नव्या व्हेरियंटची भयछाया

नव्या व्हेरियंटची भयछाया

- डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्रज्ञ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडन

जिनोम सिक्वेन्सिंग तंत्रज्ञानामुळे व्हायरसमध्ये होणारे बदल, त्याची तीव्रता वाढतेय की कमी होतेय हे समजण्यास मदत होते. भारत सरकारच्या नवीन नियमावलीनुसार डेल्टा प्लस व्हेरियंट हा व्हेरियंट ऑफ कन्सर्न असल्याचे जाहीर केले गेले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनेही याला दुजोरा दिलेला आहे. भारतामध्ये दुसरी लाट ही डेल्टा व्हेरियंटमुळे आली पण तिसरी लाट ही डेल्टा प्लसमुळेच येईल हे नक्की नाही. लसीकरण वेगाने झाले तर तिसरी लाट अतिशय सौम्य प्रकारची असेल. डेल्टा प्लसवर ‘व्हॅक्सिन मिक्सिंग’ प्रभावी ठरत असल्याचे समोर आले असले तरी त्यामुळे गाफिल वा बेफिकिर राहून चालणार नाही.

फेब्रुवारी 2021 पासून भारतामध्ये कोरोना विषाणूने संक्रमित झालेल्या रुग्णसंख्येमध्ये वाढ दिसून यायला लागली. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये रुग्णसंख्या अतिशय वेगाने वाढून दररोजचा आकडा जवळपास 4 लाखांपर्यंत पोहोचला. त्यानंतर ती हळूहळू कमी होत आता दररोज साधारणतः 50 हजारांच्या आसपास रुग्णसंख्या आणि 800-900 मृत्यूंची नोंद होत आहे.

ही रुग्णसंख्या अचानक का वाढतेय, लॉकडाऊन कमी केला म्हणून वाढली की अजून काही दुसरे कारण होते याचा शोध घेताना काही ठळक बाबी दिसून आल्या आहेत. भारतामध्ये लॉकडाऊन कमी केला हे रुग्णसंख्या वाढीचे एक कारण होते; तसेच कोरोना विषाणूच्या मूळ स्वरूपात बदल होऊन तो अधिकच वेगाने पसरेल अशा प्रकारचे बदल त्याच्यामध्ये झाले होते. यालाच शास्त्रीय भाषेत म्युटेशन किंवा नवीन व्हेरियंट म्हणतात.

जगभरातील लोक त्याला ‘इंडियन व्हेरियंट’ म्हणू लागल्यानंतर त्यावर वादविवाद होऊ लागले. अंतिमतः त्याचे नाव डेल्टा व्हेरियंट (इ.1.617.2) असे ठेवण्यात आले. याच डेल्टा व्हेरियंटमुळे इंग्लंडमध्ये तिसरी लाट सुरु झाली; तर अमेरिकेत सुद्धा रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली. विशेष म्हणजे या दोन्ही देशांच्या लसीकरणाचा वेग जगात सर्वाधिक आहे. इंग्लंमध्ये सध्या दररोजची जी रुग्णसंख्या आहे त्यामध्ये 91टक्के रुग्ण हे डेल्टा व्हेरियंटचे आहेत. भारतामध्ये डेल्टा व्हेरियंटबद्दल लोकांना माहिती होऊ लागली तोच त्यामध्ये पुन्हा बदल दिसून येऊ लागले आणि त्याचे पुढे नामकरण डेल्टा प्लस व्हेरियंट असे केले.

डेल्टा प्लस किती घातक?- सध्या सरकारी आरोग्य यंत्रणेकडे डेल्टा प्लस व्हेरियंट बद्दलची खूपच कमी माहिती आहे. याचे मुख्य कारण म्हणजे नक्की हा व्हेरियंट कुठे आणि कसा तयार झाला याची अपुरी माहिती, त्याचबरोबर देशातील वेगेवेगळ्या भागातील कोव्हीड रुग्णांमधून कोरोना व्हायरसचे फारच कमी होणारे जिनोम सिक्वेन्सिंग. वास्तविक पाहता, जिनोम सिक्वेन्सिंग तंत्रज्ञानामुळे व्हायरसमध्ये होणारे बदल, त्याची तीव्रता वाढतेय की कमी होतेय हे समजण्यास मदत होते.

