- सत्यजित दुर्वेकर

परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल असो, ज्यानं तिचा फायदा घेतला नाही आणि पैसा कमावला नाही तो आळशी, हा तर आजच्या युगाचा नियमच! कोरोनाच्या प्रसारकाळात निःस्वार्थी वृत्तीनं काम करणारे, लॉकडाउनच्या काळात हातावरचं पोट असलेल्यांना घरोघर शिधा आणि अन्न पोहोचवणारे, जिवाचा धोका पत्करून रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देणारे ‘अपवाद’ या सदरात मोडतात.

कारण नियमानुसार अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही. गरजूंना मदत करणार्यांच्या तुलनेत परिस्थितीचा फायदा (किंवा गैरफायदा) घेऊन आपलं उखळ पांढरं करणारे कितीतरी अधिक संख्येनं आढळले. व्यवसायाशी संबंधित ज्ञानशाखांमध्ये ‘मार्केट सर्व्हे’ आणि ‘एनव्हायर्नमेन्ट स्कॅनिंग’ अशा गोष्टींचा रीतसर अभ्यास केला जातो. आपल्या भोवतालचं वातावरण काय आहे, लोकांना सर्वाधिक गरज कशाची आहे, हे ओळखून व्यवसायाचं नियोजन करणारे कधीच अपयशी ठरत नाहीत. समाजातल्या बहुसंख्य लोकांना एखाद्या गोष्टीची लाज वाटत असते तर एखाद्या गोष्टीची भीती वाटत असते. अशा भावना ‘एन्कॅश’ करणं हे चांगल्या मार्केटिंगचं लक्षण मानलं जातं. किंबहुना ‘फिअर ऑफ लॉस’ नावाचा एक फंडाच मार्केटिंगमध्ये वापरला जातो. म्हणजे भीती नसली तरी ती निर्माण केली जाते. मग मुळातच सर्वत्र भीती पसरलेली असेल, तर तिचा फायदा घ्यायला नको? बारकाईनं विचार करा. अशी अनेक ‘व्यवहारी’ माणसं कोरोनाकाळात भेटली असतील.

आज जगाला सगळ्यात जास्त काय हवंय? अर्थातच कोरोनाची लस. ही लस अजून तरी ‘बाजारात तुरी’च आहे; परंतु तिचं मार्केटिंग कितीतरी आधीपासून सुरू आहे. याच लशीचा आधार घेऊन आपला व्यवसाय कसा वाढवायचा, याचा आदर्श वस्तुपाठ अमेरिकेतील एका टूरिस्ट कंपनीनं घालून दिलाय. या कंपनीनं ‘वॅक्सिन टूरिझम’ म्हणजेच ‘लस पर्यटन’ ही संकल्पना शोधून काढलीय. बरेच दिवस हालचालींवर मर्यादा आल्यानंतर फिरणं हीसुद्धा लोकांना निकडीची बाब वाटू लागलीय. दुसरीकडे, लस आल्यानंतर ती आधी कुणाला मिळेल किंबहुना प्राधान्यक्रमानं कुणाला मिळायला हवी, याबद्दल जोरदार वाद-प्रतिवाद चाललेत. काहींच्या मते, श्रीमंत व्यक्ती लशीवर मोठा खर्च करू शकत असल्यामुळं तिथूनच लसीकरणाला सुरुवात होईल. काहीजण म्हणतात, की जे मूलतः व्याधीग्रस्त आणि वयानं ज्येष्ठ आहेत त्यांना लस आधी मिळायला हवी. म्हणजे लस आली तरी आपल्याला ती लगेच मिळणार की नाही, ही भीती आहेच! हीच भीती ‘एन्कॅश’ करण्यासाठी ‘वॅक्सिन टूरिझम’ची संकल्पना या कंपनीनं आणलीय. तीन दिवस, चार रात्रींचं हे पॅकेज आहे. मुंबई ते न्यूयॉर्क आणि न्यूयॉर्क ते मुंबई असा प्रवास, निवास, भोजन आणि लस असं हे पॅकेज आहे.

लसीकरणासह या ट्रिपसाठी पावणेदोन लाख रुपये आकारले जाणार आहेत. ‘मोजक्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच उपलब्ध’, ‘प्रथम येणार्यास प्राधान्य’ असे टिपिकल शब्द वापरून या ‘वॅक्सिन टूरिझम’ची जाहिरात व्हॉट्सअॅपवर सुरू झालीय. आपल्याकडे ज्या राज्यात निवडणूक, त्या राज्यात मोफत कोरोना लस, हा फंडा राबवला गेला. आता कंपन्या आपल्या व्यवसायवृद्धीसाठी ‘वॅक्सिन पॅकेज’ आणू लागल्या. असंच सुरू राहिलं तर एक दिवस कोरोनाचा विषाणू खरोखर तडकाफडकी निघून जाईल. निराश होऊन किंवा आश्चर्यचकित होऊन!