वास्तव आग ओकू लागले...

वास्तव आग ओकू लागले...

- राजीव मुळ्ये, पर्याावरण अभ्यासक

कॅनडामध्ये उष्णतेच्या लाटेमुळं शेकडो लोकांचा बळी गेलाय. हवामान तज्ज्ञांच्या मते या घटनेला ‘हीट डोम’ कारणीभूत आहे आणि तो जलवायू परिवर्तनाचाच परिणाम आहे. जागतिक तापमानवाढ, जलवायू परिवर्तन हे जळजळीत वास्तव आहे आणि ‘हीट डोम’सारख्या संकटाच्या रूपानं ते आता आग ओकू लागलंय. हे वास्तव वेळीच स्वीकारलं नाही, तर आपली आर्थिक आगेकूच वेगानं होत राहील; मात्र त्या प्रगतीचा उपभोग घेणं आपल्या नशिबी नसेल.

थं ड प्रदेश म्हणून प्रसिद्ध असलेल्या कॅनडासारख्या देशात उष्णतेची तीव्र लाट यावी आणि सुमारे पाचशे लोकांचा मृत्यू व्हावा, ही घटना अनेकांना अजब वाटते. कॅनडासह अमेरिकाही सध्या प्रचंड उष्म्याने त्रस्त आहे. कॅनडाच्या किनारी प्रदेशात सामान्यतः सरासरी सर्वाधिक तापमान वीस अंशांच्या आतबाहेर असतं. अंतर्गत भागात उन्हाळ्यातलं सर्वाधिक तापमान सरासरी 25 ते 30 अंश सेल्सिअसच्या आसपास असतं. परंतु मंगळवारी (दि. 6) लिटन या गावात कॅनडातील विक्रमी 49.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हा मजकूर लिहीत असेपर्यंतचा हा सर्वांत ताजा आकडा आहे. व्हॅन्कुव्हरपासून ईशान्येला साधारण अडीचशे किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाजवळ अतिउष्मा आणि विजा कोसळल्यामुळं जंगलात आगी लागल्या. रहिवाशांनी राहती घरं सोडून पळ काढला आणि केवळ 15 मिनिटांत हे गाव जळून नष्ट झालं. पश्चिम कॅनडात अशा प्रकारचे एकंदर 130 पेक्षा अधिक वणवे लागले आणि लाखमोलाची वनसंपदा भस्मसात झाली. कॅनडाप्रमाणंच उत्तर अमेरिकेतसुद्धा तापमानाचे सर्व विक्रम मोडीत निघत आहेत. उष्णतेची लाट म्हणून ही घटना ओळखली जात असली तरी वस्तुतः सामान्य लाटेपेक्षा कितीतरी भयानक अशी ती उष्णतेची सुनामीच आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते या घटनेला ‘हीट डोम’ कारणीभूत आहे. अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅट्मोस्फेअरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (एनओएए) दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा महासागरातील गरम हवेला पर्यावरण एका झाकणाप्रमाणे घेरून टाकतं, तेव्हा ‘हीट डोम’ची स्थिती निर्माण होते. ही अत्यंत असामान्य स्थिती मानली जाते आणि महासागरांच्या तापमानात बदल होतो तेव्हा ती तयार होते. या प्रक्रियेला ‘संवहन’ म्हणतात.

संवहनाच्या दरम्यान गरम हवा अधिकाधिक प्रबळ होत जाते. महासागराचा तळ या हवेला आणखी गरम करतो. तळातील गरम हवा मग वरच्या दिशेने समुद्राच्या पृष्ठभागाकडे येते. काही वेळा पृष्ठभागावरून हवा पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी म्हणजे समुद्रतळाशी जाते तर काही वेळा ती जमिनीच्या दिशेने येते. अशा वेळी उष्णतेची लाट येते. ‘हीट डोम’ची स्थिती कमीत कमी एका आठवड्यापर्यंत कायम राहते. कॅनडाच्या ज्या भागात उष्णतेची लाट आली आहे, तिथे कायम हवा थंड असते. त्यामुळं अनेक घरांमध्ये एअर कंडिशनर बसवलेले नाहीत. अशा घरांमध्ये राहणं आता लोकांना असह्य झालं आहे.

