Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedकधी सावरणार मनोरंजन क्षेत्र ?

कधी सावरणार मनोरंजन क्षेत्र ?

देशात कोरोना विषाणूने शिरकाव केल्यानंतर टाळेबंदी लागू करण्यात आली. सगळे व्यवहार ठप्प झाले. गर्दीची ठिकाणं ओस पडली. चित्रपटगृहं बंद झाली. चित्रपट, मालिकांची चित्रिकरणं थांबली. प्रसारित होणार्या मालिकांचे भाग संपल्यानंतर विविध वाहिन्यांनी मालिकांचे जुने भाग दाखवायला सुरूवात केली. जवळपास तीन महिन्यांच्या बंदीवासानंतर आता चित्रपट, मालिकांचे सेट पुन्हा गजबजू लागले आहेत. लाईट, कॅमेरा, ऍक्शन हे शब्द घुमू लागले आहेत. चित्रिकरणाला सुरूवात होत असली तरी गेल्या तीन महिन्यांमध्ये देशातल्या मनोरंजनक्षेत्राचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. चित्रपटगृहांना टाळं लागल्यामुळे थिएटर तसंच मल्टिप्लेक्स मालकांचं जवळपास 4500 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यातच देेशात चित्रिकरण करायचं असल्यास बर्याच नियम व अटींचं पालन करावं लागणार आहे. सेटवरही मोजक्या लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असल्यामुळे अनेकांच्या नोकर्‍याही धोक्यात आल्या आहेत. या सगळ्या नुकसानाची भरपाई होण्यासाठी दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लागणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यातच काही मालिकांच्या सेटवर कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे खळबळ माजली. यामुळे बॉलिवूड तसंच टीव्ही जगतासाठी ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी परिस्थिती आहे. हे सगळं नुकसान भरून काढण्यासाठी चित्रपट उद्योगाला किमान दोन वर्षं लागतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

एका वर्षात भारतात साधारण 1200 चित्रपट बनतात. एकल पडदा चित्रपटगृहं तसंच मल्टीप्लेक्सना दर महिन्याला तिकिटविक्रीतून जवळपास 1000 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळतं तर खाद्यपदार्थ, पेयं यांच्या विक्रीतून तब्बल 500 कोटी रुपये मिळतात. म्हणजे चित्रपटगृहं दर महिन्याला 1500 कोटी रुपयांचा व्यवसाय करतात. मात्र टाळेबंदीनंतर चित्रपटगृहं बंदच असल्यामुळे या क्षेत्राला मोठं नुकसान सोसावं लागत आहे. त्यातच इथल्या कर्मचार्‍यांच्या नोकर्‍यांचा प्रश्नही आहेच. अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात चित्रपटगृहं सुरू झाली नाहीत. दुसर्या टप्प्यातही चित्रपटगृह मालकांच्या पदरी निराशाच पडली. मात्र ऑगस्ट, सप्टेंबरपासून चित्रपटगृहं सुरू करण्यास परवानगी मिळेल, अशी अपेक्षा आहे. तिकडे ‘सूर्यवंशी’ आणि ‘83’ सारख्या बिगबजेट आणि बहुचर्चित चित्रपटांच्या प्रदर्शनाची घोषणा झाली आहे. ‘सूर्यवंशी’ दिवाळीत तर ‘83’ यंदा ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, चित्रपटगृहं सुरू करायला परवानगी मिळाली तरी सुरूवातीचा काही काळ सर्व आसनं भरण्याची परवानगी मिळणार नाही. तसंच प्रेक्षकांच्या मनातही धास्ती असेल. त्यामुळे छोटे चित्रपट प्रदर्शित केले जातील. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आणि चित्रपटगृहं पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी मिळाल्यानंतर मोठे चित्रपट प्रदर्शित केले जातील. तोपर्यंत चित्रपटगृहमालकांना नुकसान झेलावं लागणार आहे.

- Advertisement -

आज देशभरातल्या मल्टीप्लेक्सनी दोन लाखांपेक्षा अधिक रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. मल्टीप्लेक्सच्या माध्यमातून सिनेजगताला तब्बल 60 टक्के महसूल मिळतो. यावरूनच मल्टीप्लेक्सचं महत्त्व लक्षात यावं. अनलॉकच्या दुसर्‍या टप्प्यात चित्रपटगृहं, मल्टीप्लेक्सना परवानगी न मिळाल्याने मल्टीप्लेक्स संघटनेनेही नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने दुकानं, बाजारपेठांसारखं असंघटित क्षेत्र खुलं करायला परवानगी दिली आहे. अशा ठिकाणी सामाजिक दुरावा, स्वच्छता, निर्जंतुकीकरणासारख्या नियमांचं काटेकोरपणे पालन होत नाही. मात्र मल्टीप्लेक्स, चित्रपटगृहं हे संघटित क्षेत्र असल्याने इथे सर्व नियम आणि अटींचं नीट पालन होऊ शकतं. इथे सामाजिक अंतर राखणं, निर्जंतुकीकरणासारख्या उपाययोजना करता येऊ शकतात. कोरोनाकाळात नियमांचं पालन कसं करायला हवं, सामाजिक अंतर राखताना कोणती खबरदारी घ्यावी, गर्दीवर नियंत्रण कसं ठेवावं याचं मल्टीप्लेक्स एक उदाहरण ठरू शकतं, असं संघटनेने म्हटलं आहे. चित्रपट उद्योगांच्या दृष्टीने मल्टीप्लेक्सचं महत्त्व वादातीत आहे. मल्टीप्लेक्सला परवानगी मिळाली नाही तर हा उद्योगच धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे मल्टीप्लेक्स सुरू करण्याला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी होते आहे.

