Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedस्त्रीजीवनाला नवी दिशा देणार्‍या : क्रांतीज्योती समाजसुधारक सावित्रीबाई फुले

स्त्रीजीवनाला नवी दिशा देणार्‍या : क्रांतीज्योती समाजसुधारक सावित्रीबाई फुले

डॉ.रूपेश मोरे

क्रांतीज्योती सावित्रीबाई यांची जयंती दि. 3 रोजी साजरी करण्यात आली. ‘प्रतिमेचे पूजन आणि विचारांचे भंजन’ अशा गोष्टी जोरदार सुरू आहेत.

- Advertisement -

अशावेळी महाराष्ट्र आणि देशावर ज्यांचे अनंत उपकार आहेत अशा स्त्री शिक्षणाचे कार्य करणार्‍या सावित्रीबाई फुले यांचे विचार, त्यांचे विविध पैलू, विविध प्रसंगांमधून नीटपणे समजून घेणार आहोत. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका,पहिल्या मुख्याध्यापिका तसेच पहिल्या महान कवयित्री आणि पहिल्या महान समाजसेविका , समाजसुधारक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत . 3 जानेवारी, 2017 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या 186 व्या जन्मदिनानिमीत्त त्यांचे गूगल डूडल प्रसिद्ध करुन गूगलने त्यांना अभिवादन केले आणि त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.

नुकतेच शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी हा जन्मदिन यापुढे सर्व शाळांमध्ये हे ‘शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. पुणे विद्यापीठाच्या नावाचा विस्तार करून ते ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे करण्यात आले आहे. सावित्रीबाई आणि जोतीराव फुले या जगावेगळ्या दाम्पत्यांच्या जीवनावर ज्येष्ठ अभ्यासक आणि विचारवंत, साहित्यिक हरी नरके यांच्या मार्गदर्शनाखाली ङ्गङ्घसावित्रीज्योती.आभाळाएवढी माणसं होती ङ्गफ ही मालिका सादर करण्यात आली.तसेच किसान टीव्हीवर सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील हिंदी मालिका दाखविली गेली होती.

सावित्रीबाई फुलेंनी स्त्री-पुरुष असमानता सती प्रथा ,बालविवाह, केशवपन यांसारख्या अनिष्ट आणि आंधळ्या प्रथेला विरोध करून समाजाला मानवी हक्कांची जाणीव आपल्या कार्यातून आपल्या लेखणीतून ,आपल्या कवितेतून करून दिली लोकशिक्षणासाठी त्यांनी कविता आणि विविध लेखांचे लेखन केले . काव्यफुले ,बावन्नकशी सुबोध रत्नाकर यासारखे काव्यसंग्रह लिहिले .

माणसाने जिज्ञासू वृत्ती जागी ठेवली तरच तो माणूस म्हणता येईल ,असे सांगताना सावित्रीबाई फुले कवितेत लिहितात

ज्ञान नाही, विद्या नाही

ते घेण्याची गोडी नाही

बुद्धी असूनी चालत नाही

तयास मानव म्हणावे का?

केवळ चूल आणि मूल सांभाळणार्‍या चार भिंतीतील भारतीय स्त्रीचा सार्वजनिक जीवनाची सुरुवात करणार्‍या सावित्रीबाई फुले यांनी ब्राह्मण विधवांचे केशवपन करू नये म्हणून न्हावी समाजाचे प्रबोधन केले, संप घडवून आणला. न्हावी समाजाने देखील त्यांच्या या आवाहनाला साथ देत विधवांचे केशवपन करून त्यांना विद्रूप करणार नाही असा ठराव केला. त्यामुळे विधवांचे केशवपन ही प्रथा बंद झाली. पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामात सावित्रीबाईंनी पुढाकार घेतला. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंनी उत्तम नेता बनून नेतृत्व केले. दुष्काळात गोरगरिबांची हजाराहून जास्त मुले सांभाळली या मुलांचा स्वयंपाक त्या स्वतः करत असत. सावित्रीबाई फुले यांना शिकवणारे ,त्यांचे पती महात्मा जोतीराव फुले 15 सप्टेंबर 1853 रोजी लिहिलेल्या पत्रात म्हणतात, उत्तम देशाच्या जडणघडणीसाठी मुलींचे महिलांचे शिक्षण परिणामकारक ठरते.

