दडी पावसाची, काळजी चिंतेची

दडी पावसाची, काळजी चिंतेची

-मोहन एस. मते

चार महिन्यांपूर्वी सरकारी आणि खासगी हवामान संस्थांनी मान्सूनबाबत सकारात्मक अंदाज वर्तवल्याने बळीराजासह सर्वच जण सुखावून गेले होते. मान्सूनचे आगमनही वेळेवर झाले. पण त्यानंतर दडी मारलेला मान्सून जुलैचा मध्य आला तरी बरसलेला नाही. परिणामी, कृषीग्रामीण अर्थव्यवस्थेसह एकंदरीतच अर्थचक्र चिंतेत सापडले आहे.

वर्षानुवर्षे कर्जबाजारीपणाचे जीणे जगणारा शेतकरी यंदा दुबार पेरणीचे संकट पेलण्याच्या कल्पनेनेच गतप्राण झाला आहे. अशा वेळी पुढील काही आठवड्यात पाऊस पडेल या आशेवर सरकारी यंत्रणांना राहून चालणार नाही. पावसाने दीर्घ विसावा घेतला तर पर्यायी उपाययोजना काय कराव्या लागतील याची तयारी आतापासूनच करावी लागेल.

वेधशाळेने किंवा हवामान विभागाने ४ महिन्यांपूर्वी प्रसारित केलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सूनचे आगमन झाले; पण तो नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात बरसेल असा ङ्गार मोठा दिलासा देणारा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. त्या अंदाजानुसार ८ जुलैपर्यंत आवश्यक एवढा पाऊस झालेला नाही. राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर अशा काही जिल्ह्यांतच जून महिन्यात पाऊस झाला आहे. परंतु उर्वरित अनेक जिल्ह्यांत पावसाने पाठ ङ्गिरवल्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

साधारणपणे राज्यात ७ जूननंतर पावसाचे आगमन होते. मृग नक्षत्राचा पाऊस कोसळायला सुरूवात होते. यादरम्यान शेतीची कामेही सुरू होतात. त्यापूर्वी काही भागांमध्ये रोहिणी नक्षत्राचा शिडकाव येऊन जातो. रोहिणी नक्षत्राचा पाऊस जर बर्‍यापैकी झाला असेल तर शेतकर्‍यांच्या पेरण्यांच्या कामाला वेग येतो. परंतु अलीकडील काळात पावसाच्या ठरलेल्या ऋतुमानाचे जे काही कर्तव्यचक्र आहे ते कोलमडल्याचे दिसत आहे.

जून ते सप्टेंबर पर्यंत या काळात पडणारा पाऊस हा संपूर्ण वर्षाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवत असतो. वेळेत येणारा पाऊस, पावसाची हजेरी ही संपूर्ण वर्षभरासाठीच्या अनेक प्रकारच्या कामांसाठीची शिदोरी असते. अन्न, धान्य उत्पादन आणि महत्वाचे म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न यावर विसंबून असतो. पाऊस जर पुरेसा आणि योग्य वेळी बरसला नाही तर पाण्याचे भीषण संकट निर्माण होते. भारत हा देश कृषिप्रधान असल्याने शेतीच्या उत्पादनावर या देशाचे अर्थकारणही निर्भर आहे. पाऊस थोडा जरी कमी जास्त झाला तरी त्याचा परिणाम अगदी शेअर बाजारावरही होतो. रोजगारव्यवसायही त्यामुळे प्रभावित होतात. अशा अनेक अर्थांनी आज राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे सर्वच जण चिंतेत आहेत. विशेषतः शेतकरी हवालदील झालेला आहे.

कोरोनासारख्या महामारीच्या काळात शेतीक्षेत्रावर मोठे संकट उभे आहे. पाऊस पडत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नैराश्य निर्माण झालेले आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये खेड्यापाड्यात, वाडी वस्तीत आतापासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली असून शेतीबरोबरच पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्‍चिम महाराष्ट्रात ऐन जुलै महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना त्रास सुरू झालेला आहे. दूरवर पाण्याच्या शोध घ्यावा लागतो आहे. याबाबत सरकारने आतापासून आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे.

गेल्या आठवड्यापासून प्रचंड उकाड्यांने सर्वत्र नागरिक हैराण झाले आहेत. वाढता उष्मा हा शेतकर्‍यांसाठीही काळजीचा ठरत आहे. पाऊस नसल्याने राज्यात पेरण्या खोळबंलेल्या आहेत. दुसरीकडे ज्यांनी पेरण्या केल्या आहेत ती पिके कोमेजू लागली आहेत. या स्थितीत दुबार पेरणीचे संकट दिसत असून शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. मृग आणि आर्द्रा या दोन्ही ही नक्षत्रांनी सुुरवातीलाच घोर निराशा केल्याने जवळपास सर्व खरीप हंगाम संकटात सापडलेला आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये जुलै महिना उजाडला तरीही समाधानकारक पाऊस नसल्याने जवळपास ८० टक्के पेरण्या झालेल्याच नाहीत. या सर्व जिल्ह्यांमध्ये नगदी पीक म्हणून पांढरे सोने (कापूस) पेरणीचे क्षेत्र सर्वाधिक असते. पाऊस नसल्याने तेथे पिके कोमेजू लागली आहेत.

पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला असला तरी याचा अर्थ पावसाचा भरवसा नाही. ज्या पावसाच्या शुभवर्तामानावर जगण्याचे आश्‍वासन मिळते त्या जगण्याविषयी आज कोणीच कशाची हमी किंवा खात्री देऊ शकत नाही. अनेक प्रकारच्या इच्छा लोकांच्या मनामध्ये असतात. पावसाची ही चांगली परिस्थिती लक्षात घेऊन समाजातल्या अनेक घटकांना आपापल्या उद्योग व्यवसायाची नवी रचना करता येते. अगदी शेतीतून होणारे चांगले अन्नधान्य उत्पादन हे उदरनिर्वाहापासून रोजगारचक्रावर परिणाम करणारे ठरते. चांगल्या पावसाची ही परिस्थिती समाजातल्या प्रत्येक घटकाला आपापले संकल्प किंवा योजना पूर्ण करण्यासाठी साहाय्यभूत ठरत असते. म्हणूनच चांगला पाऊस ही संपूर्ण वर्षाच्या चांगल्या परिस्थितीची खुणगाठ असते. त्यामुळेच यंदा वरूण राजाने पुढील दोन महिने सर्वाधिक पाऊस पाडून बळीराजाला दिलासा द्यावा अशीच प्रार्थना करण्याची वेळ आलेली आहे.

ज्या जून-जुलै महिन्याच्या काळात अनेक गावच्या नद्या आणि नाले दुथडी भरून वाहतात त्या अनेक नद्यांचे पात्र सध्या कोरडे ठणठणीत असल्याचे पाहून कोणाच्याही मनामध्ये सहजपणे भीती निर्माण होते. कारण या काळात पाण्याची होत असलेली टंचाई जाणवली तर पुढे काय परिस्थिती असेल, असा प्रश्‍न पडतो. पाण्याचे दुर्भिक्ष हे केवळ पिण्यापुरते संबधित राहात नाही तर त्याचा अनेक क्षेत्रावर मोठा परिणाम होतो. लक्षात न येणारी परंतु एक ठसठसणारी वेदना म्हणतात तशा प्रकारची अस्वस्थता सामाजिक पातळीवर निर्माण होऊ पहात आहे. शेतकर्‍यांना पुन्हा एका मोठ्या दुष्टचक्राचा सामना करावा लागतो आहे. विशेषत: कोरडवाहू शेतीसाठी कर्ज घेऊन पीकपाणी केलेल्या शेतकर्‍यांना पुन्हा कर्जबाजारीपणाचाच सामना करावा लागण्याची स्थिती निर्माण झाला आहे.

अन्नधान्याच्या उत्पादनावर त्याचा १०० टक्के परिणाम होऊ शकतो . आज सामान्य माणसाला महागाईच्या संकटाला तोेेंेड द्यावे लागत आहे. आजच्या परिस्थितीत भडकलेले इंधनाचे दर, जीवनावश्यक वस्तूंचे खाद्य तेलांचे, डाळीसाळीचे भाव वाढत आहेत. सरकारने महागाई कमी होत असल्याचा दावा केला तरी गेली २/३ महिन्यांपासून कमी पावसामुळे हीच महागाई पुन्हा उसळी मारूनवर येताना दिसत आहे.

गेल्या दोन वर्षापासून आजपर्यंत कोरोनोची दहशत आहे. कोरानाचा प्रभाव असूनही शेतकर्‍यांना शेतमजुरांना, व्यापार्‍यांना किंवा अगदी सामान्य नागरिकांना पावसाळाच्या काळातही जी काही आपली महत्त्वाची आणि आवश्यक जबाबदारी असते ती पार पाडणे आवश्यक असते. शेतकरी तसे धाडस दाखवतो आहे. जोखीम स्वीकारून काम करीत आहेत. मात्र शेतीवर तितकासा अवलंबून नसलेला सामान्य माणूस, ज्याचा रोजगार कोरोनामुळे अक्षरश: विस्कळीत झाला आहे, त्यांना या पावसाळ्याच्या अनियमित काळातही पुन्हा एकदा जोखीमच स्वीकारावी लागेल आणि आपला रोजगार टिकवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल.

पावसाने पाठ ङ्गिरवली असल्याने राज्यात आज ४० ते ५० टक्के भाग जुलै महिन्यातच दुष्काळजन्य परिस्थितीच्या तडारव्यात सापडला आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे.५०-५५ टक्केभाग कोरडा असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्वाभाविकपणे शेतीवरच्या रोजगाराची आशा मावळत आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगारासाठी नवीन मार्ग शोधावे लागत आहेत. पण रोजगाराच्या आशेने शहरांकडे पहावे तर तिथे लॉकडाऊन, निर्बंध आदींचे सावट आहे. अर्थचक्र सुरळितपणाने सुरू झालेले नसल्याने रोजगारांची प्रचंड टंचाई आहे. त्यामुळे राज्याचा ग्रामीण भाग अत्यंत चिंताग्रस्त बनला आहे. सरकारने याची तातडीने दखल घेतली पाहिजे.

माणसाने चंद्रावर, मंगळावर स्वारी केली तरी पावसाचे प्रमाण वाढवणे कोणाच्याही हातात नसते. पण म्हणून हातावर हात ठेवून स्वस्थ बसूनही चालणार नाही. संकटाची तीव्रता वाढण्यापूर्वी उपाय योजनांना सुरूवात केली पाहिजे. अचानकपणे आलेले दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांना आर्थिक अडचणीत आणणारेच म्हणावे लागते. खत, बियाणांच्या किंमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. याबाबत केंद्र सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सबसीडीची सरकारची घोषणा आवश्यक होती. त्या अगोदरच शेतर्‍यांनी बी- बियाणे विकत घेतलेले आहेत. त्यातच राज्यात अनेक जिल्ह्यात बोगस बियाणांचाही सुळसुळाट होत आहे. ही संकटे नैसर्गिक नाहीत. ती मानवी आहेत. ती कमी करणे, नाहीशी करणे हे आपल्या हातात आहे. ते शक्यही आहे. पण त्याबाबत नेहमीच दिसणारी उदासिनता कायम आहे. आज शेतमजुरांना काय काम द्यावे हा गंभीर प्रश्‍न बळीराजाला सतावतो आहे. कारण शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. अशातच दुबार पेरणीचा डोंगर कोसळला तर शेतकरी मातीत गाडला जाईल. त्यामुळे हे सर्व नुकसान भरून काढण्यासाठी ठोस उपाय महत्त्वाचे ठरतात.

निर्माण होत असलेली परिस्थिती कोणालाही डोळ्याआड करून चालणार नाही. कारण अन्नधान्य उत्पादनावर होणारे परिणाम हे नवे आर्थिक आव्हान निर्माण करणारे आहेत. म्हणून उपाय योजनादेखील तितक्याच विचारपूर्वक कराव्या लागतील आणि कुठेही अशा परिस्थितीमध्ये सामाजिक पातळीवर अस्वस्थता निर्माण होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com