‘ती’च्या नजरेतून दुष्काळातील ‘ती’ची होरपळ

‘ती’च्या नजरेतून दुष्काळातील ‘ती’ची होरपळ

संदीप तीर्थपुरीकर, औरंगाबाद - Aurangabad

‘दुष्काळात तिची होरपळ’

लेखक- डॉ. आरतीश्यामल जोशी

प्रकाशक- आस्था पब्लिकेशन, औरंगाबाद

‘ती’च्या नजरेतून दुष्काळातील ‘ती’ची होरपळ

वजन उचलू नका असं डॉक्टर सांगतात, पण पाणी भराया नाही म्हणलं तर सासूला नाटक वाटतं. झालं मग, पडलं बाळ पाचव्या महिन्यात. एकदाची झाली सासूची शांती. आता म्हणते जा माहेरी आराम कराया आणि नवरा म्हणतो तवा नाही गेली, आता काय करते जाऊन, रहा इठंच, मोठा त्रागा करत ‘ती’ सांगते. पाण्यामुळे माहेरचे टाळतात आणि सासरचे पाणी भरायला डांबून ठेवतात. जगण्याची पार दैना झालीय, पण काय करणार, चालायचेच... मराठवाड्याच्या दुष्काळात होरपळलेल्या महिलांच्या अशाच वेदनांना (Dr. Aartishyamal Joshi) डॉ.आरतीश्यामल जोशी यांनी 'दुष्काळात तिची होरपळ' या पुस्तकात बोलते केले आहे. मराठवाड्यात फिरत असताना सहजासहजी संपर्कात नसलेल्या गावांची निवड करून आपल्या शोधक नजरेने टिपलेल्या कहाण्यांचा वेध लेखिकेने घेतला आहे. यामुळे हे पुस्तक वास्तववादी वाटते, यातील स्त्रिया आपल्याशी संवाद साधताना वाटतात.

दुष्काळ हा मराठवाड्यासाठी नवीन नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाची झळ इथल्या लोकांना नेहमीच सोसावी लागते. दुष्काळ म्हंटले तर नापिकी, कर्जबाजारीपणा आणि त्यातून होणाऱ्या शेतकरी आत्महत्याविषयी सातत्याने बोलले जाते. चिंता वर्तवली जाते. मात्र, दुष्काळामुळे पुरूषांएवढेच किंवा त्यापेक्षा काहीसे अधिक हाल महिलांचे होतात. तिला स्वंयपाक, धुणीभांडी, मुलांचे संगोपन, ज्येष्ठांची सेवा, घराची स्वच्छता करण्यासोबत पाण्यासाठी पायपीटही करावी लागते. ही पायपीट दररोजची असते. कित्येक किलोमीटर डोक्यावर हंडे, कळशी घेत तिला पाणी आणण्यासाठी जावे लागते. यातून तिला पायदुखी, कंबरदुखी, मानदुखीसोबत अनेक रोग जडतात. तिची होरपळ होते. या वर्गाचा सर्वांगीन विचार करुन साकारलेले पुस्तक म्हणजे "दुष्काळात तिची होरपळ' होय. दुष्काळग्रस्त महिलांच्या दैनंदिन जीवनाचा बोलपट डॉ. जोशी यांनी त्यांच्या पहिल्याच पुस्तकात उभा केला आहे.

औरंगाबाद येथील आस्था पब्लिकेशनने प्रकाशित केलेेल्या पुस्तकाची तीन प्रकरणात विभागणी आहे. पहिल्या प्रकरणात दुष्काळाची संकल्पना स्पष्ट करतांना जग, भारत, महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील महत्त्वाच्या दुष्काळाचा तपशीलवार आणि संदर्भासहीत आढावा घेण्यात आला आहे. इतिहासातील नोंदी सांगतांना वर्तमानात दुष्काळ निवारणासाठी राबवण्यात आलेल्या 'जलयुक्त शिवार योजना' आणि मराठवाड्यातील धरणांना जोडणाऱ्या 'वॉटरग्रीड प्रकल्प' यांची माहितीही या प्रकरणात आहे. दैनंदिन जीवनासाठी लागणारे पाणी आणि त्याची महिला करत असलेली तरतुद, यावरही भाष्य आहे.

दुसरे प्रकरण या पुस्तकाचा आत्मा आहे. मूळ पत्रकार असणाऱ्या डॉ.जाेशी यांना पत्रकारितेतील अनुभव आणि सभोवताली दिसणाऱ्या काही बाबी सातत्याने अस्वस्थ करत होत्या. मराठवाड्यातील दुष्काळ त्यापैकीच एक. २०१६ च्या दुष्काळाचे वार्तांकन करताना हा विषय बातम्यांपलिकडचा असल्याचे जाणवले. विशेषत: दुष्काळाला तोंड देणाऱ्या महिलांच्या यातना सुन्न करणाऱ्या होत्या. या महिलांचे भावविश्व मांडण्यासाठी एक पुस्तक लिहिण्याचा विचार आला. मग पुन्हा एकदा पुस्तकांच्या अंगाने ४७ अंश सेल्सियसच्या रणरणत्या उन्हात २०१६ आणि २०१९ मध्ये मराठवाड्याचा दुष्काळ दौरा केला. ८ जिल्ह्यातील ७६ तालुके, ७९ गावे आणि ४०० महिलांशी साधलेल्या संवादातून “दुष्काळात तिची होरपळ” तयार झाले. मुलाखती घेतलेल्या ४०० महिलांपैकी ७२ अनुभव मराठवाड्यातील बोलीभाषेत या प्रकरणात मांडण्यात आले आहेत. याचे अजून २० उप-विभाग असून प्रत्येकात ५ अशा एकूण १०० कथा आहेत. ही मांडणी एवढी वास्तववादी झाली आहे की या महिला प्रत्यक्ष आपल्याशी संवाद साधत असल्याचे जाणवते. यात वाचक आपल्या घरातील स्त्रीला शोधण्याचा प्रयत्न करतो. या कथा वाचकांना अस्वस्थ करतात. मन हेलावून टाकतात.

