Monday, April 29, 2024
HomeUncategorizedसंकटकाळातला ‘संधीशोध’

संकटकाळातला ‘संधीशोध’

– योगेश मिश्र, ज्येष्ठ पत्रकार

स्तंभलेखक आणि विश्लेषक कोरोनाच्या लशींचे नऊ उत्पादक अब्जाधीशांच्या यादीत नव्याने सामील झाले आहेत. त्यांच्या संपत्तीत 19.3 अब्ज डॉलरची भर पडली आहे. तत्पूर्वी या यादीत असलेल्या आठ अब्जाधीशांच्या संपत्तीत या काळात एकंदर 32.2 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

- Advertisement -

आपत्तीत संधी शोधल्याचाच परिणाम म्हणून एके काळी पाइप तयार करण्याचा कारखाना चालविणारे गौतम अदानी आशियातील दुसर्‍या क्रमांकाचे कुबेर बनले आहेत. स्थानिक पातळीवरही अनेकांनी कोरोनाच्या संकटात संधी शोधल्यामुळे सर्वसामान्यांचे मात्र दुसर्‍या लाटेत भयंकर हाल झाले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा लोकांना टाळ्या आणि थाळ्या वाजवायला सांगितल्या होत्या, तेव्हा त्यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात ‘संकटात संधी’ हा शब्दप्रयोग केला होता. हा शब्दप्रयोगसुद्धा कोविडने ज्याप्रमाणे ‘पॉझिटिव्ह’ शब्दाचा अर्थ गमावला, तसा आपला अर्थ गमावेल, हे त्यांना कुठे ठाऊक होते? ‘ऑप्टिमिस्टिक’ अर्थाने ‘पॉझिटिव्ह’ शब्द कुठे वापरला जातो? आपत्तीमध्ये संधीचा शोध केवळ राजकीय नेते आणि सरकारी नोकरशहांनीच घेतला असे नाही, तर समाजाच्या प्रत्येक स्तरात ही मानसिकता दिसते आहे. आमच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या मैत्रिणीच्या वडिलांना कोविड झाला आणि ते हे जग सोडून गेले. त्यांना केवळ दोन मुलीच होत्या.

खांदा देण्यासाठी दोन मुलांना त्या मुलींनी हजार-हजार रुपये देऊन आणले. अनेक लोक हे ‘काम’ करत होते आणि दिवसाकाठी पाच ते हजार रुपये कमाई करत होते. स्मशान घाटावरचा डोंबच पौरोहित्य करू लागला आहे. मंत्र म्हणण्याचा मोबदला त्याने वाढविला आहे. मोठमोठ्या गाड्यांमधून ऑक्सिजन सिलिंडर वाहून नेऊन ते विकले जात असल्याचे दृश्य सर्वत्र दिसले. महागड्या दराने ऑक्सिजन खरेदी केल्याच्या कहाण्या आमच्या अनेक परिचितांनी सांगितल्या. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळ्या बाजाराच्या कथाही अशाच ऐकायला मिळाल्या. अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने या इजेक्शनची रुग्णांना गरज नाही, असे जाहीर केले. औषधे, थर्मामीटर, ऑक्सीमीटर, स्टीमर आदी उपकरणांची कमतरता आणि काळा बाजार करूनही लोकांनी ‘आपत्तीत संधी’ शोधली.

बाबा रामदेव यांनी कोरोनावरील औषधाच्या नावाखाली आपले ‘कोरोनिल’ विकून अडीचशे कोटी रुपये कमावले. औषधाच्या लाँचिंगच्या वेळी देशाचे आरोग्यमंत्रीही उपस्थित होते. ऑक्सफॅमच्या ‘द पीपल्स व्हॅक्सिन अलायन्स’ या स्वयंसेवी संस्थेचे म्हणणे असे आहे की, कोरोनाच्या लशींचे नऊ उत्पादक अब्जाधीशांच्या यादीत नव्याने सामील झाले आहेत. त्यांच्या संपत्तीत 19.3 अब्ज डॉलरची भर पडली आहे. तत्पूर्वी या यादीत असलेल्या आठ अब्जाधीशांच्या संपत्तीत या काळात एकंदर 32.2 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. नव्या अब्जाधीशांच्या यादीत अमेरिकेतील मॉडर्ना फार्मास्युटिकल कंपनीचे स्टीफन बैन्सल आणि जर्मनीच्या बायोएन्टेकचे उगुर साहीन यांची नावे आहेत. चीनच्या कॅन्सीनो बायोलॉजिक्स या लस तयार करणार्‍या कंपनीचे तीन संचालकही अब्जाधीशांच्या नव्या यादीत आहेत. आपत्तीत संधी शोधल्याचाच परिणाम म्हणून एके काळी पाइप तयार करण्याचा कारखाना चालविणारे गौतम अदानी आशियातील दुसर्‍या क्रमांकाचे कुबेर बनले आहेत.

