इंग्लंडच्या संसदेत भारतीयांचे वाढते प्रतिनिधित्व

jalgaon-digital
7 Min Read

ग्रेट ब्रिटनमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि त्यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत 15 हून अधिक भारतीय हे ब्रिटीश संसदेत निवडून आले आहेत. आजवरची ही सर्वात मोठी संख्या आहे. जॉन्सन यांच्याविरोधात लढणारे कॉरिबीन यांच्या लेबर पक्षाने भारताच्या काश्मीरप्रश्नावर अनेक भारतविरोधी आणि पाकिस्तानच्या बाजूने विधाने केली होती. या पक्षाचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला आहे. 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ग्रेट ब्रिटनमध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि त्यांच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा मोठा विजय झाला आहे. ही भारतासाठी शुभवार्ता म्हणायला हवी. ब्रिटनच्या संसदेत कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाने 326 हा बहुमताचा आकडा पार केला. या पक्षाला 363 जागा मिळाल्या आहेत.

ब्रिटनच्या निवडणुकीमध्ये बोरीस जॉन्सन यांच्याबरोबर भारतीय वंशाचे 15 उमेदवार निवडून आले आहेत. नव्याने तीन भारतीय वंशाच्या सदस्यांनी प्रथमच संसदेत प्रवेश केला आहे. निवडून आलेल्या प्रमुख भारतीयांमध्ये माजी गृहमंत्री प्रीती पटेल यांनी सहजपणे विजय मिळवला असून नव्या मंत्रिमंडळामध्येही त्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आणि माजी मंत्री रिषी सुनकदेखील निवडणुकीत विजयी झाले आहेत, तर माजी आंतरराष्ट्रीय मंत्री आलोक शर्मा यांनीही आपली जागा राखली आहे. अन्य भारतीयांमध्ये ज्येष्ठ सदस्य वीरेंद्र शर्मा यांच्यासह शैलेश वारा, सुएला ब्रेवर्मन, नवेंद्रू मिश्रा, प्रीती कौर गिल, तन्मजीतसिंग धेसी, लिसा नंदी, सीमा मल्होत्रा, वलेरी वाझ यांचा समावेश आहे.

भारतीयांनी मजूर पक्षाला टाळले

ब्रिटनमधील या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील स्थानिक भारतीय मतदारांनी पारंपरिक मजूर पक्षाला मतदान केले नाही. मजूर पक्षाने काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाचे आवाहन करणारा ठराव मंजूर करून भारतविरोधी भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे काही पारंपरिक मतदारसंघात भारतीय वंशाच्या मतदारांनी त्यांना हिसका दाखवला. मजूर पक्षाचे अनेक बालेकिल्ले हुजूर पक्षाने हादरवले. त्यात उत्तर इंग्लंड, मिडलँडस व वेल्स या भागांचा समावेश आहे.

ब्रिटीश लोकसंख्येमध्ये स्थलांतरीतांचे प्रमाण वाढले असून त्याचे प्रतिबिंब तेथील संसदेतही दिसत आहे. निवडणुकीच्या प्रचारामध्ये पूर्वग्रह आणि वंशवाद यामुळे राजकीय पक्षांसमोर आव्हान निर्माण झाले होते. संसदेतील प्रत्येक 10 सदस्यांपैकी एक सदस्य वांशिक पार्श्वभूमी असल्याचे या निकालात दिसत आहे. तेथील लोकसंख्येमध्ये 12 टक्के नागरिक वांशिक आहेत.

निवडणूक प्रचार काळात जॉन्सन यांच्या विरोधात लढणारे कॉरिबीन यांच्या लेबर पक्षाने भारताच्या काश्मीर प्रश्नावर अनेक भारतविरोधी आणि पाकिस्तानच्या बाजूने विधाने केली होती. या पक्षाचा पराभव झाला. यापूर्वी ब्रिटनमधील दुसरा महत्त्वाचा पक्ष असलेल्या लेबर पार्टीने काश्मिरी, खलिस्तानी आणि पाकिस्तानी उग्रवाद्यांच्या मदतीने भारतीय वकिलातीवर लंडनमध्ये हल्ला केला होता. यामुळे ग्रेट ब्रिटनमधील पाकिस्तानी त्यांच्या बाजूने मतदान करतील, असे त्यांना वाटत होते. मतपेटीचे राजकारण युरोपातही पसरल्याचे हे मोठे उदाहरण होते. यामुळे ब्रिटनमधील भारतीयांना राग आला आणि सर्व भारतीय एकवटले. ब्रिटनमधील भारतीयांच्या सुमारे 100 वेगवेगळ्या संस्थांनी एकत्र येऊन लेबर पक्षाला पत्र लिहून त्यांचे धोरण बदलण्याची विनंती केली. यामुळे नक्कीच फरक पडला. निवडणुकीच्या सर्वात शेवटच्या काळामध्ये लेबर पक्षाने आपले भारतविरोधी धोरण बदलण्याचा निर्णय घेतला.

