Father's Day : बाप बाप होता है!

Father's Day : बाप बाप होता है!

हल्ली सगळीकडेच या विषयवार लिहिले जाते. थोडासा गृहीत धरलेला बाप आता मात्र आवर्जून चर्चिला जातो. त्यामुळे या दिवसाच्या महतीसाठी शब्द तोकडे न पडले तर नवलच! कारण शेवटी ‘बाप बाप होता है’... 19 जून रोजी फादर्स डे जगभरात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने थोडेसे...

बाप नावाची अभिव्यक्ती अव्यक्त असली तरी ती प्रत्येक श्वासागणिक आपल्या आठवात आणि साठवात कायम असते. बापाचं आपल्या आयुष्यातील अस्तित्व खळखळत्या झर्‍यासारखं नसलं तरी भूगर्भातून उगम पावणार्‍या धारेसारखं असतं. अखंड, अविरत एक छत्र असतं. हे छत्र कधी दृश्य, कधी अदृश्य असतं. कधी अस्पष्ट तर कधी निरभ्र असतं. बाप हा प्रत्येक प्रॉब्लेमवरचं हमखास मिळणारं सोल्यूशन असतं. अगदी बालपणापासून तर आपण आईबाप झालो तरी आपला बापच आपला सोल्यूशन बॉक्स असतो.

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे. आता बापाच्या मायेत जास्तीचा ओलावा दाटलेला जाणवतो. आपल्या लेकरांसोबत बापही लेकरू होऊन जगताना दिसतो आणि कधीतरी कोपर्‍यात, एकांतात आपल्याच लेकराच्या काळजीपोटी मनातून गहिरवलेला बाप लेकरू झालेला आढळतो. अल्लड, अपरिपक्व, थोडासा बेपरवाह म्हटला जाणारा नवरा/पुरुष जेव्हा बाप होतो ना तेव्हा त्याला कधीही सांगावे लागत नाही की आता तू बाप झालास आणि जबाबदारीने वाग, तो आपसूकच जबाबदार झालेला असतो.

लेकरांवर स्वतःचे आयुष्य ओवाळून टाकणारा बाप स्वतःसाठी जगायला विसरलेला असतो. अर्थात चाकोरीबाहेरचे जगणे बापाला शक्य नसते असे नाही. तो क्षणभर जरी त्याच्या जबाबदार्‍या विसरला किंवा कुठे घसरला तर त्याच्या कुटुंबाची वाताहत होणार याचे भान तो ठेवून असतो. जो हे भान विसरला त्याच्या कुटुंबाची परवड ठरलेली असते. त्याच्यावर निर्भर असलेले कुटुंब समर्थपणे उज्वल भविष्याकडे नेण्याचे काम बाप चोखपणे करत असतो; तेही अगदी निमूटपणे.

म्हणूनच की काय ‘बाप बाप असतो’ संयमाचं गाठोडं घेऊन तो जगत असतो. त्याची माय गेल्यावर आतून एकाकी झालेला तरीही व्यक्त न होणारा आणि आपल्या मुलांची आई गेल्यावर मुलांसाठी झुरणारा बापही अनेकदा बघायला मिळतो. फक्त समाजव्यवस्थेने त्याला बाप नावाचे चिलखत घातले असल्याने त्याच्यातला हळवा माणूस दुर्लक्षित होऊन जातो. मुलाचे जोडे बापाच्या पायात यायला लागल्यावर स्वतःचा रेपलिका बघून आतूनच सुखावणारा बाप मूल चुकल्यावर त्याच जोड्याने मारायला कमी करत नाही. त्यामुळेच बापाची आदरयुक्त भीती आजही कुटुंबात शाश्वत आहे. बाप एक असे न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ केले जात नाहीत. म्हणूनच लेकरांच्या अनेक चुकांची नोंद बापापर्यंत पोहोचू न देणारी आई आपल्या मुलांना शिक्षेपासून वाचवत असते.

म्हणूनच एक वाक्य सतत ऐकिवात आहे की मुलांना बाप असावा. आई-बाप दोघे असावेतच. पण बाप नसलेल्या कुटुंबातील सदस्यांना विचारा की बापाचे अस्तित्व काय असते ते! बाप नावाची श्रीमंती मोजदादच्या पलीकडची आहे. ज्यांच्याकडे ही श्रीमंती आहे त्यांनी ती जपायला हवीय. ज्यांना स्वतःच्या पन्नाशीपर्यंत बाप पूरला ते खरोखर संपन्न, समृद्ध आहेत. ज्यांना बाप नावाची शिदोरी पुरली नाही त्यांच्या आयुष्यातील एक कोपरा कायम तसाच पोकळ आणि रिक्त राहिलेला असतो. तोही कोपरा कायमच अव्यक्त असतो.

- हेमलता पाटील, 9225613652

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com