शेतीच देईल अर्थव्यवस्थेला बळ
फिचर्स

शेतीच देईल अर्थव्यवस्थेला बळ

दैनिक देशदूत वर्धापन दिन विशेष

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

शेतीक्षेत्राच्या सद्यस्थितीवर दृष्टिक्षेप टाकल्यास एकरी शेतमालाचे उत्पादन 25 ते 50 टनांनी वाढवण्यात शेतकरी यशस्वी ठरले आहेत. अस्मानी-सुल्तानी संकटांचा फटका बसत असला तरी न डगमगता आधुनिक तंत्राचा वापरातून शेतकरी शेतीत यशस्वी ठरत आहेत. आधुनिकतेची कास धरणार्‍या बळीराजाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने त्याचे अर्थकारण बिघडले आहे.

हेमंत शुक्ला | मालेगाव

‘कृषिप्रधान देश म्हणून भारताची ओळख आजही कायम आहे. अन्नधान्य उत्पादनात देश स्वयंपूर्ण झाला आहे. सर्वाधिक रोजगार पुरवणारा व्यवसाय म्हणूनही शेतीकडेच मोठ्या अभिमानाने पाहिले जाते.

पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. साहजिकच आगामी काळात अन्नधान्यासह देशाला कोणत्याही शेतमालाचा पुरवठा कमी पडेल, अशी शक्यता नाही. आधुनिक शेतीतंत्र आणि यंत्रसामुग्रीची कास धरण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढत आहे. त्यामुळे शेती उत्पादनातसुद्धा भारत जगात अग्रेसर ठरणार आहे.

काळानुरूप बदलण्याचे तंत्र बळीराजा आत्मसात करीत आहे. त्याचाच हा परिणाम आहे. स्वयंस्फूर्तीने शेतीत सुधारणा करण्याचा शेतकर्‍यांचा दृष्टिकोनच देशाच्या शेतीक्षेत्राचे भविष्य उज्ज्वल ठरवेल यात कोणतीही शंका घ्यायला जागा नाही.

निसर्गाचा लहरीपणा, बदलत्या हवामानाचे आव्हान, किडी-रोगांचे संकट, मजूरटंचाई आणि उत्पादन खर्चावर आधारित किफायतशीर भाव न मिळणे अशा अनेक संकटांचा सामना निष्ठेने शेती करणार्‍या शेतकर्‍यांना करावा लागत आहे.

अडचणीवर मात करण्याची सकारात्मक भावना आणि नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची मानसिकता शेती व्यवसायाचा कायापालट करणारी ठरत आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करणार्‍या शेतकर्‍यांचे प्रमाण आजही मोठे आहे. तथापि मशागतीसाठी आणि शेतीतील विविध कामांसाठी यंत्रसाधनांचा उपयोग केला जात आहे.

शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरसारखी मजबूत साधने शेतकर्‍यांच्या हाती आली आहेत. कमी पाण्यात शेती फुलवण्यासाठी इस्त्राईल तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. पिकांच्या सिंचनासाठी तुषार आणि ठिबक तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या अंगवळणी पडले आहे. त्यामुळे श्रम, पैसा आणि वेळेची बचत होऊन उत्पादनवाढ होत आहे.

पीक लागवडीत प्लॅस्टिक कागदाचे अच्छादन केले जाते. त्यामुळे तणांचा त्रास कमी होऊन खुरपणीचा खर्च वाचत आहे. पिकांच्या संगोपनासाठी भारतासह विदेशी कंपन्यांची तणनाशके व कीटकनाशके वापरली जातात. फवारणी आता यंत्राने होत असल्याने कामात सुलभता येत आहे. पीककापणी आणि काढणी हार्वेस्टरने केली जात आहे. त्यामुळे खर्चात काही प्रमाणात वाढ झाली तरी श्रम व वेळेची बचत होत आहे.

शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. देशाच्या उत्पन्नात भर घालण्याचे काम शेती व्यवसाय वर्षानुवर्षे करत असला तरी शेती व शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे हवे तेवढे लक्ष पुरवले जात नाही. मदतीच्या पॅकेजची गाजरे शेतकर्‍यांना दाखवली जातात. मात्र शेती व शेतकर्‍यांची दुखणी जाणून न घेता वरवरच्या मलमपट्ट्या केल्या जातात.

पिकांखालील क्षेत्र वाढत आहे, पण शेतमालाला मिळणारा भाव उत्पादन खर्चावर आधारित नसल्याने खर्च जास्त, नफा कमी किंवा तोटाच पदरी पडतो. त्यामुळे सरासरी उत्पादन वाढले तरी उत्पादकतेतील घट नुकसानकारक ठरते.

आर्थिक सुरक्षा कवच कधी मिळणार?

पारंपरिक शेतीला प्राधान्य देणारा शेतकरी आधुनिकतेकडे वळत आहे. त्यामुळे शेतीक्षेत्राला खर्‍या अर्थाने नवे परिणाम लाभत आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादन वाढले.

मात्र उत्पादन खर्चावर आधारित भाव मात्र पदरात पडत नाही. ही तफावत आधुनिकीकरणाला बळ देणार नाही. त्यासाठी देशाचे शेतमाल निर्यातविषयक धोरण शेतीपूरक करावे लागेल. यंत्रसामुग्रीची अनुदानावर उपलब्धता, कमी व्याजदरात सुलभ कर्जपुरवठा आणि शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगांची मजबूत साखळी उभी रहिली पाहिजे.

आधुनिकतेला आर्थिक सुरक्षिततेचे कवच लाभल्यास आगामी 25 वर्षात शेतीक्षेत्र प्रगतीचा खूप मोठा टप्पा गाठू शकेल, असे मत प्रगतिशील शेतकरी केदाबापू काकुळते, दिनेश दळवी, तुळशीदास खैरनार, ज्येष्ठ महिला शेतकरी कमलबाई शिंदे, नीलेश गौतम, दीपक पगार, शरद अहिरे, संतोष पाटील, संदीप कापडणीस, केदा पगार यांनी ‘देशदूत’शी बोलताना व्यक्त केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com