता येणे शक्य होईल. 2022 या आर्थिक वर्षासाठी नवीनतम सकल मूल्यवर्धित अनुमान (जीव्हीए) असे सांगतात की, पहिल्या तिमाहीमध्ये नॉमिनल जीव्हीए 26.8 टक्के इतका होता तर 2021 या च्या पहिल्या तिमाहीत तो उणे 20.2 टक्के होता.

2021 हे आर्थिक वर्ष निश्चितपणे कोविडची महामारी आणि देशव्यापी लॉकडाउनमुळे लक्षात राहील. अर्थात 2021 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 31.7 टक्क्यांच्या दराने वाढ होऊनसुद्धा देशाचा नॉमिनल जीडीपी कोविडपूर्व काळातील आकडेवारीपर्यंत पोहोचू शकलेला नाही. दुसर्‍या लाटेदरम्यान जारी करण्यात आलेल्या लॉकडाउनचा हा परिणाम होय.

क्षेत्रवार विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत कृषी क्षेत्रात 11.3 टक्के वृद्धी झाली आहे. या क्षेत्रामुळे सर्वाधिक 43 टक्के कार्यशक्तीला रोजगार मिळत असल्यामुळे ही वृद्धी या क्षेत्राला मोठी आघाडी प्राप्त करून देणारी ठरते.

याच कालावधीत उद्योग क्षेत्र मागील वर्षाच्या उणे 38.2 टक्क्यांच्या तुलनेत 67.1 टक्के दराने वाढले. देशाच्या विकासाचा प्रमुख वाहक मानले गेलेले सेवा क्षेत्र गेल्या वर्षीच्या उणे 19 टक्क्यांच्या तुलनेत या कालावधीत 17.8 टक्क्यांनी वाढले. यावर्षीचे विकासाचे आकडे अतिरंजित वाटतात, याचे कारण गेल्या वर्षीची मोठी घसरण हेच आहे. सेवा क्षेत्राच्या अंतर्गत हॉटेल व्यवसाय, व्यापार, परिवहन आणि संचार या क्षेत्रांशी संबंधित उप-क्षेत्रे पिछाडीवर पडली आहेत. यात महामारीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या क्षेत्रांचा समावेश आहे.

उदाहरणार्थ, हवाई वाहतूक, आतिथ्य आणि हॉटेल व्यवसाय, रेस्टॉरंट आणि भोजनालये इ. यावर्षी दुसर्‍या लाटेदरम्यान या क्षेत्रांना पुन्हा एकदा झळ बसली. पण आता ही क्षेत्रे पुन्हा रुळावर येत आहेत.

बँकिंगचे उप-क्षेत्र आशाजनक वृद्धी नोंदवीत आहे. सप्टेंबर 2021 पर्यंत जमा रकमेत 9.3 टक्क्यांची वृद्धी झाली होती तर कर्जवाटपात 6.7 टक्क्यांची वाढ झालेली आहे. हे दर उत्साहवर्धक आहेत, परंतु ज्या वेगाने हे क्षेत्र विकासाच्या वाटेवर पुन्हा परतणे अपेक्षित होते, त्या तुलनेत हे क्षेत्र कमकुवतच असल्याचे दिसते. नॉन परफॉर्मिंग असेट्स (एनपीए) मार्च 2018 च्या 12 टक्क्यांवरून घटून मार्च 2021 मध्ये आठ टक्के उरला आहे.

अर्थव्यवस्थेला प्रोत्साहित करण्यासाठी मदत करणारी धोरणे अंमलात आणली आहेत. उदाहरणार्थ महामारीच्या पूर्वी जे व्याजदर होते त्यात दीड ते दोन टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गृहकर्जावरील व्याजदर पूर्वी साडेआठ टक्के होता, तो आता साडेसहा टक्क्यांच्या नीचांकी पातळीवर आणण्यात आला आहे.

अर्थव्यवस्थेशी संबंधित व्यापक निदर्शकही उल्लेखनीय आहेत. ऑगस्टमध्ये महागाई वृद्धीचा दर 5.3 टक्के होता, तो आता कमी झाला आहे. ग्राहक मूल्य निर्देशांकातही (सीपीआय) घट होऊन तो 4.35 टक्क्यांवर आला आहे. ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) वाढून तो 11.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षात 82 अब्ज डॉलरच्या प्रत्यक्ष परदेशी गुंतवणुकीनेही उच्चांक गाठला. कॉर्पोरेट क्षेत्रही वेगाने पुन्हा रुळावर येत आहे. अधिकांश कंपन्यांनी पुन्हा विक्रमी गतीने कर्जाची परतफेड केली असून, कॉर्पोरेट कर्जांमध्ये घट झाली आहे.

