फिचर्स

जनता जागरुक होईल का ?

Balvant Gaikwad

कोणतेही पुस्तक वाचायचे ठरवले तरी त्यासाठी पोटात अन्न हवे आणि शांतपणे बसून वाचण्यासाठी छोटेसे का होईना पण घर हवे. हे दोन्ही मिळवण्यासाठी नोकरी हवी. ती कशी मिळणार हा प्रश्न तरुणाईला पडला आहे. त्याची उत्तरे देण्यापेक्षा पुस्तकावरून सर्वच पक्षांनी राजकारण करणे हा जनतेचा विश्वासघात आहे. 

 राजेंद्र पाटील 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करू पाहणार्‍या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरून सर्वत्र संतप्त पडसाद उमटल्यानंतर लेखक जय भगवान गोयल यांनी ते पुस्तक मागे घेतले आहे. मात्र त्यावरून राज्याच्या राजकीय पटलावरचा वाद, एकमेकांच्या उखाळ्या, आरोप-प्रत्यारोप हे बघता राजकारण किती खालच्या पातळीला गेले आहे याचा प्रत्यय जनतेला येतो आहे.

देशात महागाईचा भडका उडाला आहे. अर्थव्यवस्था गाळात चालली आहे. जगभर विशेषत: पश्चिम आशियात ताणतणाव सुरू आहे. कच्च्या तेलाच्या किमती आणखी भडकल्या तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी दाट शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. त्यातच अमेरिका आणि इराणचे ताणलेले संबंध यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. अशावेळी अशाप्रकारचे वाद निर्माण करून जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा व तसे आचरणही करायला हवे.

या पुस्तकावरून शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी या ढोंगी प्रकाराचा खुल्या दिलाने निषेध केला पाहिजे, अशी मागणी केली. तर या पुस्तकावरून काही जण जाणीवपूर्वक वाद निर्माण करत आहेत, असे भाजपचे नेते सांगत आहेत. मात्र तरीही वाद संपत नाही म्हणून अखेर भाजप नेत्यांनी ‘या पुस्तकाशी भाजपचा काही संबंध नाही’, असे सांगत वादावर पडदा टाकला. मात्र त्याचवेळी या पुस्तकावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर पलटवार करताना शरद पवार यांना ‘जाणता राजा’ ही पदवी का दिली जाते? असा सवाल केला.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे अभिमानाचा विषय तर आहेच, पण सोबतच हा विषय भावनिकदृष्ट्याही संवेदनशील आहे. शिवाजी महाराजांच्या उल्लेखावरून घडलेले वाद महाराष्ट्राला नवे नव्हेत. जेम्स लेन प्रकरणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा परिणाम झाला हे सर्वांनी पाहिले. महाराष्ट्राचे आणि मराठी भाषिकांच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहिले जाते. स्वराज्याचे संस्थापक म्हणून तर आहेच पण आजही अनेक राजकीय, सामरिक, प्रशासकीय, व्यवस्थापन, सामाजिक धोरणांचे उद्गाते म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात सगळ्याच विचारधारांशी जवळचे राहिले आहेत. आजच्या महाराष्ट्राच्या समाजकारणावर, निवडणुकींच्या राजकारणावर शिवाजी महाराजांचा सर्वाधिक प्रभाव आहे. परिणामी त्यांच्याशी संबंधित न पटलेल्या उल्लेखांमुळे महाराष्ट्रात भावनिक आंदोलने होतात हा इतिहास आहे.

शिवाजी महाराज आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष, कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणारे राजे होते. ते एक युगपुरुष होते. त्यांच्या कारभाराचा आदर्श ठेवायला हवा.देशात झपाट्याने वाढणारी बेकारी, महागलेले शिक्षण, आरोग्य समस्येविषयी अनास्था, महागाईचा वाढलेला उच्चांक आणि दुसरीकडे पूर्वेकडील देशांचे कच्च्या तेलावरील निर्बंध, इराण व अमेरिकेतील ताणलेले संबंध यावर उपाय शोधण्यापेक्षा पुस्तकावरून राजकारण करणे हा जनतेचा विश्वासघात आहे.

देशातील मूळ समस्या, प्रश्न यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी जनतेला वेठीला धरले जात आहे का? याच्यावर तातडीने उपाययोजना करायला हवी. केवळ याच नव्हे तर कोणत्या पुस्तकात काय लिहिले आहे, ते वाचायला पोटात अन्न हवे आणि कसलाही आधार न घेता लिहिलेले पुस्तक वाचायला घर हवे. या दोन्ही गोष्टी मिळण्यासाठी नोकरी हवी. ती टिकवण्यासाठी देशात पोषक वातावरण हवे. मंदीवर कठोर उपाययोजना करायला हव्या आहेत. पण वास्तव मात्र वेगळे आहे.

दररोज अशा नवनवीन पुस्तकांचे प्रकाशन होईल आणि साप साप म्हणत जनता भुई धोपटतच राहील. त्याने कोणाचेच भले होणार नाही. मोर्चे, आंदोलने झालीच पाहिजेत, पण त्यातून कुणाचे इस्पित साध्य होत आहे हे तपासायला पाहिजे. अन्यथा राज्यकर्ते ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ दाखवायला बसलेच आहेत. म्हणून नागरिकांनी सावध व्हायला हवे. ते आता तरी सावध होतील अशी आशा करू या!

Deshdoot
www.deshdoot.com