औषध

औषध

- हिमांशु चौधरी

गांजा हा शब्द गेल्या चार महिन्यांत कितीतरी वेळा उच्चारला गेला असेल. या पदार्थाचं नाव मुख्यत्वे बॉलिवूडच्या संदर्भात घेतलं गेलं आणि काही ग्रॅम वजनाचा गांजा पकडलाही गेला. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर जे असंख्य पैलू या प्रकरणाला चिकटले, त्यातला गांजा हा प्रमुख ठरला.

सुशांतची मैत्रिण आणि तिचा भाऊ यांना अटक करण्यात आली. कालांतरानं दोघांना जामीनही मिळाला. सुशांतच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे वर्ग झाल्यानंतरच्या संपूर्ण प्रक्रियेत गांजा फार महत्त्वाचा ठरला. मृत्यूच्या कारणाचा शोध अजूनही चालूच असला तरी या निमित्तानं बॉलिवूड हे गांजाचं आगर आहे, अशी सर्वसामान्य माणसाची धारणा झाली. बंद खोलीत घेतलेले सेलिब्रिटींचे जबाबसुद्धा वृत्तवाहिन्यांच्या पडद्यावर झळकत राहिले. सीबीआय हळूहळू दिसेनाशी होत गेली आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजे एनसीबीची भूमिकाच महत्त्वाची बनली. एवढं सगळं झाल्यानंतर गांजा हा अंमली पदार्थ नसून औषध आहे, असं ऐकायला मिळाल्यावर हा सगळा तपास चवीनं बघणार्‍यांचं काय झालं असेल? संयुक्त राष्ट्रांच्या अंमली पदार्थ आयोगाने धोकादायक ड्रग्जच्या यादीतूनच गांजाचं नाव काढून टाकलं. पण तोपर्यंत गांजा या विषयावर किती वेळ चर्वित्चरण झालं! गांजाचा वापर औषध म्हणून करण्याचा मार्ग या निर्णयामुळं मोकळा झाला आहे. भारताने गांजाला ड्रग्जच्या यादीतून हटवण्याच्या बाजूनं मतदान केलं हे महत्त्वाचं आहे.

एकंदर 50 देशांनी गांजाचं वैद्यकीय महत्त्व ओळखून त्याच्या बाजूनं मतदान केलं तर विरोधात मतदान करणारे 25 देश होते. अर्थातच, बहुमतानं गांजा ‘औषध’ ठरलं. म्हणजे, गांजाचं सेवन केल्याच्या आरोपावरून बॉलिवूडमधल्या जेवढ्या लोकांची चौकशी आणि अटका झाल्या, ते सगळे औषध घेत होते, असा याचा अर्थ. याच महिन्यात अमेरिकी संसदेतसुद्धा असाच ‘ऐतिहासिक’ निर्णय झाला. गांजाचा वापर कायदेशीर ठरवण्याच्या प्रस्तावाच्या बाजूनं कनिष्ठ सभागृहात 228 मतं पडली तर विरोधात 164 मतं पडली. म्हणजे, गांजा ओढणारे अमेरिकेतले शौकीनसुद्धा ‘सुटले एकदाचे’! तसं पाहायला गेलं तर भांग, चरस, मारुआना आणि गांजा हे पदार्थ एकाच ‘फॅमिलीतले’ मानले जातात. गांजाचं सेवन योग्य प्रमाणात केलं, तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या हानिकारक नाही, असं ब्रिटिशांनीच भारतात 1893 मध्ये नेमलेल्या एका कमिशनने सांगितलं होतं म्हणे! ‘बॉलिवूडचं ड्रग कनेक्शन’ म्हणून शेकडो बातम्या अक्षरशः गाजल्यानंतर ही माहिती मिळाली. त्यामुळं याप्रकरणी चौकशी झालेल्या बॉलिवूडकरांकडे कोणत्या नजरेनं पाहायचं, हेच लोकांना कळेनासं झालंय. रिया चक्रवर्तीपासून भारती सिंहपर्यंत सगळ्यांच्या घरात काही ग्रॅम गांजा सापडला. पण नेपोटिझम, पैशांचं कारण वगैरे मुद्द्यांवरून सुशांत प्रकरण गांजापाशी येऊन थांबलं.

आता तर गांजा बाळगणंही कायदेशीर ठरलं आणि सुशांतच्या मृत्यूचं गूढही नाही उकललं. सेलिब्रिटींच्या गाड्यांचा पाठलाग करून-करून रिपोर्टर मंडळींनी दोन-तीन महिने जी मेहनत केली, ती पाण्यात जायची वेळ आली. परंतु अशा वेळी आम्हाला मात्र मराठवाड्यातल्या शेतकर्‍याची आठवण होतेय. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी गांजाचं पीक घेण्याची परवानगी द्यावी, असा रीतसर अर्ज या शेतकर्‍यानं सरकारकडे केला होता. हे ऐकून लोकांना त्यावेळी जो धक्का बसला होता, तोही आता सौम्य होईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com