श्रावणाचं आनंददान
फिचर्स

श्रावणाचं आनंददान

‘ऐकणं’ नि ‘श्रवण’ करणं यात फरक आहे. ‘श्रवण’ करण्यात एक मानसिक, भावनिक, वैचारिक जाणीव असते, ती फक्त ‘ऐकण्या’त नसते. म्हणून निसर्ग काय सांगतोय, ते ‘श्रवण’ करण्यासाठीचा सुयोग्य काळ म्हणजे श्रावणमास असेही म्हटले जाते. निसर्ग म्हणजे केवळ पाऊस, वारा, वृक्ष, डोंगर नव्हे तर आपण स्वत:ही. अनेक गोष्टी ज्या स्वत:च स्वत:ला सांगितलेल्या नसतात त्या व्यक्त करण्यासाठी असतो श्रावण. श्रावण हा जणूकाही सणासुदीचा, व्रतवैकल्यांचा, श्रवणभक्तीचा सोहळा बनून येतो आणि अर्थातच आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचं दान देऊन जातो. कोरोनामुळे यंदा श्रावणोत्सवाला काही बंधने आली असली तरी मनातील श्रावणसरी तशाच राहाव्यात हीच अपेक्षा...!

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

देशभरात अनेक ठिकाणी आणि त्यातही महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याचे महत्त्व खूप आहे. श्रावण महिना म्हटले की घरातील स्त्रियांची व मुलींची खूप धावपळ असते. सणासुदीला सुरुवात होते हे त्यामागचे एक प्रमुख कारण! त्यातही श्रावण हा श्रवणाचा महिना आहे. या महिन्यात देवाच्या कहाण्यांचे तसेच पोथ्यांचे वाचन करतात. या महिन्यात निरनिराळ्या पुस्तकांचे वाचन करून श्रावण महिन्यातील व्रतांची माहिती मिळवली जाते. श्रावण महिन्यात लोकसंस्कृती श्रावणसरीसोबत फुलून येते अन् या लोकसंस्कृतीतील कीर्तने, पोथ्या, जानपद गीतांमधून श्रवण भक्तीचे रंग उलगडू लागतात. ‘ऐकणं’ नि ‘श्रवण’ करणं यात फरक आहे. ‘श्रवण’ करण्यात एक मानसिक, भावनिक, वैचारिक जाणीव असते, ती फक्त ‘ऐकण्या’त नसते. म्हणून निसर्ग काय सांगतोय, ते ‘श्रवण’ करण्यासाठीचा सुयोग्य काळ म्हणजे श्रावणमास असेही म्हटले जाते. निसर्ग म्हणजे केवळ पाऊस, वारा, वृक्ष, डोंगर नव्हे तर आपण स्वत:ही. अनेक गोष्टी ज्या स्वत:च स्वत:ला सांगितलेल्या नसतात त्या व्यक्त करण्यासाठी असतो श्रावण. पण हासरा-नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा, श्रावण म्हणजे नेमकं काय? श्रावणाचं वर्णन बा. भ. बोरकर यांच्या शब्दांत करायचं झालं, तर पुढीलप्रमाणे करता येईल- ‘समुद्र बिलोरी ऐना... सृष्टीला पाचवा महिना...’ असं ज्याचं वर्णन केलंय तो श्रावण’! किती सुंदर वर्णन आहे हे! ‘पाचवा’ या शब्दाचे अर्थही अनेक. श्रावण हा बारा महिन्यांतला पाचवा महिना. त्यानं अवघी सृष्टी पाचूसारखी हिरवी करून टाकलेली... सर्जनशील मनाला मोहवणारा, श्रवणीय गोष्टी सांगणारा, धार्मिक गोष्टींनी युक्त असणारा, खादाडांना हवेसे वाटणारे उपास करायला लावणारा, खाऊच्या चर्चांना खमंग रसद पुरवणारा तो श्रावण... असंख्य निसर्गप्रेमींना पुन:पुन्हा खुणावणारा, आपल्या हिरव्या श्रीमंतीनं सगळ्यांचे डोळे निववणारा, पर्यावरणस्नेहाचं मोल अधोरेखित करणारा तो श्रावण... या आपल्या सर्वांच्या लाडक्या श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झालीय... त्या पार्श्वभूमीवर श्रावणाविषयी अधिक जाणून घेऊया!

