Monday, April 29, 2024
HomeUncategorizedघट्ट करुया सामाजिक वीण!

घट्ट करुया सामाजिक वीण!

– प्रा. शुभांगी कुलकर्णी

सामाजिक समरसता भंग करणारे लोक परग्रहावरून येणारे नसतात. ते आपल्यामधले आणि आपल्या आसपासचेच लोक असतात. शहरातील जागरूक नागरिकांनी आपले कर्तव्य निभावणे आणि अशा लोकांना वेळीच रोखणे आवश्यक आहे. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की, सोशल मीडिया, विशेषतः व्हॉट्स अ‍ॅपवरून नेहमी अफवा पसरविल्या जातात. आपल्या परिचयातील एखादी व्यक्ती असे करताना आढळून आल्यास त्याला समज देणे आपले काम आहे.

- Advertisement -

प्यू रिसर्च सेंटर या अमेरिकेतील नामांकित थिंक टँकने भारतातील धर्म, सहिष्णुता आणि फुटीरतावाद याविषयी एक विस्तृत सर्वेक्षण करून एक अहवाल जारी केला आहे. देशभरातील 17 भाषा बोलणार्‍या 30 हजारांहून अधिक लोकांशी बोलून त्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. हे सर्वेक्षण 2019 आणि 2020 या काळात करण्यात आले आहे. अहवालात असे म्हटले आहे की, भारतातील बहुतांश लोक स्वतःला धार्मिकदृष्ट्या सहिष्णू मानतात.

भारतात आपल्याला आपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे, त्यात कोणतीही अडचण नाही, असेही बहुतांश लोकांनी सांगितले. एकमेकांच्या धर्माचा आदर करणे आवश्यक आहे, याविषयीही भारतीय लोकांमध्ये सहमती असल्याचे दिसून आले. जीवनात धर्माला मोठे महत्त्व आहे, असेही बहुतांश भारतीयांनी सांगितले. शहरी विभाग असो वा ग्रामीण क्षेत्र असो, 60 टक्के भारतीय लोक पूजाअर्चा आणि उपासनेसाठी दररोज वेळ देतात, यावरूनच या गोष्टीचा अंदाज येतो. भारतीयांमध्ये धर्माप्रति समर्पणभाव आणि ओढ आहे, हेही यावरून स्पष्ट होते.

अहवालानुसार, बहुतांश लोकांचे म्हणणे असे होते की, सर्व धर्मांच्या लोकांनी एक सच्चा भारतीय असणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृती सर्वांत चांगली आहे, असे 85 टक्के मुस्लिमांनी सांगितले तर आपण भारतीय असल्याचा आपल्याला खूपच अभिमान आहे, असे 95 टक्के मुस्लिमांनी सांगितले. परंतु 24 टक्के मुस्लिमानी असे सांगितले की, भारतात त्यांना भेदभावाला सामोरे जावे लागते. आपल्याला भेदभावयुक्त व्यवहाराचा सामना करावा लागतो, अशी तक्रार 21 टक्के हिंदूंनीही केली. बहुतांश भारतीय, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, आपली ओळख आपल्या जातीशी जोडतात.

अनुसूचित जातींमधील लोकांशी भेदभावयुक्त वर्तन केले जाते असे दर पाच भारतीयांमागील एकाने सांगितले. या अहवालातून काही आश्चर्यजनक गोष्टी समोर आल्या आहेत. सुमारे 64 टक्के भारतीयांनी असे सांगितले की, त्यांच्या समुदायातील महिलांना अन्य जातींमधील पुरुषांशी विवाह करण्यापासून रोखले पाहिजे. हिंदू, मुस्लिम, शीख आणि जैन समुदायातील अधिकांश लोक आंतरजातीय विवाहास अनुकूल नसल्याचे दिसून आले आणि असे विवाह रोखले पाहिजेत असेच म्हणणे या सर्वांनी मांडले.

सामान्य जनजीवनात अनेक समानता असूनसुद्धा धार्मिक समूहांमध्ये अनेक प्रकारची विविधता असल्याचे या सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट स्वरूपात समोर आले आहे. उदाहरणार्थ, सुमारे 66 टक्के हिंदूंना असे वाटते की, त्यांचा धर्म इस्लामपेक्षा खूपच वेगळा आहे. 64 टक्के मुस्लिमांनाही असेच वाटते. अर्थात, दोन तृतीयांश जैन आणि जवळजवळ 50 टक्के शीख असे म्हणतात की, हिंदू धर्माशी त्यांचा धर्म अनेक बाबतीत समान आहे. आपले बहुतांश मित्र हिंदूच असल्याचे सर्वेक्षणात सामील झालेल्या अधिकांश हिंदूंनी सांगितले.

हीच परिस्थिती अन्य धर्मांचीही आहे. परंतु आपण अन्य धर्माच्या लोकांना आपल्या घरी किंवा गावात येऊसुद्धा देऊ इच्छित नाही किंवा त्यांच्या येण्यामुळे आपण नाखूश होऊ, असे खूपच कमी लोकांनी सांगितले. धर्मांतरांमुळे एखाद्या समूहाच्या लोकसंख्येवर फारसा परिणाम होत नाही, असे सर्वेक्षणात अनेकांनी सांगितले. सुमारे 82 टक्के हिंदूंनी असे सांगितले की, आपण हिंदू म्हणून जन्माला आलो आहोत आणि हिंदूच राहू. अन्य धर्मातील लोकांचीही अशीच मानसिकता दिसून आली. या सर्वेक्षणानुसार, 81 टक्के हिंदूंना गंगाजलाच्या पावित्र्याविषयी श्रद्धा आहे तर सुमारे 33 टक्के ख्रिश्चनसुद्धा गंगेला पवित्र म्हणतात.

उत्तर भारतातील 12 टक्के हिंदू, 10 टक्के शीख आणि 37 टक्के मुसलमान सुफी आणि त्यांनी सांगितलेला मार्ग अनुसरण्याविषयी अनुकूल दिसून आले. हिंदूंबरोबरच 77 टक्के मुसलमानही कर्मफळाच्या सिद्धान्तावर विश्वास ठेवतात. ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे सर्वच धर्मातील लोकांचे म्हणणे आहे. भारत आपल्या वैविध्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचे अनुसरण करण्याची मुभा आहे. या सर्वेक्षणातूनही या गोष्टीला पुष्टी मिळाली आहे. यातून एक गोष्ट सिद्ध होते ती अशी की, काही कुरबुरी दिसत असल्या तरी विविधता आवडणार्‍या व्यक्तींची संख्या भारतात घटलेली नाही. अन्य धर्माबाबत बहुतांश गोष्टींची माहिती नसतानासुद्धा

एकमेकांच्या धर्माचा आदर करायला हवा, अशी बहुतेकांची मानसिकता आहे. भारताचे ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे स्वरूप सहजासहजी धूसर होऊ शकणार नाही, याबाबत आपल्याला आश्वस्त करणारी गोष्ट हीच आहे. चिंतेची बाब अशी की, महिलांच्या बाबतीत सर्वच धर्मांतील लोकांचा दृष्टिकोन एकसारखा दिसत आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार, धार्मिक सहिष्णुता हीच देशाची खरी ओळख आहे, असे बहुतांश भारतीयांना वाटते. वस्तुतः या देशावर गांधीविचारांचा पगडा आहे. स्वतंत्र भारताचा पाया गांधीजींसारख्या व्यक्तींनीच रचला होता. महात्मा गांधींना आपण हिंदू आहोत, याचा अभिमान होता आणि ते अत्यंत धर्मनिष्ठ हिंदू होते. परंतु ते सर्व धर्मांचा आदर करीत असत.

श्रद्धा सहिष्णुतेवर आधारित असते, असे त्यांचे म्हणणे होते. महात्मा गांधींजवळ अहिंसा, सत्याग्रह आणि स्वराज्य या नावाची तीन आयुधे होती. सत्याग्रह आणि अहिंसेच्या त्यांच्या सिद्धान्तांनी केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील लोकांना अधिकार आणि मुक्तीसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. त्यामुळेच इतिहासातील सर्वांत मोठे आंदोलन अहिंसेच्या आधारे लढले गेले. भारतात धार्मिक समरसता आणि विविधतेत एकतेचे उदाहरण पाहायला मिळते, हेच भारतीय लोकशाहीचे सौंदर्य आहे. इथे वेगवेगळ्या जाती, धर्म, संस्कृतींचे आचरण करणारे लोक शतकानुशतके एकत्र राहत आहेत.

अशी विविधता जगात अन्यत्र पाहावयास मिळत नाही. हे भारताचे सर्वांत मोठे भांडवल असून, ते जोपासणे ही आम्हा सर्व भारतीयांची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे धार्मिक असणे वेगळे आणि कट्टरवादी असणे वेगळे, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. देशाच्या आर्थिक, सामाजिक किंवा अन्य कोणत्याही प्रकारची प्रगती सामाजिक शांतता आणि समरसता असल्याखेरीज शक्य होणार नाही, ही बाबही स्पष्ट आहे. आपली सामाजिक वीण कोणत्याही परिस्थितीत कायम राखणे ही आपली जबाबदारी ठरते. सरकारने सावध राहायला हवे, हे खरे आहेच; परंतु आपणही आपली जबाबदारी पूर्ण करायलाच हवी. सामाजिक समरसता भंग करणारे लोक परग्रहावरून येणारे नसतात.

ते आपल्यामधले आणि आपल्या आसपासचेच लोक असतात. शहरातील जागरूक नागरिकांनी आपले कर्तव्य निभावणे आणि अशा लोकांना वेळीच रोखणे आवश्यक आहे. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की, सोशल मीडिया, विशेषतः व्हॉट्स अ‍ॅपवरून नेहमी अफवा पसरविल्या जातात. आपल्या परिचयातील एखादी व्यक्ती असे करताना आढळून आल्यास त्याला समज देणे आपले काम आहे. आपण आपल्या देशाची सामाजिक समरसता कोणत्याही परिस्थितीत जोपासली पाहिजे.

- Advertisment -

ताज्या बातम्या