Thursday, April 25, 2024
Homeसंपादकीयबिबट्यासोबत जगताना

बिबट्यासोबत जगताना

वन्यजीव आक्रमक होत असल्याची व मानवावर हल्ला करीत असल्याच्या बातम्या वाढल्या आहेत. त्या संदर्भातील उपाय आणि घ्यावयाची खबरदारीची चर्चा वेग धरत आहे. सरकारी पातळीवरही विचारविनिमय सुरू आहे. 

सुनील लिमये

- Advertisement -

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक ठिकाणी वन्यजीव आक्रमक होत असल्याची आणि त्यांच्याकडून मानवावर हल्ला होत असल्याच्या बातम्या वाढल्यानंतर या संदर्भातले उपाय आणि घ्यावयाची खबरदारी याची चर्चा वेग धरू लागली. या निमित्ताने सरकारी पातळीवर आणि इतर माध्यमांतून विचारविनिमय सुरू झाला. वन्यजीव आणि मनुष्य यांच्यामधला संघर्षाला अनेक पदर आहेत. हा संघर्ष पूर्वीदेखील होता. मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये त्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. हा संघर्ष निर्माण होण्यामागे आणि चिघळण्यामागे असलेली कारणे जाणून उपाय शोधण्याचा प्रयत्न केला तर काही मुद्यांवर तरी तोडगा निघण्याची आशा आपण करू शकतो.

बिबट्या आपल्या परिसरात दिसला तर गोंधळ करून, आरडाओरडा करून काहीच उपयोग नसतो. गर्दी न करता संबंधित ठिकाणावरुन सगळे निघून गेले तर बिबट्याही आपणहून निघून जातो. गर्दी दिसली तर मात्र तो चेकाळून हल्ला करू शकतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत अनेक मोठमोठ्या सोसायट्या आहेत. तिथला एकेक फ्लॅट कोटींच्या घरातल्या किमतीचा आहे. हे फ्लॅट विकताना बिल्डर लोकांनी अतिशय आकर्षक जाहिराती केल्या होत्या.

‘बाल्कनीमध्ये बसा आणि बिबट्या बघा’ अशा स्वरुपाच्या त्या जाहिराती भुरळ पाडून ग्राहकांना घरखरेदीस उद्युक्त करण्यासाठी विक्रीकौशल्याचा भाग म्हणून उत्तम होत्या, पण एखाद्या दिवशी बिबट्या खरेच घराच्या बाल्कनीत आला तर काय करायचे, हे कोणी सांगितले नव्हते! म्हणूनच सर्वप्रथम आम्ही अशा उच्चभ्रू सोसायट्यांमधल्या रहिवाशांना खबरदारीच्या सूचना दिल्या. अंधार पडल्यानंतर इमारतीच्या परिसरात प्रखर उजेड देणारे दिवे लावा, मुलांना संध्याकाळी खेळायला बाहेर जाऊ देऊ नका, असे सांगितले. आम्ही असे सांगितले की त्यांची नाराजी स्पष्ट दिसायची. मग आम्ही त्यांच्यापुढे दोन पर्याय ठेवायचो. एक तर घर बदला अथवा बिबट्याबरोबर रहायला शिका! बिबट्याची बाहेर पडण्याची वेळ संध्याकाळ हीच असल्यामुळे त्यावेळी मुलांना बाहेर न सोडणे, इमारतीच्या भिंतीवर 12 ते 15 फूट जाळी बसवणे आदी उपायांनी आपण बिबट्यांपासून निर्माण होणारा धोका टाळू शकतो हे आम्ही त्यांना समजावू लागलो.

मी उदाहरणादाखल संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातली स्थिती सांगितली. कुठल्याही अडचणीच्या प्रसंगी 100 नंबरवर फोन करणे ही लोकांची सवय असते. त्यानुसार एखाद्या ठिकाणी बिबट्या दिसला तर आधी या क्रमांकावर फोन केला जात असे. ही बाब लक्षात घेऊन आम्ही काही पोलीस अधिकार्‍यांना विनंती केली आणि असे फोन आल्यावर तत्काळ आम्हाला कळवा तसेच संबंधित ठिकाणी जाऊन आधी गर्दी हटवा, अशी विनंती आम्ही पोलीस विभागाला केली. या कामी आम्हाला खात्याकडून खूप चांगली मदत मिळाली. एकंदर अशी नेमकी आणि नेटकी यंत्रणा प्रस्थापित झाल्यामुळे आता मानवी वस्तीत बिबट्याचा वावर असल्यास नागरिकांकडून लगेच आमच्याशी संपर्क साधला जातो आणि तातडीने पुढील कारवाई झाल्यामुळे दुर्घटना टळते. असा फोन आल्यानंतर आमचे लोक ताबडतोब तिथे पोहोचतात. मग आम्ही बिबट्याला पकडण्यासाठी जाळ्या लावतो. पण त्याआधी त्याला पळून जाण्याची संधी दिली जाते.

जंगलाच्या आजूबाजूच्या वस्तीत शिरलेला बिबट्या अशी संधी मिळताच पुन्हा जंगलाच्या दिशेने धाव घेतो. त्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत. मात्र लपलेल्या ठिकाणाहून बाहेर येत नसेल तर त्याला भुलीचे इंजेक्शन दिले जाते. नंतर त्यावर उपचार करून निसर्गात सोडले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या