धोक्याची घंटा

धोक्याची घंटा

- प्रा. विजया पंडित

पृथ्वीच्या पाठीवर सर्वत्र कानाकोपर्‍यात प्लास्टिकचे मायक्रो आणि नॅनो कण आज अस्तित्वात आहेत. भोजन आणि श्वासांच्या माध्यमातून ते आपल्या शरीरात प्रवेश करतात.

लाल आणि पांढर्‍या रक्तपेशींच्या संपर्कात हे प्लास्टिकचे सूक्ष्म कण आल्यानंतर एका विशिष्ट प्रकारची रासायनिक प्रक्रिया घडवून आणते. या प्रक्रियेमुळे रक्तपेशी मरून जातात आणि त्या मेल्यानंतर हे विष हळूहळू शरीरातील अन्य पेशींनाही मारू लागते. आता तर हे कण गर्भातील बाळाच्या नाळेपर्यंत पोहोचल्याचे आढळून आले असल्याने धोक्याची घंटा वाजली आहे.

मायक्रो प्लास्टिक आणि नॅनो प्लास्टिकच्या धोक्यांविषयी भारतासह जगभरात अभ्यास सुरू आहे. अशाच काही अध्ययनांमधून अशी गोष्ट समोर आली आहे की, प्लास्टिकचे आत्यंतिक सूक्ष्म कण मानवी शरीरासाठी जीवघेणे ठरू लागले आहेत. हे कण शरीरात जमा होऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करू शकतात. काही दिवसांपूर्वी अमेरिकन केमिकल सोसायटीने केलेल्या एका अध्ययनात अशा प्रकारच्या 47 नमुन्यांची तपासणी केल्यावर शास्त्रज्ञांना हे अतिसूक्ष्म प्लास्टिक कण आढळून आले होते. अध्ययनासाठी फुफ्फुसे, यकृत, मूत्रपिंड आदी अवयवांमधील नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांमध्ये मायक्रो प्लास्टिक आणि नॅनो प्लास्टिक आढळून आले होते. या सर्व नमुन्यांमध्ये बीपीए (बिस्फेनॉल ए) हे रसायनसुद्धा आढळून आले. संपूर्ण जगाने चिंता व्यक्त केली असूनसुद्धा खाण्यापिण्याच्या वस्तूंचे पॅकिंग करण्यासाठी या रसायनाचा वापर सर्रास सुरूच जातो.

एन्व्हायर्नमेन्ट इंटरनॅशनल या नियतकालिकात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधात एका भयावह गोष्टीचा खुलासा करताना म्हटले आहे की, जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचलेले मायक्रो प्लास्टिक प्रथमच एका गर्भातील बाळाच्या नाळेतसुद्धा आढळून आले आहे. गर्भावस्थेत नाळेची निर्मिती गर्भातच होत असते आणि या नाळेच्या माध्यमातूनच गर्भातील बाळाला ऑक्सिजन आणि भोजन मिळत राहते. याच नाळेतून टाकाऊ पदार्थ गर्भाच्या बाहेर फेकले जातात. जन्मालाही न आलेल्या बाळाच्या नाळेपर्यंत मायक्रो प्लास्टिक पोहोचणे हा अतिशय चिंतेचा विषय आहे. या संशोधनाच्या दरम्यान 18 ते 40 वर्षे वयोगटातील सहा महिलांमधील गर्भनाळेचे विश्लेषण केल्यानंतर चार मायक्रो प्लास्टिकचे कण मिळाले होते. महिलांमध्ये पाच ते दहा मायक्रॉन आकाराचे बारा मायक्रो प्लास्टिकचे तुकडे मिळाले. त्यातील पाच तुकडे भ्रूणामध्ये आणि चार मातांच्या शरीरात मिळाले. तीन कण अन्यत्र आढळून आले.

