स्टार्टअप्सची सुगी

स्टार्टअप्सची सुगी

- सुनिल चोरे, मनुष्यबळ विकास अभ्यासक

भारतातील अनेक लहान मोठ्या शहरात, ग्रामीण भागात विकासाची गंगा आता पोचत आहे. अनेक प्रकारच्या लहान सहान उद्योगांना स्थिरस्थावर होण्याची संधी मिळत आहे. स्टार्टअपमध्ये गुंतवणूकीची सुविधा देणार्‍या प्लॅटफॉर्ममुळे नवउद्योजकांच्या आणि गुंतवणूकदारांच्या नोंदणीत उल्लेखनीय वाढ झाली आहे.

विशेषत: दुर्गम भागातील शहरांत उद्योजकांना भांडवलाची उपलब्धता होत आहे. अशा प्रकारचे सकारात्मक वातावरण कायम राहिल्यास ग्रामीण भागातील सर्वसमावेशक गुंतवणुकीत सुधारणा होईल, विकासाची गती वाढेल आणि रोजगार वाढेल. भारत केवळ मोठ्या शहरांच्या आधारावर विकास करु शकत नाही. मुंबई, कोलकता, चेन्नई आणि बंगळूरसारखी महानगरे ही देशाला समृद्ध करत असताना दुसरीकडे अडचणीतही भर घालत आहेत.

कोरोना लाटेमुळे मोठ्या शहरातील शेकडो कामगार, असंघटीत कर्मचारी हे गावाकडे परतत आहेत. त्यामुळे या लोकांना रोजगार देणे गरजेचे आहे. बेरोजगार झालेले अनेक युवक आपल्या पातळीवर संशोधन करत आहेत आणि गुंतवणूक उभा करुन कंपनी सुरू करण्यासाठी धडपड करत आहेत.

या प्रवृत्तीमुळे मध्यम आणि लुघ उद्योगांची संख्या ग्रामीण भागात वाढत आहे. तज्ञांच्या मते, मोठ्या शहरात रोजगाराची स्थिती सध्या दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. जागेच्या अभावामुळे खर्च देखील वाढत आहे. या कारणांमुळे ग्रामीण भागात गुंतवणूक फायद्याची आणि सोयीची ठरत आहे. हा बदल वाटतो तेवढा सोपा नसला तरी युवा मंडळी त्यादृष्टीने प्रयत्न करत आहेत. सध्याच्या काळातही स्टार्टअपच्या जगात वेग आणण्यासाठी आणखी प्रयत्न होऊ शकतात. सरकारने देखील मोठ्या शहराऐंवजी लहान शहराचा विचार करायला हवा.

कशामुळे येतायेत अडचणी?

गावात, खेडोपाडी उद्योग चालवणे हे कधीही सोयीचे नव्हते. आज तर अकुशल कामगारांची संख्या वाढलेली असताना उद्योग उभारणे आणि चालवणे हे तर अधिकच जिकरीचे होऊन बसले. अशा काळात लहान उद्योग चालवण्यासाठी युवकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. अर्थात योग्य प्रशिक्षण दिल्यास युवकांना गुंतवणूक आणि संशोधनासाठी गरजेनुसार क्षेत्र दिसू लागतील. म्हणून खेड्यात आणि ग्रामीण भागात प्रशिक्षण केंद्रांची उभारणी करुन प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याची आवश्यकता आहे. यासाठी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग सुरू करायला हवेत. परंतु हा निर्णय घाईत घेण्यासारखा नाही. स्थानिक स्रोत, कौशल्य, गरज आणि मागणी या आधारावर उद्योगाचा निर्णय घेतला पाहिजे.

बाजाराचा अभ्यास गरजेचा

स्टार्टअप सुरू करताना किंवा स्टार्टअप कंपनीत गुंतवणूक करताना बाजारपेठेचे आकलन करणे गरजेचे आहे. विशेषत: स्थानिक बाजाराचा अभ्यास हा खूपच महत्त्वाचा आहे. वास्तविक काही स्टार्टअप्सची कार्यकक्षा ही देशाबाहेरही विस्तारु शकते. तरीही स्थानिक भाग आणि प्रादेशिक पातळीवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. टप्प्याटप्प्यात उद्योगाचा विस्तार करायला हवा. एकुणात भांडवलाची उपलब्धता असल्यास कोणताही व्यवसाय, उद्योगाचे कार्यक्षेत्र हे अधिक व्यापक राहू शकते.

भ्रष्टाचारावर अंकुश

लहान ठिकाणी उद्योग उभारणीतील मोठा अडसर हा भ्रष्टाचार आहे. बहुतांश युवकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या भ्रष्टाचाराचा सामना करावा लागला आहे. सरकारकडून मिळणार्‍या मंजुरीपासून ते खासगी पातळीवरच्या परवानग्या या आघाड्यांवर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सरकार किंवा लहान ठिकाणच्या प्रशासनाला स्थानिक उद्योगातील अडचणी तात्काळ समजू शकतात. अधिकार्‍यांचे किंवा कर्मचार्‍यांचे सहकार्य नसणे हे देखील लहान शहरातील विकासाला बाधक आहे. म्हणून लालफितीचा कारभार कमी केल्यास ग्रामीण भागात उद्योगशीलतेला चालना मिळू शकते. याशिवाय सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत असणारी चिंता देखील दूर करणे आवश्यक आहे.