पाण्यासारख्या अत्यंत सामान्य गोष्टीसाठी महिलांना करावा लागणारा संघर्ष वाचकांना थक्क करणारा आहे. शहरी भागात पाण्याची उधळपट्टी सुरू असतांना दोन घागरी पाणी मिळवण्यासाठी होणारी ससेहोलपट लेखिकेने प्रत्यक्ष उभी केली आहे. पाण्यामुळे होणारे हिसांचार, एकल महिलांना होणारा ताण, वैतनिक कामे, आहार, लैंगिक जीवन, मासिक पाळी, अपघात, गभर्वती महिला यावर दुष्काळ आणि पाणी टंचाईचे होणारे परिणाम वाचून अंगावर काटा येतो. पाणी टंचाईचे पुढचे परिणाम म्हणजे हरवलेले सामाजिक, मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्य, दुरावलेले नातेसंबंध, विस्कटलेली आर्थिक स्थिती, पितृसत्तेचा ताण आणि यातून झालेल्या शेतकरी आत्महत्या. कर्त्या पुरुषाच्या आत्महत्येमुळे कुटुंबाची होणारी फरफट पुस्तकात आहे. गेल्या काही वर्षात कर्जबाजारी शेतकऱ्यांसह त्यांच्या मुलांनीही आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या आहेत. विवाह, शिक्षणाचा खर्च वाचावा म्हणून मुलांनी हे टोकाचे पाऊल उचलले. अशा घटनांची दखल पुस्तकात घेतली आहे.

पाण्याअभावी वाढलेले अवैतनिक काम, अशुद्ध पाण्याचा पुरवठा आणि लांबलेले विवाह असा विस्तृत अनुभवांचा पट लेखिकेने मोठ्या कौशल्याने मांडला आहे. काही ठिकाणी सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीचे संख्याशास्त्रीय पध्दतीने विष्लेषण करून त्याचे संदर्भही देण्यात आले आहेत. २०२० च्या एप्रिल-मे महिन्यातच कोरोनाचा कहर सुरू असताना मराठवाड्यातील बहुतांश जनता टँकरवर अवलंबून होती. पाणीपुरवठा व्यवस्थेच्या ढिसाळ नियोजनामुळे महिलांची फरफट सुरू होती. पाण्यासाठी आंदोलनात करणाऱ्या महिलांचे दाखले देत प्रकरण संपते तेव्हा वाचक सुन्न झाल्याशिवाय राहत नाही.

जलचक्रात दर तिसऱ्या वर्षी पाऊस कमी होऊन चौथ्या व पाचव्या वर्षी दुष्काळ पडतो. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवली तर समाजातील अर्धा घटक असणाऱ्या महिलावर्गाच्या समस्येकडे सरकारने गांभीर्याने लक्ष घालून काही उपाययोजना कराव्यात या अनुषंगाने तिसऱ्या प्रकरणात सरकार व स्वयंसेवी संस्थांसाठी निष्कर्ष व सुचना मांडण्यात आल्या आहेत. पुस्तकातील छायााचित्रे मराठवाड्यातील पाणीटंचाईवर भाष्य करण्यासाठी पुरेसे बोलके आहेत. लेखिका डॉ. जोशी स्त्रीवादी संशोधक असल्याने पुस्तकातील अनुभव, माहिती, विश्लेषण हे पध्दतशीर आहे. दुष्काळामध्ये स्त्रियांच्या होरपळीचे आजवर स्पर्श न केलेल्या अनेक पैलूंचे रेखाटन पहिल्यांदाच या पुस्तकात करण्यात आले आहे.

पुस्तकात लेखिकेने एक गंभीर प्रश्न आगळ्या वेगळ्या पद्धतीने अतिशय समर्पक शब्दामध्ये मांडला आहे. तो सामान्य वाचक आणि अभ्यासकांनाही उपयोगाचा आहे. आरतीश्यामल यांनी पाण्याअभावी स्त्रियांची होणारी कुचंबना मांडतांना समाजाला एक नवा विचार देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारच्या लिखानासाठी अंत:करणातून प्रेरणा मिळते. लेखिकेने दुष्काळातील महिलांच्या होरपळीतून ही प्रेरणा घेत अतिशय वेगळा विषय हाताळला आहे. स्त्री अभ्यास, समाजशास्त्र, लोकप्रशासन, राज्यशास्त्र अशा सामाजिक शास्त्राच्या विविध ज्ञानशाखांना स्पर्श करणारे एक महत्त्वाचे पुस्तक म्हणून याची नोंद घ्यावी लागेल.

राजदीप सरदेसाई (Rajdeep Sardesai) म्हणतात त्याप्रमाणे मोठ्या शहरांच्या झगमगाटात झाकळून गेलेल्या खऱ्या भारताला समजवून घेण्यासाठी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

- माे.नं. ९८२२८४०५५७

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com