Thursday, April 25, 2024
HomeUncategorized‘तेजस’ का गरजेचे?

‘तेजस’ का गरजेचे?

प्रा. विजया पंडित

एकाच वेळी मोठ्या संख्येने तेजस विमाने खरेदी करण्याचा निर्णय हा दूरगामी परिणाम करणारा आहे. भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्राचा पाया रचणारा हा सौदा आहे. क्षेपणास्त्र डागून जहाजांना लक्ष्य करण्याची क्षमता तेजसमध्ये आहे. ते एक मल्टीरोल लाइट एअरक्राफ्ट आहे.

- Advertisement -

टेहळणी, अधिक्षेप (इंटरसेप्टिंग) याबरोबरच हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे तेजसवरून डागली जाऊ शकतात. तेजस विमानामुळे पाकिस्तानची बेचैनी वाढणे स्वाभाविक आहे. कारण बालाकोटसारख्या एअर स्ट्राइकच्या वेळी तेजसचा वापर होऊ शकतो. पाकिस्तानचे थंडर विमान अद्याप मिराजचा मुकाबला करू शकलेले नाही. त्यामुळे क्षमतांच्या बाबतीत तेजसच्या जवळपासही ते फिरकू शकत नाही.

भारतीय वायुसेनेने आणि भारत सरकारने अनेक वर्षे सुरू असलेल्या चर्चेनंतर एचएएल म्हणजे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून 83 स्वदेशी तेजस मार्क-1 ए ही हलकी लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय अखेर घेतलाच. हवेत असतानाच इंधन भरण्याची सुविधा, इस्राएलमधील तंत्रज्ञानाने समृद्ध रडार, बियाँड व्हिज्युअल रेंज मिसाइल यांसह अनेक अत्याधुनिक शस्त्रप्रणालींची सुविधा असलेले तेजसचे हे नवे रूप रशियाकडून मिळालेल्या सुखोई लढाऊ विमानांपेक्षा खूपच चांगले आहे. नव्या शस्त्र प्रणालींमुळे नवीन तेजस विमाने सुखोईपेक्षा महागसुद्धा आहेत. दोन महिन्यांनी म्हणजे मार्चमध्ये होत असलेल्या करारानंतर तीन वर्षांनी म्हणजे 2024 पासून ही विमाने वायुसेनेला मिळण्यास सुरुवात होईल.

45 हजार कोटींपेक्षा अधिक रकमेचा हा संरक्षण करार म्हणजे कोणत्याही स्वदेशी कंपनीला मिळालेले आजवरचे सर्वांत मोठे कंत्राट आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने तेजस विमाने खरेदी करण्याचे दूरगामी फायदे मिळतील. भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्राचा पाया रचणारा हा सौदा ठरणार आहे. भारत सरकारचा दबाव असो किंवा पाकिस्तान आणि चीनकडून असलेला युद्धाचा दुहेरी धोका असो, यामुळे वायुसेनेला झटपट निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. या गुंतवणुकीमुळे एचएएल व्यतिरिक्त देशातील कमीत कमी 500 अन्य कंपन्यांना थेट लाभ मिळेल.

सर्वांत मोठा फायदा असा की, संरक्षण उत्पादनाला पोषक वातावरण देशात निर्माण होईल. अशा वातावरणाची आज खूपच गरज आहे. डिझाइन आणि अन्य तांत्रिक बाबींमध्ये भारतीय तंत्रज्ञ आघाडीवर आहेत. ज्यावेळी कार आणि स्कूटरचेही डिझाइन भारतात केले जात नव्हते, तेव्हा भारतात लढाऊ विमानाचे डिझाइन तयार करण्यात आले होते. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्बंधांसमवेत अनेक गोष्टींमुळे आपली या क्षेत्रात पीछेहाट झाली. आज गरज आहे ती केवळ राजकीय इच्छाशक्ती, प्रोत्साहन आणि गुंतवणूक वाढविण्याची. तसेच संशोधनावरील खर्चही वाढणे अपेक्षित आहे. कोरोना महामारीच्या काळात लस तयार करणे आणि त्याचे उत्पादन करण्यापासून पीपीई किट, व्हेन्टिलेटर बनविण्यापर्यंत सर्व क्षेत्रांत भारताने आपल्या क्षमता जगाला दाखवून दिल्या आहेत.

अंतरिक्ष, क्षेपणास्त्र तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्येही भारत आज जगातील कोणत्याही देशाला टक्कर देण्याच्या स्थितीत आहे. सरकारने जर ठरविले तर काहीच अशक्य नाही. आपली वायुसेना ही जगातील चौथ्या अथवा पाचव्या क्रमांकाची मोठी आणि सुसज्ज वायुसेना आहे. परंतु राफेल, सुखोई, मिराज यांसह अधिकांश लढाऊ विमाने आणि शस्त्रास्त्रे आयात केलेली आहेत. हीच सर्वांत मोठी चिंता आहे. कारण युद्धाच्या वेळी शस्त्रास्त्रांच्या बरोबरीने आपल्याला या विमानांच्या सुट्या भागांची आणि दुरुस्तीचीही चिंता करावी लागते. युद्धकाळात जर पुरवठादार देशाने हात वर केले किंवा शत्रुसेनेने सुट्या भागांचा मार्ग रोखला तर ते धोकादायक ठरू शकते.

या बाबतीत भारतापेक्षा पाकिस्तान चांगल्या स्थितीत दिसून येतो. पाकिस्तानात चीनच्या मदतीने गेल्या दहा वर्षांपासून जेएफ-17 लढाऊ विमाने तयार करण्यात येत आहेत. त्यासाठी रशियाही मदत करीत आहे. या विमानांची इंजिन पाकिस्तानला रशियाकडून मिळत आहेत. पाकिस्तान आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज जेएफ-17 ब्लॉक 2 आणि ब्लॉक 3 विमानांच्या उत्पादनाविषयी नियोजन करीत आहे. ही विमाने राफेलला टक्कर देणारी असतील.

जबरदस्त क्षमता आणि शस्त्रास्त्रांनी युक्त असलेली ही विमाने म्हणजे भारतीय वायुसेनेसाठी धोक्याची घंटाच आहे. 1983 मध्ये रशियन मिग विमानांना पर्याय म्हणून तेजस ही हलकी लढाऊ विमाने ताफ्यात आणण्याची योजना भारताने तयार केली. तेजसचा पहिला प्रोटोटाइप 2001 मध्ये यशस्वीरीत्या आकाशात झेपावला होता. परंतु पहिली तेजस स्क्वाड्रन वायुसेनेच्या ताफ्यात 2016 मध्येच समाविष्ट झाली. याचे श्रेय तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिले पाहिजे. भविष्यातील आव्हाने ओळखून स्वदेशी विमानांची निर्मिती करण्याच्या निर्धारावर ते ठाम होते. जर 2001 मध्येच सरकारने आणि वायुसेनेने असे केले असते तर आज आपल्याकडे 150 स्वदेशी लढाऊ विमाने तर दिसली असतीच; शिवाय ती तयार करणे, त्यांची देखभाल, उड्डाण आणि ती आणखी विकसित करण्याचा प्रदीर्घ अनुभव आज आपल्याकडे असता. अर्थात, इतिहासाला दोष देण्याइतका वेळ आपल्याकडे आजमितीस नाही. गेल्या दोन-तीन दशकांमधील चुकींची पुनरावृत्ती होऊ नये, एवढेच आपल्याला आता पाहायचे आहे. भारताने तेजसचे उत्पादन उशिरा सुरू केले असले तरी आता या प्रक्रियेला आपला प्राधान्यक्रम असला पाहिजे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड तेजस मार्क टू विमान तयार करण्यात गुंतली आहे. हे पाचव्या पिढीचे लढाऊ विमान असेल. हे विमान सुखोई, मिराज 2000 या विमानांपेक्षा कितीतरी उन्नत असेल आणि राफेललाही टक्कर देऊ शकेल.

तेजस मार्क 1-ए हे विमान पाकिस्तानच्या जेएफ-17 थंडर विमानापेक्षा चांगले आहे का? थंडर विमान पाकिस्तानात चीनच्या मदतीने तयार केले जाते. या थंडरला थोपविण्याची क्षमता तेजस मार्क 1-ए मध्ये आहे का? असे प्रश्न वायुसेनाप्रमुख आर. के. एस. भदौरिया यांना नुकतेच विचारण्यात आले. उत्तरादाखल भदौरियांनी एवढेच सांगितले की, एलसीए तेजस हे विमानच थंडर विमानांना गारद करण्यास पुरेसे ठरते. अशा स्थितीत तेजस मार्क 1-ए विमानाच्या ताकदीविषयी बोलणेही योग्य ठरणार नाही. कारण त्याच्यासमोर थंडर विमानाचा कुठल्याही बाबतीत टिकाव लागू शकत नाही. क्षेपणास्त्र डागून जहाजांना लक्ष्य करण्याची क्षमता तेजसमध्ये आहे. ते एक मल्टीरोल लाइट एअरक्राफ्ट आहे. टेहळणी, अधिक्षेप (इंटरसेप्टिंग) याबरोबरच हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे तेजसवरून डागली जाऊ शकतात. पाकिस्तानच्या जेएफ-17 मध्ये ही सर्व वैशिष्ट्ये आहेत; परंतु त्याचे वजन खूपच जास्त आहे. त्यामुळे तेजस या विमानाला सहज लक्ष्य बनवू शकते. याखेरीज तेजसमध्ये जॅमर प्रोटेक्शन तंत्रज्ञान आहे. शत्रूच्या सीमेजवळ संदेशवहन बंद होऊ नये, हा त्यामागील हेतू आहे.

तेजस 42 टक्के कार्बन फायबर, 43 टक्के अ‍ॅल्युमिनियम अ‍ॅलॉय आणि टायटेनियम या धातूंचा वापर करून तयार झाले आहे. इतर लढाऊ जेट विमानांपेक्षा तेजसचे हे एक अनोखे वेगळेपण आहे. हे विमान 5300 किलोपर्यंत पेलोड एकाच वेळी वाहून नेऊ शकते. पाकिस्तानी जेएफ-17 थंडर विमान केवळ 4300 किलो पेलोड वाहून नेऊ शकते. जेएफ-17 विमानाची इंधन क्षमता 2330 किलो असून, बाह्य टाकीतून 2400 किलो अतिरिक्त इंधन ते सोबत नेऊ शकते. तेजसची इंधन क्षमता 2458 किलो असून, 3725 किलो अतिरिक्त इंधन ते वाहून नेऊ शकते.

तेजस विमानामुळे पाकिस्तानची बेचैनी वाढणे स्वाभाविक आहे. कारण बालाकोटसारख्या एअर स्ट्राइकच्या वेळी तेजसचा वापर होऊ शकतो. क्षेपणास्त्रांच्या बाबतीत बालाकोटच्या वेळी वापरल्या गेलेल्या मिराज विमानांपेक्षा हे विमान खूपच प्रभावी ठरते. पाकिस्तानचे थंडर विमान अद्याप मिराजचा मुकाबला करू शकलेले नाही. त्यामुळे क्षमतांच्या बाबतीत तेजसच्या जवळपासही ते फिरकू शकत नाही. भारतीय वायुसेनेला आता 83 अतिरिक्त तेजस लढाऊ विमाने मिळणार असल्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. एवढेच नव्हे तर भारत आगामी काळात तेजस 2 ही विमानेही विकसित करणार आहे. तेजस 1-ए च्या तुलनेत ते अधिक आधुनिक असणार आहे. ते पाचव्या पिढीचे विमान असेल. म्हणजेच तेजस-1 हे राफेलच्या तोडीचे लढाऊ विमान असेल. शत्रूच्या हद्दीतील लक्ष्यांवर तुटून पडण्याची प्रचंड क्षमता असलेले तेजस विमान वायुसेनेच्या ताफ्यात सामील झाल्यामुळे आपली ताकद वाढणार असून, आपले आक्रमक शेजारी त्यामुळे हैराण झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या