नाळेत मिळालेले मायक्रो प्लास्टिक सिंथेटिक यौगिकांनी युक्त होते आणि या बारा कणांमधील नऊ कणांमध्ये सिंथेटिक रंगाची सामग्री आढळून आली. तिचा वापर क्रीम, मेकअप किंवा नेलपॉलिशसाठी केला जातो. तीन कण पॉलीप्रोपायलिनचे असल्याचे निष्पन्न झाले. याचा उपयोग प्लास्टिकच्या बाटल्या तयार करण्यासाठी केला जातो. संशोधकांनी नाळेच्या केवळ चार टक्के भागाचेच निरीक्षण केलेले असल्यामुळे कणांची संख्या आणखीही अधिक असण्याची शक्यता आहे. दहा मायक्रोन पर्यंतचे हे सर्व कण रक्ताच्या माध्यमातून सहजगत्या बाळाच्या शरीरात जाणे शक्य होते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हे कण आईच्या श्वासातून किंवा तोंडाच्या माध्यमातून शरीरात पोहोचले असतील.

शास्त्रज्ञांच्या मते, मायक्रो प्लास्टिक कण अशा विषारी पदार्थांचे वाहक म्हणून काम करू शकतात, ज्यामुळे बाळाच्या प्रतिकारशक्तीला नुकसान पोहोचू शकेल. त्यामुळे रोगांशी लढण्याची बाळाची क्षमता कमी होऊ शकेल. मायक्रो प्लास्टिक कणांमध्ये पॅलेडियम, क्रोमियम, कॅडमियम अशा विषारी धातूंचाही समावेश असतो. प्लास्टिकचे हे प्रदूषण अत्यंत घातक असण्याचे कारण असे की, हे कण अगदी सूक्ष्म असतात. इतके, की सामान्य डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. प्लास्टिकचे हे कण अगदी सहजपणे रक्ताच्या माध्यमातून शरीरात पोहोचू शकतात. प्लास्टिकच्या एक मायक्रोमीटरपासून पाच मिलीमीटरच्या तुकड्यापर्यंतच्या कणांना मायक्रो प्लास्टिक म्हटले जाते .या सूक्ष्म कणांचा वाढता धोका ओळखायचा असेल तर पृथ्वीच्या कानाकोपर्‍यात सर्वत्र हे कण आढळतात, यावरून धोक्याचे गांभीर्य सहज लक्षात येईल. जगातील सर्वांत उंचावर असणार्‍या हिमनदीपासून सर्वांत खोल समुद्रापर्यंत प्रत्येक ठिकाणी आता हे मायक्रो प्लास्टिकचे कण विखुरले आहेत.

काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या संशोधनात असे समोर आले होते की, वर्षभरात प्रत्येक माणसाच्या शरीरात भोजनातून किंवा पेयांमधून सुमारे दहा हजार मायक्रो किंवा नॅनो प्लास्टिकचे तुकडे पोहोचतात. कॅनडातील शास्त्रज्ञांनाही एका संशोधनादरम्यान मायक्रो प्लास्टिकचे अस्तित्व मोजण्यासाठी आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर असे आढळून आले की, वर्षभरात एक प्रौढ व्यक्ती मायक्रो प्लास्टिकचे सुमारे 52 हजार कण केवळ भोजन आणि पाण्याच्या माध्यमातून शरीरात घेत असते. जर यातच वायू प्रदूषणाद्वारे शरीरात झालेल्या मायक्रो प्लास्टिकच्या कणांचाही समावेश करण्यात आला तर प्रतिदिन सुमारे 320 म्हणजे वर्षभरात सव्वा लाख मायक्रो प्लास्टिकचे तुकडे खाण्यापिण्यातून आणि श्वासातून शरीरात पोहोचतात. बाटलीबंद पाण्यात हे सूक्ष्मकण असतात, हेही स्पष्ट झाले आहे.

