-सागर शहा

कोरोना प्रकोपाच्या अंधकारात ज्या वस्तूची झळाळी सर्वाधिक दिसून आली, ती वस्तू म्हणजे सोने. या झळाळीने मंदीच्या काळातही लोकांचे डोळे दिपवून टाकले. सोन्याचे दर आभाळाला भिडले, तसे खरेदीदार आणि सुवर्णकार अवाक् झाले.

भारतात सोन्याच्या दराने ऑगस्ट महिन्यात 56,200 रुपये प्रतितोळा या जादुई आकड्याला स्पर्श केला होता आणि परदेशांतसुद्धा 2072 डॉलर प्रतिऔंस दराने सोने विकले जात होते. त्यावेळी अशीही शंका व्यक्त केली जात होती की, सोन्याचा दर 75000 रुपयांच्या एरवी अशक्य मानल्या जाणार्या आकड्यालाही स्पर्श करू शकेल की काय? परंतु तसे झाले नाही आणि नंतरच्या काळात सोन्याच्या दरात हळूहळू घसरण होऊ लागली.

सोन्याचा भाव 50000 च्या आसपास स्थिरावेल असे वाटत होते; परंतु दर अचानक खाली जाऊ लागले आणि जेव्हा भारतात सणासुदीचे दिवस होते तसेच लग्नसराईचे दिवस उंबरठ्याशी होते, त्याच वेळी सोन्याचा भाव अचानक वेगाने घसरू लागला. एकट्या नोव्हेंबर महिन्यातच दर सहा टक्क्यांनी म्हणजे 3050 रुपयांनी घसरला आणि लोक अक्षरशः हैराण झाले. लोकांना प्रश्न पडला की, या मौल्यवान धातूच्या दरात अचानक एवढी घसरण होण्यासारखे अखेर घडले तरी काय?

परंतु हे सर्व जाणून घेण्यासाठी त्याची पार्श्वभूमी समजावून घेणे आवश्यक ठरेल. संकटाच्या काळातील सांगाती म्हणून शतकानुशतके सोन्याकडे पाहिले जाते. ही मानसिकता जगभरात आहे. जेव्हा-जेव्हा जगावर संकट येते, तेव्हा-तेव्हा सोन्याचे भाव वाढल्याचे पाहायला मिळते. त्यामुळेच कोरोनाच्या कालावधीतही सोन्याने आपली चमक दाखवून दिली. तसे पाहायला गेल्यास, सोन्याच्या भावातील वाढीचा प्रारंभ अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळेच झाला होता. परंतु अमेरिका आणि चीनदरम्यान व्यापारयुद्ध सुरू झाल्यानंतर सोन्याचा भाव वेगाने वाढू लागला. त्याच वेळी जेव्हा कोरोनाच्या संकटाने जगाला विळखा घातला, तेव्हा सोन्याची झळाळी प्रचंड वेगाने वाढू लागली.

कोरोनाचा काळ हा एक महासंकटाचा काळ मानला गेला. या संकटाने जगाच्या प्रगतीची चाके थांबविली. त्या काळात सोने ही एकच अशी मालमत्ता उरली होती, ज्यावर गुंतवणूकदारांना विश्वास होता. रिअल इस्टेट आणि बँकांमधील मुदत ठेवींनी सोन्याइतका परतावा दिला नाही. अशा वातावरणात संपूर्ण जगभरातच सोन्याला मागणी वाढत गेली आणि बडे लोकही सोनेखरेदीच्या शर्यतीत उतरले. त्यांनी मोठ्या प्रमाणावर सोन्यात गुंतवणूक तर केलीच; शिवाय भविष्यात सोन्याच्या किमती आणखी वाढण्याच्या संदर्भाने मोठमोठे दावेही केले. त्यामुळे सोन्याचे भाव आणखी वाढले.

सोन्याच्या दरवाढीचा महागाई आणि बँकांच्या व्याजदराशी थेट संबंध आहे. ज्यावेळी महागाईचा दर बँकांच्या व्याजदरांपेक्षा अधिक होतो, तेव्हा गुंतवणूकदारांचे सोन्याकडे लक्ष वळते. अमेरिकी फेडरल बँकेने 2019 मध्येच असे संकेत दिले होते की, व्याजदर यापुढे वाढविले जाणार नाहीत. त्याच वेळी सोन्याचे भाव वाढणार हे निश्चित झाले होते. आता जेव्हा जगातील सर्व देशांनी नागरिकांना पॅकेज दिली आहेत आणि चलनाची उपलब्धता प्रचंड प्रमाणात वाढली आहे, अशा वेळी महागाई वाढणे स्वाभाविक आहे. अशा स्थितीत सोने हा एक चांगला पर्याय म्हणून पुढे आला.

बडे सटोडिये अब्जावधी रुपयांचे सोने खरेदी करीत होते. त्यामुळे सोन्याचे दर अवास्तव गतीने वाढत होते. सटोडिये केवळ नफा मिळविण्यासाठीच सोन्याची खरेदी करतात आणि जेव्हा मनाजोगा दर त्यांना दिसतो, तेव्हा सोने विकून मोकळे होतात. याहीवेळी तसेच झाले. दुसरीकडे अमेरिका आणि युरोपात शेअरच्या किमती अचानक वाढल्या, तेव्हा सामान्य गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे वळला. डॉलरचे मूल्य कमी झाल्यामुळेही सोन्याकडे आकर्षण वाढले आणि सोन्याचे दर वाढत राहिले.

परंतु सोन्याचे दर कधीच एवढ्या उंचीवर कायम राहत नाहीत. 1970 मध्ये अमेरिकेतील आर्थिक संकटाच्या वेळी सोन्याचे दर पाचपट वाढले होते आणि अनेक वर्षे सोन्याच्या दरात तेजी राहिली होती. परंतु नंतर हे दर हळूहळू उतरत जाऊन जवळजवळ पहिल्याच पातळीवर आले. 2008 च्या जागतिक आर्थिक संकटाच्या वेळीही सोन्याचे दर वेगाने वाढले होते. परंतु 2011 च्या प्रारंभापर्यंत ते पुन्हा थंडावले होते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. आणखी एक महत्त्वाची बाब अशी की, आता कोरोना विषाणूवरील लस तयार झाली आहे आणि ती बाजारात उतरविण्यास अनुमतीही मिळाली आहे. महासंकटाच्या शेवटाची सुरुवात होत असल्याची घोषणाच जणू झाली आहे. या घडामोडींमुळे सटोडियांचा सोन्यातील रस कमी झाला आहे. अमेरिकेत नवीन राष्ट्रपती नव्या चलनविषयक धोरणावर विचार करतील.

शांतता प्रस्थापित होण्याची आशाही वाढली आहे आणि त्यामुळेही सोन्यावरील गुंतवणूकदारांचे लक्ष अन्यत्र वळले आहे. आता सोन्याच्या दरात वाढ होणार नाही आणि चांदीचेही दर स्थिर राहतील. परंतु काहीही झाले तरी एक गोष्ट निश्चित आहे. ती अशी की, सोन्याने गुंतवणूकदारांना कधीही निराश केलेले नाही आणि नेहमी चांगला लाभ मिळवून दिला आहे. यावेळी तर सोन्याने दोन वर्षांत प्रति दहा ग्रॅम 20,000 रुपयांपर्यंत लाभ मिळवून दिला आहे आणि ही खरोखर आश्चर्यकारक घटना आहे.