- प्रा. शुभांगी कुलकर्णी

इंटरनेटचा वापर करण्याच्या बाबतीत भारत जगात दुसर्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या स्थानावर चीन आहे. असे असले तरीसुद्धा भारतात इंटरनेटचा वापर करणार्यांमध्ये महिलांची संख्या खूपच कमी आहे.

देशातील बारा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील साठ टक्क्यांहून अधिक महिलांनी इंटरनेटचा वापर आजवर कधीच केलेला नाही. अनेक कौटुंबिक आणि सामाजिक कारणांनी महिला इंटरनेटपासून दूर राहत आहेत. माहिती आणि सजगतेच्या आजच्या युगात डिजिटल दुनियेत महिला पिछाडीवर राहणे हा चिंतेचा विषय ठरतो.

जागतिक स्तरावर लोकांना एकमेकांशी जोडणार्या इंटरनेटच्या वापराच्या बाबतीत भारतीय महिला खूपच पिछाडीवर आहेत. डिजिटल इंडियाच्या काळात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि प्रत्येकाला स्वस्त डेटा उपलब्ध असूनसुद्धा अर्ध्या लोकसंख्येला इंटरनेटपर्यंत सहजासहजी पोहोचता येत नाही. जागरूकता, संपर्क, विचारविनिमय आणि क्षणाक्षणाच्या घडामोडींनी परस्परांना जोडणार्या या दुनियेत अखेर महिलांचे प्रमाण एवढे अल्प का आहे, हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 2019-20 मध्ये करण्यात आलेल्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण-5 चा अहवाल असे सांगतो की, भारतात इंटरनेट वापरणार्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या खूपच कमी आहे. देशातील 17 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशांत इंटरनेटच्या वापराविषयी झालेल्या सर्वेक्षणाचा अहवाल असे सांगतो की, 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांत सरासरी दहापैकी सहा महिलांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात इंटरनेटचा वापर कधीच केलेला नाही.

इंटरनेटच्या दुनियेतील उपस्थितीशी संबंधित ही विसंगती दर्शविणारी स्थिती बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत आणि गुजरातसारख्या प्रांतांमध्येही दिसून आली आहे. महाराष्ट्रात सरासरी दर 10 महिलांमधील 4 महिलांनी तर गुजरातमध्ये 10 पैकी 3 महिलांनी आयुष्यात इंटरनेटचा वापर कधीच केलेला नाही. बिहारमध्ये तर या बाबतीत हैराण करणारी परिस्थिती समोर आली आहे. बिहारमधील 10 पैकी 8 महिला सायबर विश्वापासून अद्याप दूरच आहेत. विशेषतः ग्रामीण महिला इंटरनेटच्या वापराबाबत खूपच पिछाडीवर आहेत.

इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंंडिया (आयएमएआय) या संघटनेतर्फे गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या 'इंडिया इंटरनेट 2019' या अहवालात म्हटले आहे की, भारतात इंटरनेटच्या वापरात गतिमान वाढ होत असूनसुद्धा या वापरात लैंगिक पातळीवर प्रचंड विषमता आहे. या अहवालावरून असे दिसून आले आहे की, देशातील 25.8 कोटी पुरुष इंटरनेटचा वापर करतात तर महिलांचे प्रमाण मात्र त्या तुलनेत अर्धेच आहे. भारतात 67 टक्के इंटरनेट वापरकर्त्या पुरुषांच्या तुलनेत केवळ 33 टक्के महिलाच इंटरनेटचा वापर करतात. शहरी भागात 62 टक्के पुरुषांच्या तुलनेत 38 टक्के महिला इंटरनेट वापरतात तर ग्रामीण भागात 72 टक्के पुरुषांच्या तुलनेत अवघ्या 28 टक्के महिलाच इंटरनेटचा वापर करतात.

या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण-5 चा ताजा अहवालसुद्धा इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये महिलांचे प्रमाण प्रचंड कमी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. सर्वेक्षणात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, मेघालय, तेलंगण, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव तसेच अंदमान आणि निकोबार बेटे ही अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत, जिथे 40 टक्क्यांपेक्षा कमी महिलांनी इंटरनेटचा वापर केला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जगातील कानाकोपर्यात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे. भारतातसुद्धा महानगरापासून खेड्यापाड्यापर्यंत व्हर्च्युअल दुनिया विस्तारली आहे. प्रत्येक वयोगटातील आणि प्रत्येक वर्गातील लोक सायबर विश्वाशी जोडले गेले आहेत. एका ढोबळ अंदाजानुसार, देशातील सुमारे 74 कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात.

जगातील ज्या देशांमध्ये इंटरनेटचा वापर करण्याचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे, अशा देशांमध्ये भारताचा समावेश होतो. इंटरनेटचा वापर करण्याच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. पहिले स्थान चीनचे आहे. असे असले तरीसुद्धा भारतात इंटरनेटचा वापर करणार्यांमध्ये महिलांची संख्या खूपच कमी आहे. देशातील बारा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील साठ टक्क्यांहून अधिक महिलांनी इंटरनेटचा वापर आजवर कधीच केलेला नाही. डिजिटल विश्वात महिलांची इतकी अत्यल्प उपस्थिती अनेक प्रश्नांना जन्म देणारी आहे. गेल्या काही वर्षांत महिलांच्या साक्षरतेचीच नव्हे तर उच्चशिक्षण घेणार्या महिलांची आकडेवारीही वाढली आहे. देशात महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण सरासरी 87 टक्के आहे. अशा स्थितीत इंटरनेट वापरणार्या महिलांच्या संख्येकडे पाहताना त्यांच्या साक्षरतेची आकडेवारीही समोर ठेवली पाहिजे. सर्वेक्षणानुसार, ज्या राज्यांमधील महिला कमी संख्येने इंटरनेटचा वापर करतात, तेथील महिलांच्या साक्षरतेचा दरही कमी आहे. याचाच अर्थ साक्षरता आणि इंटरनेटचा वापर यांचा थेट संबंध आहे.

