Thursday, April 25, 2024
HomeUncategorized‘दिशा’ ठरवणार्‍या निवडणुका

‘दिशा’ ठरवणार्‍या निवडणुका

– जगदीश काळे

2019 च्या निवडणुकीत भाजपने 11 मोठ्या राज्यांत 75 टक्क्यांहून अधिक जागा जिंकल्या असल्या तरी तमिळनाडू, केरळ यासारख्या राज्यात एकही जागा मिळाली नव्हती. याच ठिकाणी विधानसभेचे मतदान होत आहे.

- Advertisement -

या राज्यातील निकालानंतर राष्ट्रीय राजकारणाची दिशा बदलू शकते. बिगर भाजप पक्षाची पिछेहाट झाली तर संसदेतील त्यांचा आवाज कमी राहू शकतो. चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश म्हणजेच भारतातील लोकसंख्येचा सुमारे पाचवा भाग हा येत्या दोन महिन्यात नवीन सरकारची निवड करणार आहे. राज्यात नवीन प्रतिनिधी, नवीन सरकार स्थापन होण्याबरोबरच राष्ट्रीय राजकारणावर देखील दूरगामी परिणाम होणार आहेत. विशेषत: केंद्रातील सत्तारुढ पक्ष आणि मोठे विरोधी पक्ष. चार राज्य आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि केरळ तर एक केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरी.

या राज्यांत 27 मार्चपासून निवडणूका सुरू होत असून दोन मे रोजी निकाल लागणार आहेत. या पाचही राज्याचे मिळून एकूण 116 खासदार लोकसभेत जातात. ही संख्या एकूण संख्येच्या पाचवा हिस्सा आहे. या राज्यातील 51 खासदार राज्यसभेत आहेत. हे प्रमाण एकूण खासदारांच्या 21 टक्के आहे. ते थेट राज्याच्या विधानसभेतून निवडले जातात. ही बाब राष्ट्रीय राजकारणासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जवळपास सात वर्षे देशावर राज्य केले आहे. हा पक्ष 2019 च्या लोकसभेला 56 टक्के जागा जिंकण्यात यशस्वी ठरली. अर्थात भाजपचे हे चित्र सर्वत्र नव्हते. 2019 मध्ये त्यांनी 11 मोठ्या राज्यात 75 टक्क्यांहून अधिक जागा जिंकल्या असल्या तरी तमिळनाडू, केरळसारख्या काही राज्यात एकही जागा जिंकू शकले नाही.

याच राज्यात आता निवडणूक होत आहे. भाजपने 2019 मध्ये बंगालमध्ये 43 टक्के जागा जिंकल्या. त्यापूर्वी या राज्यात भाजपने 5 टक्क्यांपेक्षा अधिक जागा कधीही जिंकल्या नव्हत्या. आता पहिल्यांदाच भाजप तेथे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने कधीही तीन राज्यात तमिळनाडू, केरळ आणि प. बंगाल येथे थेटपणे राज्य केले नाही. त्यामुळे ही निवडणूक भाजपच्या विस्तारासाठी मोलाची आहे. आसामदेखील भाजपसाठी महत्त्वाचे राज्य आहे. तेथे सत्तेत असण्याबरोबरच स्थानही बळकट केले आहे. मात्र एक वर्षापूर्वी तेथे राज्य सरकारला आंदोलनाचा सामना करावा लागला.

निवडणूक होणार्‍या राज्यांचे लोकसभेत प्रमाण 21 टक्के आहे. काँग्रेसने 2019 च्या निवडणुकीत 421 जागांवर निवडणूका लढवल्या. मात्र केवळ 52 जागाच हाती पडल्या. त्यापैकी निम्म्या जागा याच पाच ठिकाणाहून आहेत.

काँग्रेस आणि घटक पक्षाने देखील जिंकलेल्या 65 टक्के जागा या पाच राज्यातील आहेत. दुसरीकडे भाजप आणि घटक पक्षाने जिंकलेल्या जागांचे प्रमाण केवळ 8 टक्के आहे. लोकसभेत सर्वाधिक खासदार असलेले दोन पक्ष सोडून द्रमुक हा सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष आहे. हा पक्ष काँग्रेसचा घटक पक्ष आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँगे्रस असून ते दहा वर्षांपासून बंगालवर राज्य करत आहे. या दोन्ही पक्षाचे दोन्ही सभागृहातील खासदारांचे प्रमाण 8 टक्के आहे.

भाजपसाठी विजय महत्त्वाचा

चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशात मिळणारा विजय हा भाजपला पुढील टप्प्यातील राष्ट्रीय निवडणुका आणि अन्य राज्यात होणार्‍या निवडणुकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या निकालाच्या आधारे भाजपचा पाया आणखी घट्ट होऊ शकतो. एवढेच नाही तर राज्यसभेतील संख्याबळ ही वाढवण्यास मदत मिळेल. सध्या 40 टक्क्यांच्या जागांसह भाजप राज्यसभेत अल्पमतात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या