मात्र त्यांचे प्रतिस्पर्धी जॉन्सन हे अधिक हुशार होते. एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की, ब्रिटनमध्ये वेगवेगळ्या भागात भारतीय नागरिक विखुरलेले असले तरी त्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यांनी ब्रिटनच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान दिले आहे. म्हणूनच जॉन्सन यांनी इलेक्शनच्या वेळी स्वामी नारायण मंदिरामध्ये जाऊन आशीर्वाद घेतला होता. एवढेच नव्हे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख नरेंद्रभाई असा केला होता. त्याचबरोबर निवडून आल्यानंतर आपण भारताच्या दहशतवादविरोधी अभियानात सामील होण्याचे आश्वासनही दिले होेते. या सगळ्या घटनांमुळे निवडणुकांच्या निकालामध्ये खूप मोठा फरक पडला आणि लेबर पक्षाचा 1935 नंतरचा सर्वात मोठा पराभव झाला. ब्रिटीश संसदेत 15 हून अधिक भारतीय निवडून आले. इतक्या वर्षांतील ही सर्वात मोठी संख्या आहे. ब्रिटनच्या निवडणुकीतून युरोपिय देशांना एक संदेश मिळाला आहे की जे भारतीय युरोप, अमेरिका किंवा कॅनडामध्ये स्थायिक झाले आहेत ते त्या-त्या देशांच्या निवडणुकांमध्ये एक महत्त्वाचे घटक आहेत. ते जिथे राहतात तिथे त्यांनी त्या-त्या अशा भारतीयांची मते त्यांना हवी असतील तर त्या देशांची धोरणे भारताच्या बाजूने असली पाहिजेत. ती दहशतवादाचा पुरस्कार करणार्‍या पाकिस्तानच्या बाजूने नसावीत.

ब्रिटनमध्ये भारतीय हे विविध भागात पसरलेले आहेत. याउलट पाकिस्तानी हे एकाच जागी वसलेले आहेत. गेल्याच आठवड्यात ग्रेट ब्रिटनमध्ये झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यामध्ये उस्मान खान नावाचा दहशतवादी पकडला गेला. तो पाकिस्तानी नागरिक होता आणि त्याने पाकिस्तानमध्ये दहशतवादासाठीचे प्रशिक्षण घेतले होते. आता ब्रिटनमध्ये कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला बहुमत मिळाल्याने एक स्पष्ट संदेश इंग्लंड, युरोप, अमेरिका या देशांना मिळाला आहे.

भारताचे शत्रू चीन आणि पाकिस्तान हे परदेशात सातत्याने भारताविरुद्ध कारस्थाने करतात. 370 कलम हटवल्यानंतर भारतात काश्मिरी जनतेच्या मानवाधिकारांचे हनन होते आहे, असा दुष्प्रचार केला जात आहे. त्याशिवाय अनिवासी पाकिस्तानी नागरिकांनी इंग्लंडमध्ये भारतीय दूतावासावर 370 कलम हटवल्यानंतर हल्ला केला. कॅनडामधील काही कट्टरतावादी हे खालिस्तान रेफ्रंडंम 2020 ही चळवळ सुरू करीत आहेत.

म्हणूनच भारताची चीन, पाकिस्तानविरुद्ध चाललेली लढाई आता आपल्याला इतर देशांमध्येही लढावी लागेल. संयुक्त राष्ट्राप्रमाणे जगातील सर्व देशांना आपल्या बाजूने आणावे लागेल. ज्यामुळे हे देश भारताचे समर्थक होतील. 2020 मध्ये अमेरिकेतसुद्धा निवडणुका होऊ घातल्या आहेत. तेथील राजकारण आणि समाजकारणामध्ये भारतीयांचे योगदान प्रचंड आहे. गुगल कंपनीचे सर्वात मुख्य अधिकारी हे भारतीय  वंशाचे आहेत. येत्या काळात हे सर्व प्रगत देश भारताच्या बाजूने धोरणे प्रस्थापित करून पाकिस्तानविरुद्ध कारवाई करतील अशादृष्टीने रणनीती आखण्याची गरज आहे. थोडक्यात परदेशातील भारतीयांची सॉफ्ट पॉवर किंवा मृदू शक्ती या निवडणुकीमधून सर्व जगासमोर आली आहे. हे सर्व देश भारताच्या बाजूने धोरणे बनवून भारताशी व्यापार, सामरीक संबंध वाढवण्यास मदत करू शकतात. त्यासाठी वेगवेगळ्या देशातील भारतीयांनी स्वत:चा धमर्र्, जात, प्रदेश विसरून एक भारतीय म्हणून त्या-त्या देशात एकत्रित होण्याची गरज आहे.

अनिवासी भारतीय परदेशामध्ये भारत देशाचे प्रतिनिधी : अनिवासी भारतीय एकत्र येऊन विविध परदेशी राजकीय पक्षांवरसुद्धा दबाव टाकत आहेत. योगाभ्यासाचा प्रसार करणे, भारतात काय घडते आहे ते त्या-त्या देशांना समजावणे, भारत-अमेरिका यांच्यातील संबंध मजबूत झाले तर याचा अमेरिकन लोकांना कसा फायदा होईल हे त्यांना समजावणे अशा प्रकारची कामे केली जात आहेत. येत्या पाच वर्षांमध्ये जगातील अनिवासी भारतीयांचा वापर करून आपली सामरिक, आर्थिक, संरक्षण नीती अधिक मजबूत केली पाहिजे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *