... म्हणून सोनं भाव खातंय !

Gold
Gold

भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये सोन्याला मोठे महत्त्व असले तरी आजकाल सोन्याचे भाव आकाशाला भिडले आहेत. सोन्याच्या भावाने पन्नास हजार रुपये प्रतितोळा ही पातळीही ओलांडली. अखेर एवढी भाववाढ झाली कशी? गुंतवणूक म्हणून सोनेखरेदी करण्याकडे कल एवढा वाढला असेल, तर गुंतवणुकीच्या अन्य साधनांची सद्यःस्थिती काय आहे? सोने हीच गुंतवणूकदारांची पहिली पसंती का ठरत आहे?

सीए संतोष घारे

सोन्याने गुंतवणूकदारांना गेल्या 18 महिन्यांत सुमारे 53 टक्के लाभ मिळवून दिला आहे. सोन्याचा पूर्वीचा भाव आता इतिहासजमा झाला आहे. मग सोन्याचे भविष्य काय आहे? पुढील काही वर्षांपर्यंत सोन्याची भाववाढ अशीच सुरू राहणार का? भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये मोठे महत्त्व असलेल्या या सोन्याचे भाव भविष्यात असेच चढे राहण्याची शक्यता अधिक आहे. यामागील कारणांचा बारकाईने वेध घ्यायला हवा. सोन्याने पैशांच्या स्वरूपात गुंतवणुकीवर मोठा लाभ नेहमीच मिळवून दिला आहे. 2001 नंतर सोन्याने गुंतवणूकदारांना दरवर्षी सुमारे 13 टक्क्यांचा लाभ मिळवून दिला आहे. गेल्या 15 वर्षांवर नजर टाकल्यास असे दिसते की, सोन्याने 14.7 टक्क्यांचा लाभ दरवर्षी दिला आहे. गेल्या दहा वर्षांत सोन्याने दरवर्षी 10.1 टक्के लाभ दिला असून, मागील पाच वर्षांत सोन्याने दरवर्षी 12.8 टक्के लाभ दिला आहे. या पार्श्वभूमीवर, गुंतवणुकीचा मोठा हिस्सा सोन्याकडे का वळतो, हे समजून घेणे अवघड नाही. सोन्यात केलेल्या गुंतवणुकीमुळे कुणाचे भवितव्य पणाला लागत नाही, हा मोठा फरक समजून घेतला पाहिजे.

सन 2018-19 मध्ये भारताने केवळ 1664 किलो सोन्याचे उत्पादन केले. सोन्याची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते. डॉलरच्या मोबदल्यात देशात आलेले सोने देशात भारतीय रुपयांच्या मोबदल्यात विकले आणि खरेदी केले जाते. गेल्या काही वर्षांत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सातत्याने घसरत आहे आणि त्यामुळेही सोन्याच्या दरात तेजी दिसत आहे. देशाने कठीण आर्थिक काळात प्रवेश केल्याबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आणखी घसरण्याची शक्यता निर्माण झाली.

जागतिक अर्थव्यवस्थेच्या भवितव्याबद्दल सध्या सांगितले जाणारे अंदाज उत्साहवर्धक नाहीत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे की, जागतिक अर्थव्यवस्था 2020 मध्ये 4.9 ट्क्क्यांवरच घुटमळेल. कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे आधीच जागतिक अर्थव्यवस्थेची गती खुंटली आहे. रोनाल्ड-पीटर स्टोफेरल आणि मार्क वलेन यांच्या ‘द डाउनिंग ऑफ गोल्डन डिकेड’ या शोधनिबंधात म्हटले आहे की, जागतिक व्यापारात दरवर्षी सामान्यतः पाच टक्क्यांच्या दराने वाढ होते. गेल्या वर्षी या दरात 0.5 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. सन 1980 नंतर ही अशा प्रकारची तिसरी घसरण आहे. 1982 आणि 2009 च्या जागतिक महामंदीच्या काळात अशा प्रकारची घसरण पाहायला मिळाली होती.

पाश्चात्य अर्थव्यवस्थांचा कल नोटा छापण्याकडे नेहमीच अधिक राहिला आहे. या अर्थव्यवस्थांना हा सोपा मार्ग वाटतो. अमेरिकन फेडरल रिझर्व्हबाबत बोलायचे झाल्यास, त्याचा ताळेबंद 24 जूनला 7.08 लाख कोटी डॉलर झाला होता. तेथे 16 फेब्रुवारी ते 24 जून या काळात सुमारे तीन लाख कोटी मूल्याच्या नोटांची छपाई करण्यात आली. अगदी त्याचप्रमाणे बँक ऑफ इंग्लंडने एप्रिल महिन्यात खर्च भागविण्यासाठी नोटा छापण्याचा निर्णय घेतला. बँक ऑफ जपानही गेल्या दहा वर्षांत सातत्याने नोटांची छपाई करीत आहे आणि बँकेच्या ताळेबंदाचा आकार 428 टक्क्यांनी वाढून 638.6 लाख कोटी येन इतका झाला आहे. अशा केंद्रीय बँकांकडून जागतिक अर्थव्यवस्थेत सोडण्यात येणारा पैसा आणि सोन्याचे भाव यांचा संबंध असतो. पैसा वाढल्यानंतर सोन्याचा भावही वाढतो.

