अहमदनगर स्थापनादिन विशेष : इतिहास गोड, पण भविष्य अवघड!

28 मे 1490 ला स्थापन झालेलं.. काना मात्रा वेलांटी नसलेलं सरळ माणसाचं सरळ शहर म्हणजे अहमदनगर. पण इथली माणसं मात्र दिसती तशी साधी, सरळ, सोपी नाहीतच. अहमदनगरच्या इतिहासात डोकावले तर तो फार गोड असल्याचे लक्षात येते. वर्तमान काळाचा विचार केला तर वर्तमानासोबतच भविष्यही अवघड दिसते. हे चित्र बदलेल, हेही दिवस जातील या आशेवर नगरकर दिवस काढतो. या आशेबाबत एका नगरकराने व्यक्त केलेली ही अपेक्षा.......
अहमदनगर स्थापनादिन विशेष : इतिहास गोड, पण 
भविष्य अवघड!

28 मे 1490 ला स्थापन झालेलं.. काना मात्रा वेलांटी नसलेलं सरळ माणसाचं सरळ शहर म्हणजे अहमदनगर. पण इथली माणसं मात्र दिसती तशी साधी, सरळ, सोपी नाहीतच. आज नगर शहराचा 531 वा वाढदिवस. म्हणजे शहर स्थापनेला आज 531 वर्षे झालीत. अहमदनगरच्या इतिहासात डोकावले तर तो फार गोड असल्याचे लक्षात येते. वर्तमान काळाचा विचार केला तर वर्तमानासोबतच भविष्यही अवघड दिसते. हे चित्र बदलेल, हेही दिवस जातील या आशेवर नगरकर दिवस काढतो. या आशेबाबत एका नगरकराने व्यक्त केलेली ही अपेक्षा.

नगर शहर आणि जिल्ह्याचा असलेला इतिहास वेगळा आहे. 28 मे 1490 ला अहमदशहा बहिरी निजामशहा यांनी अहमदनगर शहराची स्थापना केली. देशात 500 पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असलेली मोजकीच शहर आहेत. त्यातील अहमदनगर एक. आज जिथं किल्ला आहे तिथं अहमदशहा बहिरी निजामशहा थांबलेला असताना त्याने सशाला कुत्र्याच्या अंगावर धावून जाताना पाहिलं आणि अशी चमत्कारिक जागा त्याने किल्ला आणि शहर वसवायला निवडली ते अहमदनगर.

सीना नदीच्या काठावर वसलेलं, चाँदबीबीच्या शौर्याची आठवण हे शहर आजही विसरलेलं नाही. खापरी नळाने शहराला पाणी पुरवठा करण्याचा प्रयोग 500 वर्षापूर्वी मलिक अंबरने केला ते आपलं अहमदनगर शहर. जमिनीच्या मोजमापाची, शेतसार्‍याची पद्धत राबवणार्‍या आणि साधा हबशी गुलाम स्वकर्तृत्वावर थेट राज्याचा प्रधानमंत्री बनू शकतो हे दाखवणार्‍या मलिक अंबरची कार्यभूमी म्हणजे अहमदनगर.

लाड-कारंजा-पैठण, अहमदनगर-जुन्नर-नाणेघाट-कल्याण या मार्गाने थेट बगदादपर्यंत व्यापार उदीम करणार आणि एकेकाळी समृद्ध बाजारपेठ म्हणून नावारूपाला आलेलं अहमदनगर. शहाजीराजे आणि शरीफजीराजे यांच्या वडिलांनी म्हणजे मालोजीराजे जिथे नवस बोलले त्या शहाशरीफ दर्ग्याचं शहर म्हणजे अहमदनगर. शहाजीराजे ज्या भातोडीच्या लढाईने सगळ्या देशात युद्धकुशल सेनापती म्हणून प्रसिद्ध झाले ते अहमदनगर. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर, दक्षिणेत एकूण 27 वर्षे लढूनही महाराष्ट्र जिंकता न आल्याने निराश झालेल्या औरंगजेबाने शेवटचा श्‍वास घेतला ते अहमदनगर. शाहू महाराजांचे वडील छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचा निर्घृण खून झाला ते अहमदनगर शहर. त्यांचा अंत्यविधी माळीवाडा परिसरात असलेल्या ब्रिटिशकालीन कोर्टाच्या परिसरात झाला होता. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या शिपाई असलेला उमाजी भोसले याने त्यांना अग्निडाग दिला होता.

इथलं वातावरण धातुकाम करायला योग्य आहे म्हणून इथे त्याकाळात देशातल्या सर्वोत्तम तोफांची निर्मिती झाली, त्या भागाला आजही तोफखाना नाव कायम आहे. 1942 च्या आंदोलनाची हाक दिल्यावर नेहरू-पटेल-मौलाना आझाद आणि इतर अनेक नेते किल्ल्यात तुरुंगवासात होते. तिथंच नेहरूंनी ं ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ लिहिला. महात्मा गांधीजींच्या खुनाचा कट अहमदनगरमध्ये रचला गेला अन् स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेले पटवर्धन बंधूही अहमदनगरचे. स्वातंत्र्योत्तर काळात राज्यातील पहिली एसटी अहमदनगरहून पुण्याकडे मार्गस्थ झाली. असा बरावाईट इतिहास असलेले अहमदनगर भौगोलिकदृष्ट्या आणि उत्तम हवामान असलेलं प्राचीन शहर. ब्रिटीश काळाच्या आधीपासून लष्करी छावणी म्हणून नावाजलेलं आहे. इथली सलाबतखानाची कबर असलेली इमारत म्हणजे आजचा चाँदबीबी महाल. त्याची समुद्रसपाटीपासून उंची जवळपास माथेरानइतकी आहे. इतिहासाची ही कवनं भूतकाळातली.

