#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-४

A Social awareness initiative of the Nashik Obstetrics and Gynaecological Society
#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-४

रंग उमलत्या मनाचे ....

१९९० साली रंगभूमीवर रंग उमलत्या मनाचे नावाचं एक नाटक आलं होतं. वंदना गुप्ते आईच्या आणि सुमित राघवन मुलाच्या भूमिकेत होते. एकल पालक असलेली आई, तिचा वयात येणारा मुलगा आणि आईची पौगंडावस्थेतील मुलाला वाढवताना होणारी भावनिक तारांबळ ह्या विषयावर बेतलेलं हे अप्रतिम नाटक होत.

प्रत्येक पालकांना मुलं वयात येऊ लागली की विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. मुलगा असो वा मुलगी, वयात येत असताना, त्यांच्यात संप्रेरकांमुळे (हार्मोन्स) शारीरिक , मानसिक आणि भावनिक बदल झपाट्याने होऊ लागतात. त्या बदलांशी जुळवून घेताना योग्य मार्गदर्शक मिळणे आवश्यक असते. पालक, फॅमिली डॉक्टर, वर्गशिक्षक आणि समुपदेशक (counsellor), उत्तम पुस्तकं यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावतात. पालक आपल्या मुलांचे मित्र म्हणून वागले तर मुले त्यांच्या समस्या चांगल्या हाताळू शकतात. हल्ली शहरांमधील शाळांमध्ये ह्यासाठी खास व्याख्यानं (लेक्चर्स) ठेवली जातात .पण खेड्यात, वाड्या वस्त्या व इतर ठिकाणी ह्याची वानवा आहे.

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-४
#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१

एका मोठ्या स्थित्यंतराचा प्रत्यय ही मुलं रोज घेत असतात. मुलांमध्ये १२ ते १८ वर्ष आणि मुलींमध्ये ९ ते १६ वर्ष ही मोठ्या उलथापालथीची ठरतात. स्वतःची प्रतिमा जोखणे, शारीरिक बदल अनुभव, भिन्न लिंगी आकर्षण, काही तरी वेगळे करण्याची ऊर्मी, मोठे वाटण्यासाठी व इतरांसमोर स्वतः ला सिध्द करण्यासाठी धोकादायक प्रयोग करणे ह्या सारख्या अनेक गोष्टी या वयात वाटू लागतात. यातूनच मग बऱ्याचदा गंभीर चुका होतात. पौगंडावस्थेतील काही समस्या काय आहेत ते आपण आधी पाहू .....

१) समाज माध्यम (सोशल मीडिया) : हे दुधारी शस्त्र आहे. इंस्टा, एफ बी, व्हॉट्सॲप, ट्विटर, टिक टॉक सारखी अनेक ॲप्स हे तरुणाईचे आकर्षण आहेत.आपली प्रतिमा जास्तीत जास्त आकर्षक दिसण्याठी खूप आटापिटा केला जातो. त्यासाठी अवास्तव पैसे खर्च करणे, मोबाईल फोन साठी हट्ट करणे, सेल्फी काढताना जीवघेणे स्टंट करणे, पैसे चोरून खरेदी करणे अशा अनेक चुका नकळत होत जातात . 

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-४
#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग - २

२) गेम्स : सध्या आंतरजालावर ( इंटरनेट) कुठला नवीन गेम आला आहे. त्यामुळे गेम्सची चर्चा जास्त होताना दिसते. PUBG सारख्या गेम ने मुलांना हिंसक होण्यास प्रवृत्त केलं आहे. ब्लूव्हेल गेमने तर कित्येक कोवळ्या मुलांना आत्महत्येस भाग पाडले आहे .

३) व्यसन : आपल्या मित्र मैत्रीण यांच्यामध्ये आपली प्रतिमा उंचावण्यासाठी सिगारेट पिणे , अल्कोहोल घेणे गुटखा खाणे आणि काही वेळेस तर ड्रग्स घेण्यासाठी सुध्दा मुलं मागेपुढे पहात नाहीत. आणि हे सर्व करण्यासाठी पैसे लागतात जे एक तर श्रीमंत घरातील मुलांकडे असतात किंवा पैसे चोरून ह्या गोष्टी केल्या जातात. यातून मग गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढताना दिसते . 