विकासासाठी पुढाकार

‘नॅसकॉम’च्या एका अहवालानुसार 2020 मध्ये बंगळूर, दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबादसारख्या शहरात उभारलेल्या स्टार्टअपच्या तुलनेत ग्रामीण भागातील स्टार्टअपमध्ये उल्लेखनीय विकास होत आहे. अहमदाबाद, जयपूर, कोलकता, कोची, तिरुअनंतपूरम, कानपूर, इंदूरसारखे शहर हे स्टार्टअप हब म्हणून पुढे येत आहेत. धोरणात्मक पुढाकार आणि ‘वर्क फ्रॉम होम’ची वाढती सुविधा ही स्टार्टअप विकासाच्या पथ्यावर पडत आहे. याच आधारावर यूनिकॉर्न स्टार्टअप देखील वाढू शकते. गेल्या काही वर्षात कंझ्यूमर टेक्नॉलॉजीच्या नवीन उपक्रमात सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. त्यानंतर फिनटेक, खाद्य, कृषी आणि हॉस्पिटॅलिॅटीचे स्थान राहिले आहे.

याबाबत उदाहरण घ्यायचे झ्ल्यास रायपूर हे शहर पोलाद उद्योगासाठी ओळखले जाते. परंतु आता स्थानिक गुंतणूकदार उत्पादन, शिक्षण आणि वीजेसहीत अनेक क्षेत्रात रस घेत आहेत. ते म्हणतात, आपण आतापर्यंत 50 स्टार्टअप कंपनीत गुंतवणूक केली आहे. माझे काम केवळ गुंतवणूक वाढवण्याचे आहे. शेअर आणि सोन्याच्या क्षेत्रात अस्थिरता असताना स्टार्टअपमध्ये मात्र संपत्ती वाढत चालली आहे. त्यामुळे एकुणात स्टार्टअप क्षेत्रात ङ्गअच्छे दिनफ येत आहेत. स्टार्टअपमध्ये गुंतवणूकीची सुविधा देणार्‍या प्लॅटफॉर्ममुळे नवउद्योजकांच्या आणि गुंतवणूकदारांच्या नोंदणीत उल्लेखनीय वाढ झाली आहे. विशेषत: दुर्गम भागातील शहरांत उद्योजकांना भांडवलाची उपलब्धता होत आहे.

सुरवातीच्या टप्प्यात स्टार्टअप कंपन्या या दीर्घकाळापासून भांडवलापासून वंचित राहिल्या. परंतु आता गुंतवणूकीच्या संधी वाढत असल्याने सकारात्मक संकेत मिळत आहेत. स्टार्टअप कंपन्या गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय असला तरी म्युच्युअल फंड, गोल्ड, शेअर किंवा रिअल इस्टेटप्रमाणे वैशिष्ट्ये प्रदान करतीलच असे नाही. जर एखाद्या स्टार्टअपला दमदार गुंतवणूकदार लाभला नाही तर तो उद्योग फार काळ चालत नाही. सुरवातीच्या काळात स्टार्टअपना भांडवलासाठी बरेच कष्ट करावे लागले. कारण अपेक्षेप्रमाणे त्यांना पैसे मिळत नव्हते. आता गुंतवणूकदारांची वाढती संख्या हे स्टार्टअपला फायद्याचे ठरत आहे. जर एखाद्या विशेष स्टार्टअपच्या गुंतवणूकीच्या यादीत सारखा बदल होत असेल तर ही बाब उद्योगाच्या दीर्घकालीन विकासाच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम करु शकतो.

स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणारे प्लॅटफॉर्म 100 एक्स व्हीसीचे संस्थापक आणि भागीदार संजय मेहता म्हणतात की, स्टार्टअपमध्ये शुद्ध गुंतवणूक होते. यात प्रचंड मेहनतीची गरज आहे. एखाद्या उद्योगाची किंवा उत्पादनाची सर्वंकष माहिती जोपर्यंत मिळत नाही आणि समजत नाही,तोपर्यंत स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करु नये. दुसरीकडे गेल्या वर्षात ग्रामीण भागातील गुंतवणूक करणार्‍यांची संख्या ही अडीच पटीने वाढली आहे. गेल्या आर्थिक वर्षात लहान शहरात रोजगारांतही 12 टक्क्यांने वाढ झाली आहे. देशातील लहान शहरातील, ग्रामीण भागातील एकूण 120 स्टार्टअप कंपन्यांनी मे महिन्याखेरीस तब्बल 2.25 अब्ज डॉलर भांडवल गोळा केला आहे. उद्योग जगतातील अधिकार्‍यांनी स्टार्टअपमध्ये गुंतवणूकीचा ओघ हा दीर्घकाळापर्यंत चालेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी देशांतर्गत ग्रामीण विकासाच्या रिपोर्टचा दाखला दिला आहे.

स्टार्टअप गुंतवणूक ही संथगतीने श्रीमंतांच्या गुंतवणूकीच्या यादीत स्थान मिळवीत आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सुमारे 12 टक्के लोकांनी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे भांडवल उभा करण्याचे नवीन रुप म्हणून स्टार्टअपकडे पाहिले जात आहे. उदा. यूएस सिक्यूरिटीज अँड एक्स्चेंज कमिनशनने अलिकडेच फंडसाठी कमाल मर्यादा वाढवली आहे. क्राऊंड फंडिंगच्या माध्यमातून दहा लाख डॉलरपासून 50 लाख डॉलरपर्यंत निधी गोळा केला जावू शकतो.

ग्रामीण भागातील स्टार्टअप वेगवेगळ्या मार्गाने निधी जमा करत आहेत. सरकारने देखील गुंतवणूक सुरू राहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि सहयोगी संघटना आणि संस्थांना मदत करायला हवी. उद्योगाची सर्वात मोठी अडचण ही भांडवलाची असते आणि ही बाब सातत्याने समोर आली आहे. जर ही उणिव आपण दूर केल्यास देशाचा चेहरा बदलण्यास वेळ लागणार नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com