अहमदनगर शहराचा वर्तमान आणि भविष्य मात्र अवघड आहे. अवतीभोवती लष्करी केंद्र असल्याने वाढीला आणि विकासाला प्रचंड भौगोलिक मर्यादा आहेत. स्थानिक पातळीवर नेतृत्वाची अनास्था आणि दूरदृष्टीचा अभाव हा कलंक येथील नागरिकांना गेली काही दशकं सतावतोय. आधी नगरपालिका आणि आता महानगरपालिका. पण या स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्ताधारी म्हणजे सोयरेपक्ष. सत्ताधारी कुणीही असले तरी ठेकेदारही तेच, असलं चित्र या शहरात दिसतं. नेतृत्वाच्या अनास्थेमुळेच अहमदनगरचं भविष्य मात्र अवघड होऊन बसलंय. चाँदबीबी घोड्यावर बसून पुन्हा आली तरीही शहरातले रस्ते चुकणार नाही हा विनोद नगरकर नकळत निर्लज्जपणे आज सांगतो, यावरून शहराचं भविष्य कळून घ्यावं. कायदे, नियम असतात, पण ते पाळण्यासाठीच का? असा प्रश्‍न फेरफटका मारताना पडल्याशिवाय राहत नाही. नियमांचे पालन आणि नगरकरांचा दुरान्वये संबंध नसल्याचे पदोपदी दिसते. त्यामुळेच वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहतूक आणि अपघातात मरणारी माणसं याचं कोणतंच सोयरसूतक कोणाला वाटत नाही. याच उदासीनतेचा परिपाक म्हणून एमआयडीसी सुरुवातीपासून कुपोषित आहे. जुने उद्योग बंद पडले, नवीन येत नाहीत, आले तरी राजकीय दबावाला कंटाळून उद्योजक गाशा गुंडाळतात. परिणामी नव्याने रोजगारनिर्मिती नाही. पर्यायाने बाजारपेठ मर्यादेपलीकडे वाढत नाही अशा दुष्टचक्रात आज शहर अडकले आहे. अहमदनगर शहराचं भौगोलिक स्थान महत्वाचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नेमकं मध्यवर्ती असलेलं. पुणे-औरंगाबाद-बीड-नाशिक अवघ्या सव्वाशे-दीडशे किलोमीटरच्या टप्प्यात आणि मुंबई 300 किलोमीटर. औरंगाबाद-अहमदनगर-पुणे अशी थेट रेल्वे सुरू झाली तर पुणे शहरावर असलेला ताण कमी होईलच, शिवाय अहमदनगर आणि औरंगाबाद या शहरांच्या बरोबर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर धावेल यात शंका नाही. विकासाची आश्‍वासनं भरपूर मिळतात मात्र स्थिती काही बदलत नाही. हेही दिवस जातील याच आशेवर आम्ही दिवस काढतोय, जगतोय! - एक नगरकर

हीच अहमदनगरची ओळख

ब्रिटीशकाळापासून नगरला लष्करी महत्व आहे. मध्यवर्ती ठिकाण, दळणवळण सोयीचे. यामुळे अहमदनगरला वाहन संशोधन विकास केंद्र, रणगाडा दल, चिलखती दल, बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट, यांत्रिकी पायदळ प्रशिक्षण संस्था, खारे-कर्जुने (केके रेंज) हे युद्धसराव आणि प्रात्यक्षिक केंद्र अशा अनेक महत्त्वाच्या संस्था शहराच्या भोवती आहेत. दीडशे वर्षापेक्षा जुने संपूर्ण दगडी बांधकाम आणि तत्कालीन सागवानी फर्निचर उत्तम असलेलं माणिक चौकातील ह्यूम मेमोरियल चर्च, मुक्तीफौजेचं रुग्णसेवेला समर्पित असलेलं बूथ हॉस्पिटल, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे...’ अशी घोषणा असलेले बाळ गंगाधर टिळकांचे भाषण झाले ती इमारत कंपनी, महाराष्ट्रातील मोजक्या जुन्या शिक्षण संस्थापैकी एक असलेली भा.पा.हिवाळे शिक्षण संस्था शहरात आहे. आता अलिकडच्या काळात नगर शहर म्हणजे गुंडागर्दी, धमक्या, दादागिरीचं शहर म्हणूनही पुढे येवू पाहतंय. हे चित्र विदारक आहे याची जाण प्रत्येकाला आहे, पण ते बदलणार कोण? हा खरा प्रश्‍न आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com