भारत सरकारच्या नवीन नियमावलीनुसार नुकताच डेल्टा प्लस व्हेरियंट हा व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणजेच आरोग्यसाठी हानिकारक किंवा काळजी करण्यासारखा असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याची कारणे देताना भारत सरकारने जाहीर केले आहे की हा डेल्टा प्लस व्हेरियंट हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक वेगाने पसरतो आहे, याची रुग्णाच्या शरीरात प्रवेश करण्याची क्षमता वेगवान आहे. तसेच फुफ्फुसांमधील पेशीत प्रवेश करण्याची क्षमतासुद्धा अधिक आहे. सध्या आढळणार्‍या कोरोना व्हायरसच्या सर्व रूपांमध्ये म्युटेशनचे (उत्परिवर्तनांचे) क्लस्टर आढळत आहेत.

डेल्टा प्लस व्हेरियंटमध्ये मूळ डेल्टा व्हेरियंटपेक्षा के 417 एन नावाचे अतिरिक्त उत्परिवर्तन आहे, जे हे नियमित डेल्टा व्हेरियंटपेक्षा वेगळे असून हे उत्परिवर्तन स्पाइक प्रोटीनवर परिणाम करताना दिसून आले आहे. स्पाइक प्रोटीन हा विषाणूचा एक भाग आहे जो विषाणूला पेशींमध्ये वेगाने संक्रमित होण्यास मदत करतो. डेल्टा प्लसमध्ये जे उत्परिवर्तन झाले आहे ते स्पाइक प्रोटीनशी निगडित आहे.

सध्याच्या काही शास्त्रीय निरीक्षणावरून असे दिसून आले आहे की हा व्हॅरियंट रुग्णाच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजनाही निष्क्रिय करतो आहे आणि त्यामुळेच तो वेगाने पसरत आहे. पूर्वीच्या डेल्टा व्हॅरियंटमध्ये म्युटेशन (बदल) होऊन डेल्टा प्लस तयार झाला असल्यामुळे त्याचे बरेचसे गुणधर्म हे आहे तसेच आहेत.

सध्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या घातकतेबद्दल दोन मतप्रवाह आहेत. काही सरकारी आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे की हा व्हेरियंट घातक नसून तो वेगाने पसरत नाही; याउलट भारतातील खासगी आरोग्य यंत्रणा आणि इतर देशातील सरकारी आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे की हा व्हेरियंट घातक असून तो अतिशय वेगाने पसरेल. भारतातील सरकारी आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे की हा व्हेरियंट मार्च 2021 पासूनच समजत असून तो तेव्हाच युरोपियन देशांमध्येही होता. तर काही निरीक्षणांवरून असे दिसून आले आहे की हा व्हेरियंट नेपाळमधून भारतामध्ये आला आहे. एकंदरीत, सध्या तरी याच्या उगमाबद्दल खूपच भिन्न मतप्रवाह आहेत.

डेल्टा प्लस आणि जागतिक परिस्थिती: - आजच्या जागतिक परिस्थितीचा विचार केला तर मूळ डेल्टा व्हेरियंट हा जगातील 80 देशांमध्ये पसरला आहे आणि त्याची रुग्णसंख्या कितीतरी लाखांमध्ये आहे. याउलट नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट हा अजून अनेक देशांमध्ये पसरला नसून सध्या भारत, अमेरिका आणि यूरोपमधील काही देश मिळून एकूण 11 देशांत याची रुग्णसंख्या 200 च्या आसपास आहे. केवळ भारतामध्ये या व्हॅरियंटमुळे एका मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये मात्र दररोज वेगाने वाढ होत आहे.