बिहारमध्ये महिला साक्षरतेचा दर सरासरी 57 टक्के एवढाच आहे आणि इंटरनेट वापरकर्त्या महिलांचे प्रमाण बिहारमध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत कितीतरी कमी आहे. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, ज्या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांत चाळीस टक्क्यांपेक्षा कमी महिला इंटरनेटचा वापर करतात, त्यात 20.6 टक्के इतक्या अत्यल्प आकडेवारीसह बिहार शेवटच्या पायरीवर उभा आहे तर 38 टक्के आकडेवारीसह महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. महिला आणि पुरुषांमधील हे अंतर काही सामाजिक-कौटुंबिक कारणांमुळेही दिसून येते. या कारणांमुळे इंटरनेटच्या दुनियेत महिलांची भागीदारी कमी आहे. घरात आणि घराबाहेर अशा दोन्ही ठिकाणी कष्ट आणि संघर्ष करीत असलेल्या महिलांचे प्राधान्यक्रम पुरुषांच्या तुलनेत खूपच वेगळे आहेत. ग्रामीण महिलांमध्ये डिजिटल साक्षरतेचे प्रमाण कमी आहे तर शहरी महिलांना सायबर छेडछाडीला सातत्याने सामोरे जावे लागते. ही दोन महत्त्वाची कारणेही अनुक्रमे ग्रामीण आणि शहरी महिलांना इंटरनेटच्या दुनियेपासून दूर घेऊन जातात.

इंटरनेटच्या दुनियेत होणारा अभद्र व्यवहार आणि सुरक्षिततेची कमतरता या कारणांमुळेही महिला वापरकर्त्यांची संख्या वाढण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. देशाच्या अनेक भागांत महिलांना तासन्तास पायी चालून पिण्याचे पाणी मिळवावे लागते तर जवळजवळ सर्वच भागांत घर आणि शेतातील जबाबदार्या सांभाळण्यासाठी महिलांना कठोर मेहनत करावी लागते. त्यांची जीवनशैलीच एवढी कष्टमय आहे, की त्यांना इंटरनेटशी जोडले जाण्यासाठी संधीच मिळत नाही. एवढेच नव्हे तर भारतात मोठ्या संख्येने महिला अशिक्षित आहेत. आर्थिकदृष्ट्या त्या कुटुंबातील पुरुष मंडळींवर अवलंबून आहेत. अनेक घरांमध्ये महिलांना इंटरनेटचा वापर करण्याचे स्वातंत्र्य दिले जात नाही. काही खेड्यांमध्ये तर मुलींनी आणि महिलांनी इंटरनेटचा वापर करू नये, असे फर्मानच गावच्या पंचमंडळींनी काढल्याचे दिसून येते.

सध्याच्या काळात इंटरनेटपासून दूर राहण्याचा अर्थ जागरूकता आणि सजगता वाढविणार्या माहितीपासून दूर राहणे असाच आहे. याच कारणामुळे देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला इंटरनेटचा वापर करण्याची सुविधा आणि संधी मिळत नाही, म्हणून त्या अनेक आघाड्यांवर मागे पडण्याची शक्यता बळावली आहे. माहिती आणि सजगतेच्या आजच्या काळात इंटरनेट हा एका मित्राप्रमाणे आहे आणि तो लोकांना एकमेकांशी जोडून ठेवण्याचे काम करतो, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. बातम्या समजण्यापासून एकमेकांची ख्यालीखुशाली समजण्यापर्यंत सर्वच पातळ्यांवर हे एक सक्रिय माध्यम बनले आहे. लोकांना बातम्या लवकर समजतात. इंडिया इंटरनेट-2019 च्या अहवालानुसार, गेल्या वर्षी देशात 45.10 कोटी मासिक सक्रिय इंटरनेट वापरकर्ते होते. देशातील सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येविषयीच्या इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालातही असे दिसून आले आहे की, पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण इंटरनेटच्या वापरात बरेच कमी आहे. याच कारणामुळे ग्रामीण भारतात डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत डिजिटल दुनियेतील लैंगिक विषमता दूर करण्यासाठी 'इंटरनेट साथी' या कार्यक्रमांतर्गत इंटरनेटच्या वापरासाठी महिलांना शिक्षित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. डिजिटल बाबतीत साक्षर असलेल्या महिला आपला समुदाय आणि आसपासच्या गावांमधील महिलांनाही प्रशिक्षित करू शकतात.

देशाच्या प्रत्येक भागात, प्रत्येक समाजघटकांमध्ये इंटरनेटच्या माध्यमाबाबत जागरूकता आणण्याचा प्रयत्न करण्याची सध्याच्या काळात गरज आहे. आजच्या या डिजिटल काळात आपले मत मांडण्यासाठी आणि माहिती गोळा करण्यासाठी महिलांनी इंटरनेटशी जोडून घेणे आवश्यक आहे. महिला आणि मुलींना शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित योजना आणि संस्थांची माहिती डिजिटल माध्यमातून जमा करणे सोयीचे जाईल. संपर्काचे आणि माहिती मिळविण्याचे हे एक सुलभ माध्यम आहे. त्यामुळेच डिजिटल दुनियेत महिला पिछाडीवर राहणे हा चिंतेचा विषय ठरतो.