स्टोफेरल आणि वलेक यांनी 2019 मधील ‘इन गोल्ड वुई ट्रस्ट’ या आपल्या अहवालात म्हटले आहे की, मंदीच्या काळात शेअरमधील नुकसानीची भरपाई करण्यासाठी सोने हेच उत्तम माध्यम आहे. अमेरिकी शेअर्समधील चढउतारांचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर होतो, ही गोष्ट सर्वज्ञात आहे. त्यामुळे जेव्हा अमेरिकेतील शेअर्समध्ये घसरण होते, तेव्हा सोनेबाजारासाठी ती चांगली बातमी असू शकते. याखेरीज, 2008 च्या आर्थिक संकटानंतर झालेल्या नोटाछपाईचा परिणाम पारंपरिक स्वरूपात महागाईच्या रूपाने समोर आला नाही. ग्राहकोपयोगी वस्तू आणि सेवांच्या किमतीत मोठी वाढ झाली नाही. परंतु सांपत्तिक चलनवाढ (शेअर, स्थावर मालमत्ता, बाँड यांच्या वाढलेल्या किमती) जगाच्या मोठ्या भागात दिसून आली.

मॉर्गन स्टेनली येथील माजी प्रमुख अर्थतज्ज्ञ आणि सध्या येल विद्यापीठातील अर्थतज्ज्ञ स्टीफन रोच यांनी अलीकडेच असे म्हटले होते की, कोविड-19 च्या नकारात्मक परिणामांचा मुकाबला करण्यासाठी सरकारांनी आपला खर्च वाढविला आहे आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य दिले जात आहे. त्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी अव्यक्त स्वरूपात वाढत राहील. कोरोनाचा प्रभाव कमी होताच मागणीत अचानक प्रचंड वाढ झाल्याचे दिसेल. त्यामुळे कदाचित महागाईही वाढू शकेल. कारण मागणीएवढा पुरवठा होऊ शकणार नाही. असे होण्याची शक्यता आपल्याला आताच लक्षात घेतली पाहिजे. सोन्याने चलन फुगवट्याच्या विरोधात एक कवच म्हणून नेहमी काम केले आहे. सोन्याची मागणी कायम राहण्यामागे हेही मोठे कारण आहे.

गुंतवणुकीच्या अन्य मार्गांचे भवितव्य सध्या फारसे सकारात्मक दिसत नाही. मुदत ठेवींंवरील व्याजाचे दर मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत. त्याचबरोबर अन्य बचत योजनांवरील व्याजदरही कमीच राहण्याची शक्यता आहे. कारण यापुढील काळात बँकांकडून कर्जाची मागणीही कमी प्रमाणात केली जाईल. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक हे दोन्ही अंक यावर्षीच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात गाठलेल्या पातळीपेक्षा 16 टक्क्यांनी खाली आले आहेत. त्याचप्रमाणे शेअर बाजाराच्या निर्देशांकात अस्थिरताही मोठ्या प्रमाणावर दिसून आली आहे. 14 जानेवारीला निर्देशांक 41,952.63 अंकांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता.

परंतु 23 मार्च पर्यंत 38 टक्क्यांची नाट्यमय घसरण झाली. त्यामुळे शेअरमधून मिळणार्या लाभाचे प्रमाणही प्रचंड घटले. या मार्गानंतर गुंतवणुकीचा महत्त्वाचा मार्ग म्हणजे स्थावर मालमत्ता. देशाच्या अनेक भागांत गेल्या काही वर्षांत घरांच्या किमती घसरल्या आहेत. आरबीआय मूल्य निर्देशांक पाहिल्यास घरांमधील गुंतवणुकीने डिसेंबर 2016 ते डिसेंबर 2019 या कालावधीत दरवर्षी सरासरी दरवर्षी 5.1 टक्के दराने लाभ दिला आहे. सर्व खर्च जमेस धरता गेल्या काही वर्षांत घरांमधील गुंतवणुकीच्या माध्यमातून मिळणारा लाभ नकारात्मकच पाहायला मिळाला आहे. त्यामुळेही अर्थातच सोनेबाजाराचाच फायदा झाला आहे. गुंतवणुकीच्या अन्य माध्यमांची शाश्वती नसते, तेव्हासुद्धा सोन्यातील गुंतवणुकीतून लाभ मिळतो, ही सोन्याची खासीयत आहे.

1971 नंतर जागतिक मौद्रिक प्रणाली एका शुद्ध कागदी व्यवस्थेवर आधारलेली आहे. जी मौद्रिक प्रणाली 1971 पूर्वी अस्तित्वात होती ती सोने आणि चांदीच्या पाठबळावर संचालित होत होती. आता केंद्रीय बँकांच्या माध्यमातून सरकारे मनाजोगा पैसा प्राप्त करू शकतात. पूर्वी हे शक्य नव्हते. 2008 च्या अखेरीपासून जगभरातील अर्थव्यवस्थांना मोठ्या प्रमाणावर चलनाची छपाई करण्याची सवय जडली, याची चर्चा आपण पूर्वी केलीच आहे. जगाच्या अनेक भागांत सध्या नकारात्मक व्याजदर पाहायला मिळतात.

हातात जो पैसा उपलब्ध आहे, त्याचे काय करायचे हे बँकांना कळेनासे झाले आहे. स्टोफरेल आणि वलेक यांच्या म्हणण्यानुसार, बचतकर्ते आणि गुंतवणूकदारांना येणार्या काळात आपली संपत्ती सुरक्षित राखण्यात अडचणी येतील. आभासी चलनाच्या पुराचा जगाला धोका आहे. पैसे सुरक्षित राखण्याची ठिकाणे मर्यादित आहेत. नकारात्मक व्याजदरांच्या युगात सोन्याची बाँडबरोबर वेगाने स्पर्धा सुरू होऊ शकते. थोडक्यात सांगायचे झाल्यास, सोन्याचे मोल ओळखण्याची गरज आहे आणि गुंतवणुकीच्या माध्यमांमध्ये सोन्याचा समावेश सर्वांनी यथाशक्ती केला पाहिजे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com