Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedमायावी

मायावी

– रियाज इनामदार

नवीन करोना..? ही काय भानगड? विक्री मंदावल्यावर स्टॉक क्लिअरन्स सेल लावावा किंवा नवनवीन ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित करावं, तसा हा विषाणूसुद्धा विझायला लागल्यावर पुन्हा पेटून उठतोय की काय? ब्रिटनमध्ये या ‘न्यू करोना’चे रुग्ण सापडल्यावर जगाने कपाळावर हात मारून घेतला.

- Advertisement -

ब्रिटनमधून येणारी विमानं विविध देशांनी रोखली. ब्रिटनबरोबरच दक्षिण आफ्रिकेतसुद्धा ङ्गन्यू करोनाफ आढळून आलाय. इटलीत एक पेशंट सापडल्यावर तिथं पळता भुई थोडी झाली. या नव्या प्रकारच्या करोना पेशंटला आयसोलेट करून ‘हाच एकमेव असावा’ यासाठी तिथली आरोग्य यंत्रणा प्रार्थना करू लागली. डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड अशा देशांनीही ‘नवा करोना’च्या आगमनाची पुष्टी केलीय. हा ‘नवा करोना’ किती घातक आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही; परंतु जग कोणताही धोका पत्करण्याच्या मनःस्थितीत नाही. ब्रिटनमध्ये ताबडतोब लॉकडाउन जारी करण्यात आलाय.

ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशन हा विषयही संपल्याचं ब्रिटनने जाहीर केलंय. हा ‘न्यू करोना’ झटपट पसरतोय, अशी माहिती मिळाल्यापासून शास्त्रज्ञ पुन्हा कामाला लागलेत. हा चतुर विषाणू स्वतःच्या रूपात बदल करून घेण्यात तरबेज आहे आणि अशी एकापाठोपाठ एक तो किती रूपं घेणार? त्यातली किती घातक असणार? याबद्दल काहीही समजायला मार्ग नाही. पुराणकथेतला मायावी राक्षसच झालाय करोना… जगाला ङ्गत्राही माम्फ करून सोडणारा!

केवळ सूक्ष्मदर्शकातूनच दिसू शकेल, असा एक लहानसा विषाणूसुद्धा, स्वतःला सर्वशक्तीमान समजणार्‍या मानवाला कसा गुडघ्यावर आणतो, आपल्या तालावर कसा नाचवतो याचा अनुभव संपूर्ण दुनियेनं तब्बल वर्षभर घेतलाय. व्यवहार, कामं, शिक्षण इत्यादी ऑनलाइन वगैरे सुरू करून ‘आम्ही हार मानणार नाही,’ असं निक्षून सांगणारेही आतून हादरलेले आणि वैतागलेलेच आहेत. अनेकांनी हे वर्ष कोविड-19 मुळं ‘डिलीट’ करण्याचा निर्णय घेऊन टाकलाय. आता विषाणूचा जो नवा अवतार आलाय, त्याला ‘कोविड-20’ म्हणावं का, असा खल सोशल मीडियावर चाललाय म्हणे! भारतातल्या वैद्यक क्षेत्राकडून प्राप्त माहितीनुसार, अद्याप तरी भारतात नवा विषाणू सापडलेला नाही.

परंतु आता कुणी बाधित आढळल्यास केवळ चाचणी करून भागणार नाही म्हणे! कारण आतापर्यंत आपण एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आहे की नाही, एवढंच पाहत होतो. इथून पुढे आपल्याला विषाणूची जनुकीय साखळीही पाहावी लागणार आहे. एकंदरीत जनजीवन पूर्ववत होण्याची आशा निर्माण होत असतानाच मावळली आहे. विषाणू जर बहुरुप्याप्रमाणं रूपं बदलून-बदलून येऊ लागला तर लढायचं कसं, हा प्रश्न मानवजातीला पडलाय. आपल्याकडे तर मुळातच सैन्य कमी. तेही थकलेलं आहे आणि त्याचवेळी विषाणूच्या नव्या अवताराची चाहूल लागलीय.

सलग वर्षभर चाललेला संसर्गजन्य आजार आपण पहिल्यांदाच पाहत आहोत. यापूर्वी असे काही आजार येऊन गेले; परंतु त्यावेळी वैद्यकशास्त्र आजच्याइतकं विकसित झालेलं नव्हतं. आजच्या काळात आपल्या शास्त्रज्ञांनी एका वर्षाच्या आत लस शोधून काढण्याची प्रक्रिया पूर्ण करून दाखवली. परंतु विषाणूनेही आपलं स्वरूप बदलून हुलकावणी दिली. हे नवं रूप तयार लशींना दाद देतं का, हेही पाहावं लागेल. थोडक्यात, लढाई मायावी राक्षसाविरुद्ध असल्यामुळं ती लांबत चाललीय आणि शेवट दिसेनासा झालाय.

- Advertisment -

ताज्या बातम्या