आपत्तीमध्ये संधी शोधण्याचे सकारात्मक उदाहरण न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांचे आहे. जगातील महान नेत्यांच्या यादीत त्या अग्रस्थानी आहेत. ‘फॉर्च्यून’ने असे प्रसिद्ध केले आहे की, कोरोना महामारीच्या काळात जेसिंडा यांनी ज्या प्रकारे आपले काम केले, ते अद्भुत आहे. त्यांनी केवळ विषाणूवर नियंत्रण मिळविले असे नाही तर आपल्या देशातून विषाणूचा पूर्ण निःपात केला. सुमारे 50 लाखांची लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंडमध्ये 2700 पेक्षाही कमी कोरोना रुग्ण आढळले आणि केवळ 26 मृत्यू झाले.

आपत्तीत संधी शोधूनच कोविशिल्ड लस तयार करणारे आदर पूनावाला आणि त्यांचे वडील भारत सोडून ब्रिटनमध्ये निघून गेले. आपल्या कंपनीचे शंभर कोटींपेक्षा अधिक रकमेचे शेअर विकले. संकटात संधी सोधण्याच्या वृत्तीचा परिणाम म्हणूनच लस तयार करण्याचे काम भारतातून कोरियात हलविले जात आहे. सॅमसंग बायोलॉजिक्स अँड सेलट्रियान उत्पादन सुविधा तसेच संशोधन आणि विकास केंद्र उभारण्यासाठी सुमारे पावणेदोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहेत. बायोमेडिकल उत्पादनांच्या बाबतीत हे जगातील क्रमांक एकचे हब बनविण्याचा या कंपन्यांचा विचार आहे.

सुरुवातीला लोकांना आरटी-पीसीआर चाचणीऐवजी अँटीजेन चाचणी करायला भाग पाडण्यात आले आणि एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी दर्शविली गेली तर दुसरीकडे सरकार खूप मोठ्या संख्येने चाचण्या करीत आहे, असे भासविण्यात आले. वस्तुतः अँटीजेन चाचण्या अचूक नसतात अशी सर्वसामान्य धारणा असतानासुद्धा हे केले गेले. एवढेच नव्हे तर दुसर्‍या लाटेत आरटी-पीसीआर चाचण्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, कारण कोरोनाची अनेक गंभीर लक्षणे दिसत असूनसुद्धा काही जणांची चाचणी निगेटिव्ह आली. यातून मार्ग शोधण्यासाठी जनतेने फुफ्फुसाचे सीटी-स्कॅन करून घेण्याकडे मोर्चा वळविला. त्यावेळी एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सीटी स्कॅन किती धोकादायक आहे, हे सांगायला सुरुवात केली. एक रुग्णालय दुसर्‍या रुग्णालयाचे चाचणी अहवाल मानायला तयार नाही. सर्व रुग्णालये आपापली स्वतंत्र चाचणी करवून घेत आहेत.

संकटात संधी शोधण्याच्या प्रवृत्तीचाच परिणाम म्हणून गुजरातेत 1 ते 10 मार्च या कालावधीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा सरकारी आकडा 4218 एवढा होता. प्रत्यक्षात राज्यात या कालावधीत 1 लाख 23 हजार मृत्यू प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. मृतांची आकडेवारी लपविण्यासाठी नोकरशहांना निर्देश दिले जाणे ही सामान्य बाब होय. ‘द गार्डियन’ या वृत्तपत्रात सरकारवर आपत्ती व्यवस्थापन योग्य न केल्याबद्दल टीका प्रसिद्ध केली गेली, तेव्हा ‘डेली गार्डियन’ वृत्तपत्रात सरकारचे कौतुक छापून आणण्यात आले. ‘द गार्डियन’ हे ब्रिटनमधील दैनिक असून, ‘डेली गार्डियन’ हे भाजपचे माजी मंत्री आणि पत्रकार एम. जे. अकबर यांनी स्थापन केलेल्या ‘संडे गार्डियन’ची दैनिक ई-आवृत्ती आहे. सध्या हे दैनिक ई-टीव्ही नेटवर्ककडे आहे. या ग्रुपचे मालक माजी काँग्रेस नेते विनोद शर्मा यांचे पुत्र कार्तिकेय शर्मा हे आहेत.