समुद्रतळाकडून पृष्ठभागाकडे आणि तिथून जमिनीकडे वाहणारी ही गरम हवा पिकांसाठीही अत्यंत घातक असते. अन्नधान्याच्या पिकांबरोबरच अन्य वनस्पतींचेही या हवेमुळं नुकसान होतं. अशा हवेमुळे काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असतो. अशा स्थितीत अनेक गोष्टी एकाच वेळी घडतात आणि त्या तापमान वाढवण्यासच कारणीभूत ठरतात. त्यातील एक म्हणजे जंगलात लागणारे वणवे. दुसरी गोष्ट अशी की, या काळात विजेची मागणी स्वाभाविकपणे प्रचंड प्रमाणात वाढते. त्या विजेची निर्मिती प्रक्रिया पुन्हा तापमानात भरच घालते. जंगलातील आगींमुळे प्रचंड नुकसान होतं.

हीट डोममुळं अमेरिकेत नेहमी जंगलात वणवे लागतात. हवामान तज्ज्ञांच्या मते, अशा अनपेक्षित पर्यावरणीय घटना म्हणजे हवामान बदलाचे, पर्यायानं जागतिक तापमानवाढीचे परिणाम आहेत. ‘एनओएए’ने 2017 मध्ये एक सर्वेक्षण केलं होतं. त्याच्या निष्कर्षात असं म्हटलं होतं की, अमेरिकेच्या सरासरी तापमानात एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपासून सातत्याने वाढच होत आहे. येत्या दहा वर्षांत आणखी भीषण उष्णतेचा सामना करावा लागू शकतो, असंही सर्वेक्षण अहवालात म्हटलंय.

गेल्या रविवारी कॅनडामध्ये तोपर्यंतचं सर्वाधिक म्हणजे 45 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं होतं. त्यापूर्वी सर्वाधिक तापमानाची नोंद 1937 मध्ये झाली होती. रविवारनंतर दररोज वेगवेगळे विक्रम प्रस्थापित करत तापमानानं पन्नाशीच्या आसपास मजल मारली.

एकट्या व्हँकुव्हरमध्ये उष्णतेनं 65 पेक्षा जास्त बळी घेतले. या उष्णतेचं वर्णन शब्दांत करता येत नाही, असं खुद्द कॅनडाच्या हवामान खात्यानं म्हटलंय, यावरूनच परिस्थितीचा अंदाज येतो. ब्रिटिश कोलंबिया भागात नोंदवलं गेलेलं तापमान लास वेगासमध्ये यापूर्वी नोंदवण्यात आलेल्या सर्वोच्च तापमानापेक्षाही अधिक आहे. बुधवारपर्यंत (दि. 7) ब्रिटिश कोलंबिया, युकॉन आणि वायव्य कॅनडातील अनेक भागांत विक्रमी उष्मा नोंदवला गेला. पोलिसांना दर तासाला किमान एका तरी व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा फोन येत होता. त्यामुळं या भागात जादा पोलिस कुमक तैनात करण्यात आली. लोकांसाठी हेल्पलाइन नंबर देणार्‍या पोलिसांना ‘केवळ आपत्कालीन स्थिती असेल तरच फोन करा,’ असं लोकांना सांगावं लागलं.

अमेरिकेत वॉशिंग्टन आणि ओरेगॉनमध्येही आतापर्यंतचं सर्वोच्च तापमान नोंदवलं गेलंय. ‘हीट डोम’मुळं कॅनडामध्ये अशा प्रकारे हाहाकार उडण्याची घटना गेल्या दहा हजार वर्षांत पहिल्यांदाच घडलीय. ‘हीट डोम’मुळं उष्णता वातावरणात मोठ्या प्रमाणावर पसरते. हवेचा दबाव आणि हवामानाचा पॅटर्न यामुळं अचानक बदलून जातो. उच्च दाबाच्या क्षेत्रात उष्णतेचा संचय होतो. या क्षेत्राच्या आजूबाजूची हवा आणखी तापते. या क्षेत्राच्या बाहेरची हवा बाहेरच अडकून राहते. ती या क्षेत्रात येऊ शकत नाही आणि या क्षेत्रीतली हवा बाहेर जाऊ शकत नाही. तज्ज्ञांच्या मते, ‘हीट डोम’सारखी घटना दहा हजार वर्षांमधून एखाद्या वेळी घडते.