मार्च 2020 मध्ये कतारमध्ये सापडलेल्या एका मूळ कोरोना विषाणूमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे उत्परिवर्तन दिसून आले असून, पूर्वी दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा सापडलेल्या बीटा व्हेरियंटमध्येही असेच नवीन बदल झालेले दिसून आले आहेत. याबद्दलची माहिती 23 जून रोजी लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या सायन्स मीडिया सेंटरने जाहीर केली. जूनच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंडमधील सरकारी पब्लिक हेल्थच्या अहवालानुसार डेल्टा प्लस व्हेरियंटची नोंद जगातील वेगवेगळ्या देशांनी केली आहे. ती अशी ः कॅनडा, जर्मनी आणि रशियामधील प्रत्येकी एकाचा समावेश होता. भारतात 6, पोलंडमध्ये 9, नेपाळमध्ये 2, स्वित्झर्लंडमध्ये 4, पोर्तुगालमध्ये 12, जपानमध्ये 13 आणि अमेरिकेत 14.

जून 25 पर्यंत अमेरिकेने 84 रुग्णांमध्ये आणि भारताने 48 रुग्णांमध्ये जीनोम सिक्वेन्सिंग करून डेल्टा प्लस व्हेरियंटची नोंद केली आहे. संपूर्ण भारतामध्ये 12 राज्यांमध्ये 28 प्रयोगशाळेत एकूण 45000 रुग्णांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले गेले आहे. यामध्ये 48 डेल्टा प्लस व्हेरियंट सापडले आहेत. इंग्लंडमध्ये ही संख्या 41 इतकी आहे. अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेनेही डेल्टा प्लसला ङ्गव्हेरियंट ऑफ कन्सर्नफ म्हणून जाहीर केले आहे.

डेल्टा प्लस आणि लसीकरण: - साधारणपणे डिसेंबर 2020 पासून जेव्हा जेव्हा कोरोना विषाणूचे नवीन व्हेरियंट आले तेव्हा तेव्हा सर्वांच्या मनात एकाच शंका आली, यावरती लस उपयोगी पडणार का? डेल्टा प्लसबाबतही हाच प्रश्न सर्वांच्या मनात आहे. आजच्या दिवसापर्यंत जगातील जवळपास 100 कोटीपेक्षा अधिक लोकांना सहा वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसीचे एक किंवा दोन डोस मिळाले आहेत (अधिकृत माहितीनुसार यामध्ये चीनचा समावेश नाही). भारताचा विचार केला तर सुमारे 19 टक्के लोकांना एक डोस तर फक्त 4 टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. भारतामध्ये सार्वधिक दिलेली लस म्हणजे कोविशील्ड. भारतामध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार कोविशील्डचा एक डोस डेल्टा व्हेरियंटवर 70 टक्के परिणामकारक आहे. म्हणजेच एका डोसमुळे 70 टक्के लोकांना जरी डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग झाला तरी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज लागत नाही. दुसरीकडे इंग्लंडमध्ये लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर हेच प्रमाण 90 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या माहितीनुसार, सध्याच्या सर्व लसी या कोरोनामुळे होणारा गंभीर संसर्ग आणि मृत्यूपासून बचाव करण्यासाठी सक्षम आहेत. आत्तापर्यंत जवळपास कोरोना व्हायरसची 10 हजारांहून अधिक प्रकारची म्युटेशन्स सापडली आहेत आणि या सर्व प्रकारांच्या विरूद्ध लसी प्रभावी आहेत. डेल्टा प्लस या नवीन उत्परिवर्तित प्रकारातील कोरोना विषाणूवर लसी प्रभावी ठरतील की नाही, यासाठी अधिक माहितीची प्रतीक्षा करावी लागेल, असे डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले आहे. चांगली गोष्ट म्हणजे सध्या डेल्टा प्लसची जागतिक स्तरावर वर्णन केलेली फारच कमी प्रकरणे आहेत. तरीही जगातील सर्वच देश लसी आणि डेल्टा प्लस या दोन्हींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

