सकारात्मकतेचा संकल्प
फिचर्स

सकारात्मकतेचा संकल्प

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

समजा, आजूबाजूला 70 टक्के नकारात्मकता आणि 30 टक्के सकारात्मकता असेल तर त्या 30 टक्क्यांसहित आनंदाने जीवन कसे जगायचे हे शिकायला हवे. नकारात्मकतेवर चर्चा करून वेळ वाया कशाला घालवायचा? 

 मेघा बुरकुले

वर्षाच्या शेवटाकडे आपण आलो की, आपण अगदी सहजरीत्या विचार करतो तो मागील घडलेल्या घटनांचा आणि त्यातून मिळालेल्या शिकवणीतून भविष्यात वाटचाल करण्याचा. 2019 तसे माझ्यासाठी लक्षात राहण्यासारखेच. वर्षाला सुरुवातच झाली होती. वर्ष कसे छान आपण आनंदाने घालवायचेे असे मनाशी पक्के केलेे होते.

25 जानेवारी, नेहमीप्रमाणे कपिल माझा नवरा, आयुषला सोडवायला शाळेत गेला आणि येताना मात्र बिबट्याने दिलेला भलामोठा प्रसाद घेऊन आला. झाले असे की, आमच्या सावरकरनगरमध्ये सकाळी सकाळी बिबट्याचे दर्शन झाले होते आणि कपिल त्या बिबट्याची बातमी कव्हर करायला गेला होता.

एकंदरीतच लोकांच्या आततायीपणामुळे बिथरलेल्या बिबट्याने कपिलवर हल्ला केला होता. त्याचे डोके बिबट्याच्या जबड्यात होते, झटापटीनंतर बिबट्याच्या तावडीतून कपिल सुटला, मात्र त्याच्या डोक्यावर 40 टाके होते. कपिलवर झालेल्या बिबट्याच्या हल्ल्याने मी काही क्षणांसाठी हादरून गेले होते. मात्र हल्ला झाल्यानंतरसुद्धा शांत असणार्‍या कपिलला बघितले आणि माझ्या मनातली भीतीच पळून गेली. पण अनेक रात्र त्या प्रसंगामुळे मला झोप आली नाही. असे काही प्रसंग आपल्यावर आल्यावर ते संयमाने, शांततेन सोडवणे आणि मनोबल खचून न जाता त्या प्रसंगाला तोंड देणे हे मात्र मी बिबट्याच्या हल्ल्यातून शिकले होते.

वर्षभरात अनेक आनंदी आणि दु:खी प्रसंग मी पाहिले. तसेे बघायला गेले तर प्रत्येकाचेच वर्ष अशाच प्रसंगांनी भरलेले असते. परंतु वर्षाच्या सरतेशेवटी मी विचार केला तेव्हा असे लक्षात आले की यावर्षी उत्साहाच्या आनंदाच्या कमी आणि मन हेलवणार्‍या, अस्वस्थ करणार्‍या बातम्याच अधिक ऐकल्या. सध्या माध्यमे इतकी वाढली आहेत की एखादी घटना घडली तर तिच्या नको इतक्या बातम्या, छायाचित्र सतत प्रसिद्ध होत असतात. अतिसंवेदनशील तपशीलदेखील सहज सार्वजनिक होतो आणि याचा विपरीत परिणाम म्हणजे सर्वत्र नकारात्मकता वाढत जाते. जर आपल्या अवतीभाोवती घडणार्‍या 70 टक्के घटना नकारात्मक आहेत तर 30 टक्के आनंदातून मी 100 टक्के आनंदी, उत्साही, सकारात्मक जीवन कसे जगायचे? आणि दुसर्‍यांना पण कसा आनंद द्यायचा? यावर उत्तर एकच आहे. समाज माध्यमांचा वाढता वापर कटाक्षाने कमी करायला हवा. ज्या गोष्टींमधून नकारात्मकता, नैराश्य येते त्या लगेच डोक्यातून, मनातून झटकून टाकायच्या. आवर्जून आपल्याला आनंद मिळेल त्या गोष्टी करायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचे संवाद वाढवायचा.

या साध्या गोष्टी मी प्रयत्नपूर्वक करायच्या ठरवल्या आहेत. कारण सरत्या वर्षाने मला शिकवले आहे की, येणारा काळ कदाचित संघर्षाचाच असणार आहे. पण मला मात्र डगमगून चालणार नाही. कारण आपण प्रचंड ऊर्जा असणारे मनुष्य प्राणी आहोत, कोणतीही घटना आपल्याला गिळंकृत करू शकत नाही. तेव्हा तुम्हीसुद्धा तुमच्यातील सकारात्मक स्रोत अखंड टिकवा आणि येणारेे प्रत्येक वर्ष आनंदाने जगा.

Deshdoot
www.deshdoot.com