श्रावण आणि श्रवण यांचा अनुबंध फार पुरातन आहे. श्रावण हा श्रवणभक्तीचा महिना होय. श्रावणात अनेक मंदिरांमध्ये कीर्तन सप्ताहांचे आयोजन केलेले असते. श्रावणी सोमवारी हमखास या शिवमंदिरांमधून कीर्तने होतात. श्रावणात वारकरी कीर्तन आणि हरदासी कीर्तन हमखास ऐकायला मिळाले इतकेच नव्हे तर पांडवप्रताप, शिवलीलामृत, नवनाथ, हरिविजय, जैमिनी अश्वमेध, काशीखंड आदी ग्रंथांचे वाचनही घरोघरी होते. या ग्रंथांच्या वाचनाला पोथी लावणे, पोथी सांगणे असे म्हणतात. एकेका ओवीचे वाचन करून त्या ओवीचा अर्थ एखादा कथेकरी बुवा सांगतो. हा अर्थ सांगताना तो प्रारंभी ‘हां मग काय झालं महाराजा’ अशी सुरवात करून पोथीतील कथेकडे सातत्याने श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतो. या पोथी वाचनात आणि पोथीच्या निरूपणात विशिष्ट प्रकारची लय असते. जसा कथेतील प्रसंग तशी ही लय कमी जास्त होते. थोडक्यात ही लय रसानुवर्ती असते. पोथीतील कथेत युद्धाचे वर्णन येते तेव्हा पोथी वाचणारा आणि निरूपण करणारा यांची लय द्रुत असते. युद्धाच्या वर्णनात अस्त्रांचा उल्लेख येतो तेव्हा निरूपण करणारा अतिशय द्रुतलयीत वर्णन करतो. श्रावणात विविध पोथ्यांच्या वाचनातून श्रवणभक्तीचे पुण्य साध्य केले जाते.

हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार श्रावण महिना हा पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा/सणांचा राजा म्हटले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू आणि जैन धर्मीयांची परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणार्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या महिन्यात अनेक सण येतात.

नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्रचलित आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या षष्ठीच्या दिवशी कल्की जयंती असते. नारळी पौर्णिमा हा सण हिंदू महिन्यांपैकी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी समुद्रकिनारी राहणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी मासेमारी करणारे महाराष्ट्रातले कोळी व समुद्राशी निगडित असलेल्या व्यवसायांतील इतर लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात. पावसाळ्यात बंद असलेले मासे पकडणे या दिवसापासून परत सुरू होते. ज्या कुटुंबात रोजच्या खाण्यात नारळ नसतो, त्याही मराठी घरांमधून या दिवशी नारळीभात, नारळाच्या वड्या यांसारखे नारळापासून बनलेले खाद्य पदार्थ बनवतात. याच दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते त्यावरून या पौर्णिमेला राखी पौर्णिमा असे म्हणतात. ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते, कारण या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू, शिव, सूर्यइत्यादी देवतांना अर्पण करतात व मग कुटुंबातील स्त्री-पुरुष ती पोवती हातात बांधतात. याच दिवशी श्रवण नक्षत्र असल्याने ब्राह्मण पुरुष उपाकर्म करून नवीन यज्ञोपवीत धारण करतात. या विधीला श्रावणी असे नाव आहे.

श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात, कारण या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानतात. या दिवशी भाविक स्त्रीपुरुष उपवास करतात व कृष्ण जन्माचा सोहळा करतात.