28 जून रोजी ऑक्सफोर्ड विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार असे आढळले आहे की ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका (भारतातील कोविशील्ड) आणि फायजर या दोन वेगवेगळ्या लसींच्या वैकल्पिक डोसमुळे कोरोना व्हायरस विरूद्ध तीव्र प्रतिकारशक्ती निर्माण होते आहे. ङ्गलॅन्सेटफ या मेडिकल क्षेत्रातील जगप्रसिद्ध जर्नलच्या प्रिप्रिन्टमध्ये याचे निष्कर्ष 28 जून रोजी प्रसिद्ध झाले आहेत. सध्या कोरोना व्हायरसचे जे नवनवीन स्ट्रेन तयार होत आहेत त्यासाठी पुन्हा नवीन लसी तय्यार कराव्या लागतील काय किंवा तिसरा-चौथा बुस्टर डोस द्यावा लागतोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. अशा वेळी या प्रयोगाचा हा फायदा म्हणजे नवीन लस किंवा अधिक डोस देण्यापेक्षा दोन वेगवेगळ्या लसी दिल्या तर त्या नवनवीन स्ट्रेनवर फायदेशीर ठरतील. याचा भविष्यामध्ये फायदा भारतासहित, नेपाळ, ब्राझील, मेक्सिको आणि आफ्रिकन देशांना होण्याची शक्यता दिसून येत आहे.

भारतामध्ये सध्या ज्या तीन लसी लसीकरणासाठी उपलब्ध आहेत त्यामध्ये कोविशील्ड म्हणजेच ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका, कोवॅक्सीन (भारत बायोटेक) आणि काही प्रमाणात स्पुटनिक यांचा समावेश आहे. यामधील कोविशील्ड आणि स्पुटनिक या एकाच प्लॅटफॉर्मवरती किंवा तंत्रज्ञानावर आधारित असून कोवॅक्सीन मात्र संपूर्णतः वेगळी आहे आहे. त्यामुळे भारतामध्ये सुद्धा कोविशील्ड आणि कोवॅक्सीन किंवा कोवॅक्सीन आणि स्पुटनिक अशा प्रकारचे संयुग करता येईल. याचबरोबर कोविशील्ड आणि स्पुटनिक या दोन लसींमध्ये काही मूलभूत फरक असल्याने या दोन लसींचेही वेगेवेगळे डोस देता येतील.

डेल्टा प्लसमुळे तिसरी लाट येईल का?

भारतामध्ये सध्या तरी दुसरी लाट ओसरू लागली आहे. भारतामध्ये दुसरी लाट ही डेल्टा व्हॅरियंटमुळे आली पण तिसरी लाट ही डेल्टा प्लस व्हेरियंटमुळेच येईल हे नक्की नाही किंवा लसीकरण वेगाने झाले तर तिसरी लाट अतिशय सौम्य प्रकारची असेल. उदाहरणच द्याचे झाले तर इंग्लंडमध्ये पहिला डोस 75 टक्के लोकांना तर दुसरा डोस 50 टक्के लोकांना दिला आहे. मे महिन्यात दिवसाला फक्त 2000 नवीन रुग्ण आणि 30 ते 50 च्या दरम्यान मृत्यू नोंद केले जात होते. जूनपासून रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली; मात्र मृत्यूदर कमी होत गेला. 30 जून रोजी इंग्लंडमध्ये 20 हजार रुग्णसंख्या नोंदली गेली; मात्र मृत्यू फक्त 10 नोंदले गेले. तर संपूर्ण इंग्लंडमध्ये एक हजारच्या आसपास कोरोना संसर्गित रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. यावरून असे दिसून येते की, जरी नवीन व्हेरियंट आले तरी आत्ता आहेत त्याच लसी प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे भारतातील लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com