कॉर्पोरेट कर कमी करून 25 टक्क्यांवर आणण्याच्या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण आहे आणि उद्योगविश्व क्षमतावृद्धी करण्यासाठी भांडवली खर्च वाढविण्याचा विचार करीत आहे. परदेशी व्यापारही वाढत आहे. सप्टेंबरपर्यंत आपली निर्यात 198 अब्ज डॉलरवर पोहोचलेली होती. गेल्या वर्षी याच कालावधीत ती 125 अब्ज डॉलर होती. म्हणजेच निर्यातीत 58 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. अर्थात, या कालावधीत आयात 151 अब्ज डॉलरच्या मागील वर्षीच्या आकड्यावरून वाढून 276 डॉलरवर पोहोचली आहे.

व्यापारी तूट गेल्या वर्षीच्या 26 अब्ज डॉलरवरून वाढून ती 78 अब्ज डॉलर एवढी झाली आहे. वाढत्या व्यापारी तुटीचा अर्थ असा की परकीय चलनाची गंगाजळी पूर्वीप्रमाणे वाढणार नाही आणि बँकिंग प्रणालीतील तरलताही पूर्वीसारखी उच्च स्तरावर पोहोचणार नाही. सध्याची तरलता 10-11 लाख कोटी रुपये एवढी आहे. आर्थिक विकासाची वाढ होण्याचा परिणाम अंतिमतः करसंकलनात दिसला पाहिजे.

करसंकलन वस्तुतः पूर्वपदावर आलेही आहे. यावर्षी एप्रिलपासून ऑगस्टपर्यंतचे करसंकलन मागील वर्षाच्या 5.04 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत वाढून 8.59 लाख कोटी इतके झाले आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करवसुलीत वाढ झाल्यामुळे ही 70 टक्क्यांची वाढ शक्य झाली आहे. केवळ 2021 च नव्हे तर 2020 च्या तुलनेतही करसंकलन वाढले आहे आणि ही तेजीचे संकेत देणारी बाब होय.

एप्रिल ते ऑगस्टदरम्यान राजकोषीय तूट गेल्या वर्षीच्या 8.7 लाख कोटींवरून कमी होऊन 4.68 लाख कोटी रुपये राहिली आहे. सरकारी खर्चामुळे भांडवली खर्चात 28 टक्क्यांची वाढ झाली आहे. राजकोषीय तुटीचा प्रवास निश्चितच सरकारी खर्चावर अवलंबून असेल. सरकार अधिक खर्च करीत आहे, त्याचा परिणाम म्हणून समग्र खर्च, विक्री आणि विकासात वाढ होणार आहे आणि त्यातूनच अंतिमतः आर्थिक विकासाच्या दरात वृद्धी होईल. उच्च कर्जवाटपाच्या आशेने तरलता मोठ्या प्रमाणावर असूनसुद्धा सरकारी बाँड्सच्या दरात वाढ झाली आहे.

अर्थात, खूप खर्च करूनसुद्धा सरकारी कर्ज अर्थसंकल्पापेक्षा कमी असू शकते, असे संकेत आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने ती चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळेच भारतीय अर्थव्यवस्थेत व्यापक अडचणी येत आहेत. एकंदरीत, विकास आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत वृद्धी होत असल्याचे अनेक निदर्शक आहेत. व्यापक आशावादामुळेच शेअर बाजाराचे मूल्यांकन 260 लाख कोटी इतक्या सर्वकालीन उच्च स्तरावर आहे.

सध्याचा जीडीपी 210 लाख कोटी एवढा असून, त्या तुलनेत हे मूल्यांकन कितीतरी अधिक आहे. भारतीय शेअर बाजाराचे भांडवलीकरण यावर्षी चौथ्या स्थानावर पोहोचण्याचे संकेत मिळत आहेत. यावर्षी सरकारी स्तरावर मोठ्या सुधारणा पाहायला मिळाल्या आहेत आणि कोविडचा अडथळा असूनसुद्धा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या आशावादाचा परिणाम म्हणून भांडवली खर्चात वाढ होईल आणि आर्थिक घडामोडींमध्ये वाढ पाहायला मिळेल, अशी आशा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com