नाशिक शहर
नाशिक शहर
फिचर्स

गोदा प्रकल्पातून नाशिक नगरीला नवी ओळख

देशदूत वर्धापन दिनविशेष लेख

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

गोदाकाठाचा साबरमती आणि परदेशातील अत्याधुनिक शहरातील उद्यानांच्या धर्तीवर विकास केला जाणार आहे. हरित, स्वच्छ, आध्यात्मिक, गोदाकाठाची निर्मिती केली जाणार आहे. गोदा प्रकल्पांच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांना प्रारंभ झाला असून यात गोदावरी नदी स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात नाशिकची निवड झाल्यानंतर आता नाशिकला अत्याधुनिक रुप देण्याचे काम सुरू झाले आहे. नाशिक म्युनिसीपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमीटेड कंपनीच्या माध्यमातून सुरू झाल्यानंतर काही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आता गोदा प्रकल्पाचे हाती घेण्यात आले आहे.

मंत्रनगरी असलेल्या पुरातन नाशिकनगरीला देशात वेगळी ओळख निर्माण करून देणार्‍या गोदावरी नदीला पुनर्वैभव प्राप्त करून देताना त्याला अत्याधुनिकतेची जोड देऊन गोदाकाठाचा विकास साबरमती आणि परदेशातील अत्याधुनिक शहरातील उद्यानांच्या धर्तीवर केला जाणार आहे.

प्रभू श्री रामचंद्राच्या वास्तव्याने पुनित झालेल्या नाशिकनगरीला नवी ओळख देणारा गोदा प्रकल्प पुढच्या काही वर्षांत तीन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. गोदावरी नदीच्या विकासाची लांबी 2 कि. मी. असून प्रकल्पांचे क्षेत्रफळ 23 एकर आहे. यात गोदा नदीकांठाच्या भागाचा विकास केला जाणार आहे. देशात तीर्थक्षेत्र म्हणून असलेली ओळख कायम राहावी म्हणून पुरातन मंदिरे व खुणा कायम जपण्याचे काम या प्रकल्पांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

यात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या केंद्रबिंदू असलेले पवित्र रामकुंड व गोदाघाट परिसर, अस्थी विसर्जन ठिकाण, गणपती विसर्जनाचे ठिकाण, याठिकाणी असलेली पुरातन लहान मंदिरे, गोदावरी नदीचे ऐतिहासिक महत्त्व आदींचे जतन आणि नूतनीकरण करणे आदी बाबी लक्षात घेऊन गोदाकाठच्या भागाचा एकात्मिक विकास करण्यात येणार आहे.

हे कामे करताना हरित, स्वच्छ, आध्यात्मिक, सर्वसमावेशक व सक्रिय गोदाकाठची निर्मिती केले जाणार आहे. यात गोदाकाठावर नौका विहार, अत्याधुनिक स्वरुपात फेरीवाला झोन, सभा समासंभासाठी केंद्र, वाहनतळ आदी बाबी अंतर्भूत करण्यात आल्या आहे.

गोदा प्रकल्पांच्या पहिल्या टप्प्यातील विकासकामांना प्रारंभ झाला असून यात गोदावरी नदी स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गोदावरी नदीच्या पाण्यावरील जल वनस्पती काढण्याचे काम सुरू झाले असून याकरिता ट्रॅश स्कीम्मर या अद्ययावत हैड्रोलिक सिस्टीम यंत्राच्या साह्याने पाणी स्वच्छतेचे काम सुरू झाले आहे.

रामवाडी पूल ते अहिल्याबाई होळकर पुलापर्यंत विकासकामास प्रारंभ झाला आहे. याठिकाणी गोदा उद्यानाचा विकास केला जात असून सुंदरनारायण घाट विकास, गोदा वॉक, सायकल ट्रॅक, 2 जेट्टी पॉईंट व लेझर फाऊंडन शो अशा प्रकारे कामे सुरू आहे.

याच टप्प्यात फॉरेस्ट नर्सरी ते होळकर पूल या 3.20 कि. मी. अंतरात गोदापात्रातील गाळ काढण्यात येणार असून गोदाकाठालगत बांबूसह इतर देशी वृक्षांची लागवड करून याठिकाणीची पूर्वीची जैव विविधा पुनर्प्रस्थापित करण्याचे काम केले जाणार आहे. तसेच याच टप्प्यात आध्यात्मिक परिसर विकसित केला जाणार आहे.

पवित्र कुंडांचा विकास करण्यात येणार असून याकरिता इतिहास तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता दुतोंड्या मारुतीपासून पुढील भागातील नदीतील काँक्रिटीकरण काढण्याचे काम सुरू झाले आहे. याभागात असलेले पुरातन 17 कुंडांचे पुनरुज्जीवन केली जाणार असून कुंडातील जिवंत झरे प्रवाहित करण्याचे काम यातून होणार आहे. गोदा प्रकल्पांच्या तिसर्‍या टप्प्यात गोदाकाठालगतच्या सुशोभिकरणावर भर देण्यात आला आहे. गोदाकाठालगत 9850 चौरस मीटर क्षेत्रफळाचा गोदा पार्क विकसित केला जाणार आहे. यात अ‍ॅॅम्पिथिएटर, वॉक वे - ऍक्युप्रेशर पाथवे, उपहार गृह, सायकल मार्ग, वॉटर कॅसकेड, दगडी बाकडे (गॅबियन), बबल जेट फाऊंटन, वॉटर प्रोजेक्शन स्क्रीन, हेरिटेज वॉक, मुलांना खेळण्यासाठी उद्यान, वृक्ष लागवड, ई - टॉयलेट आदींची व्यवस्था केली जाणार आहे.

विशेषत: होळकर पूल ते टाळकुटेश्वर मंदिर परिसरापर्यंत ही कामे केली जाणार आहे. याभागात गोदा पार्कचे मुख्यप्रवेशद्वार असणार आहे. याठिकाणी विशिष्ट प्रकारचे आकर्षक रॅम्प व पायर्‍यांची उभारणी केली जाणार आहे.

याच भागात अ‍ॅॅम्पिथिएटर उभारण्यात येणार असून याच भागात पर्यटकांसाठी उपहारगृहांची उभारणी केली जाणार आहे. गोदा पार्कमध्ये पर्यटकांना बसण्यासाठी आकर्षक अशी दगडी बाक बनविले जाणार आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी परदेशातील उद्यानाच्या धर्तीवर एक क्षेत्र तयार केले जाणार आहे.

याठिकाणी विशिष्ट प्रकाराच्या खेळाच्या माध्यमातून शिक्षणाची गोडी लागावी अशी व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे. गोदापार्क संरक्षक भिंतीलगत वृक्षारोपणाच्या माध्यमातून चढते - उतरते स्वरुपाची रोपे लावण्यात येणार आहे.

पुढच्या काळात या प्रकल्पांमुळे नाशिकनगरीला नवी ओळख निर्माण होणार आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून नाशिक शहरातील पुरातन संस्कृतीची जपवणूक होणार असून येणार्‍या नव्या पिढीसाठी हा मोठा ठेवा असणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com