वृक्षवल्ली आम्हा सोयरी…
फिचर्स

वृक्षवल्ली आम्हा सोयरी…

Balvant Gaikwad

माणसाने स्वार्थ्यासाठी पृथ्वी अक्षरश: ओरबाडली. विकासासाठी झाडांची कत्तल केली. तापमान वाढले. दुष्काळ, अतिवृष्टीने मानवी अस्तित्व धोक्यात आले. म्हणून वृक्ष लागवड केली पाहिजे. अभिनेते सयाजी शिंदे यांचे वृक्ष संमेलन हाच संदेश देते.

– आरती देशपांडे

साहित्य संमेलन, कृषी संमेलन, नाट्य संमेलन, पक्षी संंमेलन, बाल संमेलन… अशी विविध संमेलने आजवर पार पडली. या प्रत्येक संमेलनात लोकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. अशा संमेलनांमधून विविध संदेश दिले जातात. कोणी तरी या संमेलनांचे अध्यक्षपद भूषवते. रंगारंग कार्यक्रमांचे आयोजन होते. अशी संमेलने नवी नाहीत. पण वृक्ष संमेलन? याबद्दल तुम्ही कधी ऐकलेय का?

वृक्षांचेही संमेलन भरू शकते, यावर पटकन विश्वास ठेवता येत नाही. पण अभिनेते सयाजी शिंदे यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. वृक्षराजीवर मनापासून प्रेम करणार्‍या सयाजी शिंदेंच्या संकल्पनेतून बीडमध्ये दोन दिवसीय वृक्ष संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

विशेष म्हणजे या संमेलनाचे अध्यक्षपद कोणत्याही व्यक्तीला नाही तर वडाच्या झाडाला देण्यात आले. वडाच्या झाडाच्या अध्यक्षतेखाली पार पडणारे हे संमेलन अनोखे ठरले. या संमेलनाच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन, वृक्ष लागवडीचे महत्त्व याबाबत निर्माण होणारी जागरुकता महत्त्वाची ठरली. बीडमधला पालवणचा डोंगर एकेकाळी उजाड बनून गेला होता. हा उघडाबोडका डोंगर बघून अनेक निसर्गप्रेमींची मने व्याकूळ होत असत. सयाजी शिंदेही अशाच निसर्गप्रेमींपैकी एक. आज या डोंगरावर नंदनवन फुलले आहे. हा परिसर हिरवाईने नटून गेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने दिलेल्या दोनशे हेक्टर परिसरात सयाजी शिंदे यांच्या पुढाकाराने ‘सह्याद्री देवराई’ हा वृक्षलागवडीचा प्रकल्प राबवण्यात आला. या भागात जवळपास 60 प्रजातींची 2 लाख 90 हजार 317 झाडे लावण्यात आली. हाच हिरवागार परिसर वृक्ष संमेलनानिमित्त गजबजून गेला. बीडमध्ये आयोजित करण्यात आलेले हे जगातले पहिलेच वृक्ष संमेलन.

त्यामुळे या संमेलनाबाबत प्रचंड कुतूहल निर्माण झाले होते. सयाजी शिंदे यांनी ‘येऊन येऊन येणार कोण, झाडांशिवाय आहेच कोण’ अशा कल्पक घोषवाक्यांनी तरुणांना या प्रकल्पाकडे आकर्षित केले, वृक्ष लागवडीबाबत जागरुक केले. मग अनेक हात सयाशी शिंदेंसोबत जोडले गेले. या असंख्या हातांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि या वैराण डोंगरात जणू नवचेतना निर्माण झाली. आज अवघी पृथ्वी हवामानबदलाचे परिणाम भोगत आहे. पृथ्वीचे वाढत चाललेले तापमान हिमनद्या वितळवत आहे. या वितळलेल्या हिमनद्यांचे पाणी समुद्राला जाऊन मिळत असल्यामुळे समुद्राची पातळी वाढू लागली आहे. येत्या काळात काही शहरेच नाही तर देशही समुद्राच्या पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ असे सांगणारी आपली संस्कृती.

वड, पिंपळासारख्या झाडांना आपल्याकडे धार्मिक महत्त्व आहे. या झाडांची पूजा केली जाते. वडासारखी झाडे म्हणजे ऑक्सिजनचा चिरंतन स्रोत. वडाचे झाड असेल तर कोणत्याही हवा शुद्धीकरण यंत्राची गरजच भासणार नाही. पण विकास, भौतिक सुखांच्या नावाखाली माणूस निसर्गाचा र्‍हास करत आहे. वृक्षतोडीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. निसर्ग संवर्धनासाठी प्रयत्न करणार्‍या, या बेसुमार वृक्षतोडीला विरोध करणार्‍या, प्राणी-पक्ष्यांचे अधिवास टिकून राहावेत यासाठी झटणार्‍या पर्यावरणप्रेमींची टिंगलटवाळी केली जाते. त्यांच्या प्रयत्नांना खुजे ठरवले जाते.

मुंबईतही आरे परिसरात मेट्रोच्या कारशेडसाठी वृक्षांची कत्तल करण्यात आली. इमारती उभारण्यासाठी, पूल बांधण्यासाठी झाडांचा बळी दिला गेला. अशा कृत्यांमुळे हिरवागार भासणारा परिसर अचानक भकास, उदास वाटू लागतो. वृक्षांची हिरवाई नेत्रांनाही सुखद अनुभव देते. पृथ्वीवर माणसाचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर वृक्षांचे अस्तित्व टिकवून ठेवायला हवे. वृक्षच नसतील तर आपल्याला प्राणवायू मिळणार नाही. मग हा प्राणवायू मिळवण्यासाठी आपल्याला मास्क घालून फिरावे लागेल. आपल्या भविष्यातल्या पिढ्यांना ‘सुजलाम् सुफलाम्’ भूमी मिळावी यासाठी आतापासून प्रयत्न होणे गरजेचे आहे. आज जगभरातल्या बर्‍याच देेशांमध्ये नैसर्गिक आपत्तींनी डोके वर काढले आहे.

अवर्षण, अतिवृष्टी, पूर हे सगळे हवामान बदलाचेच परिणाम आहेत. वृक्षतोड झाल्यामुळे दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागते. पुरामुळे उद्भवणार्‍या भयानक परिस्थितीचा जगाने सतत अनुभव घेतला. ऑस्ट्रेलिया तसेच युरोपमधल्या देशांनीही उन्हाचे चटके सोसले. अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदवण्यात आले. उन्हाळ्यातले तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

अनेक ठिकाणी पारा पन्नाशी ओलांडतोय. पावसाचे चक्र बदलत चालले आहे. यंदा तर दिवाळीपर्यंत पाऊस कोसळत होता. थंडीही उशिरानेच पडली. निसर्गाचे हे बदलते चक्र आपल्या अस्तित्वालाच आव्हान देत आहे. वृक्षतोडीमुळे वैराण झालेली ही धरित्री पुन्हा एकदा हिरवाईने नटावी. अशी संमेलने गावोगावी, जागोजागी व्हावीत आणि झाडांनी मायेची सावली आपल्या सर्वांवर अशीच धरावी, हीच अपेक्षा यानिमित्ताने करता येईल.

Deshdoot
www.deshdoot.com