जोडी कमाल है…

jalgaon-digital
6 Min Read

– देवेंद्र व्यास, इंदूर

मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीत शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या जोडीने जनतेचा विश्वास मिळवून दाखविला. यामुळे सिंधिया यांची भाजपमधील स्वीकारार्हता वाढणार आहे.

काँग्रेसने मात्र कमलनाथ यांचे सरकार पाडल्याचे भांडवल करून सातत्याने नकारात्मक प्रचार केला आणि त्यामुळे भाजपमधील अंतर्गत धुसफूस हेरण्यात आणि त्याचा लाभ घेण्यात या पक्षाचे नेते कमी पडले, असे म्हणावे लागेल.

मध्य प्रदेश विधानसभेच्या 28 जागांसाठी झालेली पोटनिवडणूक अत्यंत महत्त्वाची होती आणि देशाचे लक्ष त्याकडे लागून राहिले होते. मंगळवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही वेळानेच कल दिसून आला आणि 20 जागांवर भाजपने निर्णायक आघाडी घेतली. शिवराजसिंह चौहान यांचे सरकार कायम राहणार यावर शिक्कामोर्तब झाले. वास्तविक, सत्तेत कायम राहण्यासाठी भाजपला पोटनिवडणुकीत केवळ सात जागा जिंकण्याची गरज होती. परंतु काँग्रेसला गमावलेली सत्ता परत मिळविण्यासाठी सर्वच्या सर्व 28 जागा जिंकणे गरजेचे होते. हे लक्ष्य गाठणे आपल्यासाठी एव्हरेस्ट शिखर सर करण्याइतके अवघड आहे, याची जाणीव माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांच्या सहकार्‍यांना होती.

मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांचेच सरकार सत्तेवर राहणार हे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. या पोटनिवडणुकीत अनेकांना अस्तित्वासाठी अटीतटीने लढावे लागले म्हणूनच ती लक्षवेधी ठरली होती. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसमध्ये बंड करून आपल्या समर्थक आमदारांसह भाजपचा रस्ता धरला आणि भाजपमध्ये त्यांना सहभागीही करून घेण्यात आले. परंतु हे पक्षांतर जनतेने स्वीकारणे आवश्यक होते आणि या निवडणुकीद्वारे ते घडून आले. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने राजकीय मुद्दे उपस्थित करताना अहंकाराऐवजी वस्तुस्थितीला प्राधान्य द्यायला हवे, असा एक संदेशही या निवडणुकीने दिला आहे.

या निवडणुकीत आणखी एक गोष्ट दिसून आली. ती म्हणजे, काँग्रेसचा प्रचार सुरुवातीपासून नकारात्मक होता आणि त्यामुळेच लोकांनीही काँग्रेसला नकार दिला. काँग्रेस सोडून भाजपच्या गोटात गेलेल्या आमदारांना ‘गद्दार’ घोषित करून त्यांच्यावर टीका करणे हाच काँग्रेसच्या प्रचाराचा मुख्य भाग होता, हे सगळेच जाणतात. पक्षांतराच्या माध्यमातून सरकार पाडण्याचा भाजपचा यशस्वी प्रयत्न चुकीचा असल्याचे सांगून लोकांचे समर्थन मिळविणे हा यामागील उद्देश होता. असे करून काँग्रेसला कमलनाथ यांच्याविषयी सहानुभूती निर्माण करण्याची इच्छा होती. परंतु मध्य प्रदेशच्या मतदारांनी उलट काँग्रेसचा प्रचारच नकारात्मक ठरवून टाकला. मागील लोकसभा निवडणुकांप्रमाणेच काँग्रेसची रणनीती चुकीची ठरल्याचे या निवडणुकीत दिसून आले.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात देण्यासाठी राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’चा नारा दिला होता. या घोषणेचा काय परिणाम झाला, हे सर्वांसमोर आहे. आपल्या चुकीतून धडा न घेण्याची शिक्षा भोगण्याची वेळ काँग्रेसवर आता दुसर्‍यांदा आली आहे. मध्य प्रदेशमधील पोटनिवडणुका बिहारच्या विधानसभा निवडणुकांबरोबरच झाल्या. राजकीय परिपक्वतेच्या दृष्टीने देशात अव्वल मानल्या जाणार्‍या बिहारमधील निवडणुकीच्या निकालांमधूनही काहीसा असाच संदेश दिला गेला आहे. तेथेही मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरोधात युवा नेते तेजस्वी यादव यांनी प्रचंड ऊर्जा एकवटून लढाई छेडली होती. तेथे महाआघाडी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) यांच्यात सत्तेसाठी थेट संग्राम होता.

