उच्चक्षिक्षण हवे परिवर्तनशील!

jalgaon-digital
5 Min Read

नितीन परांजपे

उच्चशिक्षणात परिवर्तनशीलतेला फार महत्त्व आहे. मात्र आजच्या विद्यापीठ शिक्षणात त्याचीच कमतरता आहे. सर्वच प्रकारचे शिक्षण संस्थांच्या जाळ्यात सापडले आहे. शिकणार्‍याला ते स्वातंत्र्य नाही. शिक्षण विद्यार्थ्याप्रमाणे व त्याच्या आवडीप्रमाणे असायला हवे. आज तसे ते मिळत नाही. येत्या 25 वर्षांत ते परिवर्तनशील व्हायला हवे.

आजकालच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जे शिकण्यात रस आहे तेच शिकवले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिकवले जात नाही तोपर्यंत उच्चशिक्षणाला चांगले दिवस येणार नाहीत. महाविद्यालयात एक ठरलेली व्यवस्था असते.

लेक्चर्स, परीक्षा व प्राध्यापक असतात. तसे शिक्षण नको. सर्व महाविद्यालये एका व्यवस्थेतच अडकून पडलेली आहेत. उच्चशिक्षण खरे तर ज्ञानासाठी, ज्ञानाचे अ‍ॅप्लिकेशन होण्यासाठी आहे. ते ज्ञान मी कुठे वापरू? ते करून मला माझे आयुष्य समृद्ध करायचे आहे.

मला माझे आयुष्य जगता येईल, याच शिक्षणाला धरून आवडीचे कामही करता येईल, अशा प्रकारचे उच्चशिक्षण असावे, हे अपेक्षित आहे. वरील बाबींसाठी परिवर्तनशीलता (फ्लेक्सिबिलिटी) फार महत्त्वाची आहे. हीच मात्र आजच्या विद्यापीठ शिक्षणात त्याची कमतरता आहे.

शिक्षण विद्यार्थ्याप्रमाणे व त्याच्या आवडीप्रमाणे असायला हवे. आज तसे ते मिळत नाही. येत्या 25 वर्षांत तशी परिवर्तनशीलता त्यात यायला हवी. शिक्षण शिकायला स्वातंत्र्य हवे. ज्ञानाचा सखोल अभ्यास करण्यासाठी संधी हवी. म्हणजेच एखादा विद्यार्थी अ‍ॅग्रिकल्चरचे शिक्षण घेत आहे तर या अभ्यासात त्याला विज्ञान, इतिहास, तत्त्वज्ञान, कला काय आहे? हे शिकण्याची संंधी मिळेल.

त्यानंतर त्याचे अ‍ॅप्लिकेशनही विद्यार्थ्याला कळतील. येथून पुढे प्रॅक्टिकल, थेरॉटिकल करायला मिळेल. दुसरे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला अकाऊंटचे शिक्षण घ्यायचे असेल तर त्याला सहा दिवस कॉलेजला न जाता तीन दिवस इंटर्नशिप करायला व तीन दिवस कॉलेजला जायला मिळेल.

यातून विद्यार्थ्याला प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल. असे होऊ शकेल का? दुसरे असे की, हाताने काम! आपण सध्या डोळ्याने शिकतो. शिक्षणात हात नाही. हाताने शिकण्यासाठी काही करता येईल का? मला सर्वच जमले पाहिजे. स्वयंपाक आला पाहिजे अशा तर्‍हेने. ग्रामीण भागातील मुले हाताने काम करण्यास सरस असतात. मात्र त्यांच्या तुलनेत शहरी मुले केवळ हाताने कॉम्प्युटर चालवतात. शिक्षण हाताने आणि डोक्यानेच असायला हवे.

विद्यार्थ्याला कुठेतरी इंटर्नशिप करता आली पाहिजे. आर्किटेक्चर शिक्षणाचे असेच करता येईल. म्हणजे विद्यार्थी शिक्षण घेता-घेता पाच दिवसांपैकी तीन दिवस शिक्षण व उर्वरित दोन दिवस आर्किटेक्चरकडे प्रॅक्टिस करू शकतो.वास्तविक मुलांना शिकवणारे शिक्षकही तसेच असायला हवेत. म्हणजे त्यांना शिकवण्यात रस आहे. या क्रमात फॉर्मल पद्धतीने मेंटर व इंटर्नशिप आवश्यक वाटते.

यासह जर्नालिझम शिकतोय तर विद्यार्थ्याला सर्व तर्‍हेची माहिती व दृष्टिकोन देता आला पाहिजे. त्याला शिकवताना राजकीय, सामाजिक, आर्थिक या तर्‍हेने बघण्याचा दृष्टिकोन दिला गेला पाहिजे. सध्या शिक्षक केवळ परीक्षा निगडीत शिकवतात. तसे शिक्षण अजिबात नको. प्रामुख्याने ज्ञानाशी निगडीत शिक्षण असायला हवे. तसेच दोन निरनिराळ्या मूल्यमापन पद्धती असायला हव्यात.

पहिली सेल्फ इव्हॅल्युएशन! त्या विद्यार्थ्याला काय वाटते? त्याने तितकी मेहनत घेतली आहे का? प्रॅक्टिस केलीय का? समजा 100 मार्क्स आहेत तर त्या विद्यार्थ्याला स्वत:ला किती मार्क्स द्यावे वाटतात? दुसरी पद्धत परीक्षा! यात ओरल, रिटर्न वा कोणतीही परीक्षा असो, अशा दोन्ही पद्धतींचे कॉम्बिनेशन झाले पाहिजे. अर्थात, हॉलिस्टिक मूल्यमापन झाले पाहिजे. विद्यार्थ्यांत शिकण्यासाठी अ‍ॅटिट्यूड काय आहे? घोकमपट्टी तर नाही करत ना? असे असायला हवे. विशेष म्हणजे शिक्षणात रेकगनायझेशन झाले पाहिजे.

विद्यार्थ्यांत स्किल खूप असते. समाजाला ते ठरवता येईल. बीई अ‍ॅग्रिकल्चर करणार्‍यांपेक्षा एका शेतकर्‍याचा मुलगा योग्य व्यवस्थापनाने शेती करतो. त्याच्या ज्ञानाचे कोणाला काही देणे-घेणे नाही. याबद्दल समाजात ओपननेस असला पाहिजे.

या पद्धतीचे उच्चशिक्षण असायला हवे. महत्त्वाचे म्हणजे शिक्षण आपल्या प्रादेशिक स्थितीशी निगडीत असायला हवे. जसे नाशिकसाठी उत्तर महाराष्ट्र आहे. तर याच उत्तर महाराष्ट्राला काय व कोणत्या विज्ञानाची, कलेची गरज आहे? हे बघता आले पाहिजे. त्याचा संबंध असला पाहिजे.

आजच्या स्थितीनुसार ग्रॅज्युएट व पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना समाजाबद्दल कमी माहिती असते. असे नको. जो विद्यार्थी विज्ञान, कला, वाणिज्य शाखेचा असेल त्याला आपला इतिहास, समाजाबद्दल सगळ्या बाबी माहिती पाहिजेत. यातून ज्ञान व दृष्टिकोन डेव्हलप झाला पाहिजे. हे उच्चशिक्षणाचे काम आहे. आपल्याकडे माणूस डिग्री होल्डर होतो, पण त्याला शहाणपण येत नाही. ते अनुभवानेच येते. त्यामुळे विद्यापीठ शिक्षण आपण कसे तयार करू शकू?

अभ्यासक्रम कसा असावा? याचा सर्व अंगांनी विचार करून धोरण डेव्हलप करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातला विद्यार्थी शहरात येतो. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असायला हवा. कारण ते नवीन असतात. शहरासारखी त्यांना माहिती नसते. त्यांना विशिष्ट गोष्टींचीच माहिती असते. त्यामुळे त्यांना सामावून घेतले पाहिजे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *