Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedतेच मोठे आव्हान होते…

तेच मोठे आव्हान होते…

डॉ. श्रीराम लागू म्हणजे रंगभूमीवरचे नटसम्राट! …आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटात डॉ. लागूंची भूमिका करशील का? असा निखिल सानेंचा दूरध्वनी आला आणि मी जागीच उडालो. मी ती भूमिका साकारली त्यावेळची भावनाच वेगळी होती.

– सुमित राघवन

- Advertisement -

कळायला लागल्यापासून मी डॉक्टरांची जवळपास सगळी नाटकं पाहिली आहेत. यातल्या ‘प्रेमाची गोष्ट’साठी मला विचारण्यात आले होते. प्रसाद ओक त्यावेळी त्यात काम करायचा. पण तेव्हा मला व्यावसायिक नाटकात काम करायचे नव्हते आणि

‘प्रेमाची गोष्ट’ हे व्यावसायिक नाटक असल्यामुळे मी त्यात काम करायला नकार दिला आणि डॉक्टरांसोबत काम करण्याच्या एका चांगल्या अनुभवाला मी मुकलो. त्यात निळूभाऊ आणि डॉ. लागू असे दोन दिग्गज कलाकार काम करायचे. ‘बालगंधर्व’ या चित्रपटाच्या प्रीमियरला श्रीरामजी आले होते. हा चित्रपट बघून त्यांनी माझे खूप कौतुक केले. यानंतर कधीही भेटल्यावर ते मला नारायणरावच म्हणायचे.

‘कट्यार काळजात घुसली’चा मुहूर्तही डॉक्टरांनी केला होता. आम्ही त्यांना ‘कट्यार…’च्या मुहूर्तासाठी येण्याचा आग्रह केला होता. ते आले आणि मुहूर्ताची क्लॅपही दिली. डॉक्टरांच्या हस्ते मुहूर्त झाल्यामुळे मोलाचा आशीर्वादच आम्हाला आणि ‘कट्यार…’ला मिळाला. त्यानंतर सातत्याने जमेल तेव्हा आणि जमेल तसा मी फक्त गप्पा मारायला डॉक्टरांकडे जात असे.

‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटात मी डॉ. लागूंची व्यक्तिरेखा साकारली. डॉ. लागूंची भूमिका करायला मिळणे हे मी माझे भाग्यच समजतो. या चित्रपटात डॉ. लागूंची भूमिका करणार का, अशी विचारणा करणारा फोन मला निखिल सानेंनी केला होता. या चित्रपटात डॉ. लागूंची भूमिका करायला आवडेल का, असे विचारल्यावर मी जागेवरच उडालो.  डॉक्टरांची भूमिका करायला मला नक्कीच आवडेल, असे मी त्यांना सांगितले. डॉ. लागू म्हणजे मराठी रंगभूमीचा खरा नटसम्राट आणि त्यांची भूमिका करायला मिळणे, मला त्यांचे व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकारायचे आहे, ही भावनाच खूप वेगळी होती. या भावनेचे वर्णन शब्दांमध्ये करता येणार नाही. डॉ. लागूंसमोर त्यांचीच भूमिका करायला मिळणे याच्यापेक्षा दुसरे कोणतेही मोठे आव्हान एका नटासाठी असू शकत नाही! डॉ. लागू किंवा त्यांच्या निकटवर्तीयांना हा चित्रपट बघितल्यानंतर तो काळ आठवला पाहिजे, हाच विचार तेव्हा माझ्या मनात होता. यात मी डॉक्टरांच्या तरुपणातला अभिनेता साकारला होता. पण तेव्हा डॉ. लागूंचे वय 92 वर्षे होते. आमची पिढी त्यांना गेल्या 20 ते 25 वर्षांपासून बघत आली आहे. म्हणजेच त्यांच्या वयाच्या सत्तरीपासून आम्ही त्यांना बघत आलो. या चित्रपटातला काळ त्यांच्या उमेदीचा म्हणजे त्यांच्या चाळिशीतला आहे. तेव्हाचे डॉक्टर आम्हाला कोणालाच माहीत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावरील पुस्तक वाचून, त्यांचे चित्रपट बघून त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

त्यांची शेवटची भेट मला आठवते. जगभरातले दर्जेदार इंग्रजी चित्रपट माझ्याकडे होते. मी त्यांना हे सगळे चित्रपट एका हार्ड ड्राईव्हमध्ये संकलित करून दिले होते. शेवटी शेवटी त्यांना विस्मरणाचा त्रास व्हायला लागला होता. काही मिनिटांपूर्वीचे त्यांच्या लक्षात राहायचे नाही. नटसम्राट, सूर्य पाहिलेला माणूस अशा नाटकांमधले पल्लेदार आणि दीर्घ संवाद अगदी लिलया म्हणणार्‍या डॉक्टरांना काही मिनिटांपूर्वीचे आठवत नाही हे बघून खूप त्रास व्हायचा. ‘सूर्य पाहिलेला

माणूस’मध्ये त्यांचे 35 मिनिटांचे स्वगत होते. इतकी मोठी, प्रचंड लांबीची स्वगतं आपल्या अभिनयाने उचलून घेणारा हा अभिनेता आणि आता त्याला पंधरा मिनिटांपूर्वी बोललेले आठवत नाही, हा विचारच मनाला खूप अस्वस्थ करून गेला. आता मात्र फक्त आठवणी उरल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या