ब्रिटनमधील हॅरियट वॉट विद्यापीठातील संशोधकांनी त्यांच्या एका अहवालात असा खुलासा केला आहे की, आपण ज्या-ज्यावेळी भोजन करण्यास बसतो, त्या त्या वेळी भोजनाबरोबर शंभराहून अधिक सूक्ष्मकण आपल्या पोटात पोहोचतात. वस्तुतः एकदा या संशोधकांना जेव्हा प्रयोगशाळेतील पँट्री डिशमध्ये असे कण आढळून आले, तेव्हा त्यांनी विचार केला, की जर आपल्या प्रयोगशाळेच्या पँट्री डिशमध्ये एवढे कण सापडू शकतात, तर घरच्या जेवणातून किती कण पोटात जात असतील! पँट्री डिशच्या तुलनेत घरची भोजनथाळी निश्चितच मोठी असते. त्यामुळेच त्यांनी घरच्या थाळीत किती मायक्रो प्लास्टिक कण असतात, याचा अभ्यास सुरू केला. त्यावेळी त्यांना असे आढळून आले की, एका मोठ्या थाळीत प्लास्टिकचे सरासरी 114 सूक्ष्मकण असतात. या अहवालानुसार, ब्रिटनमध्ये एक व्यक्ती वर्षभरात याच प्रकारे भोजनाच्या माध्यमातून प्लास्टिकचे 68415 कण गिळून टाकते.

प्लास्टिकचे हे सूक्ष्म कण आज प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात आहेत. मग ते कार्पेट असो, खुर्ची, सोफा असो किंवा अगदी आपल्या कपड्यांवरसुद्धा मायक्रो प्लास्टिकचे कण अस्तित्वात असू शकतात. हे कण आपल्याला दिसू शकत नाहीत आणि आपल्याही नकळत आपल्या पोटात त्यांचा प्रवेश होत राहतो. कारचे टायर, बांधकाम साहित्य आणि सौंदर्य प्रसाधन सामग्रीत असलेल्या रबराच्या घर्षणातूनही मायक्रो प्लास्टिकची निर्मिती होते. शीतपेयांच्या बाटलीत किंवा प्लास्टिकच्या थैल्यांमध्ये असणारे मायक्रो आणि नॅनो प्लास्टिकचे कण जगभरात प्रत्येक कानाकोपर्‍यात पर्यावरणाचे प्रदूषण करण्यास कारणीभूत असल्याचे आढळून आले आहे. मानवी शरीरावर या कणांचा होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी सखोल संशोधन सुरू आहे. शास्त्रज्ञांच्या मते, प्लास्टिक कणांमुळे किंवा रसायनांमुळे येणारी सूज किंवा पचनसंस्थेतील अवयवांचे नुकसान, हेच या कणांच्या दुष्परिणामांचे प्रारंभिक संकेत आहेत.

आपण कितीही काळजी घेतली तरी हवेत तरंगत असलेले प्लास्टिकचे सूक्ष्मकण श्वासाच्या माध्यमातून आपल्या शरीरात प्रवेश करीत असताना आपण त्यांना रोखू शकत नाही. शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की, मायक्रो प्लास्टिक मानवी शरीरात जाण्यापासून रोखण्यासाठी सर्वांत चांगला उपाय म्हणजे प्लास्टिकचे उत्पादन आणि वापर कमीत कमी केला जावा. मायक्रो प्लास्टिकचे कण हवेतून किंवा अन्नातून पोटात जाण्याबरोबरच लिपस्टिक, शॅम्पू आणि पाण्याच्या बाटल्या या माध्यमांमधूनही आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि रक्तातील प्रथिनांच्या कणांना चिकटून बसतात. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह मंदावू लागतो आणि रक्तात असलेले प्रथिन काम करणे बंद करते. संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, लाल आणि पांढर्‍या रक्तपेशींच्या संपर्कात मायक्रो आणि नॅनो प्लास्टिक कण आल्यानंतर एका विशिष्ट प्रकारची रासायनिक प्रक्रिया घडवून आणते. या प्रक्रियेमुळे रक्तपेशी मरून जातात आणि त्या मेल्यानंतर हे विष हळूहळू शरीरातील अन्य पेशींनाही मारू लागते. अमेरिकन केमिकल सोसायटीचे चार्ल्स रोलस्की असे सांगतात की, आता जगाच्या कानाकोपर्‍यात प्लास्टिकचे मायक्रो आणि नॅनो कण अस्तित्वात आहेत आणि प्लास्टिकचे उत्पादन सुरू झाल्यामुळे आपल्याला एके काळी जो अद्भुत लाभ झाल्यासारखे वाटले होते, त्याच्या उलट आपण प्लास्टिककडे फक्त एक मोठा धोका म्हणूनच पाहू शकू.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com