श्रावण वद्य नवमी या दिवशी बालगोपाल गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी करतात. श्रावण महिन्यातील अमावास्याही महत्त्वाची मानली जाते. पिठोरी अमावास्या असे तिचे नाव आहे. संततीच्या प्राप्तीसाठी सौभाग्यवती स्त्रिया पिठोरी व्रत करतात. याच दिवशी काही ठिकाणी शेतकरी पोळा साजरा करतात. हा सण बैलांसंबंधी असून, या दिवशी बैलांना शृंगारून त्यांची मिरवणूक काढतात.

कदाचित आपल्यातल्या अनेकजणांना ठाऊक नसेल, पण साधारणपणे 8 किंवा 11 आणि क्वचित 19 वर्षांनी ‘अधिक’ श्रावण येतो. त्या महिन्यात येणार्या शुक्ल किंवा वद्य या दोन्ही एकादश्यांना कमला एकादशी हे नाव आहे. उत्तर हिंदुस्थानात या एकादश्यांना अनुक्रमे पद्मिनी आणि परम एकादशी म्हणतात. विशेष म्हणजे ज्यावर्षी अधिक श्रावण असतो त्यावर्षी पाच महिन्यांचा चातुर्मास असतो.

श्रावण महिन्यात आठवड्याच्या प्रत्येक वारालाही विशेषत्व प्राप्त झाले आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहण्याची रीत अनेक कुटुंबात पिढ्यानुपिढ्या सांभाळली जाते आहे. अनेक कुटुंबात नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात. पहिली पाच वर्षे मंगळागौर केल्यानंतर, नंतरच्या एखाद्या वर्षी उद्यापन करतात. त्यावेळी आपल्या आईला वाण म्हणून सोन्याचा नाग देण्याचीही पद्धत आहे. बुधवारी बुधाची, गुरुवारी बृहस्पती पूजा केली जाते. शुक्रवारी जिवती देवीचे पूजन, पुरणाच्या दिव्यांनी अपत्यांना ओवाळणे आणि हळदी-कुंकू करण्याचीही प्रथा आहे. शनिवारी ब्रह्मचारी किंवा ब्राह्मण यांचे पूजन अनेक घरांमध्ये केले जाते. रविवारी आदित्य राणूबाई पूजन करण्याची प्रथा आहे.

श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करण्याची पद्धती प्रचलित झाली आहे असे दिसून येते. तसेच श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ महिना मानला जात असल्याने कित्येक धनिक लोक प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत ब्राह्मणांना व गोरगरिबांना भोजन देतात. देवस्थानांतही या महिन्यात कथापुराणादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उत्तर भारतात विशेषतः बिहारमधील वैजनाथ या ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या शिवमंदिरात गंगेचे पाणी कावडीतून वाहून नेऊन शिवपिंडीला अभिषेक करण्याची परंपरा आहे. उत्तर भारतात जवळपास सर्व प्रांतात या महिन्यात झुलन यात्रा, रक्षाबंधन, जन्माष्टमी व नंदोत्सव हे उत्सव विशेष महत्त्वाचे मानतात. झुलन जत्रा हा दोलोत्सव आहे.

श्रावणातल्या पौर्णिमेच्या दिवशी राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देतात व स्त्रिया त्यांच्यासंबंधी गीते गातात. हा उत्सव एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत चालतो. कृष्ण जन्माच्या दुसर्या दिवशी नंदोत्सव करतात. नंदाला पुत्र झाला असे समजून या दिवशी हळदी-कुंकू मिसळलेले पाणी पिचकारीने उडवतात आणि जणू आनंदोत्सव साजरा करतात. अशा रितीने श्रावण हा जणूकाही सणासुदीचा, व्रतवैकल्यांचा, श्रवणभक्तीचा सोहळा बनून येतो आणि अर्थातच आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचं दान देऊन जातो. कोरोनामुळे यंदा श्रावणोत्सवाला काही बंधने आली असली तरी मनातील श्रावणसरी तशाच राहाव्यात हीच अपेक्षा...!

विधिषा देशपांडे

Deshdoot
www.deshdoot.com