उत्तम शिक्षणाने स्वतःच्या कुवतीसोबत हिम्मत वाढत असते. सामान्य जनतेमध्ये समाज परिवर्तन करण्याची ताकद उत्तम शिक्षणाने निर्माण होत असते. शिक्षण ही खाजगी देणगी नसून देशाची परिस्थिती सुधारण्याचे साधन आहे . उत्तम शिक्षणातून खोट्या आणि अन्याय विरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते.असे विचारधन देणार्‍या सावित्रीबाई फुले आणि जोतीरावांच्या विचारांची आज देशाला गरज आहे. आजचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच उपयोग होऊ शकतो.

प्रसंगी जेवणाची सवड न काढणार्‍या सावित्रीबाई फुले यांना सुरुवातीला शाळा सुरू करताना दगड ,गोटे ,शेण यांचा मारा समाजातील काही दुष्ट प्रवृत्तीच्या सनातनी लोकांकडून सहन करावा लागला .

त्यांनी चालवलेल्या शाळेतील वसतीगृहातील विद्यार्थिनी भविष्यात मोठ्या पदावर विराजमान झाल्यात. प्रसिद्ध स्त्रीपुरुष तुलना या गाजलेल्या इंग्रजीतील पुस्तकाच्या लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या ताराबाई शिंदे त्यांच्या शाळेच्या विद्यार्थिनी होत्या.

गोडी लागेल असा अभ्यासक्रम राबविणार्‍या,कौशल्य अवगत होईल अश्या उद्देशाने सावित्रीबाई आणि जोतीराव शिक्षणाची उत्तम तयारी करून घेतात,उच्च गुणवत्ता राखतात .सरकारी शाळांपेक्षा चांगले शिक्षण देतात अशा प्रतिक्रिया असलेल्या आश्चर्यकारक नोंदी सापडतात.

पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात सावित्रीबाईंच्या शाळेतील मुली देत असलेली परीक्षा बघण्यास तीन हजारांहून अधिक लोक जमले होते अशी पोलिस दफ्तरी नोंद आढळते. पोलीसखात्याच्या रिपोर्ट मध्ये असे नमूद केले आहे की चलो पुणे ! चलो पुणे !! मुलींची परीक्षा बघायला !!! असा नारा ऐकून परीक्षा बघण्यासाठीची गर्दी पुण्याचा इतिहासात आजपर्यंत कधी नव्हे इतकी जमली नव्हती.

मुंबई प्रातांतला शिक्षणखात्यातला अहवालामधील बक्षीस समारंभाचा प्रसंग आश्चर्यचकित करणारा आहे .कलेक्टर आणि त्यांच्या पत्नी यांनी प्रथम आलेल्या मुक्ता नावाच्या सहा वर्षीय मुलीला बक्षीस म्हणून तिला एका बॉक्समध्ये तिच्यासाठी कपडे,विविध खेळण्या आणि खाऊसह दिले.या सहा वर्षाच्या मुलीला बॉक्स मधील वस्तू कोणत्या आहेत हे समजल्यावर या मुलीने कलेक्टर साहेबांना आणि त्याच्या पत्नींना विनंती केली की मला या वस्तू देण्याऐवजी माझ्या शाळेसाठी समृद्ध ग्रंथालय द्यावे असे उत्तरादाखल विनंती केले. केवळ सहा वर्ष वय असणार्‍या या मुलीच्या आश्चर्यकारक अशा परिपक्व उत्तराने आणि सावित्रीबाई ,जोतिरावांच्या प्रयत्नातून भारतातले पहिले शालेय ग्रंथालय सुरू झाले . आजच्या काळातही आपल्या पाल्यांना अश्या पद्धतीचे संस्कार देण्यास अवघड जाते.म्हणूनच सावित्रीबाईचे विचारधन अंगिकारले पाहिजे.