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-४
#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-३

४) शरीर संबंध :  स्वतः मोठे झाल्याची भावना आणि नवीन प्रयोग करण्याची ऊर्मी (experimentation) कडे असलेला कल यामुळे गंभीर चूक होताना दिसतात. त्यामुळे कमी वयात गर्भधारणा होणे आणि पोस्को सारख्या गंभीर गुन्ह्यात अडकण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. त्याचबरोबर गुप्त रोग संक्रमणाचा धोकाही वाढतो. या शिवाय पॉर्न फिल्म बघण्याचे व्यसन लागू शकते. त्यातून पुढील आयुष्यात वैवाहिक जीवनात अवास्तव कल्पना डोक्यात असल्यामुळे विवाह टिकण्यास अडथळे येतात . 

५) मैत्रीतून दबाव (peer pressure) : आपले मित्र आपल्याला काय म्हणतील ह्या भावनेतून मुलं टोकाचे पाऊल उचलताना दिसतात. सायबर क्राईम, चोरी करणे, कॉपी करणे , व्यसन करणे, शरीर संबंध ठेवणे, प्रसंगी हत्या करणे या सारख्या गंभीर समस्या मित्रांना इमेप्र्स करण्यासाठी केल्या जातात .

अशावेळी काय करावं ? या वयात काही समस्या निर्माण झाल्यास आपल्या पालकांना विश्वासात घ्या, समुपदेशकांची मदत घेऊन समस्येचं निराकरण नक्की होऊ शकतं याची खात्री बाळगा. खरंच हा काळ एवढा कठीण असतो का ? एवढ्या समस्या निर्माण का होतात ? याचा विचार करायला हवा. प्रचंड ऊर्जास्त्रोत असणारा शारीरिक बळ वाढवणारा असा हा व्यक्तिमत्त्व विकास घडवणारा हा काळ आहे.

तीन मोठी उदाहरणं देता येतील. सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर, सोळाव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेऊन तोरणा किल्ला सर करणारे छ्त्रपती शिवाजी महाराज, वयाच्या सोळाव्या वर्षी कसोटी पदार्पण करणारा भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर. या वयात उत्तम स्मरणशक्ती, एकाग्रता, शारीरिक बल यांचा संगम साधता येऊ शकतो. त्यामुळे एक चांगलं व्यक्तिमत्त्व घडवता येऊ शकतं.

तसेच अलीकडची काही तरुण मुलांची उदाहरणं पाहू या. सतराव्या वर्षी झीरोदा स्टॉक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म तयार करणारे नितीन कामथ, ११ व्या वर्षी सर्वात तरुण वेब डिझायनर बनलेली श्रीलक्ष्मी सुरेश, १७ व्या वर्षी on your own हा OYO हॉटेल बुकिंग प्लॅटफॉर्म बनवणारा रितेश अगरवाल, गुगल व बिंग या दिग्गज कंपन्यांकडून मान्यता मिळवलेला १२ वर्षाचा तरुण तंत्रज्ञ अद्वैत ठाकूर, नॅशनल स्विमिंग चॅम्पियन वेदांत माधवन.ही अलीकडच्या काळातील प्रेरणादायी मुले आहेत ज्यांनी अगदी कोवळ्या वयात आपल्या सुप्त कल्पनांना आकार देऊन खूप छान काम करून दाखवले आहे. 

तर सुरवंट देखील विविध रंगी फुलपाखरामध्ये रूपांतरित होतं. अगदी तसंच आपलं व्यक्तिमत्त्व विविध रंगांनी आणि गुणांनी खुलवण्याचा हा सुवर्ण काळ ! निसर्गानं दिलेले हे देणं आपण कसे घडवतो हे आपल्याच हातात आहे, नाही का ?

डॉ. रविराज खैरनार, स्त्री रोगतज्ञ, नाशिक

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com