कोरोना निर्बंधाचे विस्मरण

कोरोना निर्बंधाचे विस्मरण

- हिमांशु चौधरी

कोरोनाच्या जागतिक महासंसर्गानं आपल्याला मूलभूत गरजांची आठवण करून दिली, असं म्हणतात. पहिल्या लाटेच्या वेळी तर महिनोन्महिने लॉकडाउन होता. उद्योग, व्यवसाय, बाजारपेठा, कार्यालयं, शाळा-महाविद्यालयं सगळं बंद! हातावरचं पोट असणार्‍यांचे जगण्याचे प्रश्न निर्माण झाले.

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यावेळी असंख्य ‘देणारे हात’ त्यावेळी पुढं आले होते. परंतु जीवन वाचवायचं की जीविका, हा यक्षप्रश्न धोरणकर्त्यांना पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेत अधिक तीव्रतेनं पडला. अर्थव्यवस्था सावरता सावरेना, रोजगार घटले, अनेक उद्योगांना कायमचं टाळं लागलं. अर्थचक्र ठप्प राहावं आणि उपजीविकेचे प्रश्न निर्माण व्हावेत, असं कुणालाच वाटणार नाही. स्वाभाविकच ‘लॉकडाउन’, ‘निर्बंध’ हे शब्द ऐकल्यावर चेहरे कोमेजणारच! परंतु निर्बंध उठवल्यावरही आपल्याला नियम पाळायचेत आणि अर्थचक्र सुरू ठेवायचंय, हे आपल्या मनात पक्कं रुजलं पाहिजे.

विषाणूच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या अवतारांनंतर आता ‘कप्पा’ नावाचा अवतार उत्तर प्रदेशात आढळून आलाय. सगळ्यात जास्त रुग्ण आजही महाराष्ट्र आणि केरळमध्ये आहेत. केरळमध्ये तर ‘जिका’चाही धोका वाढतोय. या पार्श्वभूमीवर, निर्बंध उठवले तरी आपण आपल्या गरजांचे प्राधान्यक्रम ठरवायला हवेत. अगदीच निकडीच्या गरजा सर्वप्रथम, त्यानंतर काहीशा कमी महत्त्वाच्या गरजा अशा प्रकारे क्रम लावूनच घराबाहेर पडण्याचा धोका पत्करला पाहिजे. बाहेर पडलो तरी नियम पाळले पाहिजे. पण अनुभव काय सांगतो..?

निर्बंध शिथिल केल्याबरोबर लोक पर्यटनस्थळी गर्दी करू लागले. उत्तरेत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अन्य राज्यांमध्ये हजारोंच्या संख्येनं लोक जमू लागलेत. तिसर्‍या लाटेचा धोका अद्याप टळलेला नाही आणि आपल्याला मुभा मिळालीय ती आवश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी... अर्थचक्र सुरू राहण्यासाठी! परंतु हा विचार पर्यटकांपैकी कुणाच्याही चेहर्‍यावर दिसत नाही. एवढंच कशाला, अनेकांच्या चेहर्‍यावर मास्कही दिसत नाही. जणूकाही करोना आपल्याला कायमचा सोडून गेलाय, अशा आविर्भावात लोक पर्यटनस्थळी वावरतायत. टूरिस्ट स्पॉच हेच करोनाचे हॉट स्पॉट ठरण्याचा धोका आहे, असा इशारा नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिलाय.

पर्यटन हाही आजकाल एक मोठा व्यवसाय आहे, अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे आणि त्यावर अनेकांचा चरितार्थ अवलंबून आहे, हे सगळं मान्य केलं तरी पर्यटन ही आपली पहिली गरज नाही. अनेक महिने घरात कोंडल्यासारखे व्यतीत केल्यानंतर बाहेर पडल्या-पडल्या निसर्गाच्या सान्निध्यात जावंसं वाटणंही मानवी स्वभावाला धरूनच आहे. परंतु तरीही पर्यटन ही आपली प्राथमिक गरज नाही आणि ठरलेल्या टूरिस्ट स्पॉटवर गर्दी करण्याऐवजी अन्य ठिकाणंही आपल्याला शोधता येतात, या गोष्टी लोकांना पटतच नाहीत. म्हणूनच ठराविक स्पॉटवर पर्यटकांची तोबा गर्दी उसळलीय.

वीकेन्ड म्हणजे तर अनेकांसाठी पर्यटनाची पर्वणीच! परंतु करोनाचं विस्मरण व्हावं असा याचा अर्थ घेता कामा नये. लोणावळ्याजवळच्या भुशी डॅमवरून असंख्य पर्यटकांना हाकलून देण्याची वेळ पोलिसांवर का आली? कारवाई करून पर्यटकांचा रसभंग करण्याची पोलिसांना हौस असते का?

करोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्णसंख्या अचानक वाढली तेव्हा रुग्णालयांमध्ये खाटा, औषधं, इंजेक्शनं आणि ऑक्सिजन कमी पडल्यामुळं अनेकांना अकाली जग सोडून जावं लागलं, एवढं तरी गर्दी करताना आठवायला नको का?

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com