नितीशकुमार आणि मोदी यांनी प्रचार मोहिमेत नेहमी शालीनता दाखवून दिली. मोठेपणा दाखवून या नेत्यांनी तेजस्वी यादव यांना थेट लक्ष्य केले नाही. बुद्धाच्या भूमीत राहणार्‍या बिहारी जनतेला कदाचित हे शालीन प्रचार अभियान राजद आणि काँग्रेसच्या आक्रमक प्रचारापेक्षा अधिक भावले. बिहारप्रमाणेच मध्य प्रदेशातही निवडणूक आणि सत्तेच्या राजकारणात युवा विरुद्ध ज्येष्ठ पिढी हा मुद्दा सुरुवातीपासूनच चर्चेत होता.

राज्यात पोटनिवडणुकांना कारणीभूत ठरलेले सिंधिया यांनी प्रचारसभांमध्ये एकेकाळी सोबत असणार्‍या आणि आता विरोधात असणार्‍या नेत्यांविषयी तिखट भाषा वापरली; परंतु कमलनाथ किंवा दिग्विजयसिंह यांना थेट लक्ष्य केले नाही आणि लक्ष्मणरेषेचे उल्लंघन केले नाही. कमलनाथ यांची संपूर्ण टीम मात्र भाजपच्या उमेदवारांचा उल्लेख गद्दार म्हणून करत राहिली. त्याऐवजी काँग्रेसच्या नेत्यांनी सिंधिया यांची संपूर्ण मोहीम नीतिमत्तेला धरून नसल्याचे तसेच लोकशाहीस मारक असल्याचे ठसविणारे योग्य मुद्दे प्रचारात आणले असते, तर काँग्रेसला त्याचा फायदा झाला असता. त्याचप्रमाणे सिंधिया यांच्या मोहिमेमुळे भाजपच्या गोटात सर्व 28 मतदारसंघांमध्ये जी अंतर्गत धुसफूस सुरू झाली होती, तिचाही लाभ काँग्रेसला घेता आला नाही, तो केवळ नकारात्मकतेमुळेच!

या पोटनिवडणुकीत सिंधिया यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये सहभागी झालेल्या सर्व आमदारांना भाजपने तिकिटे दिली होती. अशा स्थितीत या सर्वच्या सर्व मतदारसंघांमधील जे मूळचे भाजपचे उमेदवार होते, त्यांच्यात नाराजीचे आणि पक्षबदलू उमेदवारांबद्दल रागाचे वातावरण असणे अत्यंत स्वाभाविक होते. परंतु काँग्रेसने कमलनाथ यांचे सरकार पाडल्याचा मुद्दाच गडद केला आणि सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. भाजपमधील अंतर्गत नाराजीचा लाभ घेण्याच्या पर्यायाची साधी चाचपणीही केली नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिंधिया यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या ग्वाल्हेर-चंबळ क्षेत्रात दिसून आले. येथे तिसरी ताकद म्हणून विकसित झालेल्या बसपने काँग्रेसला साथ दिली. या भागातील भांडेर, डबरा, मुरैना आणि ग्वाल्हेर या मतदारसंघांमध्ये अत्यंत अटीतटीची आणि तुल्यबळ लढत झाली. डबरामध्ये मंत्री इमरती देवी यांची पीछेहाट होताना दिसून आली. जर ग्वाल्हेर विभागासारखीच अन्य भागांमध्येही बसप ही तिसरी ताकद म्हणून विकसित करण्यासाठी काँग्रेसने थोडी मेहनत घेतली असती, तर चित्र सध्या दिसते आहे, त्यापेक्षा निश्चित वेगळे दिसले असते.

एकंदरीत या पोटनिवडणुकांनी मध्य प्रदेशात शिवराजसिंह आणि सिंधिया जोडीला जनतेच्या कसोटीवर प्रभाव सिद्ध करण्याची संधी दिली आणि त्यांनी तिचा लाभही घेतला. यामुळे भाजपमध्ये सिंधिया यांची स्वीकारार्हता वाढेलच; शिवाय शिवराजसिंह यांनाही ‘महाराजां’च्या सोबत वाटचाल करण्यात काही अवघडलेपण येणार नाही, हे या निवडणुकांमधून स्पष्ट झाले. दुसरीकडे काँग्रेसबाबत असे म्हणावे लागते की, योग्य वेळी वस्तुस्थितीचे आकलन करण्याचा शहाणपणा या पक्षाच्या नेत्यांनी दाखविला तर काँग्रेससाठी मध्य प्रदेशाची जमीन अजूनही बर्‍याच प्रमाणात सुपीक बनू शकते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *