
दरवर्षी मार्च महिन्यातील तिसर्या शुक्रवारी 'जागतिक निद्रा दिवस' साजरा केला जातो. यावर्षी 18 मार्च म्हणजेचं आज निद्रा दिवस साजरा केला जात आहे. 'वर्ल्ड स्लीप डे' प्रथम 2008 मध्ये साजरा करण्यात आला. तेव्हापासून 'जागतिक निद्रा दिवस' दरवर्षी मार्च महिन्यात तिसर्या शुक्रवारी साजरा केला जातो. झोप आणि आरोग्य यांच्यातील संबंधांबद्दल लोकांना जागरूक करणे हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोकांना आजकाल पुरेशी झोप मिळत नाही. याचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. यासाठी, डॉक्टर दररोज किमान 8 तास झोपण्याची शिफारस करतात. 2022 या वर्षी जागतिक निद्रा दिवसाची थीम Quality Sleep, Sound Mind, Happy World. अशी आहे. या खाल लेखातून जागतिक निद्रा दिवसचा इतिहास आणि महत्त्व समजून घेऊयात.
जागतिक निद्रा दिवसचा इतिहास -
'वर्ल्ड स्लीप सोसायटी', 'वर्ल्ड स्लीप डे'च्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करते. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे लोक बर्याच आजारांचे बळी पडतात. हे रोखण्यासाठी जागतिक निद्रा दिवस सोसायटीने, वर्ल्ड स्लीप डे सुरू केला. आज जगातील 88 हून अधिक देशांमध्ये वर्ल्ड स्लीप डे साजरा केला जातो. प्रथम हा दिवस 2008 मध्ये साजरा करण्यात आला. निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. यासाठी जागतिक निद्रा सोसायटीने वर्ल्ड स्लीप डे साजरा करण्यास सुरुवात केली. जेणेकरुन लोक झोपेत्या बाबतील जागरूक होतील.
नवजात बालकं, प्रौढ व्यक्ती, वृद्ध लोकं यांना निरोगी आरोग्यसाठी किती तास झोप आवश्यक ?
योग्य वेळेत आणि पुरेशी झोप ही नवजात बालकांपासून अगदी वयोवृद्धांसाठी आवश्यक आहे. उत्तम झोप हे निरोगी आरोग्याचं गुपित आहे. त्यामुळे पहा प्रत्येकाला कोणत्या टप्प्यावर किती झोप घेणं आवश्यक आहे हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
Sleep Health Journal ने दिलेल्या माहितीनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाच्या शरीरात बदल होत असतात. बदलती जीवनशैली आणि आरोग्य यांची सांगड घालण्यासाठी प्रत्येकाला वयाच्या विविध टप्प्यावर वेगवेगळ्या तासाचा आराम आणि झोप आवश्यक आहे.
नवजात बालकं - नुकताच जन्म झालेले बाळ पहिल्या 3 महिन्याच्या टप्प्यापर्यंत सुमारे 14-17 तास रोज झोपते. जसजशी मुलांची वाढ होते तसे ते सुरूवातीला 4-11 महिन्याच्या काळात 12-15 तास झोपते. पहिल्या 1-2 वर्षांची मुलं अॅक्टिव्ह होतात, त्यांची वाढ होत असताना दिवसभरात 11-14 तास झोप आवश्यक असते.
तीन ते साडे तीन वर्षापासून मुलं शाळेत, नर्सरीमध्ये शिकायला लागतात. तेव्हा 6-13 वर्ष या शालेय जीवनात मुलांना दिवसभरात 9-11 तास झोप नियमित आवश्यक आहे. 14-17 वर्षात मुलं आणि मुली दोन्हींच्या शरीरात हार्मोनल बदल होत असतात. अशा काळात शारिरीक वाढीसाठी नियमित 8-10 तास झोपणे आवश्यक आहे. 18-25 या तारूण्याच्या काळात काम, शिक्षण, धावपळ अधिक प्रमाणात होते त्यामुळे या वयोगटात 7-9 तास झोप पुरेशी आहे.
26- 64 या प्रौढ वयोगटातील मंडळीदेखील 7-9 तास झोपणे आवश्यक आहे. या टप्प्यामध्ये स्त्रियांच्या जीवनात ममातृत्त्वफ आणि ममेनोपॉजफचा टप्पा असतो. त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात बदल होतात. या काळात गरोदर स्त्रियांना अधिक झोपेचे गरज असते. गर्भारपणात झोप येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे.
जसजसा आयुष्याचा टप्पा वार्धक्याकडे जातो तशी झोप कमी होण्यास सुरूवात होते. 64 हून अधिक वयातील मंडळींमध्ये किमान 7-8 तास झोप पुरेशी असते. अनेकांची झोप कमी होते. वेळच्या वेळी पौष्टिक आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते. त्यामुळे वयानुसार तुमची जीवनशैली जरी बदलली तरीही झोपेच्या बाबतीमध्ये निष्काळजीपणा करू नका. झोपेच्या गणितावरही अनेक आजार अवलंबून असतात.
जागतिक निद्रा दिवसाचे महत्त्व -
आधुनिक काळात लोक चुकीचे खाणे, दिनचर्या, तणाव आणि कमी झोपेमुळे विविध प्रकारच्या आजाराने त्रस्त आहेत. कमी झोप आणि तणाव यांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. जागतिक निद्रा दिवस सोसायटीचे हे पाऊल कौतुकास्पद आहे. याद्वारे लोकांना पुरेशा झोपेची महत्त्व पटवून दिलं जातं. तुम्हीही स्वत: ला निरोगी ठेवू इच्छित असल्यास, दररोज 8 तासांची झोप नक्की घ्या.