पुणे येथील त्यांचे शिक्षणकार्य पाहून 1852 मध्ये सरकारने फुले पतिपत्नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीरपणे सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले.

स्त्री शिक्षण विरोधी व्यवस्था बदलण्यासाठी आणि स्त्री शिक्षणाला समाजमान्यता मिळवण्यासाठी फुले दाम्पत्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केलेला दिसतो.म्हणूनच विविध कार्यक्रमांमध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर , न्यायमूर्ती रानडे, जगन्नाथ सदशिवजी , दादोबा पांडुरंग ,जगन्नाथ नगरशेठ यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तींना बक्षीस समारंभात आमंत्रित करून स्त्रीशिक्षणाला समाजमान्यता वाढविली.आजही त्यांच्या जमाखर्च आणि देणगी यांचे नोंदीचे पुरावे उपलब्ध आहेत.

आजच्या काळात काही व्यक्ती केवळ नफा कमावण्याच्या हेतूने , नवीन शिक्षण संस्था काढीत आहे. नीतिमूल्ये रुजवण्यासाठी कार्य करणार्‍या शिक्षण संस्था फारच कमी आहेत 1 जानेवारी 1848 भिडे वाड्यात तात्या भिडे यांच्या सहकार्याने फुले दाम्पत्याने मुलींसाठी प्रथम शाळा सुरू केली.

आजच्या काळात गल्लोगल्लीत शाळा सुरु करण्याचे पेव फुटल्याने आजच्या पिढीला ही गोष्ट सामान्य वाटत असली तरी त्याकाळात असामान्य गोष्ट होती . कारण त्याकाळी अंधश्रद्धेचे मोठे पीक आले होते . स्त्री शिक्षण घेणार्‍या बायकांनी अक्षरे वाचलीस तर त्या अक्षराच्या आळ्या बनवून नवर्‍याच्या जेवणाच्या ताटात पडतात .अभ्यासाच्या ओझ्यामुळे लहान मुलींचे कोवळे मेंदू फुटू शकतात. अश्या प्रकारचे मोठे गैरसमज होते. परंतु विविध विद्यापीठांचे निकाल बघितल्यावर सहज लक्षात येते मुली मुलांपेक्षा पुढे आहेत,सरस आहेत..जास्त मार्क मिळवीत आहेत.

एका प्रसिद्ध विचारवंताने म्हटल्यानुसार ,समाजाला सुधारणे खूप अवघड असते परंतु त्यांना मूर्ख बनवणे, फसविणेचे काम सोपे असते . यामुळेच काही धूर्त,ढोंगी , लबाड राजकारणी मंडळी सामान्य लोकांची भावनिकतेचा आधारे , विविध वेशभूषा वापरून दिशाभूल करतात.

बलात्कार झाला म्हणून आत्महत्या करायला निघालेल्या एका काशीबाईं नावाच्या विधवा ब्राह्मण महिलेला सावित्रीबाईंनी रोखले आणि स्वतःच्या घरी त्यांची प्रसूती केली आणि तिच्या मुलाला यशवंत नाव दिले आणि स्वतः दत्तक घेतले . त्याला वाढवून ,पालनपोषण करून शिक्षण देऊन डॉक्टर बनविले.