शरीरावर मातीचा लेप लावल्यामुळे कोरोना होणार नाही, असा दावा भाजपच्या अनेक नेत्यांनी केला. काही लोकांनी हवन करून संकटाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. काहीजण म्हणाले, की गौमूत्र प्यायल्याने कोरोना होणार नाही. महामारीच्या बाबतीत आपण किती ‘जबाबदार’ आहोत, हेच या घटनांवरून दिसून येते. 2020 मध्ये जेव्हा कोरोनाच्या लशीवर काम सुरू झाले, तेव्हा भारत सरकारने लशीच्या विकासासाठी गुंतवणूक केली नाही. लशीसाठी एकही ‘अ‍ॅडव्हान्स ऑर्डर’ दिली नाही. देशातील ज्या लोकांचे लसीकरण प्राधान्याने व्हायला हवे होते, त्यांचेही पूर्ण लसीकरण झालेले नसताना 18 वर्षांवरील तरुणांचे लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. दुसर्‍या लाटेने प्रचंड नुकसान केल्यानंतरही अजून लस आयात करण्यासाठी ऑर्डर दिली गेलेली नाही.

कोरोनाची पहिली लाट शांत होत असताना पुढील संभाव्य लाटेसाठी काहीच तयारी करण्यात आली नाही. तात्पुरती रुग्णालयेही हटविण्यात आली. वस्तुतः 2021 च्या सुरुवातीलाच दुसरी लाट येईल, अशी शक्यता असंख्य शास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती. आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि नोकरशहांनी गडबडीत, कोणताही शास्त्रीय आधार नसताना कोरोनावर विजय संपादन केल्याचा दावा केला. सरकारने पूर्ण अनलॉक केल्यामुळे सर्वकाही आलबेल असल्याचा संदेश गेला. त्यामुळे लोकही बेजबाबदार बनले.

दुसरी लाट जेव्हा सुनामी बनली तेव्हा लक्षात आले की, देशात ऑक्सिजनचाही पुरेसा साठा नाही आणि रेमसेडिवीरचासुद्धा! केंद्राने 2020 मध्ये मुक्तहस्ते ऑक्सिजनची निर्यात केली. एवढेच नव्हे तर जेव्हा दुसरी लाट शिगेला पोहोचली होती, तेव्हा आयसीएमआरने प्रयोगशाळांवर मोठा दबाव असल्याचे कारण सांगून रॅपिड अँटिजेन टेस्ट अधिक करण्यावर भर दिला. वस्तुतः ही चाचणी फारशी विश्वासार्ह नाही. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी कोणतीही तयारी केली गेली नाही. दुसर्‍या लाटेचे इशारे मिळूनसुद्धा कुंभमेळ्याचे आयोजन करण्यास अनुमती देण्यात आली.

पाच राज्यांत निवडणुका घेण्यात आल्या. पंतप्रधानांनी लोकांना सचेत करण्याऐवजी स्वतःच मोठमोठ्या प्रचारसभा घेतल्या. सरकारने तयार केलेल्या कोरोना नियमावलीत वारंवार बदल केले. 2020 मध्ये तयार केलेली नियमावली आता पूर्णपणे बदललेली आहे. कोरोनाच्या संदर्भातील आर्थिक मुद्द्यांवर सरकार सपशेल अपयशी ठरले.

अतिगरीब व्यक्तींना अन्नधान्य वितरित करण्याखेरीज अन्य गरजू लोक, संस्था, व्यापारी आदींना कोणतीही थेट मदत दिली गेली नाही. कोरोनाचा आजार आणि त्याच्याशी निगडीत अन्य पैलूंच्या बाबतीत सरकारने पारदर्शकता बिलकूल बाळगली नाही. केवळ सरकारचा बचाव करण्याकडेच लक्ष दिले गेले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोकांना माहिती देताना आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर, नीती आयोग, टास्क फोर्स आदींकडून वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या. ज्या चुका झाल्या, त्या स्वीकारल्या गेल्या नाहीत. यापुढे चुका होऊ नयेत, यासाठी काय करणार हेही सांगितले गेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या