जिथं कधीच एअर कंडिशनरची गरज भासली नाही, तिथं माणसं अशी अतिरिक्त उष्म्यानं मृत्युमुखी पडत असतील आणि सरकारला कूलरची व्यवस्था करावी लागत असेल, असे कूलर मोठ्या संख्येने बसविलेल्या स्टेडियममध्ये लोकांना आसरा घ्यावा लागत असेल, तर परिस्थिती गंभीरच म्हणावी लागेल. अनेक मोठ्या शहरांमध्ये मिस्टिंग स्टेशन तयार करण्यात आली आहेत. मिस्टिंग स्टेशन म्हणजे असं ठिकाण जिथं सातत्यानं पाण्याचे फवारे सोडले जातात. या ठिकाणाहून जाणार्‍या-येणार्‍यांना थोड्या वेळासाठी का होईना उष्म्यापासून दिलासा मिळतो.

करोनाच्या संसर्गाची भीती न बाळगता अशा ठिकाणी माणसं एकत्र येत असतील, तर उकाड्याची कल्पनाच केलेली बरी! ज्या शहरी भागांमध्ये झाडंझुडपं कमी प्रमाणात आहेत, तिथं हवेतला उष्मा इतका तीव्र झालाय, की विजेच्या केबल आणि रस्त्यांवरचं डांबर वितळून जाऊ लागलंय.

अनेक ठिकाणी रस्त्यांना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. ‘हीट डोम’ ही केवळ एक पर्यावरणीय घटना किंवा जलवायूची स्थिती म्हणून सोडून देता येणार नाही. ती का तयार झाली, याचा अभ्यास तर होईलच; परंतु ती पुन्हा घडू नये म्हणून काय करता येईल, याचा विचार करावाच लागेल.

महासागरांचं तापमान सातत्यानं वाढतच चाललंय. यावर्षी आपल्याकडे पावसाळा वेळेवर सुरू झाला म्हणून सगळे आनंदले. शेतकर्‍यांनी पेरण्याही केल्या आणि पाऊस गायब झाला. अतिवृष्टी आणि पुराच्या घटना आपल्याकडे दरवर्षी कुठे ना कुठे घडत असतातच. पावसाळ्यातले पावसाचे दिवस कमी झाले आहेत आणि एकाच दिवशी अधिक पाऊस पडण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. ढगफुटी, अतिवृष्टी, विजा पडणे या घटना संपूर्ण जगभरात वाढत चालल्या आहेत. नैसर्गिक आपत्तींची शंभर वर्षांपूर्वीची वारंवारिता आणि आजची स्थिती यात जमीन-

अस्मानाचा फरक आहे. ‘हीट डोम’ ही एक अशी परिस्थिती आहे, जिचा मुकाबला करणं सोपं नाही. त्यामुळंच कॅनडात एका पाठोपाठ एक मृत्यू होऊ लागले आणि पाहता-पाहता शेकडो माणसं दगावली. केवळ माणसांवरच नव्हे तर पशुपक्ष्यांहीट डोमचा प्रतिकूल परिणाम झाला. ङ्गहीट डोमफमुळं जंगलांमध्ये लागलेल्या आगीत असंख्य पशुपक्षी आपला नैसर्गिक अधिवास गमावणार आहेत. शेतीचं किती नुकसान झालंय, हे लगेच समजून येणार नाही. परंतु ती आकडेवारीही लवकरच हाती येईल.

जागतिक तापमानवाढ, जलवायू परिवर्तन हे जळजळीत वास्तव आहे आणि ‘हीट डोम’ सारख्या संकटाच्या रूपानं ते आता आग ओकू लागलंय. हे वास्तव वेळीच स्वीकारलं नाही, तर आपली आर्थिक आगेकूच वेगानं होत राहील; मात्र त्या प्रगतीचा उपभोग घेणं आपल्या नशिबी नसेल. जलवायू परिवर्तनाच्या संदर्भानं ज्या आंतरराष्ट्रीय परिषदा, बैठका होतात, त्यात चर्चेचा मूळ मुद्दा पर्यावरण हा नसतोच. चर्चेच्या केंद्रस्थानी ‘जीडीपी’च असतो. विकसनशील देशांचा वाढता ‘जीडीपी’ ही विकसित देशांच्या दृष्टीनं डोकेदुखी असते तर विकसनशील देश विकसित देशांच्या नावानं बोटं मोडत राहतात. जलवायू परिवर्तनासाठी कोण अधिक जबाबदार यावरच ओढाताण सुरू असते आणि या चर्चांशी ज्यांचा काडीमात्र संबंध नाही, अशा सामान्य लोकांना त्याची किंमत मोजावी लागते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com