शुभेच्छा!

शुभेच्छा!

अपर्णा देवकर

31 डिसेंबर आणि एक जानेवारी या दोन दिवसांत फारसा फरक नसतो, असं म्हणणार्‍यांना ‘अरसिक’ मानलं जात असलं आणि नवं वर्ष म्हणजे केवळ भिंतीवरचं कॅलेंडर बदलणं नसून, त्याव्यतिरिक्त बरंच काही असतं हे खरं असलं तरी यावेळी मात्र अरसिकांचाच विजय झाला. ठिकठिकाणी सेलिब्रेशनला बंदी घातली गेली.

नववर्षाच्या स्वागतासाठी लोक दोन-तीन दिवस आधीच घराबाहेर पडले, वेगवेगळ्या पर्यटनस्थळी जाऊन विसावले, महागड्या हॉटेलांमध्ये अ‍ॅडव्हान्स भरला आणि मग सरकारकडून निरोप आला... ‘सेलिब्रेशन कॅन्सल!’ अनेकांना सक्तीनं अरसिक व्हावं लागलं. खरं तर एकतीस डिसेंबरच्या रात्री माणसं आणि फटाके या दोहोंमध्ये समान घटक भरलेला असतो- दारू!

फटाके फुटतात तशी माणसंही फुटतात रात्री बारा वाजता! यंदा या धिंगाण्याला मर्यादा आल्या आणि फुटणारे फटाके लांबूनच पाहण्यांची वेळ अनेकजणांवर आली. आता विषय राहिला नववर्षासाठी केल्या जाणार्‍या संकल्पांचा! एकतीस डिसेंबरच्या रात्री खाली ठेवलेला ग्लास पुन्हा उचलायचा नाही, असा निश्चय बरेचजण करतात आणि थोडे दिवस निग्रहानं पाळतातसुद्धा! यंदा संकल्प वगैरे करण्याच्या मूडमध्ये असलेली माणसं फार भेटली नाहीत. सेलिब्रेशनचा मूड मात्र जबरदस्त होता. बरेच दिवस कोंडून घातल्यानंतर स्वैरपणे वावरण्याची, मनाला येईल ते करण्याची इच्छा उत्पन्न होण्यात काही गैर नाही. परंतु सेलिब्रेशनची शाश्वती नाही म्हणून अनेकांचे संकल्पही बारगळले!

आम्ही संकल्प वगैरे (केले तरी टिकत नसल्यामुळं) कधीच करत नाही. दोन्ही पायांवर नीट उभे राहून नवीन वर्षात पदार्पण करणार्‍यांपैकी आम्ही असल्यामुळं न्यू इयर सेलिब्रेशनमध्येही आमचा काही उपयोग नसतो. (खरं तर आमचा सर्वांना अडथळा होतो; पण इतकं स्पष्ट कसं बोलायचं ना!) परंतु आम्हाला कुणी बोलवावं असंही आमचं म्हणणं नसतं. ज्या टीव्ही चॅनेलवर बर्‍यापैकी कार्यक्रम असतील, तो लावायचा आणि घरात बसल्या-बसल्या सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा पाठवायच्या, हा आमचा शिरस्ता.

यावर्षी शुभेच्छा काय द्यायच्या याबाबत आम्ही पहिल्यांदाच कन्फ्यूज झालो. सुरुवातीला ठरवलं, की कोरोनाचा नवा ङ्गस्ट्रेनफ वर्षभर तुमच्या आसपास फिरकू नये, अशा शुभेच्छा द्याव्यात. पण मग असा विचार केला, की मुळात जवळजवळ वर्षभर सगळेजण रोगट वातावरणात जगतायत. विषाणूची भीती तर सगळ्यांना आहेच; शिवाय अनेकांनी कामधंदे आणि उत्पन्नाची साधनं गमावली असल्यामुळं ते तणावग्रस्तही आहेत. शुभेच्छा म्हणून पुन्हा त्यांना रोगाबद्दलच वाचायला लावायचं हा घोर अन्याय ठरेल. मग 2020 हे वर्ष जसं कायम लक्षात राहील, तसं 2021 चं होऊ नये, अशा आशयाचा मजकूर टाइप करायला घेतला. पण नववर्ष चांगल्या दृष्टीनंही संस्मरणीय ठरू शकतं.

मग मोबाइलवर काहीतरी छानसं साहित्यिक वगैरे टाइप करायचा प्रयत्न केला. पण ते फारच दिवाळी अंकातल्यासारखं वाटू लागलं. अखेर मजकूर सापडला... “नव्या वर्षात कोरोनासह जीवनमरणाच्या कोणत्याही प्रश्नाचं राजकारण होऊ नये. विविध पक्षांच्या वाचाळ प्रवक्त्यांच्या जिभेला वळण लागावं आणि ते गुद्द्यांवरून मुद्द्यांवर यावेत. मुळात आपण संकटात आहोत, यावर सर्वपक्षीय एकमत व्हावं. केंद्र आणि राज्य अशा दोन्ही राज्यकर्त्यांना जनता ‘मायबाप सरकार’ म्हणते, हे नव्या वर्षात दोन्हीकडच्यांना समजावं याच शुभेच्छा!”

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com