1871 ते 1881 या या काळातील जनगणनेनुसार न्यायमूर्ती रानडे ,लोकहितवादी यांनी केलेल्या नोंदीनुसार एकट्या पुणे शहरात 0 ते 4 वर्ष वयोगटातील विधवांची संख्या तेरा हजार इतकी मोठी होती. बालविवाह प्रथेमुळे आठ आठ दिवसाच्या वयाच्या मुलीसुद्धा विधवा असत. या बालविवाह प्रथेमुळे ,वयात आल्यावर बहुतांश स्त्रिया काही नराधमांच्या शिकार होत नंतर बेवारस संतती या दुष्टचक्रात अडकत असत किंवा आत्महत्या करीत .

म्हणूनच 28 जानेवारी 1853 रोजी कर्तुत्ववान सावित्रीबाईंनी गर्भवती बलात्कार पीडित महिलांसाठी बालहत्याप्रतिबंधक सुरू केले.त्यामुळे त्यांच्या मुलांना वाचण्यास मदत झाली.

त्यांनी विधवाविवाहबंदी ,देवदासीप्रथा ,दारूचे व्यसन या वाईट प्रथांवर आघात केला पण विशिष्ट जातीधर्मातील माणसावर नव्हता .असाच विचार वाचकांनीसुद्धा आपल्या हृदयात ठेवावा.

या समाजाभिमुख कार्यासाठी सावित्रीबाई फुले यांना पतीसह गोंवडे ,परांजपे, वाळवेकर, तात्या भिडे ,रानबा महार शिवाजी मांग,लहूजी राघ राऊत ,उस्मान शेख, फातिमा बेगम शेख ,सदोबा कृष्णाजी न्हावी आणि राजे सयाजीराव गायकवाड यांसारख्या सर्व जातीधर्माच्या व्यक्तींची मदत झाली. आधुनिक भारत निर्माणासाठी भरपूर शाळा सुरू केल्या.

महात्मा फुलेंनी स्त्री कर्तुत्वाला वाव दिला .सावित्रीमुळेच मी लोकांचे भले करू शकलो अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली. आज कोरोनामुळे समाज भेदरलेला आहे,तरुण बेरोजगारीच्या भीतीपोटी भेदरलेला आहे.स्वस्तात मिळणारा उपचारांसाठी अंगारा ,भोंदूभगत, बुवाबाजीचा वापर करीत आहे.

आयुष्यभर जोतीरावांना साथ देणार्‍या साथीविरुद्ध लढणार्‍या दहा बारा वर्षाच्याआजारी मुलाला पाठीवर घेऊन 66 वयाच्या सावित्रीबाईंनी दवाखान्यात नेले आणि त्याचे प्राण वाचवले. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून 10 मार्च, इ.स. 1897 रोजी त्यांचे निधन झाले. लोकोत्तर कार्य कार्य केल्यामुळेच सावित्रीबाईं फुले या समाजक्रांतीच्या जननी बनल्या आणि त्यांच्यामुळेच आज भारतामधील स्त्रियां सरपंचपदापासून ते पंतप्रधान, राष्ट्रपती पदापर्यंत पोचू शकल्या.

त्यांच्या जीवनावरील डॉ. मा. गो. माळी यांनी लिहिलेले साहित्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी प्रकाशित केलेले सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय तसेच धनंजय कीर ,डॉ. स. गं. मालशे ,डॉ.य. दि. फडके यांनी संपादित केलेले महात्मा फुले समग्र वाड्मय, पीडीएफ स्वरूपात ुुु.ीरहळीूंर.ारीरींहळ.र्सेीं.ळप/स्कॅन-डाऊनलोड/ वर उपलब्ध आहे..

संदर्भ 1.सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय,डॉ. मा. गो. . माळी ,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई .

2.महात्मा फुले समग्र वाड्मय,धनंजय कीर ,डॉ. स. गं. मालशे ,डॉ.य. दि. फडके , महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई.

3.शिक्षण गप्पा: प्रा. हरी नरके शिक्षण तज्ञ महात्मा फुलेंचे शैक्षणिक चिंतन नेमके काय आहे..?

- Advertisment -

ताज्या बातम्या