अधिकृत टाळेबंदी लागू होण्याआधीच चित्रपटगृहं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतरच्या अडीच ते तीन महिन्यांमध्ये देशातल्या चित्रपट उद्योगाला तब्बल 2500 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावं लागलं. यात हिंदी चित्रपटांचा वाटा 40 ते 50 टक्के होता. चित्रपटगृहं पुढेही बंद राहणार असल्यामुळे हे नुकसान पाच हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतं. चित्रपटगृहं बंद असल्यामुळे अनेक निर्मात्यांनी आपले चित्रपट ओटीटी व्यासपीठांवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. यात ‘सडक 2’, ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’सारख्या मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. अनेक चित्रपटांचं ओटीटी व्यासपीठांवर प्रदर्शित होणं मल्टीप्लेक्ससाठी धोकादायक ठरत आहे. मात्र सगळेच चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार नाहीत. ‘संदीप और पिंकी फरार, ‘छलांग’, ‘सूरज पर मंगल भारी’सह रणबीर कपूरचा ‘शेरशाह’ तसंच परिणिती चोप्राचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हे चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकतात. जॉन अब्राहमच्या ‘मुंबई सागा’चं 10 ते 15 दिवसांचं चित्रिकरण पूर्ण व्हायचं असल्यामुळे हा चित्रपटही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाऊ शकतो. त्यातच सलमान खानचा ‘राधे’, आमीर खानचा ‘लालसिंह चढ्ढा’ हे चित्रपटही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतील, असं या क्षेत्रातले जाणकार सांगत आहेत.

दरम्यान, चित्रपटगृहं सुरू झाली तरी गर्दीवर नियंत्रण राखणं, प्रत्येक खेळानंतर निर्जंतुकीकरण करणं, प्रेक्षकांना सॅनिटायझर देणं, त्यांचं तापमान तपासणं अशा सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होणार आहे. चित्रपटांचे सेट्सही सॅनिटाईज करावे लागणार असल्याने निर्मितीसंस्थांचा खर्चही चांगलाच वाढणार आहे. या सगळ्यांचा ताळमेळ बसवण्याचं आव्हान मनोरंजन क्षेत्रापुढे आहे. तिकडे टीव्ही जगतालााही मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. मालिकांच्या चित्रिकरणाला सुरूवात होत असली तरी सगळी दक्षता घ्यावी लागणार आहे. सेटवरची गर्दी कमी करण्यासाठी बर्‍याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. बहुसंख्य मालिकांची चित्रिकरणं मुंबईतल्या चित्रनगरीत पार पडतात. त्यातच चित्रिकरणादरम्यान सेटवर 33 टक्के लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी असल्यामुळे अनेक तंत्रज्ञ, मेक अप आर्टिस्ट, ज्युनिअर आर्टिस्ट्सवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. हिंदी मालिकांच्या सेटवर कलाकार, तंत्रज्ञ तसंच इतर लोक मिळून दीडशे ते 200 लोक असतात, मराठी मालिकांच्या सेटवरही एका वेळी साधारण 100 लोक उपस्थित असतात. अपुर्‍या मनुष्यबळासह मालिकेचं चित्रिकरण कसं करायचं हा प्रश्नही उपस्थित होत आहे. मानधनात कपात करण्याची वेळ आली आहे.

देशभरातला टीव्ही उद्योग जवळपास 80 हजार कोटी रुपयांचा आहे. लॉकडाउन काळात टीव्हीच्या प्रेक्षकसंख्येत वाढ झाली असली तरी यामुळे टीव्हीजगताला फारसा लाभ झालेला नाही. क्रीडा वाहिन्यांनी जुने सामने दाखवले. क्रीडा स्पर्धांना आता कुठे सुरूवात होत असल्यामुळे जाहिरातींच्या माध्यमातून महसूल मिळायला वेळ लागणार आहे. क्रीडा वाहिन्यांना जाहिरातींद्वारे मिळणार्‍या महसुलात 85 ते 90 टक्क्यांची घट झाल्याचा अंदाज आहे. निकाल आधीच माहीत असणारे सामने बघायला प्रेक्षक फारसे उत्सुक नसल्यामुळे टीआरपीमध्येही मोठी घट झाल्याचं दिसून आलं. या सगळ्या आर्थिक नुकसानामुळे काही वाहिन्या बंद करण्याचीही वेळ आली. कोरोना विषाणू, टाळेबंदीमुळे मनोरंजन विश्व पुरतं भरडलं गेलं आहे.

मधुरा कुलकर्णी

- Advertisment -

ताज्या बातम्या