सरकारचे बस्तान बसले !
फिचर्स

सरकारचे बस्तान बसले !

Balvant Gaikwad

महाविकास आघाडीच्या सरकारचे बस्तान बसले आहे. पहिल्या शंभर दिवसांचा कार्यकाल पूर्ण करण्याकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच कदाचित विरोधकांना ‘चलो दिल्ली’ असा नारा द्यावासा वाटला असेल.
किशोर आपटे, 9869397255

यासरकारचे सध्या काय चालले आहे? असा प्रश्न अनेक जण विचारतात. सरकार सध्या 2020-21 या आर्थिक वर्षाची तयारी करत आहे. ‘शिवभोजन’ला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. किमान समान कार्यक्रम ठरविताना शिवसेनेच्या वचननाम्यात कर्जमाफी, भोजन आणि 1 रुपयात आरोग्य सुविधा या तीन मुख्य गोष्टी होत्या. त्यातील दोन तर दोन महिन्यांत मार्गी लागल्या आहेत.

तिसरीदेखील या अर्थसंकल्पात तरतूद करून मार्गी लागणार आहे, असे सांगण्यात येत आहे.
पर्यावरण-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे पर्यावरण, प्लास्टिकमुक्ती आणि अन्य विषयांवर काम सुरू केले आहे. मुंबईत नाईट लाईफबाबत मागच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाची मर्यादीत स्वरूपात अंमलबजावणी करण्यात ते यशस्वी झाले आहेत. हा निर्णय घेण्यासाठी आवश्यक कायदेशीर व्यवस्था मागच्या सरकारने केली होती, तरी प्रत्यक्षात निर्णय रखडला होता, तो आता केवळ मंत्र्याच्या व्यक्तिगत हितासाठी मार्गी लावण्यात आला, असा आरोप होताना दिसत आहे. या आरोपाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, होय, कष्टकरी मुंबईकर माझे निकटवर्तीय आहेत. त्यांच्यासाठीच आम्ही हा निर्णय घेत आहोत. असे असले तरी सध्या काही मिल कम्पाऊंड आणि मॉलपुरताच हा निर्णय राबविला जात आहे.

दुसरीकडे दहा रुपयांत भोजन देणार्‍या योजनेचा विस्तार करत त्यात लोकसहभाग घेऊन अधिक लाभार्थींना दोन वेळचे अन्न देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दररोज एक लाख लोकांना दहा रुपयांत जेवण देण्यासाठी अन्नदाते, देणगीदार आणि सेवाभावी व्यक्ती आणि संस्था यांना त्यात सहभागी करून घेत आहेत. त्यामुळे ही योजना भविष्यात लोकसहभागातून राबविलेला सरकारी उपक्रम होणार आहे. दुसरी योजना शेतकरी कर्जमाफीची तिची जबाबदारी आधी जयंत पाटील आणि आता अजित पवार यांच्यावर आहे. दादांचा स्वभाव करारी आहे, ते उगाच काहीतरी करण्यात विश्वास ठेवत नाहीत, असे म्हणतात. त्यामुळे येत्या काळात ही योजना शेतकर्‍यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल, यासाठी त्यांनी आर्थिक नियोजन सुरू केले आहे. मागील काळात बँकाकडे देण्यात आलेली माहितीदेखील या कामी उपयोगात येत आहे. या योजनेवर राष्ट्रवादीकडे असलेल्या विभागातून काम होताना दिसत आहे.

तिसरा निर्णय राज्यात मोफत किंवा नाममात्र दरात आरोग्य सुविधा देण्याचा त्यावर राष्ट्रवादीचे मंत्री राजेश टोपे काम करताना दिसत आहेत. सध्या त्यांनी करोना व्हायरससारख्या मुद्यावर भर दिला असला तरी राज्यात प्रत्येक तालुक्यात महात्मा फुले जीवनदायी योजना पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शिवसेनेच्या वचननाम्यातील या तिसर्‍या महत्त्वाच्या कामासाठी राष्ट्रवादीचे मंत्री जोमात कामाला लागले आहेत. तिकडे मुंबईतील शिवतीर्थाजवळ असलेल्या चैत्यभूमी जवळच्या इंदू मिल परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे विशाल स्मृतीस्थळ 2022च्या मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी तयार करायचे, असा चंग समाजकल्याण या राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्याच्या मंत्र्यांनी बांधला आहे. या खात्याचे मंत्री धनंजय मुंडे शरद पवार यांच्या मार्गदर्शनात काम करत आहेत.

भाजप आणि शिवेसना यांची दोस्ती संपल्याने शिवसेनेसोबत येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आपला मुंबईत गेल्या अनेक वर्षांत न झालेला राजकीय विकास साधून घेणार आहे. वंचित बहुजनकडे गेलेला प्रबुद्ध दलित समाज सोबत आणणे राष्ट्रवादीचा हा राजकीय अजेंडा आहे, असे जाणकार सांगत आहेत. राष्ट्रवादीला ते कितपत पदरात पाडून घेता येईल, ते कळेलच. मात्र सध्या मुंबई महापालिकेत तीन विरुद्ध भाजप एकटा पडू नये म्हणून मनसेनेला सोबत घेण्याचा भाजपचादेखील प्रयत्न सुरू आहे. हे शरद पवार यांनी हेरले असून वंचित बहुजनला शह देऊन ते या भाजपच्या पहारेकर्‍यांना उत्तर देणार आहेत, असे दिसते.

मुंबईच्या नाईट लाईफमध्ये गुंतलेल्या शिवसेनेला आता थोडे उशीरा का होईना भविष्यातील राजकारणाचे भान आले असावे म्हणूनच की काय सामनातून ‘धमाका’ मुलाखती सुरू झाल्या आहेत. प्रत्यक्षात मुंबई महापालिकेत यावेळी शिवसेनेसाठी खर्‍या अर्थाने अस्तित्वाची लढाई फाईट फॉर (पॉलिटिकल)लाईफ असणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com