नाशिकरोड
नाशिकरोड
फिचर्स

पन्नास वर्षांपूर्वीचे नाशिकरोड

-अ‍ॅड. दीपक बर्वे

Gokul Pawar

Gokul Pawar

सुमारे 40-50 वर्षांपूर्वीचे नाशिकरोड कसे होते हे जाणणे उत्सुकता वाढवणारे आहे. त्याकाळी नाशिकरोड परिसर ग्रामीण भाग म्हणून ओळखला जात असे. आजूबाजूची खेडी पूल नसल्याने नदीपलीकडे होती. काही नाशिकरोडपासून लांबच होती. शहराच्या विकासात करन्सी नोट प्रेस, इंडिया सिक्युरिटी प्रेसचा वाटा मोलाचा आहे. कामगार वसाहती उभ्या राहिल्या. व्यापार उदीम वाढला. अनेक व्यक्ती आणि संस्थांच्या प्रयत्नातून नाशिकरोड आकारास आले आहे.

साधारणत: 40-50 वर्षांपूर्वीचा काळ असेल. त्यावेळी नाशिकरोड परिसर ग्रामीण भाग म्हणून ओळखला जात असे. दसक, पंचक, विहितगाव, देवळालीगाव, नांदूर, मानूर ही आजूबाजूची खेडी पूल नसल्याने नदीच्या पलीकडे होती. चेहेडी, शिंदे, पळसे ही गावे नाशिकरोडपासून लांबच होती. नाशिकरोडच्या विकासात अत्यंत मोलाचा वाटा असेल तर तो करन्सी नोट प्रेस, इंडिया सिक्युरिटी प्रेसचा! इंग्रजांच्या काळात दोन्ही प्रेस अस्तित्वात आल्या तेव्हा कामगारांना राहण्यासाठी मेनगेट वसाहत, दहा चाळ, प्ले कॅम्प, स्टाफ क्वार्टर्स, नेहरूनगर वसाहत अशा वसाहती टप्प्याटप्प्याने उभ्या राहिल्या. प्रेस कामगारांचा पगार 10 तारखेला होत असे. पूर्वी नाशिकरोडच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या आजूबाजूला मीना बाजार भरत असे. दर महिन्याच्या 10 तारखेला या बाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत असे. काळानुसार मीना बाजार बंद होऊन त्याचे रूपांतर व्यापारपेठेत झाले.

गांधीनगर प्रेसची स्थापना झाल्यानंतर तिथेही वसाहतीची स्थापना झाली. त्यांचाही व्यवहार नाशिकरोड येथेच होत असे. पुढे एकलहरे येथे औष्णिक विद्युत केंद्र स्थापन झाले. तिथेही कामगार आणि अधिकार्‍यांसाठी वसाहत निर्माण करण्यात आली. त्याचबरोबर पुढे किर्लोस्कर, टॅ्रक्शन कारखाना यांचीही निर्मिती झाली. त्यामुळे नाशिकरोडमधील व्यापार अधिकाधिक वाढू लागला. नाशिकरोड, गांधीनगर, उपनगर, एकलहरे तसेच आजूबाजूच्या खेडेगावातील नागरिक खरेदी-विक्रीसाठी नाशिकरोडला येऊ लागल्याने येथील व्यापार वृद्धिंगत झाला.

त्याकाळात नाशिकरोडच्या विकासात महत्त्वाचे नाव घ्यावे लागेल ते म्हणजे बिटको! पूर्ण नाव भायखळा ट्रेडिंग कंपनी! ‘बिटको’ने नाशिकरोड शहरात दंतमंजन, ग्राईप वॉटर, बिटको हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालय, सिनेमागृह, मुक्तिधाम अशा सर्व क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन नाशिकरोडच्या विकासात भर घातली. विशेष म्हणजे बिटको यांच्या घराण्याने प्रत्यक्ष राजकारणात कधीही सहभाग घेतला नाही.

पूर्वी प्रेस कामगार गांधी टोपी, पायजमा, धोतर अशा पोशाखात आणि सायकलवर दिसायचा. काळानुसार आता तो दुचाकी आणि चारचाकीत मोठ्या दिमाखाने वावरतो. कामगारांच्या मुलांनीसुद्धा शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. प्रेस कामगारांची मुले सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रात आपले नाव कमवत आहेत. त्यातील बर्‍याच जणांनी सरकारी नोकरीत उच्च अधिकारपदे भूषवली. आजही भूषवत आहेत. काहींनी परदेशातही आपल्या शहराचा नावलौकिक वाढवला आहे.

सन 1992 नंतर महापालिकेची निवडणूक झाली. त्यानंतर नाशिक, नाशिकरोड शहराची प्रगती वाढली. रस्ते, वीज, पाणी या मूलभूत गरजा सर्वदूर पोहोचल्या. फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल या मैदानी खेळांचे धडे नाशिकरोडच्या जिमखाना मैदानावर घेऊन अनेक खेळाडूंनी राष्ट्रीयपातळीवर चमक दाखवली आहे. काळानुसार स्पर्धा बदलत गेल्या. आता केवळ क्रीडांगणे अस्तित्वात आहेत. या क्रीडांगणांकडे बघून जुन्या पिढीतील क्रीडा रसिकांना व खेळाडूंना निश्चितच वाईट वाटते.

नाशिकरोडच्या विकासात बिटको शेठ, वि. तु. अरिंगळे, बाबूराव बागुल, डॉ. वझे, माजी खासदार बाळासाहेब देशमुख, बाबूराव रिपोर्टे, सीताराम बर्वे यांचे योगदान खूप मोठे आहे. साधारणत: 1978-1980 पर्यंत या व्यक्तींचा शहरात आदरयुक्त दबदबा होता. त्यांच्या शब्दाला मोठी किंमत होती. मोठमोठे वाद, शेतीचे प्रश्न, आरोग्य किंवा समाजाविषयीच्या अडचणी हे लोक अत्यंत खुबीने व कोणालाही न दुखावता सोडवत. पुढे काळानुसार राजकारणातही बदल होत गेला. आता नाशिकरोड शहरात मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. मीना बाजार बंद होऊन त्याजागी मोठमोठ्या इमारती तयार झाल्या. एवढ्या बदलानंतरही देवळालीगावचा आठवडे बाजार मात्र अद्यापही दिमाखात भरतो हे विशेष!

सन 1978 च्या सामाजिक दंगलीनंतर दोन समाजात वितुष्ट निर्माण झाले होते. त्याकाळी अनेकांची मने दुभंगली होती. परंतु काळानुसार आता सर्व काही व्यवस्थित झाले आहे. सार्वजनिक सण-उत्सव एकोप्याने साजरे केले जातात. 1978 नंतर आतापर्यंत शहरात एकही जातीय दंगल झाली नाही, हे येथील एकोप्याचे प्रतीकच समजायला हवे. शहराच्या आर्थिक बळकटीसाठी कर्जपुरवठा करणार्‍या बँकांची गरज निर्माण झाल्याने व्यापारी बँकेची निर्मिती करण्यात आली. या बँकेच्या विकासाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे.

आज नाशिकरोड शहराची मुख्य अर्थवाहिनी असा नावलौकिक मिळवून आहे. त्यानंतर बिझनेस बँक तसेच पतसंस्था निर्माण झाल्या. अलीकडच्या काळात बांधकाम व्यावसायिकांनी शहर विकासात मोठा हातभार लावला आहे. एकंदरीतच समाजाच्या सर्वच स्तरावर येथील व्यक्ती आणि संस्थांनी मारलेली भरारी, केलेले कार्य शहराच्या लौकिकात भर टाकणारे ठरले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com